स्मरणदिवा

रायबा तानाजी मालुसरे's picture
रायबा तानाजी मालुसरे in जनातलं, मनातलं
29 Mar 2017 - 4:21 pm

आता शाळा सोडून कितीतरी वर्ष उलटली, पण अजूनही रंगपंचमीच्या आसपास हवा अशी काही बदलते की मला वार्षिक परिक्षेचे वेध लागतात. 'आभ्यास कर आभ्यास कर' म्हणून आईचं मागे लागणं, बाबांचं रोज संध्याकाळी घरी आल्यावर 'आज किती झाला आभ्यास?' म्हणून विचारणं असं सगळं सगळं आठवतं. परिक्षा काय, जाते तशीच जायची पण परिक्षा संपल्याच्या दुसर्‍या दिवशी माझं आजोळी जाणं मात्र ठरलेलं असायचं.
आजोळचा जुना वाडा. या अशा भल्यामोठ्या खोल्या! पलीकडे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरातच एका कोपर्‍यात मोरी. कोणी मोरीत गेलेलं असलं म्हंजे स्वयंपाकघराचं दार बंद. अशाच वेळी भावंडांपैकी कुणाला तरी काहीतरी खायला हवं असायचं. मग आजीला हाका. आजी वैतगायची,"आत्ता तर खाल्लं ना रे, काय सारखं सारखं?" जुन्या वाड्याच्या जुन्या खिडक्या. काहींना गज असायचे काहींना नाही. दारातून ये-जा करण्याऐवजी आम्ही गज नसलेली खिडकी वापरत असू. खुंट्या तर केवळ लोंबकाळण्यासाठीच असत. सकाळ अशी दंगा करण्यात निघून जायची. दुपारी मामा आणि आजोबा आमचं दुकान बंद करून घरी जेवायला यायचे. जेवणं उरकली की मग दुपारी जरा पडायचं. आजी म्हणायची,"साडेचार वाजल्याशिवाय बाहेर नाही हं सोडणार." मग दुपारी पत्ते खेळायचे. त्यातही खोटं खेळायचं. बदामसातात पत्ते असून पास म्हणायचं. पत्ते फोडायचे. बहिणींना रडवायचं. जरा ऊन्हं तिरकी होताना कुल्फीवाला घंटा वाजवत यायचा. दिलखुश किंवा बेस्ट कुल्फी. कुठल्यातरी अटीवर कुल्फी मिळायची.
संध्याकाळी नदीच्या वाळवंटात जायचं. तिथे कितीही पडलं धडलं तरी लागायचं नाही. खेळून दमल्यावर गावातल्या शंकराच्या मंदीरात बसायचं आणि सूर्य मावाळताना घरी पोहोचायचं. हातपायतोंड धुवेस्तोवर आजोबा घरी यायचेच. जरा वेळानी मामा यायचा. जेवणं व्हायच्या वेळेला बरेचदा दिवे गेलेले असायचे. मग कंदील लावले जायचे. आणि गाण्याच्या भेंड्या रंगायच्या. आजोबा जुनी जुनी गाणी अख्खि म्हणायचे. हळू हळू भेंड्या मागे पडायच्या आणि प्रत्येक जण स्वतंत्रपणे एकेक गाणं म्हणायचा. आजोबांचा आवाज एव्हाना थरथरायला लागला होता. पण अजूनही ऐकत रहावं असाच होता. आईच्या माहेरचे लोक मूळचे बेळगावकडचे. त्यामुळे कधी कधी आजोबा कानडी भजनं म्हणत. मी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून लवंडलेला असे. एकही शब्द कळत नसताना गाण्याच्या चालीत दंग होऊन जाई. आजीचा हात कपाळावरून फिरत राही. अशा वेळी दिवे येऊच नयेसे वाटत.
आताशा घरात कंदील कुठे असतात? दिवे गेले तरी दिवसा जातात. पुण्या-मुंबईत त्याचंही प्रमाण कमीच. मेणबत्त्या शोधायची वेळही अगदीच क्वचित येते. पण परवा अशी कधी नव्हे ती लवकर जेवणं आटोपली आणि नेमकेच दिवे गेले. अंधूक अंधूक दिसू लागलं तसा उठलो. हार्मोनियम जवळ ओढली आणि असंच काहीतरी वाजवायला लागलो. कोमल रिषभावर थांबलो तर आठवलं 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा'! मी वाजवताना कसंबसं गुणगुणायला लागलो. आई समोर येऊन ऐकत बसली. मी संपवलं तसं म्हणाली,"आजोबांची आठवण झाली रे! पाणी आलं डोळ्यात माझ्या." मी नुसताच जरासा हसलो. पुरुषाच्या डोळ्यात अश्रु बरे दिसत नहीत. दिवे नाहीयेत हेच बरं!

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

29 Mar 2017 - 4:47 pm | पैसा

खूप छान लिहिलंय

सिरुसेरि's picture

29 Mar 2017 - 5:26 pm | सिरुसेरि

छान लिहिलंय. ---संध्याकाळी नदीच्या वाळवंटात जायचं.--- पंढरपुर का ?

रायबा तानाजी मालुसरे's picture

30 Mar 2017 - 5:25 pm | रायबा तानाजी मालुसरे

नाही नाही...भोर!

वा, जुन्या आठवणी जागवल्यात. बालपण रम्य हे खरं.

संजय पाटिल's picture

29 Mar 2017 - 6:29 pm | संजय पाटिल

छान ... 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा'.. भिमसेन जोशींचं ऐकलेलं..

हरवलेला's picture

29 Mar 2017 - 9:50 pm | हरवलेला

छान

रायबा तानाजी मालुसरे's picture

30 Mar 2017 - 5:23 pm | रायबा तानाजी मालुसरे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार!

सुमीत's picture

30 Mar 2017 - 7:03 pm | सुमीत

स्मरण दिवा