सकाळचा "च्य़ा "

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
21 Nov 2008 - 12:34 am

"कसला ह्यो च्या म्हणायचा?? दे वोतुन मोरीत...!!!" आबा कडाडले.. ..

नवीनच लग्न होऊन आलेल्या आबांच्या सुनेचे डोळे भरून आले ... तरीही मन घट्ट करून तिने विचारलेच, "आबाजी, काय झाल जी? चहा गुळमाट झाला व्हय? पर दिसायस तरी बेस दिसतोया... "

"अग बाय, दिसण्यात आणि असण्यात वाईच तरी फरक अस्तो का न्हाय?? तूच पिऊन बघ ह्यो च्या, म्हंजी समजल तुला बी...."

"आता उरला नाय, व्ह्ता नव्हता त्यो समदा तुम्हासणीच दिला नव्हं...." सुनेने उत्तर दिले.

" सक्काळच्या पारीचा "च्या" कसा पाइजी ठाव हाय का तुला?" आणि आबा चहाच्या वर्णात बुडाले... "कडक, ताज्या दुधाचा, दाटसर, गवती पात, जरा येलची पुड घातलेला, नुसत्या चहाच्या वासानंच मन तिप्त व्हावं असा....ह्या आजकालच्या पोरी च्या करत्यात म्हणं, ह्यो त्यांनी केलेला च्या पिण्या पेक्षा म्हशीच मु* पिल्याल परवाडल..!!" आबा चहाच्या समाधीतुन जागे होत बोलले.
"माझी सुलू गेल्यापासन "च्या" काय मला मनाजोगता मिळना... " आबांच्या तोंडाची बडबड चालूच होती.. आणि आबा त्यांच्या जुन्या दिवसात, बायकोच्या आठवणीत रमून गेले.

आबा तसे सधन शेतकरी. २० एकर बागायती जमीन, ४ म्हशी,२ गाय, बैलाची जोडी,बैलगाडी, शेतात राबायला गडी माणसं, आणि आबांच्या आणि सुलुच्या स्वभावामुळे माणसाला माणूस जोडलेला. घरी येणा-य़ा जाणा-या लोकांचा राबता ही भरपूर.
आबांचे आई - वडील आबां लहान असतानाच वारले. आबा त्यांच्या मामापाशीच लहानाचे मोठे झाले. आबांच्या मामानेच आबांची शेतीवाडी सांभाळली, आणि आबांचे लग्न झाल्यावर आबांच्या स्वाधीन केली. पुढे आबांनी मेहनतीने त्यात अजून भर पाडली.
सुलू, आबांची बायको. सकाळी सुलूच्या हातच्या चहा प्यायची आबांना इतकी सवय झाली होती की, दुस-य़ा कोणी चहा केलेला त्यांच्या पसंतीस उतरत नसे.

सुलू सकाळी लवकर उठून सडा-रांगोळी, देव पूजा करे. तो पर्यत आबा उठायचे, ते आंघोळीला गेले, की सुलू म्हशींच्या धारा काढायला जायची. आबांची देवपूजा होईपर्यत दोघांसाठी ताज्या दुधाचा चहा ठेवायची. आबांची देव पूजा झाली, की चहा घेण्यासाठी आबा माजघरात येत. आबांनी चहाचा पहिला घोट घेईपर्यत सुलूचे डॊळे आबांच्या डॊळ्यांशी गुंतलेले असत. आबांनी चहाची दाद डॊळ्यांनी दिल्यावरच सुलू सुखावे ,आणि तिच्या घशातून चहाचा घोट खाली जाई. अशी चहाबरोबर प्रेमाचीही देवाण घेवाण करून त्यांचा दिवस चालू होत असे. सुलूच्या चहाचे कौतुक आबा सगळ्यांजवळ करत, आणि आबांच्या कौतुकभरल्या प्रेमात सुलू सुखावत असे. अशा अनेक आठवणी आबांच्या चहाशी जोडल्या होत्या.

सुलू आबांना सोडुन देवाघरी जाऊन काही महिनेच झाले होते. घरातल बाईपण संपू नये म्हणून आबांनी सुलू गेल्यावर थोड्या महिन्यांतच लेकाचे लग्न करून घरात सून आणली. आबांची सून नेहमी आबांना आवडेल तसा चहा करायचा प्रयत्न करायची, पण आबांना तो काही पसंतीस उतरत नसे. इतर सगळ्या गोष्टींत बापाच्या मायेने समजून घेणारा सासरा, चहा मनासारखा मिळत नसल्याने सुनेवर चहावरून मात्र नाराज होई! मग एके दिवशी परत आबांनी चहा वरून बोलायला सुरू केल्यावर, न राहवल्यामुळे सून आबांना बोलली, "तुम्हासनी तरी जमतो का,तुम्हाला पाहिजे तसा च्या कराया..? " सुनेच्या ह्या वाक्यानी आबांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या, आणि आज पर्यत कधीच चहा देखिल न केलेल्या आबांनी चहा साठी चुल फुंकली!!

एकाच दिवसात सात-आठ वेळा स्वत: केलेला चहा त्यांना पसंत पडला नाही, त्यामुळे ते चहा जाऊन ओतून येत आणि परत करत आणि मग त्यांना हव्या तशा चवीचा चहा बनविण्यात ते यशस्वी झाले. त्यावेळी त्याच्या चेह-यावर लहान मुला आनंद दिसत होता!!

आबांनी सुनेला आनंदाने हाक मारली, आणि स्वत:च्या हाताने बनविलेला कपात ओतला. सुनेला बोलले, "घे दोन घोट, बघ कसा लागतोया! ह्यो ज्यो मी केला नव्हं, त्यास "च्या" म्हणत्यात!!" स्वत:वरच खुश होत भुर्रर्रर्र आवाज काढीत चहा संपविला!

त्यांच्या चेह-यावरील तो आनंद पाहुन सुनेच्या डोळ्यांतुन अश्रू वाहू लागले!

कथासाहित्यिकप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Nov 2008 - 12:41 am | यशोधरा

शीतल, मस्त गं :)

भाग्यश्री's picture

21 Nov 2008 - 12:52 am | भाग्यश्री

मस्तच ! :)
'तू' ' चहावर' लिहीणार याची खात्री होती! :)

(चहाप्रेमी) भाग्यश्री
http://bhagyashreee.blogspot.com/

टारझन's picture

21 Nov 2008 - 10:04 pm | टारझन

च्या भारी च्च ... आबाच्या चिकाटीला सलाम...
शेवटी आबाला त्याच्या आवडीचा च्या जमल्यावर सुन त्या च्याला छ्या म्हणेल का काय असं वाटून गेलं..

(गवती चहा) टारझन

प्राजु's picture

21 Nov 2008 - 12:52 am | प्राजु

छान जमली आहे लघुकथा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

21 Nov 2008 - 1:11 am | अनामिक

खरच! चहा असावा तर नुसत्या आव्या दुधाचा (पाणी न घालता)... थोडं आलं घातलेला... आलं नसलं तर तुळशीची पाने घातलेला... सोबतीला थोडी वेलची कुटून घातलेली... योग्य प्रमाणात चहा पत्ती आणि अगदी थोडी साखर... मस्त बदामी रंग येई पर्यंत उकळलेला.... आहा! विचार करुनच चहा प्यायची तलप जागी झाली!

शितल तै, छोटेखानी कथा आवडली....!!!

बाकी वर लिहिल्याप्रमाणे चहा आवडत असला तरी माझी कोणत्याच चहाला ना नसते... 'च्या' आमचा वीक पॉंईंट.... म्हणतात की चहा ने झोप जाते... पण शिकायला असताना रात्री २-३ वाजता मित्रांबरोबर टवाळक्या करून झाल्यावर कोठेतरी चहाची टपरी शोधायची... नुसता पाण्याचा चहा मिळाला तरी ढोसायचा... त्या शिवाय झोपच येत नसे..... नंतर पुण्यात असताना रात्री-बेरात्री फक्त स्वारगेट किंवा शिवाजीनगर स्टेशनलाच चहाची तहान भागवायचो (कारण बाकी सगळी अमृततुल्य बंद असायची).... तसं नंतर भांडारकर रोडवर एक छोटा चहा/कॉफीचं शॉप होतं जे रात्री ३ पर्यंत तरी उघडं असायचं... मग तिथं जायचो... बोनस म्हणून तिथं हाय-फाय सोसायटीतल्या, आपापल्या बॉयफ्रेंड बरोबर आलेल्या पोरी टापायला मिळायच्या....!! मजा यायची!!!

'च्या' बद्दल बऱ्याच जणांनी लिहलय आधी... पण चहा वाचायला आणि प्यायला कधीही आवडतो...

तसंही कुठेतरी वाचलं/ऐकलं आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवावं.... "बाईनं कुंकवाला अन मर्दानं च्या ला कदी ना म्हणू नै! "

(चहाप्रेमी) अनामिक

अवांतरः निळू फुले च्या सपट च्याची आठवण आल्यापासून राहवले नाही!

कपिल काळे's picture

21 Nov 2008 - 1:46 am | कपिल काळे

अरे ही कथा वाचताना सांगली आकाशवाणी वर लागणारी एक जाहिरात आठवत होती. अनामिक ने त्यातील एकच ओळ लिहिली आहे. ती जाहिरात अशी

"राम राम दौलतराव"
"राम राम"
"सून बाई दोन चा टाका पाहू"
"नगं नगं"
"का? अवो सिवासिनीने कुकवाला आनि मर्दाने चा ला नगं म्हनू नये"
"पन आमी न्हेमी मर्दांचा कडाक मग्दूम चा च पितो"
" मंग आमी का उन पानी पितो काय?, आमी बी आमच्या आबा आज्ज्यापास्न मग्दूम चा च पितो"
"अश्शी, मंग हून जाउद्या डब्बल"

के टी मगदूम आणि कंपनी सांगली ह्यांचा उत्साहवर्धक चहा मगदूम चहा..

मग ही जिंगल...
उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा मगदूम चहा हवा नित्य आम्हा.
टीण टीण टीण ट्याण ट्याण ट्याण ट्याण

इथे कुणाला आठवते का ही जाहिरात. ( प्राजु?)

ही बालपणीची जैरात आठवून दिल्याबद्दल शीतलचे आभार. छान कथा.

http://kalekapil.blogspot.com/

बर्‍याचवेळा ऐकलेली सकाळी सकाळी लागायची सांगली आकाशवाणीला अगदी चहाच्याच वेळेत! :)

चतुरंग

कोलबेर's picture

21 Nov 2008 - 2:10 am | कोलबेर

त्याच बरोबर
"पिण्या पाजण्या अस्सा फर्मास चहा कोणता सांगाजी..
सरस्वती चहा म्हणती त्याला फर्मसासुनी लै भारी!"
हे जिंगल पण रेडियोवर लागायचे!

कपिल काळे's picture

21 Nov 2008 - 2:37 am | कपिल काळे

ही पण जैरात लागायची तेव्हा. कोलबेर चे आभार . आता आठवली.

http://kalekapil.blogspot.com/

मला ही आठवते ती जाहिरात.
ती जाहिरात सकाळी रेडिओच्या बातम्याच्या आधी का मध्ये लागायची.
आम्ही कोल्हापुरात मगदुम चहा , कधी गद्रे चहा वापरायचो. :)

मुक्तसुनीत's picture

21 Nov 2008 - 1:51 am | मुक्तसुनीत

छोटीशी कथा आवडली. सासू-सासर्‍यांपैकी एकाच्या निधनानंतर सूनेलाच मागे राहिलेल्या वृद्धांची आई व्हावे लागते हे सनातन भारतीय विचारसरणीतले सूत्र अधोरेखित करणारी. वृद्ध , कठोर स्वभावाच्या सासर्‍याला त्याच्या वृद्धापकाळी सून त्याच्या स्वतःमधले लहान मूल शोधण्यास मदत करते हा शेवटचा प्रसंग हृदयस्पर्शी.

(थोडीशी साने गुर्जी छाप , थोडी खांडेकरी वळणाची , ग्रामीण भाषेमुळे शंकर पाटलांच्या कथेसारखी. ५०-७० वर्षांपूर्वीच्या गावातल्या वातावरणात घडणार्‍या या कथेत खरे म्हणजे वाचण्यासारखे काय असे कुणाला वाटू शकेल :-) पण मला नाही बुवा वाटले ...कथा आवडली. हघ्याहे सर्वांनाच सांनल ;-) )

सर्किट's picture

21 Nov 2008 - 1:56 am | सर्किट (not verified)

खेड्यातल्या एखा द्या विधुर माणसाने साताठ वेळा स्वतः केलेला चहा ओतून देणे, खरेच मनाला पटत नाही. असा विक्षिप्त नवरा असल्यानेच सुलूने प्राण त्यागले असावेत असे वाटते. आणि चहात साखरे ऐवजी गूळ होता का, अशीही शंका मनाला चाटून जाते.

पण ही कथा जी एंची नसल्याने आवडली.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

कपिल काळे's picture

21 Nov 2008 - 2:25 am | कपिल काळे

सध्या गुराळांचा मोसम सुरु आहे. त्यामुळे गुळाची आठवण बरेच वेळेस येणे स्वाभाविक.

इथे नको राडा घालायला. खरोखर कथा मस्त . ती मला माझ्या लहानपणात घेउन गेली आहे. मी ती सांगली रेडियो वरची जैरात सध्या एकतोय. आणि दुपारचा चा पितोय.

गुळाचा राडा माझ्या ख.व. मध्ये मनसोक्त घाला

शितल's picture

21 Nov 2008 - 2:34 am | शितल

>>>खेड्यातल्या एखा द्या विधुर माणसाने साताठ वेळा स्वतः केलेला चहा ओतून देणे, खरेच मनाला पटत नाही
मस्ती ओ अजुन काय बोलणार, गोठ्यात चार म्हशी आहेत, शेतात उस आहे, मग दुसरे काय करणार :)

>>आणि चहात साखरे ऐवजी गूळ होता का, अशीही शंका मनाला चाटून जाते.
गुळाचा चहा दुधात केला तर तो फाटतो, मला वाटते, गुळाचा चहा करून दुसरी कडे दुध गरम करून मग तो चहात ओतत असावा.
मी एक दोनदा गुळाचा चहा केला होता लहानपणी तेव्हा तो फाटलेला कारण दुध गुळाचा चहा गरम असतानाच ओतले होते आणि उकळी काढली होती.
:)

यशोधरा's picture

21 Nov 2008 - 10:31 am | यशोधरा

:)

सर्किट's picture

21 Nov 2008 - 12:32 pm | सर्किट (not verified)

मस्ती ओ अजुन काय बोलणार, गोठ्यात चार म्हशी आहेत, शेतात उस आहे, मग दुसरे काय करणार

अर्थकारणातील भयस्वप्नांचे लेख वाचल्यास, त्या चार म्हशींपासून आणि शेतातील उसांपासून मिळणार्‍या पैशांचे अवमूल्यन होणार, आणि शेवटी जगभरात गरीबी पसरणार असे चेंगट विधान ह्या म्हातार्‍याला कळले नसावे, हे पटतच नाही.

चहा टाकून देणे हे ह्या अर्थव्यवस्थेत शक्य नाही. १९७० च्या मंदीतही हे शक्य नव्हते, आणि १९२९ ते १९४५ पर्यंतच्या मंदीतही शक्य नव्हते. भारतातील खेड्यात तर १९३४ पासून सुरू झालेली आर्थिक दुरवस्था अद्याप कायम आहे. मग ही आर्थिक दुरवस्था असतानादेखील हा म्हातारा साताठ वेळा चहा टाकून देतो हे पटत नाही.

जपानचे मंदीच्या काळात काय झाले, हे ह्या म्हातार्‍याला माहित असावेच.

त्यामुळे ही कथा सत्य वाटत नाही.

असो,

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आजानुकर्ण's picture

21 Nov 2008 - 2:34 am | आजानुकर्ण

(:)) आजानुकर्ण

सहज's picture

21 Nov 2008 - 8:04 am | सहज

लघुकथा आवडली तसेच मुसु व सर्केश्वरांची प्रतिसादरुपी बिस्किटे त्या चहाबरोबर नक्कीच भारी :-)

फुकट्टचा च्या प्यायला फुकटा आला होता असे दिसते. :-)

(कॉफीप्रेमी) सहज

धमाल नावाचा बैल's picture

21 Nov 2008 - 8:18 pm | धमाल नावाचा बैल

>>फुकट्टचा च्या प्यायला फुकटा आला होता असे दिसते.

अरे सहजा, पुरे आता! तिकडे हसं करुन घेतलस तसं इकडही नको!!

-बैलोबा

सूर्य's picture

21 Nov 2008 - 1:56 am | सूर्य

चहा हा माझा वीक प्वाईंट. दिवसातुन कितीही वेळा आणि कधीही चहा पिऊ शकतो. पण चहाची चव पाहीजे तशीच लागली पाहीजे :). असो.
वेगळ्या विषयावरील कथा आवडली.

मीनल's picture

21 Nov 2008 - 2:00 am | मीनल

ही `चा` चांगली जमली बघा शितल ताई तुमास नी.

मीनल.

चतुरंग's picture

21 Nov 2008 - 2:01 am | चतुरंग

आत्ताच दुपारचा च्या घेतघेत कथा वाचली! अनुभव सच्चा असलेले कथेत समजतेच.
कुठलेही अलंकारिक शब्द न वापरता लिहिलेली, एकदम तुमच्या आमच्यातली, कुठल्याही घरात घडेल अशी कथा आवडली.

चतुरंग

छोटा डॉन's picture

21 Nov 2008 - 2:25 am | छोटा डॉन

कुठलेही अलंकारिक शब्द न वापरता लिहिलेली, एकदम तुमच्या आमच्यातली, कुठल्याही घरात घडेल अशी कथा आवडली.

एकदम चपलख रंगाशेठ, सहमत आहे.
असेच म्हणतो ....
एकदम नेटकी आणि बेश्ट कथा ....

बाकी, आत्ताच रात्रीचा ऑरेंज ज्युस घेतघेत कथा वाचली! अनुभव सच्चा असलेले कथेत समजतेच.

अवांतर : का हो , चहा साखरेचा चांगला की गुळाचा ???

(सगळ्या चवी आवडणारा ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

21 Nov 2008 - 1:07 pm | मनस्वी

प्रसंग किती साधा! पण त्याचे डिटेलींग मस्त केलंएस. लघुकथा आवडली.

नंदन's picture

21 Nov 2008 - 2:44 am | नंदन
पिवळा डांबिस's picture

21 Nov 2008 - 7:12 am | पिवळा डांबिस

सहमत.
मलाही कथा आवडली.

राघव's picture

21 Nov 2008 - 7:27 pm | राघव

सहमत आहे.
मस्त कथा! आता एक "चा"हाणावाच लागेल!! :)
("चा"प्रेमी)मुमुक्षु

अभिज्ञ's picture

21 Nov 2008 - 2:36 am | अभिज्ञ

शितल,
अतिशय साधी व सुंदर भाषेत लिहिलेली लघुकथा आवडली.
अभिनंदन.

अवांतर (फाटे)-
गुळाचा चहा पण छानच होतो,फक्त गुळाला "चव" पाहिजे.;)

अभिज्ञ.

अनामिक's picture

21 Nov 2008 - 2:53 am | अनामिक

मला वाटलं फक्त नारळाचा चव असतो... ;) (ह.घ्या)

आजानुकर्ण's picture

21 Nov 2008 - 3:20 am | आजानुकर्ण

इनो प्रमाणेच गूळ हा शब्दही एकंदर लोकप्रिय झाला तर.

आपला
(गूळ आवडणारा) आजानुकर्ण

घाटावरचे भट's picture

21 Nov 2008 - 8:39 am | घाटावरचे भट

सहमत.

चित्रा's picture

21 Nov 2008 - 5:01 am | चित्रा

चांगलीच आहे. आवडली.

चित्रा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2008 - 7:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रामीण कथेचा बाज हाताळणार्‍या लेखिकेची लघुकथा आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

21 Nov 2008 - 9:20 am | विजुभाऊ

कथेतले वातावरण आवडले

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

विसोबा खेचर's picture

21 Nov 2008 - 9:58 am | विसोबा खेचर

चहाकथा आवडली.. :)

शितल, जियो.. !

इराण्याच्या चहा आपल्याला लै आवडतो...

आपला,
(चहाप्रेमी) तात्या.

मैत्री's picture

21 Nov 2008 - 12:23 pm | मैत्री

तुमचा च्या बाकी झाआआआआआआआआआआआक हाय बरका शीतल ताई...............!

मनीषा's picture

21 Nov 2008 - 12:29 pm | मनीषा

आवडली ...

विसुनाना's picture

21 Nov 2008 - 12:46 pm | विसुनाना

चहा... मस्त कथा.

चहावरून सांगलीचा 'भगवानदास कंदी' मसाला चहा आठवला.

'आमीबी मगदुम चाच पितो' वरून आठवले -
लोकप्रभा दिवाळी०८ मधला अविनाश बिनीवाल्यांचा 'चाहतसे मजबूर' हा लेख उत्तम आहे.
त्यात या सांगली-जयसिंगपूरच्या मगदूम च्या वाल्यांचा उल्लेख आहे -
"लायपुली नावाच्या गावात दीपा मगदुम - आता सौ. दीपा सिंह - या एका मराठी महिलेचा असाच एक चहाचा कारखाना आहे.
आहे ना आपल्याला अभिमानास्पद गोष्ट?!"

जिज्ञासूंनी लेख जरूर वाचावा.

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Nov 2008 - 3:18 pm | ब्रिटिश टिंग्या

लघु कथा आवडली!

बाकी आपल्याला अमृततुल्यातला चहा लै आवडतो!

- टिंग्या
श्रीकृष्ण अमृततुल्य
नळष्टाप

चहा बनवणं चांगलं.....पण तो ७-८ वेळा फेकणं वाईट!

धमाल मुलगा's picture

21 Nov 2008 - 5:24 pm | धमाल मुलगा

सह्ही कथा :)
मला माझ्या आजोबांची आठवण आली. ह्या कथेतलं बरचसं वर्णन त्यांना तंतोतंत लागु पडतं :)
आणि ते असेच चहाचे शौकीन. चहा नीट, त्यांना आवडणारा असा झाला असेल तर ठीक. नाहीतर ज्या कपबशीत चहा दिलाय, ती कपबशी आपण विसरुन जायची. पण फक्त मी केलेला कसलाही चहा मात्र ते निमुट प्यायचे बॉ.(अर्थात त्यावेळी बरंच वयही झालं होतं त्यांचं..कदाचित वयोमानापरत्वे राग कमी झाला असेल :) )

"कडक, ताज्या दुधाचा, दाटसर, गवती पात, जरा येलची पुड घातलेला, नुसत्या चहाच्या वासानंच मन तिप्त व्हावं असा....ह्या आजकालच्या पोरी च्या करत्यात म्हणं, ह्यो त्यांनी केलेला च्या पिण्या पेक्षा म्हशीच मु* पिल्याल परवाडल..!!"

:) चारदोन शब्द इकडं तिकडं असतील कदाचित...पण असंच म्हणायचे तेही!

असो,
छान जमलीये कथा.

लिखाळ's picture

21 Nov 2008 - 5:37 pm | लिखाळ

अरे वा !
चहाची कथा आवडली.. छानच आहे...
-- लिखाळ.

शितल's picture

21 Nov 2008 - 6:25 pm | शितल

"च्या" आवडल्याचे सांगितल्या बद्दल धन्यवाद !

:)

रेवती's picture

21 Nov 2008 - 7:32 pm | रेवती

छान कथा लिहिलीस. धन्यवाद!
चहाचं वर्णन झकास!

रेवती

धमाल नावाचा बैल's picture

21 Nov 2008 - 8:14 pm | धमाल नावाचा बैल

वा मस्त कथा शितलताई! च्या वाइच आवडला.

सर्वसाक्षी's picture

21 Nov 2008 - 8:25 pm | सर्वसाक्षी

कचेर्‍यांमध्ये नळाचा चहा आल्यापासून कचेरीत चहा बंद केला. संध्याकाळी घरी परत येताना वाटेत मस्त पैकी भटाच्या टपरीवर उभे राहुन चहा प्यायचा हे बरे. एकुण चहा ही चवीने पिण्याचे चिज आहे, समोर येइल तो गरम द्र्व चहा म्हणुन पिणे शक्य नाही

कथा आवडली

स्वाती दिनेश's picture

21 Nov 2008 - 9:05 pm | स्वाती दिनेश

च्याची गोष्ट आवडली शीतल, छान लिहिले आहेस,
स्वाती

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Nov 2008 - 11:35 pm | श्रीकृष्ण सामंत

लेख छान लिहिला आहे.
कुठचीही स्त्री कुणालाही तिने केलेला पदार्थ आवडावा म्हणूनच करित असते.खाणार्‍याने हे लक्षात ठेवून खाल्लं, तर तिला किती आनंद होईल.
ज्या घरात स्त्रीला सन्मान नाही ते घर सुसंस्कृत नसावं असं मला वाटतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

धनंजय's picture

22 Nov 2008 - 3:01 am | धनंजय

छान कथाकथन.

**शेवटचे वाक्य थोडे साच्यातले आहे, जरा बदलले तर आणखी आवडेल**

मराठी कथालेखक's picture

5 Feb 2014 - 3:37 pm | मराठी कथालेखक

गुळाच्या चहा ची कृती Google वर शोधताना ही कथा सापडली. मस्त आहे कथा.

नंतर अजून एक छान कथा वाचायला मिळाली

मग अजून एक ह्र्दयस्पर्शी कथा सापडली

पण गुळाच्या चहा ची कृती अजून मिळालेली नाही ...प्रयत्न सुरु आहेत.

अरे ही कथा वाचताना सांगली आकाशवाणी वर लागणारी एक जाहिरात आठवत होती. अनामिक ने त्यातील एकच ओळ लिहिली आहे. ती जाहिरात अशी
"राम राम दौलतराव"
"राम राम"
"सून बाई दोन चा टाका पाहू"
"नगं नगं"
"का? अवो सिवासिनीने कुकवाला आनि मर्दाने चा ला नगं म्हनू नये"
"पन आमी न्हेमी मर्दांचा कडाक मग्दूम चा च पितो"
" मंग आमी का उन पानी पितो काय?, आमी बी आमच्या आबा आज्ज्यापास्न मग्दूम चा च पितो"
"अश्शी, मंग हून जाउद्या डब्बल"
के टी मगदूम आणि कंपनी सांगली ह्यांचा उत्साहवर्धक चहा मगदूम चहा..
मग ही जिंगल...
उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा मगदूम चहा हवा नित्य आम्हा.
टीण टीण टीण ट्याण ट्याण ट्याण ट्याण
इथे कुणाला आठवते का ही जाहिरात. ( प्राजु?)

हो मला आठवत आहे जशी च्या तशी !
सांगली आकाशवाणी वरून मला वाटतंय अजून एक कार्यक्रम व्हायचा. प्रभातीचे रंग नावाचा सातच्या बातम्या संपल्या कि, निवेदक प्रभातीचे रंग काही घटना, माहिती आणि माहितीवर आधारित जुन्या नव्या चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम असे म्हणायचा आणि कार्यक्रमाची सुरुवात करायचा ! खूप छान होता तो कार्यक्रम सुद्धा !
बाकी तुमचा चहा आवडला खूप गोड होता !

बन्डु's picture

5 Feb 2014 - 5:19 pm | बन्डु

मी ऐकलेली म्हण काही वेगळीच होती--
चहाचा घोट आणी बाईच ओठ याला कदीच नाई म्हणु नये...!