सकाळचा "च्या" ( वपु/शंकर पाटील .... स्टाईल )

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
10 Feb 2014 - 5:15 am

आमची प्रेरणा http://misalpav.com/node/4715
"सकाळचा "च्या"
"चहा" हा विषय घेवून व पु / शंकर पाटील कसे लिहीतील याची एक झलक.
वपु:-
बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणून नये ही म्हण ज्या टाळक्यतुन निपजली त्या टाळक्याला सलाम.
हल्ली मी चहा घेणे बंद केलय. नाही म्हणजे खूप काही महत्वाचे कारण नाही. पण सध्या घरात चहा पेक्षा घरातले वातावरण अधीक तापते. कारण म्हणाल तर मीच. मला सकाळी मस्त चहा लागतो. आमच्या ऑफिसातला तो कनक शहा म्हणतो. "जेनी चा बगडे एनी सवार बगडे " कनक शहा चं माहीत नाही पण माझी मात्र सकाळ बिघडते.
अरे एखादा रवीवार येतो मस्त लोळत पडायचे. लोकसत्ता , नवाकाळ, महाराष्ट्र टाईम्स हे वर्तमान बिघडवणारे सर्व प्रकार नजरे आड करायचे. मस्त तलत ची गझल किंवा किशोरी आमोणकरांची तोडी ची कॅसेट लावायचे. फोन , दारावरची बेल हे सगळे बंद करायचे. विज्ञानाने जे काही शोध लावलेले आहेत त्या पैकी दारावरची बेल हा एक नको असणारा शोध आहे..
मस्त गप्पा रम्गात आलेल्या असाव्यात आणि दारावरची बेल वाजएत. घरातल्या प्रत्येकाच्या कपाळावर सरासरी अडीच आठ्या चढतात. कोण कडम़अलय या वेळी..... हेच भाव असतात. अन दारात एखादा आवडता मित्र उभा असतो.
किंवा कोणी आवडती व्यक्ती येणार असेल या अपेक्षेने दार उघडले तर उत्साही प्रफुल्लीत चेहेर्‍याने दार उघडले जाते आणि दारात नावडते कोणी उभे असते. म्हणजे बघा तुमच्या कडे वहीदा रहिमान आली अशा आशेने उघडलेल्या दारात दारात सपट लोशन किंवा गजकर्ण मलम चा सेल्समन उभा असेल तर ?
नको असलेल्या पाहुण्याला कटवण्यासाठी एखादे संशोधन का नाही केलं कुणी.
तर काय सांगत होतो. चहा. रवीवारी सकाळी मस्त गझल किंवा शिवकुमारची झिंझोटी लावावी. मस्त किंचीत आले घातलेला चहा हातात असावा अन सोबत तितक्या उत्साही चेहेर्‍याने गप्पा मारायला बायकोला वेळ असावा. दाराने स्वतःच "डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावावा
हे ज्याना जमते त्याना भाळणे आणि संभाळणे म्हणजे नक्की काय ते माहीत असते." एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे संभाळण्याचे"

शंकर पाटील :-
कंदील जळावी तशी दुपार ढाणढाण जळत होती. झाडांच्या फांद्यांऐवजी नुसत्या तुराट्या उरल्या होत्या. बघावं तिकडे रानं कोरडी ठाक पडली होती. उस , ज्वारी , भुईमूग ही असली पिकं कधीकाळी या जमिनीत उगवत असतील यावर विश्वास ठेवणंही अवघड जात होतं. आखातीथीला नेहमी येणारा पाऊस आला नाही तेंव्हाच जरा मनात पाल चुकचुकली होती.
वैषाख वणवा म्हणताना अंगाची काहील करत आला तो जणू मुक्कामालाच राहीला. आषाढ श्रावण हे यायलाच विसरले.
आकाशातून पाण्याचा टिप्पूस देखील पडला नाही. नाही म्हणायला ढग यायचे अन वाकुल्या दाखवू जायचे.
वारा आला की रानारानातून नुसत्या धुळीचे लोट उसळत होते. रस्त्याची तीच गत.
रिकाम्या गोठ्याच्या सावलीत झोपलेला भिवा दूरवरून धूळीचा लोट दिसायला लागला तसा डोळे किलकीले करुन पाहु लागला. कोण आलं आसल ह्या वक्ताला. आन इतक्या उन्हात? कोणातरी लेंगा सदरा आन पांढरं मुंडासं घालून सायकल हाणत येत होतं
सायकलवाला जवळ आला अन भिवा समोर त्यानं सायकल थाम्बवली राम राम.
"राम राम "उन्हाच्या चटक्याने डोळे जळणारे डोळे साफ करुन आलेल्या पावण्याकडे पाहू लागला" कोन की? वळीकलं नाय जी .कोन गाव पावणं?."
"मी मी हातकलंङड्याचा. ध्यागुड्याचा रामा"
कसं काय येनं केलं जी येरवाळी ?
अलु हुतं असाच,
असाच? आन ह्या उन्हात? आजारी बिजारी पडायचं हाय का?
न्हाय जी.
मंग.
अलु हुतं. बाजाराचा धंदा हाय आपला.
कस्ला बाजार म्हनायचा?
आपला हाच की ? ते गुराढोराचा.
म्हंजी?
बाजारात गुरं इकतो.
अस्सं व्हय.
मंग हिकडं कुनीकडं आलाय?
बगत हुतो कुनाची गुरं हायेत का? पानी हाय का जरा प्यायला.
घ्याकी. गडव्यात आसलं तर बगा. . पावणा गडवा तोंडाला लावून घटाघटा पाणी प्याला.
हितं हायेत का गुरं कुनाची.
मस हायती की पर तुमाला कशाला पायजेत.
कशाला म्हंजी बाजारात न्यायला.
म्हंजी इकायला.....
व्हय.
काय करतात हो इकत घेनारे. मान्सास्नी प्यायला पानी न्हाय. गुराना कसं देत असतील. आन वैरन कुट्न्म मिळवत असतील ती लोकं?
काय करतात? ती शेरात पाठवत्यात.
शेरातली लोक गुरं पाळतात?
भिवाचा प्रश्न ऐकुन पाहुणा हासला. "शेरात कशाला गुरं पाळतील तिथं लोकास्नी रहायला जागा न्हाय. गुरं कसली पाळत्यात त्ये?
मंग काय म्हणून शेरात नेतात गुरं?
शेरात कारखाने असतात. गुरं तिथं नेतात. मशीनसमोर उभी करतात. मशीन मधे जनावर गेलं की धा मिंटात मशीन त्याचा फन्ना उडवतं.सगळं कसं अटुम्यायटीक असतं. सुर्‍याबीर्‍या सुद्धा मशीनच चालवतं. मंग डब्यात भरतात आन तिकडे अरबस्तानात पाठवत्यात.
आन शेरात ते गुरांच्या छावण्या का काय त्ये असतं ना?
कस्लं छावण्या गिवण्या घेऊन बसलाय राव. तिथं बी पानी न्हाय.
मंग. त्या छावण्यातली जनावरं कुटं जात्यात.
छावण्या नुस्त्या नावाला .तिथली जनावरं बी कारखान्यातच नेत्यात.
पावणा काहीबाही बोलत राहीला भिवा सुन्नपणे ऐकत राहीला.
आपल्या घरात वैरणपाणी नाही. जनावराला म्हणून कारभारीण नको म्हणत असतानाही गेल्याच आठवड्यात त्यानी तानी म्हशीला शहरातल्या छावणीत पाठवून दिले होते. भिवाला तानी म्हशीच्या धारोष्ण दुधाच्या चहाची आठवण झाली.
रिकाम्या गोठ्यातले तानी म्हशीचे दावे पाहू भिवाला भडभडून आलं. तो तसाच बसुन राहीला.
भिवा बोलायचा थांबलेला पाहून पावणाही थोडावेळ बोलायचा थांबला. अन पुन्हा बोलु लागला. तुम्ही भिवा नव्हं?.
व्हय
गेल्या बारीला आमच्य कंपनीचा एक दुसरा एजन्ट आला व्हता. त्याने तुमच्या म्हशीचे पैशे माझ्याकडे दिले आहेत. मला म्हणला अडेळकीच्या रस्त्याला दाभाड्याचं शेतं हाय तिथं भिवा म्हनुन कोणाला बी इच्यार. हे घ्या. आन या कागदावर पैशे मिळाल्याचा अंगठा उठवा.
डोळ्यातल्या पाण्यामुळं भिवाला सगळं अंधूक झालं. आसपासचं गोलगोल फिरु लागलं
कशाचा तरी आधार घ्यायचा म्हणून भिवाने हात लांब केला हाताला तानी म्हशीच्या दावणीचा खांब लागला.
दावणीच्या खांबाशेजारीच भिवा मटकन खाली बसला अन धुसमुसून रडू लागला.

भाषाप्रतिभा

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

10 Feb 2014 - 8:03 am | पाषाणभेद

जबरदस्त. हेच लेखक वाचतो आहे असे वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2014 - 8:21 am | अत्रुप्त आत्मा

क्लासिक! शंकर पाटिल मस्त प्रगटले एकदम!

सस्नेह's picture

11 Feb 2014 - 12:02 pm | सस्नेह

+१

बॅटमॅन's picture

10 Feb 2014 - 3:00 pm | बॅटमॅन

शंकर पाटील जास्त भिडले....

आतिवास's picture

10 Feb 2014 - 3:28 pm | आतिवास

वपुही उतरले आहेत अस्सल तुमच्या लेखणीतून.

मंदार कात्रे's picture

11 Feb 2014 - 3:18 pm | मंदार कात्रे

शंकर पाटील ..... ग्रेट!

विशाल चंदाले's picture

10 Feb 2014 - 3:52 pm | विशाल चंदाले

शंकर पाटील जास्त भिडले.... +1

जेपी's picture

10 Feb 2014 - 3:53 pm | जेपी

आवडल .

विअर्ड विक्स's picture

10 Feb 2014 - 5:48 pm | विअर्ड विक्स

दोन्ही कथा उत्तम जमल्या आहेत….

मुक्त विहारि's picture

10 Feb 2014 - 7:52 pm | मुक्त विहारि

"कशाचा तरी आधार घ्यायचा म्हणून भिवाने हात लांब केला हाताला तानी म्हशीच्या दावणीचा खांब लागला."

सॉलीड...

ह्या वाक्या नंतरचे वाक्य जरा अंधूकच दिसले....

साल्ला अजून माझी कातडी गेंड्याची झाली नाही.आमच्या सारख्या माणसांचे कसे होणार, कुणास ठावूक?

समीरसूर's picture

10 Feb 2014 - 11:43 pm | समीरसूर

खूप छान लिहिले आहे. :-)

बाबा पाटील's picture

11 Feb 2014 - 11:44 am | बाबा पाटील

दोन्ही आवडले...

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2014 - 12:58 pm | llपुण्याचे पेशवेll

विजुभाऊ सुंदर लिहीले आहे. मस्तंच. शंकर पाटील तर अगदी तंतोतंत उतरले आहेत.

पैसा's picture

11 Feb 2014 - 1:04 pm | पैसा

दोन्ही कथा आवडल्या. "वपु" वाचताना त्यांची शैली आठवून जाम हसायला येत होतं. आणि "शंकर पाटलां"चीही 'धिंड'सारखी एखादी फर्मास कथा असेल म्हणून वाचायला सुरुवात केली आणि डोळ्यात पाणी आणलंत राव! शैलीची कॉपी चांगलीच पण स्वतंत्र कथा म्हणूनही उत्तम जमली आहे.

प्यारे१'s picture

11 Feb 2014 - 1:21 pm | प्यारे१

विजुभौ भारी लिहीतात. आवडलं.

वर वपुंपेक्षा शंकर पाटील जास्त भिडले.
तसंही वपुंचं राऊंड राऊंड मेरी गो राऊंड जाणवतं. (वैयक्तिक मत)
मागे एक छान धागा आलेला, बर्‍याच लेखकांच्या शैलीत दादर फुलबाजाराचं वर्णन होतं. (विजुभौंचाच होता काय?)

मागे एक छान धागा आलेला, बर्‍याच लेखकांच्या शैलीत दादर फुलबाजाराचं वर्णन होतं. (विजुभौंचाच होता काय?)

होय, त्यांचाच होता.

प्रीत-मोहर's picture

11 Feb 2014 - 2:02 pm | प्रीत-मोहर

वपुंपेक्षा शंकर पाटील जास्त भिडले. :)

इन्दुसुता's picture

13 Feb 2014 - 9:33 am | इन्दुसुता

दोन्ही आवडले.

झकासराव's picture

13 Feb 2014 - 9:55 am | झकासराव

दोन्ही जमलेत. :)

शंकर पाटिल स्टाइल तर हुबेहुब, तन्तोतन्त.

चिगो's picture

13 Feb 2014 - 11:42 am | चिगो

दोन्ही जमलेत..

एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे संभाळण्याचे

हे टिपीकल वपुस्टाईल.. अगदी वपुर्झा मधून असल्यासारखेच..

दुसरी कथा तर जबरदस्त.. शंकर पाटलांची शैली म्हणूनच नव्हे, तर स्वतंत्र कथा म्हणूनही जबरा कथा झालीय.

विजुभाऊ's picture

13 Feb 2014 - 11:42 pm | विजुभाऊ

धन्यवाद
पुढील वेळेस सम्पूर्ण कथा वपुंच्या स्टाईल मधे लिहीन.

विजुभाऊ's picture

22 Nov 2020 - 7:11 pm | विजुभाऊ
पहाटवारा's picture

14 Feb 2014 - 7:12 am | पहाटवारा

ऊत्तम कथा - दोन्हीहि .. दुसरी जास्तच !
येउ द्या थोड्या मोठ्या !
-पहाटवारा

सुबोध खरे's picture

17 Feb 2016 - 7:10 pm | सुबोध खरे

+१

उडन खटोला's picture

14 Feb 2016 - 9:46 pm | उडन खटोला

येकदम लय भारी !

जबरदस्त लेखनशैली

सिरुसेरि's picture

16 Feb 2016 - 5:54 pm | सिरुसेरि

दोन्हीही ऊत्तम कथा . रेडिओवरची "आनं आमी काय उनपाणी पितो का काय ? आमीबी आमच्या आबा आज्यापासनं मगदुम च्याच पितो" हि जाहिरात आठवली.

प्राची अश्विनी's picture

16 Feb 2016 - 7:23 pm | प्राची अश्विनी

छान खुसखुशीत कथा!

जव्हेरगंज's picture

16 Feb 2016 - 7:24 pm | जव्हेरगंज

शंकर पाटील स्टाईल आवडली!!!

नुस्त्या उचापती's picture

16 Feb 2016 - 7:51 pm | नुस्त्या उचापती

व पु आणि शंकर पाटिल म्हणजे मराठी कथा विश्वातील दिग्गज .

अस्सल ग्रामीण कथा लिहावी , ती फक्त शंकर पाटलांनीच . त्यांच्या कथेत जागोजागी गावरान गोडवा दिसून येतो .

हल्ली असे दर्जेदार ग्रामीण कथाकार पाहायला मिळत नाहीत .

वपुंविषयी तर काय बोलावे ?त्यांचे लेखन म्हणजे जणू सुविचार संग्रहच . प्रत्येक वाक्य डायरीत नोंदवावं असं .

हे आणि असे असंख्य साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच .

हेमंत लाटकर's picture

18 Feb 2016 - 1:47 pm | हेमंत लाटकर

मस्तच विजूभाऊ

राजाभाउ's picture

18 Feb 2016 - 2:55 pm | राजाभाउ

विजूभाउ,
दोन्हीही हुबेहुब जमले आहे.

हे ज्याना जमते त्याना भाळणे आणि संभाळणे म्हणजे नक्की काय ते माहीत असते." एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे संभाळण्याचे

हे तर खास वपु स्टाइल

शंकर पाटील जास्त भिडले हे मात्र खरं

टर्मीनेटर's picture

19 Nov 2020 - 5:41 pm | टर्मीनेटर

(फिरसे एक बार) मान गये विजुभाऊ आपको...🙏
जैरात वाचून इथे आल्याचे सार्थक झाले! खूप आवडले दोन्ही प्रसंग 👍

सिरुसेरि's picture

19 Nov 2020 - 9:18 pm | सिरुसेरि

मस्त लेख . वपु , शंकर पाटिल / व्यंकटेश माडगुळकर यांच्या शैलीची आठवण करुन देणारा च्या शेवटाला गपगार करुन गेला .

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2020 - 1:07 pm | चौथा कोनाडा

व्वा, विजूभाऊ .... एक नंबर !

👌

दोन्ही खतर्नाक हुबेहुब ! शंकर पाटील स्टाईलने तर काळजाला हात घातला !

लगे रहो विजुभाय !