प्रतिभा
खरंतर दोन वर्षांपासून प्रतिभा आमच्या ऑफिसमध्ये काम करीत होती. ती थोडी अबोल होती. फारशी स्वतः हून मिसळत नसे. ऑफिसमधल्या कोणत्याही कार्यक्रमाला मात्र ती न चुकता हजेरी लावीत असे . पण ती बरीचशी निर्विकार होती. तिची प्रतिक्रिया क्वचितच बघायला मिळत असे. माझी सहकारी म्हणून ती उत्तम होती. प्रत्येक कामाची ती अगदी मन लावून आखणी करून ते यशस्वी करून दाखवीत असे. वयाने माझ्यापेक्षा एखादं दोन वर्ष लहान असेल किंवा बरोबरीची पण असेल. तिचा चेहरा थोडा करारी वाटायचा. उभट कपाळ , त्या खाली असलेले स्थिर डोळे तिचा गंभीर पणा उगाचच वाढवीत आहेत असे वाटे.