प्रतिभा

अरूण गंगाधर कोर्डे's picture
अरूण गंगाधर कोर्डे in जनातलं, मनातलं
20 Apr 2017 - 11:33 am

खरंतर दोन वर्षांपासून प्रतिभा आमच्या ऑफिसमध्ये काम करीत होती. ती थोडी अबोल होती. फारशी स्वतः हून मिसळत नसे. ऑफिसमधल्या कोणत्याही कार्यक्रमाला मात्र ती न चुकता हजेरी लावीत असे . पण ती बरीचशी निर्विकार होती. तिची प्रतिक्रिया क्वचितच बघायला मिळत असे. माझी सहकारी म्हणून ती उत्तम होती. प्रत्येक कामाची ती अगदी मन लावून आखणी करून ते यशस्वी करून दाखवीत असे. वयाने माझ्यापेक्षा एखादं दोन वर्ष लहान असेल किंवा बरोबरीची पण असेल. तिचा चेहरा थोडा करारी वाटायचा. उभट कपाळ , त्या खाली असलेले स्थिर डोळे तिचा गंभीर पणा उगाचच वाढवीत आहेत असे वाटे. ही थोडी मोकळी राहिली तर काय बिघडणार आहे असं मला नेहमी वाटायचं. मोकळी म्हणजे पुरुषाला जी मोकळेपणाची अपेक्षा असते ती. खरं म्हणजे असा अर्थ माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जळमटा सारखा चिकटलेला असावा. पण दिखाऊ स्त्रीदाक्षिण्याला बळी पडणाऱ्यांपैकी मी पण असल्याने मी तिच्याशी योग्य तेवढ्या सभ्यतेने वागत असे. एकूण तिचा बांधा आकर्षक नसला तरी ती स्त्री होती हे महत्त्वाचं होतं. तिची घरची परिस्थिती नक्की काय होती कुणास ठाऊक. मी कधी त्याबद्दल विचारलंही नाही आणि तिनी ते सांगितलंही नाही. निदान मला तरी. तिच्या बोलण्यात कधी घरचा संदर्भ येतच नसे. मला नेहमी वाटे मिस्टरांबद्दल काहीतरी बोलेल, किंवा मुलांबद्दल तरी. पण ती बरोबरीच्या मैत्रिणींशीही कधी बोलल्याचं दिसलं नाही. जेवणाच्या वेळेलाच ती जी काही कामातून उठायची इतकंच. थोडक्यात हा बर्फ लवकर फुटणाऱ्यांपैकी नव्हता. गळ्यात मंगळसुत्राशिवाय दागिना नव्हता की हातात बांगड्या. मात्र हाताला घड्याळ होतं. वर्ण किंचित गोरा होता. एक प्रकारचा निबरटपणा असूनही ती बरी दिसत होती. दोन वर्षात तात्काळ करायलाच हवं किंवा जास्त वेळ बसून करायलाच हवं असं काम निघालं नव्हतं. कारण अगदी सरळ होतं , ज्या दिवसाचं काम त्या दिवशीच करणं ही आमच्या बॉसची शिस्त होती. त्याचं नाव,नारायणन. .... ‌ सदाशिव नारायणन. आम्ही दोघेही त्याच्या शिस्तीत बसत असल्याने आम्हाला नेहमी इतरांपेक्षा जास्त पगारवाढ मिळायची. इतर सहकारी आमच्याकडे थोड्या नाखुशीनेच बघत.

काही दिवसातच आमच्या हाती कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट दिला गेला. त्यातही इतरांना मत्सर वाटला. इतर म्हणजे इतर बॉसेस आणि त्यांचा स्टाफ. या प्रोजेक्टमध्ये सत्तर ते ऐंशी लहान कंपन्या होत्या. प्रथम यांना संपर्क करून आमच्या उत्पादनाची माहिती द्यायची. मग भेटी देऊन चर्चेतून त्यांना तपशील द्यायचा ,आखणी करायची आणि नवीन उत्पादन बाजारात आल्यावर त्यातून त्यांना होणारा फायदा अंदाजे किती आहे ते पटवून त्यांच्याकडून ऑर्डर्स घ्यायच्या. असं काहीसं स्वरूप होतं. त्यासाठी प्रथम पूर्वतयारी म्हणून नारायणने आम्हाला दोघांना बोलावले. तास दीड तास चर्चा करून त्याने कामाची वाटणी तिघामध्ये केली. साधारण सहा महिन्याचा कालावधी दिला होता. कालावधी कमी असला तरी नारायण असल्या कमी वेळात पूर्ण करण्याच्या कामात निष्णात होता. त्याला मराठी बोललेलं समजायचं . पण बोलता येत नसे. गेल्या काही दिवसांपासून त्याला कुठूनतरी " कशाला " शब्द कळला होता. तो मात्र तो अधून मधून आमच्याशी बोलताना वापरीत असे. पण आम्हाला त्याचं खूप हसू यायचं. त्याला इतर कोणतेही शब्द माहिती नसल्याने त्याचा हा कशाला मजेशीर रित्या मध्ये यायचा. आम्ही कधी कधी त्याच्या तोंडावर पण हसायचो. म्हणजे मीच. प्रतिभा नाहीच. तरीही त्याला राग येत नसे. आपण हा शब्द विनाकारण वापरत आहोत हे आम्हाला कळतंय हे माहीत असूनही तो आमच्या हसण्याचा राग धरीत नसे. तोही हसण्यात सामील व्हायचा. प्रतिभा फार झालंच तर थोडं ओठाच्या कोपऱ्यातून हसल्यासारखा करायची. मला तिचा राग यायचा. जरा मोकळेपणाने हसली तर हिचं काय खर्च होतं असं मला वाटायचं. असो. ......... आम्ही जरा जास्तच व्यग्र झाल्याने आम्हाला कधी कधी तास दोन तास जास्त बसायला लागत असे. मला कंटाळा यायचा. पण ती मात्र मख्खपणे बसून काम करीत राहायची. तिच्या बरोबर कामाबद्दल बोलताना सुद्धा ती अगदी जेवढ्यास तेवढंच बोलत असे. मीच कधी कधी काही गोष्टी विनोदीपणे सांगायचो आणि स्वतःच हसतं सुटायचो . आणि ती हसते का ते पाहायचो . पण ती ताकास तूर लागून देत नसे. कोणत्याही मैत्रीणींसोबत ती ऑफिस सुटल्यावर जात नसे. इतक्या वर्षात कोणाशी तरी तुमची मैत्री होतेच. पण ती अशी एकलकोंडेपणाने जगत होती. घरची कारणं नको सांगूस पण मिसळायला काय झालंय , असं सारखं माझ्या मनात यायचं. मी सुद्धा विवाहित होतो. मला दोन मुलंही होती. तिला होती की नाही माहीत नाही. तरीही मला तिच्याशी मैत्री हवी होती. कदाचित मला तिच्या या मूग गिळून बसण्यामुळे तिच्या कोशातला आयुष्य काय आहे ते कळावं असं माझ्या मनात असावं. म्हणजे सुरुवातीला. पुढे पुढे "असावं " हा शब्द मनाने काढून टाकला आणि तसं मला वाटू लागलं. किंबहुना तो माझा सामाजिक हक्कच आहे असंही वाटू लागलं. त्यात तिच्या जवळ जाण्याचा माझा हेतू नक्कीच होता. दुसऱ्या सहकारी स्त्रीने आपल्याशी अगदी मिळून मिसळून वागण्याची आपली का अपेक्षा असते कळत नाही. कदाचित मला ती स्त्री आहे म्हणून सुप्त आकर्षण होतं. वरवर सुप्तपणाची शाल पांघरलेलं आकर्षण .

मी रोज घरातून निघताना ठरवून जात असे की आज तिला विचारायचंच तिचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे . मुलं किती आणि मिस्टर काय करतात. पण सबंध दिवसभरात मला तशी संधी घेता येत नसे , किंवा मी घाबरत होतो. पण धीर करून आज मात्र मी तिला विचारलंच." प्रतिभा , रोज रोज उशीर होतो म्हणून माझी बायको आणि मुलं जाम वैतागतात ग. तुझं तसंच ........ " होतं का असं मला

विचारायचं होतं. म्हणून मी प्रश्न अर्धवट ठेवला. पण तिचा चेहरा निर्विकार होता. उत्तरादाखल ती म्हणाली, " लंचनंतर सरांनी रोझ आणि कंपनीकडे जायला सांगितलंय. " तिने उत्तर टाळल्याचं मला लक्षात आलं. पण आज निदान तिच्या मनस्थितीच्या प्रांगणात मी एका प्रश्नाचं बी तरी फेकलं होतं. पाहू या कधी उगवतंय ते. असं म्हणून मी गप्प बसलो. ती यथावकाश भेटीसाठी निघून गेली. मला एवढं विचलित होण्यासारखं तिचं वागणं नव्हतं. पण अपेक्षा आणि त्याही स्त्री सहकाऱ्याकडून हे महत्त्वाचं निमित्त होतं. त्या दिवशी मला जवळ जवळ साडेनऊ झाले. मी जाम वैतागलो होतो. काय कारण काढून घरी जाण्याबद्दल नारायणला पटवावं ते सुचत नव्हतं. तेवढ्यात प्रतिभा आली. मला आश्चर्य वाटलं . बहुतेक ही घरी गेली असणार. पण ती रोझ आणि कंपनीकडून एक फाइल घेऊन आली . मी जास्त लक्ष दिलं नाही. कदाचित तिला वाटत असावं मी विचारेन की ती एवढ्या उशिरा पण ऑफिसला का आली. पण मी विचारलं नाही. ती फाइल घेऊन केबिन मध्ये जाणार तेवढ्यात नारायण बॅग घेऊन बाहेर आला. मला म्हणाला," अरे उत्तम अभी रहने दो. कल सुबे देकेंगे, तुम भी निकलो. ..... (प्रतिभाकडे वळून ) त्याने विचारलं " तुम आ गयी क्या ? सीधा घर जाती . " तिचा मख्ख चेहरा पाहून तो पुढे काही न बोलता ऑफिस बाहेर पडलाही. आणि बाहेर असलेल्या गार्डला ऑफिस बंद करण्याच्या सूचना देऊन तो लिफ्टमध्ये शिरला. आता आम्ही दोघंच राहिलो होतो. प्रतिभाची निराशा नक्कीच झाली असणार. एवढी काळजीने ती ऑफिसला परत आली होती. तेही फाइल घेऊन. ती काहीतरी कुरबूर करील म्हणून मी वाट पाहत होतो. आणि अधून मधून आवरण्याची आवश्यकता नसतानाही माझं टेबल आवरत होतो. तिने काही न बोलता हातातली फाइल समोरच्या कपाटात ठेवली . कपाटाला कुलूप लावून , पर्स खांद्याला अडकवून ती निघाली. मी पण घाईघाईने बॅग सांभाळीत लिफ्टकडे निघालो. तिने बटण दाबलं होतं. लिफ्टमध्ये मी पण शिरलो. माझ्या सहज मनात आलं , लिफ्ट अचानक बंद पडली तर . ती काहीतरी जळजळीत प्रतिक्रिया देईल. आणि संभाषणाचा धागा मला मिळेल. गंमत म्हणजे , खरच एक दोन मजले गेल्यावर लिफ्ट बंद पडली. आता लिफ्टमध्ये फक्त ती आणि मी होतो. तुमच्या मनात काय आलंय ते माझ्याही मनात होतं. चेहऱ्यावर विक्षिप्त भाव आणून तिने आपला एक हात इमर्जन्सी अलार्म कडे नेला . ठीक त्याच वेळी मीही माझा हात नेला. आणि तिच्या हातावर माझा हात एका क्षणासाठी कां होईना विसावला. तिच्या हाताचा स्पर्श थंड होता. तिने लावलेला हलकासा सेंटही माझ्या नाकाने टिपला. मग तिने माझ्याकडे नजर वळवली. ............

तिच्या नजरेतला कोरडेपणा मला तुच्छतादर्शक वाटल्याने मी घाबरून सॉरी म्हणालो आणि हात काढून घेतला. यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे कोणत्याही अनपेक्षित कृतीला आमंत्रण देणे ठरले असते. मलाही थोडी चीड आली. इतकंही कोणी कोरडेपणाने वागत नाही. लवकरच दरवाज्याशी लिफ्टमन आला आणि त्याने त्याच्या जवळच्या किल्लीने लिफ्टचा दरवाजा उघडला. आता लिफ्ट खाली जाणार नाही असे तो म्हणाल्याने आम्ही जिन्याकडे वळलो. आता मात्र मी, ती मागून येत्ये की नाही हे पाहण्यासाठी थांबलो नाही . रात्रीच्या वेळेला रिक्षा मिळणं कठिण होतं. आणि बोरिवली सारख्या स्टेशनहून गाडी मिळणंही. जवळ जवळ साडेदहा होत होते. लवकरच माझ्या मागे ती आल्याची मला जाणीव झाली. आता मात्र मी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून रिक्षाला हात केला. दोन चार रिक्षा रिकाम्या असूनही न थांबता तशाच निघून गेल्या. तीही रिक्षाला हात दाखवीत होती. पण रिक्षा येण्यास तयार नव्हती. अचानक एक रिक्षा मी हात दाखवला आणि माझ्या जवळ येऊन थांबली. मी पटकन रिक्षात शिरलो आणि चलण्याची खूण केली. तशी रिक्षावाला म्हणाला, " अहो साहेब मिसेस मागेच राहून कसं चालेल ? " (त्याला काय माहीत ती माझी मिसेस नव्हती ) मग त्यानेच तिला खूण करून सांगितले, " ओ मॅडम , मिस्टर बसले पण. " त्यावर मी त्याला ती माझी बायको नाही ,असे सांगण्याचा प्रयत्न करीत होतो , पण मला गप्प बसवून तो तिला बोलावीत राहिला. तरीही ती येत नव्हती. मग ती आली आणि म्हणाली, " मला या रिक्षातून यायचं नाही आहे. तुम्ही निघा. " असं म्हटल्यावर रिक्षावाला रिक्षा चालू करीत म्हणाला, " काय बाई आहे, हिला दुसरी रिक्षा नाही मिळाली तर चालत जायची वेळ येईल. , मग माझ्याकडे वळून म्हणाला, " तुमच्या मिसेस नाहीत वाटतं. , मी उशिरा ओळखलं, नाहीतर आपण लवकरच निघालो असतो. असे लोक वागतात आणि आमच्या विरुद्ध कंप्लेटी करतात. " मी काहीच बोललो नाही. ती त्या रात्री केव्हा घरी गेली मला माहीत नाही आणि माहीत करून घेण्याची मला इच्छाही झाली नाही.

....... काही दिवस असेच गेले. ऑफिसमधलं काम चालूच होतं . तिचं वागणं तसंच होतं . मी लक्ष देणं बंद केलं . अचानक एक फोन आला. ती जागेवर नव्हती. नुकतीच ती कोणत्या तरी कंपनीत भेटीसाठी गेली होती. फोन जरा वेळ वाजल्यावर मीच घेतला. पलीकडून एक पुरुषी आवाज आला. त्याचं बोलणं अर्धवट , ताबा नसल्यासारखं वाटलं. " आहे का ? प्रतिभा ? आं ...? काय विचारतोय मी ? " मला असं कोणी दमात घेतलेलं आवडत नाही. तरीही मी स्वतःवर ताबा ठेवीत म्हणालो, " ती बाहेर गेल्ये, तुम्ही कोण बोलता ? " त्यावर त्याने सणसणीत शिवी देऊन फोन खाली ठेवला. मला राग आला होता. तरीही मी प्रतिभाला काहीही न सांगण्याचं ठरवलं. फार काय तिचा फोन आल्याचंही मी तिला सांगणार नव्हतो. दुपारनंतर ती आली. ती बरीच दमली असावी. मी तिच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिलं. तिची मुद्रा जास्तच आक्रसल्यासारखी वाटली. हिला हिचा फोन आल्याचं माहीत असावं की काय अशी मला शंका आली. आता मी तिच्याशी कोणताही वैयक्तिक स्वरुपाचा संबंध न ठेवण्याचं ठरवलं. पण तिच्यावर पाळत ठेवण्यालाही मी उद्युक्त झालो. हि राहते कुठे , ऑफिस नंतर जाते कुठे, तसंच तिची व्यक्तिगत माहिती मिळवण्याचं मी ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळ नंतर मी माझ्या या कामाला सुरुवात करण्याचं ठरवलं होतं. आज नारायणने पण जास्त वेळ बसवले नाही. ती निघाल्या बरोबर मीही निघालो. फक्त जिन्याने. जरा धावतच जावं लागलं . ती ऑफिसच्या मुख्य दरवाज्यामधून बाहेर पडली होती. तिने रिक्षा पकडली. ती नक्कीच स्टेशन कडे जाणार हे माहीत होतं. पण मी माझ्या रिक्षावाल्याला तिच्या रिक्षाचा पाठलाग करायला सांगितलं. माझं नशीब जोरावर असावं.

तिची रिक्षा स्टेशन कडे न जाता बोरिवलीच्या एका अंधाऱ्या गल्लीत शिरली आणि एका बैठ्या चाळीसमोर जाऊन थांबली. ती गल्ली इतकीच रुंद होती की एका वेळेला एकच रिक्षा आत शिरू शकेल. बहुतेक आत शिरलेली रिक्षा गल्लीच्या दुसऱ्या तोंडाकडून बाहेर पडू शकत असेल. मी माझी रिक्षा पुढे जाऊन थांबवण्यास सांगितलं. आणि मुद्दामच वेटिंगमधे ठेवली. रिक्षावाला म्हणाला, " साब ये पीछा करना हमको नही जमेगा. आप जलदी आयेंगे तोही रोकना, वरना मुझे भाडा देके छोड देना. " मी त्याला मुद्दामच पन्नास रुपये दिले आणि मी सांगेन तिथे येण्यास सांगितले. आणि मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचेही सांगितले. तेव्हा कुठे त्याने थांबण्याचे आश्वासन दिले. आता रात्रीचे साडेनऊ वाजत होते. प्रतिभा झपाझप चालत होती. तिचा माग न घालवता आणि तिला न कळत जाताना मला बरेच प्रयास पडत होते. पण मी आज चंगच बांधला होता. अचानक ती डावीकडे वळली. जिथून दुसऱ्या चाळी सुरू होत होत्या. म्हणजे त्याही पहिल्या चाळींना चिकटूनच होत्या. मला चांगलाच घाम फुटला होता. अचानक पावसाची बुरबुर चालू झाली. प्रतिभा आत आत जात पुन्हा डावीकडे वळली. जिथे दुसऱ्या चाळीची शेवटची खोली असावी. त्या खोलीला दरवाज्या वळून जाऊन होता. मी जरा थांबलो. आजूबाजूच्या खोल्यांमध्ये पिवळट प्रकाश दिसत होते. ही वेळ झोपेची नक्कीच नव्हती. लोक साधारणपणे जेवत असतात आणि त्याबरोबर टीव्ही पाहत असतात. म्हणजे आत्ता सध्यातरी कोणी बाहेर येण्याची शक्यता नव्हती. मी चाळीच्या शेवटून दुसऱ्या खोली जवळ भिंतीला चिकटून उभा होतो. प्रतिभाने दारावरची बेल दाबली. पण आतून दरवाज्या लोटलेला असल्याचं सांगितलं गेलं असावं.

ती दरवाज्या लोटून आत शिरली आणि तिने तो आतून लावून घेतला होता. आता मी दरवाज्या ओलांडून खोलीच्या मागच्या भिंतीजवळ आलो. आतून एका ड्रिंक घेतलेल्या माणसाचा आवाज येत होता. " आत्ता आलीस , नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आं ? " प्रतिभा किंचाळून म्हणाली, " ऑफिसमध्ये फोन करायचा नाही मी सांगितलं होतं ना ? " तो म्हणाला, " का ? का नाही करायचा ? मला शुचिताला भेटायचंय . तिला मी उद्या भेटायला येणार. " ........ " अजिबात यायचं नाही सांगून ठेवत्ये तुम्हाला. , तुमचा आता काहीही संबंध नाही. " "नाही कसा? कोर्टाचा हुकूम आहे ,महिन्यातून दोनदा मी तिला भेटू शकतो. " मग थोडा वेळ जाऊन देऊन तो पुन्हा म्हणाला, " चार महिने झाले , शुचीला भेटलो नाही. कुठे आहे तो तुझा तांबडे वकील , साला मला बदफैली म्हणतो , भर कोर्टात ? आपण कमवित नाही पण आपण बदफैली पण नाही. आणि काय गं ए, पैसे कुठे आहेत ? मला पैसे देण्याचं ठरलं होतं ना ? गेले दोन महिने पैसे पण दिले नाहीस,. कोर्टाचा अपमान करतेस ? आणि माझाही ? अपमान ? " असं म्हणून त्याने तिचा हात पिरगळला असावा . ती वेदनेने कळवळून ओरडली, " अग आई गं, सोडा माझा हात. मी पोलिसांकडे जाईन. " ती सुटण्याची धडपड करीत असावी . हे सगळं ऐकण्यात मी इतका रंगलो होतो, की माझ्या मागे कोणी येऊन उभं राहिलं आहे , याची मला जाणीवच झाली नाही. अचानक रस्त्यावरचे लाइट गेले. म्हणजे घरातलेही गेले असावेत. म्हणजे लोक लवकरच बाहेर येतील. आपल्याला निघायला पाहिजे या जाणिवेने मी पुढे पाऊल टाकणार तेवढ्यात मी मागे वळून पाहिलं. एक म्हातारी स्त्री गुडघ्यापर्यंत लुगडं नेसलेली उभी होती. तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. पण तिचे शब्द ऐकू आले. " काय रे , लोकांच्या घराशी चोरून ऐकतोस काय ? " मग तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. ......... " ए, कमळे, ए दादा, भायेर ये, हा बघ कोण हाय त्यो...... " ती आणखीनही लोकांना बोलवीत राहिली. पण ते ऐकायला मी थांबलो नाही. तसाच पळत सुटलो. आता फक्त बाहेर पडायला हवं एकच विचार माझ्या मनात होता. नशिबाने मी चाळींच्या कोंडाळ्यातून मुख्य रस्त्यावर आलो. माझ्या रिक्षावाल्याने लाइट चालूच ठेवल्याने मला तो ओळखता आला. घाई गर्दीने मी रिक्षात बसलो आणि त्याला "चलो " म्हणालो. मी प्रतिभा येत्ये की नाही हे पाहिले देखील नाही. विनाकारण माझा श्वास जड झाला होता. शर्ट घामाने आणि पाण्याने पाठीला चिकटला होता. एकदाचं बोरिवली स्टेशन गाठलं. सुटणारी एक गाडी मी कशी तरी धडपडत पकडली. आत बसून जागा पकडली. घाम टिपत मी स्वस्थ झालो. माझी नजर सहजच बाजूच्या बाकड्याच्या खिडकीच्या सीटवर गेली. तिथल्या स्त्रीने मान वळवली. ती प्रतिभा होती. आता मात्र मी चिमटा काढून पाहिलं. मी झोपेत नव्हतो की स्वप्नातही. माझ्या आधी ही कशी आली . मला कळेना . याचाच अर्थ तिने पण रिक्षा थांबवली असणार , आणि तीही जवळच. माझ्यासारखं तिला मुख्य रस्त्यावर यावं लागलं नव्हतं. मी मान खाली घातली. ते केवळ तिने माझ्याकडे पाहून काही संवाद साधू नये यासाठी. मला तिच्याशी आत्तातरी संपर्क नको होता. तिचे थंड डोळे माझे निरीक्षण करीत होते. पण मी उठलो. आणि जागा असतानाही दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिलो.

तिला संशय आला असेल का , की मी तिच्या पाळतीवर होतो. माझं मन मला अपराधीपणाची जाणीव करून देऊ लागलं. मी कसा तरी विवेक करून ती जाणीव दाबली. आणि तिला मदतीची गरज असेल तर आपल्याला ती केली पाहिजे असे म्हणून मी त्या जाणिवेवर पांघरूण घातलं. तिचा तो प्यायलेला माणूस नवरा असेल का ? त्याचा आवाज आणि ऑफिसमध्ये फोन करणाऱ्याच आवाज मला सारखा वाटू लागला. मला त्याचा चेहरा पाहायला मिळाला नव्हता. नवीन माहिती म्हणजे तिला एक मुलगी आहे. तिचं नाव शुचिता आहे , हे नक्की. ती घटस्फोटित आहे. विचार थांबेनात. मी तसाच घरी गेलो. माझी बायको रिता , तिने जांभया देत दार उघडलं. तिच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे दुर्लक्ष करीत मी झोपण्याच्या तयारीला लागलो. .....

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला लवकरच गेलो. मी आता प्रतिभाकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. ती जरा उशिरा आली. ती माझ्याशी एकही अक्षर बोलली नाही. म्हणजे ती कधीच बोलत नसे. कालच्या प्रकारानंतर ती माझ्याशी बोलणार नाही अशी माझी खात्री होती. मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करित होतो. एकीकडे कामही करीत होतो. निदान तसे दाखवीत तरी होतो. तिच्या चेहऱ्यावर कालचे काहीच अवशेष दिसत नव्हते. मला तिचा चेहरा एकदा तरी आक्रसलेला पाहायचा होता. निदान काहीतरी प्रतिक्रियेची अपेक्षा नक्कीच होती. मला असे गप्प बसणारे लोक आवडत नाहीत. तिच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नव्हती. जणू इस्त्री केलेला रुमाल. आता मला खात्री झाली की ती मला काहीही विचारणार नाही. मी मग खरच कामात बुडून गेलो. एक दोन वेळा नारायणच्या केबीन मध्ये चर्चेसाठीही जाऊन आलो. अर्थात ती त्यात नव्हती. आज ती लाल रंगाचा ड्रेस घालून आली होती. खांद्यावरची ओढणी सांभाळीत ती काम करीत होती. तिला ड्रेसची सवय नसावी असे वाटले. तिचा बांधा आणि इतर अवयव आज उठून दिसत होते. तिच्या अंगाचा घाम मिश्रित सेंटचा वास मला उत्तेजित करित होता. मला थेट पाहता येणं शक्य नव्हतं. दुसरी एखादी स्त्री असती तर तिला जवळून न्याहाळण्याची मिळालेली संधी मी सोडली नसती. तरीही काहीही पाहत नाही असं दाखवीत मी पाहता येईल तेवढं पाहत होतो. कदाचित हे तिच्या लक्षात आलं की काय कोण जाणे. लंच टाइम झाला. ..... मी लंचला जाण्याच्या तयारीने उठलो. आणि वळलोही. .......

अचानक तिने प्रश्न फ़ेकला. कोळी जाळं फेकतो तसं . बेसावधपणे काही मासे जाळ्यात अडकतात, तीच अपेक्षा तिची होती. " मिस्टर उत्तम , .......... " मी वळलो. तिच्याकडे पाहत मी प्रश्नार्थक मुद्रा केली. ती पुढे म्हणाली, " काल तुम्ही सोनार गल्लीत आला होतात ना ? " एकदम ती असं काही विचारील याची कल्पना नसल्याने मी गडबडून जाऊन हो म्हंटलं. मी नाही म्हणू शकलो असतो. पण माणूस नाही म्हणायचं असतानाही हो का म्हणतो कोण जाणे. त्यावर ती म्हणाली, " काय काय पाहिलंत तिथे ? " तिच्या प्रश्नाने आणि माझ्या चेहऱ्यावरून फिरणाऱ्या तिच्या शोधक नजरेने मला हलकासा घाम येत असल्याची जाणीव झाली. तरीही मी स्वतःला सांभाळीत म्हंटले, " काय पाहणार ? तो काय म्यूझियम थोडाच आहे ? " तिने आवाजात धार आणित म्हंटलं, " तेच तर म्हणत्ये मी,तरीही तुम्ही तिथे आला होतात ........ थोडं थांबून ती म्हणाली, " ...... माझा पाठलाग केलात ? ..... का ? माणसाला खाजगी आयुष्य असं असूच नाही का ? त्यातल्या त्यात एकाद्या स्त्रीला ? तुम्हाला माझी काय माहिती हवी आहे ? " ....... मी खिशातला रुमाल काढून घाम पुसू लागलो. तो तो घाम जास्त येऊ लागला. तिला उत्तर देणं सध्या तरी मला कठीण होतं. तरीही मी तिला उत्तर दिलं. " माझा एक मित्र राहातो . दीपेश नाव आहे त्याचं. आणखी काही माहिती हवी का ? ............. तिने माझ्या डोळ्यांकडे संशयाने पाहिलं. तिच्या डोळ्यात मला तिरस्कार आणि अविश्वास दिसला. मग ती खालच्या मानेने म्हणाली, " परत माझ्या खाजगी आयुष्यात डोकवायचं काम करू नका, नाहीतर मला गंभीर स्टेप्स घ्याव्या लागतील . " तिला जास्त बोलण्याची संधी न देता मी वळलो. मला लंचमध्ये फारसा रस वाटेना. आता तर हिचं रहस्य उलगडलंच पाहिजे आणि मी त्यासाठी मी काहीही

करण्याचं ठरवलं. आता तर ती कुठे राहते तेही शोधण्याचं ठरवलं.माझं मन भलत्याचं नशे मध्ये डुबक्या मारू लागलं. खरंतर मी तिथेच थांबायला हवं होतं. पण पुढचे प्रसंग मीच जणू बेतत होतो असं नंतर मला वाटलं. ..... त्या दिवशी माझं कामात लक्ष लागलं नाही. मी डिस्टर्ब झालोय , हे तिच्या लक्षात आलं असावं. मला उगाचंच तिच्या मुद्रेवर विजयी भाव दिसले. आज तिने एका पुरुषाला घाबरवलं होतं . मला ती यापुढे काय कृती करेल याचा अंदाज येत नव्हता. दोन वेळा नारायणने मला बोलावलं. पण माझ्याकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने तो म्हणाला, " उत्तम, तुमको मंगता है तो एक दोन दिन लेलो, बट गीव मी प्रॉपर इंफोर्मेशन, नेक्स्ट टाइम यू विल नॉट बी एक्सक्यूज्ड. "

मी त्या दिवशी नाराज होउनच घरी गेलो. दरवाज्या उघडणाऱ्या रिताला विनाकारण जवळ घेत म्हणालो, " उद्या आपण सगळेच बाहेर जेवायला जाऊ " ......... आश्चर्य वाटून ती म्हणाली, "प्रमोशन मिळालं वाटतं. " मी मानेनेच नाही म्हंटलं. काय कोण जाणे माझा मूड खराब असला तरी तिचा मूड मात्र चांगला झालेला दिसला. तसंही एक दोन दिवस लीव मिळणार होतीच. पाहू लीवचा काय सदुपयोग (? )

करता येतोय ते. फक्त एकच ,लीव घेतलेली आहे हे रिताला कळून द्यायचं नाही. मी हे सगळं का करतोय असं तुम्हाला वाटत असणार. पण मनाचा थांग भल्या भल्यांना लागत नाही असं म्हणतात. पण आपल्या मनाचा थांग आपल्याला पाहायचा नसतो हेच खरं. मन उकरून पाहत होतं. पण मी ते उकरणं दाबलं. माझं मन मी लागलेल्या टीव्ही सिरियलमध्ये गुंतवण्याच प्रयत्न करू लागलो.

दुसऱ्या दिवशी मी नारायणला फोन करून दोन दिवस येणार नसल्याचे सांगितले. तो थोडा वैतागलेला दिसला . त्याच्या बोलण्याचा लगेच फायदा घेतलेला त्याला आवडला नसावा. पडत्या फळाची आज्ञाच ती. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली नाही की मी दिवसभर घरी बसून काय करणार होतो . मला रिताला जेवायला घेऊन जायचं होतं. पण ते दिवसा जावं लागेल. मग प्रतिभाचा माग कसा लागणार ? ते काम तर संध्याकाळ नंतरच करावं लागेल. म्हणून मी कामावर जायचं ठरवलं. आणि दिवसभर ती माझ्या डोळ्यासमोरही राहिली असती. त्या दिवशी मी थोडा उशिराच ऑफिसमध्ये पोहोचलो. प्रतिभा जागेवर दिसली नाही. मी गेल्या गेल्या प्रथम नारायणलाच भेटलो. त्याच्या तोंडावर आश्चर्याचे भाव होते. पण तो काही बोलला नाही. मात्र त्याने मला कामात नीट लक्ष देण्याचे सुचवले. दुपारी दोन वाजेपर्यंत कामात वेळ गेला. नंतर प्रतिभा आली. मी येणार नसल्याने माझ्या व्हिजिटस तिला दिल्या होत्या. तिने फक्त एकदा माझ्याकडे पाहिले. म्हणजे , मी येणार नसल्याने तिला जावं लागलं , या भावनेने ती भारल्यासारखी दिसली. काहीच घडलं नाही. संध्याकाळी ती जायला निघाली . मी थोडावेळ उगाचच इकडे तिकडे करून नारायणला सांगून निघालो. ती रिक्षा पकडताना दिसली. मीही रिक्षा पकडली. कुठे जायचं हे न सांगितल्याने रिक्षावाल्याने जोरात विचारले, " कही जाना नही क्या ? " मी त्याला प्रतिभाच्या रिक्षाचा पाठलाग करायला सांगितलं. थोडी फार कुरकुर करीत तो निघाला. तिची रिक्षा गर्दीतून वाट काढीत चालली होती. अचानक तिची रिक्षा दिसेनाशी झाली. मी चडफडलो. मग माझी रिक्षा मी बोरिवली स्टेशनकडे घेण्यास सांगितलं. तिचा माग नाहीसा झाल्याने मी निराश झालो. त्या दिवशी तसंच घरी जावं लागलं. रिता आल्या आल्या तयार झालेली दिसली. पण आता माझा मूड नव्हता. मी आज जायचं नाही असं सांगून तिची निराशा केली. जेमतेम जेवण झालं . (कारण माझा मूड नव्हता म्हणून) रात्री रिता जवळ आली . मी यांत्रीकपणे तिच्या अंगावरून हात फिरवला. तिला ते जाणवलं असावं. ती उठून बसत म्हणाली, " काय झालय काय , हल्ली असं कोरडेपणाने का जवळ घेता. काही झालंय का ? माझं सोडा पण मुलांचीही निराशा केलीत. " तिला जवळ घेत मी म्हंटलं , " सॉरी, एक दोन दिवसात नक्की बाहेर जेवायला जाऊ‍. झोप आता. " असं म्हंटलं . ती खरच झोपली. पण मी टक्क जागा होतो. रात्री केव्हातरी मला झोप लागली. इतका वेळ प्रतिभाचा विचार करून माझं डोक शिणलं . ती एवढी शुष्कतेने का वागते ? आपण तर तिला काहीच त्रास दिला नाही. बरोबर काम करणाऱ्या माणसांच ट्यूनिंग कीती छान जमतं. मग हिच अशी का ? मग मला आमच्या ऑफिसमधल्या जोड्या आठवल्या. सावर्डेकर बाई आणि प्रताप , मिश्रा आणि ललिता , राघवन आणि सिथा. कशी मनापासून आणि सहकार्य करून काम करतात. काम तर आमचंही चांगलं होत होतं. पण त्यात नातं नव्हतं. निदान मैत्रिचं तरी हवं होतं. माझ्या मनाने परत मैत्री या विषयावर माझ्या सात्त्विक (? ) भावना दाखवायला सुरुवात केली. मग थोड्या मोठ्याने मी मनावर चिडून म्हंटलं, " हो , मला आवडते प्रतिभा. आणि तिच्या बरोबर एंजॉय करायलाही मला आवडेल. " तेव्हा कुठे मन थप्पड मारल्यासारखं स्वस्थ बसलं. तरीही " निर्लज्ज " हा शेरा बाहेर आलाच मी फार लक्ष दिलं नाही. मात्र उद्या काहीही झालं तरी प्रतिभाचं रहस्य उलगडलंच पाहिजे. असं मी ठरवलं. जणू ते काम मला नारायणनेच दिलं होतं. मी सिगारेट शिलगावली. एक दोन झुरके मारुन फेकून दिली.

दुसऱ्या दिवशी मी कामावर लवकर जायचं ठरवलं. त्याप्रमाणे गेलोही. पण माझ्या आधीच प्रतिभा येऊन बसली होती. मी कामाला सुरुवात करणार तोच नारायणने आम्हाला दोघांना आत बोलावलं. आत गेल्यावर त्याने आम्हाला दोघांना विल्सन आणि कंपनीकडे जायला सांगितलं. काम मोठं असल्याने त्याने दोघांना सांगितलं होतं. मला ते फारसं आवडलं नाही. कारण मी जितका मोकळा राहणार होतो तितकं मला प्रतिभाच्या मागे लागता आलं असतं आम्ही ऑफिसला परत नाही आलो तरी चालणार होतं. विल्सन मध्ये जाण्यापूर्वी आम्ही दोघांनी (म्हणजे खरंतर मीच) परत एकदा काम थोडक्यात समजून घेतलं. आणि चेकलिस्ट काढली. एकदाच फक्त ती म्हणाली, " याची काही गरज नाही, माझ्या लक्षात आहे सगळं . " तिचं बोलणं माझा संपर्क टाळण्यासाठी होतं हे माझ्या लक्षात आलं. पण मीच घोडं पुढे दामटलं. तिच्या चेहऱ्याचं निरिक्षण करून पाहिलं. पण दगडाचा मुखवटा घालण्याची तिला सवय होती , त्यामुळे माझ्या पदरात परत निराशा आली. एकच फायदा झाला. तिच्या उजव्या खांद्यावरचा तीळ तेवढा मला दिसला. मला एवढं आकर्षण का निर्माण झालं होतं कोण जाणे . बहुतेक जे माणूस जवळ येऊ देत नाही , त्याच्या बद्दल जास्त आकर्षण वाटत, हेच खरं. त्यातून ती स्त्री होती. आम्ही ऑफिस बाहेर आलो. रिक्षा पकडली. ती माझ्या बाजूला (जवळ नाही ) थोडं अंतर ठेवून बसली होती. माझं लक्ष जरी तिच्याकडे असलं तरी तिचं लक्ष नाकासमोर होतं. रिक्षा जात असताना एकदाच फक्त रिक्षावाल्याला न चुकवता आलेल्या खड्ड्याने ती माझ्या अंगावर भेलकांडली. तेवढाच काय तो स्पर्श . स्वतःला सांभाळून ती परत स्थिर झाली. कंपनीतलं काम साडेपाच पर्यंत चालू होतं. मग बऱ्यापैकी मोठी ऑर्डर घेऊन आम्ही बाहेर पडलो. परत रिक्षा पकडताना ती म्हणाली, " मी घरी जात्ये. " आणि आलेल्या रिक्षात बसून गेलीही. मी दुसरी रिक्षा पकडून तिच्या रिक्षाचा पाठलाग केला. आज ती बोरिवली स्टेशनलाच गेली.

तिने जी गाडी पकडली तीच मी पण पकडली. संध्याकाळचे सात वाजत होते. मी मुद्दामच लेडीज कंपार्टमेंटला लागून असलेल्या डब्यात बसलो. मधल्या जाळीतून ती दिसत होती. जवळ जवळ पाऊण तासाने ती माहीमला उतरली . गर्दी वाढलेली असली तरी मी तिचा ट्रॅक सोडला नाही. अगदी ऐन वेळेवर उतरायला गेल्याने सहप्रवाशांच्या शिव्यांचा मी धनी झालो. पण मला आता कशाचीच पर्वा

नव्हती.ती झपाझप चालत होती. तशी मला माहीमची फारशी माहिती नव्हती. माहीम दर्ग्याच्या रस्त्याने ती निघाली. रात्रीच्या वेळेला दर्गा दिव्यांच्या सजावटीमुळे चमकत होता. मध्येच पावसाला सुरुवात झाली. माझ्याकडे छत्री नव्हती. कदाचीत तिच्याकडेही नसावी. तसंच झालं. मला वाटलं ती टॅक्सी करील. पण तसं झालं नाही तीही भिजत जात होती. याचा अर्थ ती जवळ राहत असावी. पण ती थोडी लांब राहत होती. वीस बावीस मिनिटे चालल्यानंतर तिचा चालण्याचा वेग कमी झाला. आता तिच्या आणि माझ्या मध्ये दहा एक फुटांचं अंतर होतं. ती अधून मधून भिजलेल्या केसांवरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवीत होती. आज तिची साडी काळसर रंगाची होती. रस्त्यावरचे लाइट फार पॉवरफुल नव्हते. का कोण जाणे तिचा दगडाचा मुखवटा सरकल्यासारखा मला दिसला. मला आता ती नॉर्मल स्त्री दिसू लागली. म्हणजे ऑफिससाठी ती मुखवटा घालते तर. लगेच माझ्या मनाने विचार माडला. याचा अर्थ मला सगळं समजलं आणि दिसलं असं मानण्याचं कारण नाही. मन मला नाउमेद करू पाहत होत. मला वाटतं प्रत्येकाच मनच त्याचा वैरी असतं. इतर वैरी परवडले. मनापासून काही लपवता येत नाही. ती आता एका वळवणावर आली. मी पटकन चेहरा वळवला. तिने मागे वळून पाहिलं असावं पण त्यात शोध घेण्याचा प्रयत्न नसावा . ते नैसर्गिक होतं. अचानक वळल्यावर माझ्यासमोर एक पाच मजली चाळवजा इमारत आली. तिथे वॉचमन नव्हता. काही वृद्ध माणसं खाली बसलेली दिसली. मीही आत सहज म्हणून शिरलो. पण त्यांनी माझी दखल घेतली. नाही. आता मला जिन्यावरून ती कोणत्या मजल्यावर जाते पाहणं गरजेचं होतं. मी थोडा थांबलो. ती जवळ जवळ घाईघाईने जिने चढताना दिसली. खालून मला ती तिसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीची बेल दाबताना दिसली. मीही जवळ जवळ धावतच तिथे पोहोचलो. पण तोपर्यंत त्या खोलीचा दरवाजा बंद झालेला होता. सगळ्याच दरवाज्यांचं बाहेरचं डिझाइन सारखं असल्याने मला नक्की खोली कोणती ते ओळखता येईना. बाहेरच्या कॉरिडोरसारख्या भागात लहान मुलं खेळत होती. पण मी जिन्याच्या सर्वात वरच्या पायरीवर उभा असल्याने कोणालाही दिसत नव्हतो. बाजूचे काही दरवाजे अर्धवट उघडे होते. काही बंद होते. तिची खोली जिन्या जवळ असलेल्या खोलीच्या बाजूची असावी. विचारण्यात अर्थच नव्हता. खालून पाह्णं वेगळं आणि जवळ जाऊन पाह्णं वेगळं. मला नक्की आठवेना. मग सहज म्हणून पाहिलं तर ज्या खोलीत ती असावी असं वाटत होतं. तिचं बाहेर लटकवलेलं कुलूप थोडं हालताना दिसत होतं. म्हणजे हीच तिची खोली असावी . तेवढ्यात एक मुलगा , ज्याने मला पाहिलं असावं धावत आला आणि म्हणाला, "कोण पाहिजे काका ? प्रतिभा काकू का ? ' त्याने त्याच खोलीकडे बोट करीत विचारले. पण मी " म्हंटले, नाही रे मला चाळक्यांकडे जायचंय. " त्यावर तो म्हणाला, " पण आमच्या इथे चाळके राहत नाहीत. " मी असू दे. म्हंटलं आणी धडाधड पावलं उचलीत निघालो. कसा तरी आणि धावतच मुख्य गेटच्या बाहेर आलो. मी वळून पाहिलं. प्रतिभाच्या खोलीचं दार उघडं होतं. आणि ती बाहेर येत होती. मग मात्र मी पटकन एका टॅक्सीला हात केला आणि आत घाईघाईने बसलो. ड्रायव्हर मुसलमान होता. तो म्हणाला, " जनाब आरामसे बैठिये, मै कही भागा नही जा राहा हूं. " मी काहीही बोललो नाही. त्याला काय माहीत मला कोणाच्या दृष्टिक्षेपातून बाहेर जायचं आहे. लवकरच माहीम स्टेशनला पोहोचलो.........

आज पुन्हा मला रात्री घरी जायला उशिर झाला होता . तरीही साडेनऊच झालेले असल्याने मी रिताला म्हंटले, " चल , आपण जेवायला बाहेर जाऊ. " पण ती तयार झाली नाही. थोडी रागातच ,केलेल्या जेवणाकडे बोट दाखवीत ती म्हणाली, " मग याचं काय करू ". माझ्याजवळ उत्तर नव्हतं. न बोलताच जेवणं झाली. साडेदहा अकराच्या सुमारास अंथरूणं घालून ती माझ्या जवळ लवंडली. अर्थातच माझ्याकडे पाठ करून . माझ्या ते लक्षात आलं. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तिने माझा हात बाजूला करून ती म्हणाली, " बस, आता झोपू द्या. मुलांनीही खूप वाट पाहिली. निदान त्यांचा तरी विचार करायचा होतात. नव्हतं बाहेर जायचं तर नसती वचनं देताच कशाला ? " मी फक्त सॉरी म्हंटलं. मला झोप लागेना. आजचा दिवस मात्र सार्थकी लागला होता. प्रतिभा कुठे राहते ते कळलं होतं. रितालाही झोप येत नसावी. ती सारखी चुळबुळ करीत होती. शेवटी येत्या रविवारी नक्की बाहेर जायचं आणि तेही सकाळपासून असं ठरल्यावर ती मला बिलगून झोपली. मला आता कुठे या प्रतिभा प्रकरणात थोडी प्रगती झाल्यासारखी वाटू लागली . दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो. बहुतेक प्रतिभा आजही मला झापेल की काय असा विचार माझ्या मनात आला. मी घाबरतच आत शिरलो. पण प्रतिभा आलीच नव्हती. नारायणने मला विचारले, पण मी मला माहित नसल्याचे सांगून बाहेर आलो. त्याला तिचा फोनही आला नसावा. असे दोन तीन दिवस गेले. मला एचआर डिपार्टमेंटने बोलवले. तिथे जंबोसिंग नावाचा रिजनल हेड होता. त्याने मला बोलावले. त्याने मला काही माहिती मिळते का ते पाहण्यासाठी बोलावले. पण मी परत कानावर हात ठेवले. मला माहिती अशी नव्हतीच. मी जागेवर परत आलो. संध्याकाळच्या सुमारास मला नारायणने मला बोलावले. " देको, अगर प्रतिभा कलभी नही आयेगी तो एक लेटर देता हूं वो उसको देके आना. एचाअर से उसका पता ले लेना. " मला जरा बरं वाटलं. आता कसं अगदी आधिकृत रित्या प्रतिभाच्या घरी जायला मिळणार होतं.

दुसऱ्या दिवशीही मी उत्साहात ऑफिसात पोहोचलो. प्रतिभा न आल्याने मला बरं वाटलं. मला नारायण बोलावणार हे नक्की होतं. पण त्याने मला संध्याकाळ झाली तरी बोलावले नाही. माझी निराशा होते की काय असे मला वाटले. पण सहा वाजता मला नारायणने बोलावले. "देको, कल तक प्रतिबा की राह देकेंगे, फिर तुम लेटर ले जाना. लेकीन एचाअर मे जाकर उसका आड्रेस आजही पता कर लेना. " मी हो म्हंटले. पण फारसं बरं वाटलं नाही. तरीही मी उत्साहाने जंबोसिंगला जाऊन भेटलो. सरदारजी मला ओळखत होता. ओळखीचं हसू हसून तो म्हणाला, " क्या बात है उत्तम , तुम तो यहां का रास्ताही भूल गया. " त्याचं म्हणणं बरोबर होतं. सुरुवातीच्या काळात म्हणजे पाचसहा वर्षांपूर्वी स्टाफ कमी होता तेव्हा तो अधून मधून भेटायचा. मग मी त्याला प्रतिभाचा पत्ता विचारला. त्यावर त्याने त्याचा सहकारी निशांतला प्रतिभाची फाइल घेऊन बोलावले. तो पर्यंत तो म्हणाला, " ये नारायण , खुद क्यूं हँडल कर राहा है, ये तो हमारा काम है. " तेवढ्यात आलेली फाइल उघडून प्रतिभाचा पत्ता असलेले पान काढून माझ्यापुढे धरीत म्हणाला, " लिख लो. " त्याने मला फाइल हातात दिली नाही. कदाचित मी फाइल चाळून पाहीन असं वाटल्याने असेल. पण मी पत्ता पाहिला आणि मला धक्काच बसला. तिचा पत्ता सोनार गल्लीतला होता. म्हणजे मला सापडलेला पत्ता कंपनीला तिने अजून कळवला नसावा. याचाच अर्थ तिचं वेगळं राहणं मागील काही महिन्यातच झालं असावं. मी तिथून निघालो. आणि घरी जाताना विचार केला. तिने पत्ता का कळवला नव्हता. खरंतर आता माझ्या दुष्ट मनाला उकळ्या फुटत होत्या. पत्ता न कळवल्याबद्दल कंपनी तिच्याविरुद्ध काही कारवाई नक्की करील. .....मला आता दोन्ही घरी हक्काने जाता येईल. पण कागदोपत्री तिचा नवीन पत्ता कंपनीकडे नसताना मी तिथे जाऊन तिला लेटर देणं., कितपत योग्य होतं हे मला कळत नव्हतं. मी काही पोलिस अधिकारी अथवा सरकारी नोकर नव्हतो. ....अधिकृत पत्त्यावर जाऊन तिच्या नवऱ्याला भेटता येईल त्याच्याशी बोलता येईल . फोन करणारा तोच आहे का तेही कळेल. पण तिचे पत्र मला त्याच्याकडे देता येणार नाही. मग मला तिच्या नव्या घरी जाता येईल आणी तिला ते पत्र देता येईल. म्हणजेच मला तिच्या बऱ्याच गोष्टी जवळून पाहता येतील. म्हणजे तिची एकूण परिस्थिती वगैरे(या वगैरे मध्ये बरंच काही येतं) . माझी मनस्थिती अशी असली तरी मला कधीही असं वाटलं नाही की मी इतका रस तिच्या आयुष्यात का घेत होतो ते पाहावं. इतका मी झपाटला गेलो होतो. एकदा एखादी स्त्री एकटी आहे म्हंटलं की आजूबाजूचे लोक (म्हणजे पुरूष ) तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात हेच खरं. पण अजूनही एक गोष्ट मी विसरत होतो की तिच्या गळ्यात नवऱ्याच्या नावाचं मंगळसुत्र होतं. याचा अर्थ मला लागत नव्हता.

मी घरी गेलो . रिता अजुनही थोडी गुश्श्यात होती. म्हणजे बोलत होती, पण अगदी जुजबी. आता रविवारचा तोडगा केल्याशिवाय काही खरं नाही(म्हणजे बाहेर जेवायला जाणं वगैरे) . मीही काही खास बोललो नाही. आज मला प्रतिभाकडे जाण्यात तेवढा रस वाटत नव्हता. पण माझ्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असावं. सकाळी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या मला नारायणने बोलावले. त्याने एक सीलबंद लखोटा मला दिला. याचा अर्थ ते पत्र गोपनीय होतं. मी ते उघडून पाहण्याची अपेक्षा नव्हती. त्याने मला आज संध्याकाळी जाण्यास सांगितले. "देको,आज दोपर तक वो आ सकती है. आयेगी तो लेटर मेरेको वापिस करना " असं म्हणून तो कामाला लागला. मी बाहेर आलो. आज कामात माझं लक्ष जेमतेम लागलं. वेळही मुंगीच्या पावलाने सरकत होता . शेवटी एकदाचे साडेपाच वाजले. रिक्षा करून मी सोनार गल्लीत पोहोचलो. आता मला अजिबात घर शोधायचं नव्हतं. उलट मला बऱ्याच रहस्यमय गोष्टी आज समजणार होत्या. पावसाला सुरुवात झाल्याने मी भराभर चालत होतो. उत्साहाच्या भरात मी त्या खोलीपाशी पोहोचलो. जोरात आणि आत्मविश्वासाने मी बेल वाजबली. मागच्या वेळेला माझी भीतीची प्रतिक्रिया होती. रस्त्यावर पावसाची काळोखी झाल्याने बीएमसी ने दिवे चालू केले होते. त्यांचा अतिमंद उजेड येत होता. दरवाजा उघडला गेला नसल्याने मी, पुन्हा बेल वाजवली. मी विचार केला हा बेवडा शुद्धीत नसणार. म्हणून मी दरवाज्या ठोकला. त्याबरोबर तो जुनाट आवाज करीत उघडला गेला. आत मध्ये थोडा काळोखच होता. बाहेरच्या मंद उजेडात आत पावसाचे पाणी शिरले असल्याचे मला वाटले ....... माझ्या मोबाईलचा टॉर्च मी चालू केला. त्याच्या झरोक्यात मला असे दिसले, की मी पाण्याच्या डबक्यात उभा नसून रक्ताच्या ओघळांमध्ये उभा आहे. टॉर्चचा प्रकाश मी लांबवला. आतल्या खोलीचे दार मला उघडे दिसले. माझ्या अंगाला कापरं भरू लागलं. तशाही अवस्थेत मी आतल्या अर्धवट उघड्या दरवाज्यातून वाकून पाहिले. प्रतिभाचा नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पुढे काहीही न पाहता मी बाहेरच्या दरवाज्या जवळ आलो. पावसाने जोर धरला होता. रस्त्यावर शाळकरी मुलं येताना दिसत होती. माझा श्वास आता वर खाली होऊ लागला. इथून आपण लवकरात लवकर जावं हे बरं. दुसरं तिसरं कोणीही न दिसल्याने आणि कोणत्याही खोल्यांचे पुढचे दरवाजे उघडे न दिसल्याने मी पटकन तिथून पळण्यासाठी पाय बाहेर टाकला . आणि समोर मला प्रतिभा आलेली दिसली . पावसाच्या धारांमध्येही माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. नशीब माझ्या हातात लखोटा होता. तिला पाहून माझी बोबडीच वळली. आता मी काय बोलणार होतो ? ........ क्षणभर मी तिच्याकडे , ती माझ्या कडे आणि हातातल्या लखोट्याकडे पाहू लागली. मी हातातला लखोटा तिच्या पुढे केला तिने तो कपाळावर नाखुषीच्या आठ्या घालीत तो हातात घेतला. तिच्या हातात छत्री होती. तिच्या मागे एक सात आठ वर्षांची मुलगीही होती. ती शुचिता असावी. तोंडावर पडणारं घाममिश्रित पाणी पुसण्याचं भानही मला राहिले नाही. प्रतिभाच्या नजरेतला तिरस्कार आणि अचानक मी दिसल्याने तिला बसलेला धक्का ती लपवू शकली नाही. . ती काही बोलण्याच्या आतच मी तिथून धूम ठोकली................

प्रतिभा आश्चर्याने उत्तमच्या पाठमोऱ्या आणि घाईघाईने जाणाऱ्या आकृतीकडे पाहातच राहिली. तिच्या मनात आलं उत्तम इथे कसा आणि त्याने हा लखोटा का दिला ? हातातला लखोटा पर्समधे ठेवीत तिने खोलीच्या उघड्या दारातून आत डोकावून पाहिले.आत अंधार होता. बाजूच्याच भिंतीवरील लाइटचे बटण दाबल्यावर उजेड झाला. उजेडात तिने आतल्या खोलीतून येणारे रक्ताचे ओघळ पाहिले, आता त्यांचं दाराजवळ डबकं तयार झालं होतं. धडधडत्या छातीने ती आतल्या खोलीच्या उघड्या दरवाज्यातून आत डोकावली. आतले दृष्य पाहून सगळं घर आपल्या भोवती फिरतंय असं तिला वाटू लागलं. आयुष्यात तिने अगदी जवळून खून झालेला देह पाहिलेला नव्हता. राजेशचा पडलेला देह पाहून ती चक्रावली. तिच्या छातीत अचानक दाब निर्माण झाला .श्वास वरच्यावर राहिला. तिच्या तोंडून भीतीने किंचाळी फुटली आणि शुचिताने पाहू नये म्हणून ती बाहेर आली आणि तिला आपल्या पोटाशी धरले. ती काही क्षण तिथेच भिंतीशी बसली. मग तिच्या लक्षात आलं की त्याच्या पाठीत सुरा खुपसला होता. म्हणजे त्याला सुरा मारला जाईल इतकी कल्पनाच नसावी. कोणी केलं हे .....?उत्तम ?...... तो कशाला करील ? .......तिच्या नवऱ्याचे अनेक शत्रू होते. बऱ्याच लोकांकडून कर्ज घेतल्याने त्याला सारखे धमकीचे फोन येत असत. तिला पाठीवरुन थंडगार घामाचा ओघळ उतरताना जाणवला. लवकरच तिच्या लक्षात आलं की पोलिसांना फोन करणं भाग आहे . तिने पोलिस स्टेशनला फोन केला. अडखळतच तिने पत्ता सांगितला. भिंतीला टेकून ती शुचीला कवेत घेऊन बसली होती. आज ती राजेशच्या तोंडावर पैसे फेकण्यासाठीच आली होती. आणि शुचीची भेट व्हावी म्हणून तिलाही तिने बरोबर आणलं होतं. ती आज शेवटचीच त्याला शुचीला दाखवणार होती. आज शेवटचं भांडण तिला राजेशबरोबर करायचं होतं. उघड्या पर्समधले पैसे निर्जिवपणे तिच्याकडे पाहत होते. ............

अर्ध्या तासांनी पोलीस आले. एक महिला कॉन्स्टेबल बरोबर होती. इन्स्पे. वाघमारे आणि बरोबरीचे तीन पो. कॉन्स्टेबल्स यांनी त्या दोनही खोल्या भरून गेल्या. प्रतिभा रडत नव्हती की भेकत नव्हती. कोरड्या डोळ्यांनी ती सगळा सीन पाहत होती. तिच्या मनात आलं का रडायचं , कशाला रडायचं. ज्या माणसाकडून आजपर्यंत उपेक्षेशिवाय काही मिळालं नाही त्याच्यासाठी का रडायचं ? अचानक तिच्या मनाने तिच्या आयुष्याचा चित्रपट उभा केला. तिला तरूण राजेश आवडला होता. ती स्वत: वेगळ्या जातीची असल्याने राजेशच्या घरून लग्नाला विरोध होता. पण राजेशने सगळं सांभाळलं. वेगळी , चाळितली का होईना , पण जागा घेतली. नव्याची नवी वर्ष लवकरच सरली. अचानक तिच्या लक्षात आलं राजेशला कोणतेही काम करण्यात काहीही रस नव्हता. मोठ्या मुष्किलीने तो कामावर जायचा. हळू हळू एका रजनी नावाच्या मुलीशी त्याची ओळख झाली. आणि त्यांचं आयुष्य डागाळू लागलं. मग रोज त्याचं उशिरा घरी येणं सुरू झालं. मध्येच शुचीचा जन्म झाला. त्यानंतर सहा सात महिने तो ठीक वागला. पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न चालू झाले. आता तर तो अवेळी घरी येत असे . कारण नसताना तिला शिव्या देत असे . तिच्या माहेरच्यांना नावं ठेवीत असे. नाहितर बाप्पांशी (म्हणजे तिचे वडील) किती छान वागत असे. पण झालं सगळंच पालटलं. नजर लागल्या सारखं . ....... एक दिवस त्याने तिला माझे चाळे जर तुला पसंत नसतील तर तुझी तू सोय बघ म्हणून सांगितल्याने तिने नवीन जागा घेतली होती. तीही माहिमला. मग काय तो काहिही करीत नसल्याने अधून मधून माहिमच्या घरी यायचा तोही पिऊनच. तिच्या कडून पैसे उकळायचा. शेवटी तिला वकिलाचा सल्ला घेऊन घटस्फोटाचा मार्ग स्वीकारावा लागला. तेही काही सहज झालं नाही. एकत्र राहण्याच्या सल्ल्याला तिने विरोध केला. त्यावरचे अपिल ती जिंकली. आणि त्याच्या बरोबर राहणं टळलं . कोर्टात त्याने ती चारित्र्यहीन म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि मुलीचा ताबा मिळावा असे म्हंटले, पण त्यात तो यशस्वी न होता घटस्फोट मिळाला. फक्त त्याने मागितलेला मेंटेनन्स चा खर्च मात्र तिच्या माथी आला. आज त्याचाच तटका तोडण्यासाठी ती पैसे घेऊन आली होती. पण समोर काही भलतच वाढून ठेवलेलं होतं. तशी तिच्या मनाने तिला तिची सुटका झाल्याचं सांगितलं, कोणी का करेना पण त्याच्या पापांची शिक्षा त्याला मिळाली होती. त्यामुळे रडण्याचा प्रश्नच नव्हता. ................त्यांच्या समोरच्या गंभीर वातावरणाचा भंग करीत आल्यापासून शुचीने पहिल्यांदा विचारले, " ममी , घरी कधी जायचं " तिला आणखीन जवळ घेत ती म्हणाली, " जाऊ लवकरच हं . " पोलिसांचे सोपस्कार पुरे व्हायला तास दीड तास लागला. मग इन्स्पे.वाघमारे म्हणाले, " मिसेस राजवाडे तुम्हाला स्टेशनला यावं लागेल. तुमची जबानी घेणं मला आवश्यक आहे. मी समजू शकतो की अशा प्रसंगी तुमची मनस्थिती फारशी चांगली नाही पण माझा नाइलाज आहे. तुमच्या मुलीला या मॅडम सांभाळतील. " असे म्हणून ते मग सगळे निघाले. बॉडी सरकारी हॉस्पिटलात हालवण्याची व्यवस्था केली. जाता जाता ते आपल्या सहकाऱ्याशी मात्र कुजबुजले, " या बाईच्या डोळ्यात पाण्याचं टिपूस सुद्धा नाही , का ते कळत नाही. " सहकाऱ्याने त्याला अनुमोदन दिले. मग सगळेच जण पोलिस व्हॅनमध्ये बसून निघाले.

*************************************

खरंतर गल्ली मला आता नवीन नव्हती. पण बाहेर यायला फार वेळ लागल्यासारखे वाटले. मला इतका जबरदस्त धक्का बसला होता गल्ली संपली तरीही मी चालतच राहिलो. दहा बारा मिनिटं चालल्यावर माझ्या लक्षात आलं की रिक्षा करायला हवी. मग मी थोडा भानावर येऊन रिक्षा बघू लागलो. समोरून रिकाम्या येणाऱ्या दोन्ही रिक्षा थांबल्या नाहीत. कदाचित माझा एकूण चेहरामोहरा पाहून असेल. माझे कपडे ओले होते. कपाळावरचे केस विस्कटून चिकटले होते. खिशातला रुमाल भिजल्याने त्याचा तोंड पुसायला उपयोग नव्हता. मी चेहऱ्यावरचे पाणी हातानेच झटकीत होतो. चार महिन्यांचा पाऊस आजच पडू पाहत होता. मी डोक्यावर हात धरून रिक्षा शोधत होतो. नशीब माझ्या हातात लखोटा नव्हता. तो प्रतिभाने घेतला हे बरं झालं होतं. तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याची मला त्यावेळी तरी गरज वाटली नाही. खांद्यावरच्या सॅकचं मला ओझं वाटत होतं. अजूनही इथून दूर पळावसं वाटत होतं. माझ्या डोळ्यासमोर सारखी पावसात उभी असलेली प्रतिभा आणि तिची मुलगी येत होती. मनाने आता मिठाची गुळणी धरली होती. एरवी डोक फिरवणारं मन आता बधीर झालं होतं की काय कोण जाणे. तेवढ्यात एक रिक्षा माझ्या जवळ येऊन उभी राहिली. मी त्याला स्टेशन म्हणून सांगितल्यावर तो माझ्याकडे बघत राहिला. मी चिडून म्हणालो " अब चलेगा भी , या ऐसाही बैठा रहेगा ? " तो चुपचाप निघाला. सध्या मला काहीही पाहायचे नव्हते की ऐकायचे नव्हते. पावसाचा आणि वाहतुकीचा आवाज यात मला मोबाइलचं फुरफुरणं जाणवलं. पण मी लक्ष दिले नाही. रिताचाच असणार असं मला वाटलं. स्टेशन फारच लवकर आल्याने मला आश्चर्य वाटलं कदाचित म्हणूनच रिक्षावाला माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत होता. ......मी तडक समोर दिसेल त्या गाडीत घुसलो. नशीब ती चर्चगेट कडे जाणारी होती. आठ सव्वा आठला मी घरी पोहोचलो. माझा चेहरा बोलका झाला होता की काय कोण जाणे . शिरल्या शिरल्या माझ्या हातातली बॅग घेत रिताने विचारले, " काही झालंय का ? " ...... मला जरा रागच आला. मी मानेनेच नाही म्हंटलं. मी बूट जागेवर ठेवून फ्रेश होण्यासाठी आत वळलो. तोंडावर पाणी मारता मारता माझं मन जागं झालं. " कर तिचा पाठलाग , नसते उपद्व्याप करायला सांगितल कोणी ? " मी उत्तर दिलं नाही. माझ्या डोळ्यासमोर प्रतिभाच्या नवऱ्याचा रक्ताच्या थारोळयात पडलेला देह आला. मन थांबायला तयार नव्हतं. त्याला आसुरी आनंद होत होता. शेवटी बाहेर येऊन मी मुलांशी खेळण्यात वेळ घालवू लागलो. मग जेवायला बसलो. आपण यात अडकणार की काय ? अचानक आलेल्या भीतीदायक विचाराने माझा घास तोंडात फिरू लागला. रिताच्या ते लक्षात आलेलं दिसलं. तिने पुन्हा विचारलं " जेवणात लक्ष नाही आहे तुमचं, काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करा ना. म्हणजे मार्ग निघेल. " तिचा मला राग येऊन मी तिच्यावर खेकसलो. " मघाशी सांगितलं ना तुला , काही नाही म्हणून . अजून किती वेळा सांगायचं . पुन्हा पुन्हा विचारलं तर माझं उत्तर बदलेल असं वाटतं का तुला ? " ती नाराज झाली. या क्षणी मला खरंतर एखाद दोन पेगची गरज होती. मी बाहेर उभं राहून सिगारेट शिलगावली. एक दोन झुरके घेतले तोच मोबाइल फुरफुरला. पाहिलं तर नारायणचा फोन होता.

मी तो घ्यावा की नाही या विचारात होतो. पण घेतला. त्याचा काळजीत असलेला आवाज आला " अरे उत्तम किधर है तुम , मै छे बजेसे ट्राइ कर रहा है. तुमने वो लेटर डिलिव्हर किया क्या ? " म्हणजे मध्ये फुरफुरणारा फोन त्याचा होता तर. त्या आधीही त्याने फोन केला असणार. त्याने खरच बरेच कॉल्स केलेले दिसले. ......मी घाबरलो. याच्याकडे पोलिस तर नाही पोहोचले. माझ्या मनात शंका. मी " हां " म्हंटले. त्यावर तो म्हणाला, " वो लेटर देनेका नही था. प्रतिबाका फोन आया था , वो एक दो दिनमे ऑफिस आनेवाली है . जाने दो . " त्याने फोन बंद केला. खरा धक्का तर मला अजून ऑफिसला गेल्यावर बसणार होता. पाऊस इतका जोरात पडत होता की आता फक्त रात्रच राहणार आहे दिवस उजाडणारच नाही अशी त्याची कल्पना असावी. आता मला थोडी थंडी वाजू लागली. मी घरात आलो अंगावर पांघरूण घेऊन पडलो. थोड्याच वेळात रिता आली. ती माझ्याशी फारसं काही बोलली नाही. आता नशा आणणारं आणि विसरायला लावणारं एकच पेय्य होतं. ते म्हणजे " प्र ण य " ........ पण मी तिला नाराज केलेलं होतं. ती प्रतिसाद देणार नाही अशी खात्री होती. अचानक मी तिच्याकडे वळलो. (म्हणजे मला वळायचंच होतं ) मी काहीच हालचाल केली नाही . तीच मग मला जवळ घेऊन म्हणाली, " खरच, मी विचारायलाच नको होतं. " आता ती इतकी जवळ होती, की तिचे श्वास आणि स्पर्श मला चांगलेच जाणवत होते. तिच्या श्वासाचा गंध आणि शरिराचा गंध मादक पणा वाढवीत होता. तिच्या कडूनही आता चांगलेच प्रतिसाद येऊ लागले. मी सुद्धा मग न राहवून म्हणत तिला जवळ ओढली. जवळ जवळ अर्धा पाऊण तास आमचे प्रणयाराधन चालू होतं. ओलसर पावसाळी रात्र आम्हाला दोघांना बेभान करीत नाचत होती. समाधान तिच्या अंगाला स्पर्श करीत होत. तिने डोळे मिटले. ती भानावर आल्यावर मी तिला झाल्या प्रकारातलं सांगण्यासारखं जे जे होतं ते सांगितलं.(अर्थातच प्रतिभाच्या पाठलागाचा भाग सोडून) तिला या सगळ्या गोष्टी इतक्या भयंकर वाटल्या की ती उठून बसली आणि म्हणाली, " छे बाई, मला नाही आता झोप लागणार . आता आपल्या घरी पोलिस येतील का हो ? " तिने घाबरत विचारले. मी म्हंटले, " यायला हवेत का ? " त्यावर ती म्हणाली, " तसं नाही हो , पण काळजी वाटते. " तिने परत मला जवळ घेत म्हंटले, " काळजी घ्या हो. " अशा रितिने माझ्या बद्दल काळजी वाहू वातावरण तिच्या मनात मी तयार करण्यात यशस्वी झालो. आता मला थोडं बरं वाटत होतं. पण पावसासारखं उद्या दिवस उजाडणार नाही अशी खात्री मात्र वाटली नाही. ....... एकूण मी पुरुषी कावा यशस्वी रित्या खेळलो. आता तिच्या मनात माझ्याबद्दल मी निरपराध असल्याची भावना निर्माण झाली असावी. तसा मी नैतिक दृष्ट्या अपराधी होतो.

सकाळ झाली. का झाली ? सूर्याला काय झालं , आणखी पंधराएक दिवस नाही उगवला तर ? या भावनेत मी उठलो. आणि दात घासता घासता माझ्या मनात विचार आला, " पो ली स ये ऊ न गे ले अ स ती ल " एवढ्या वाक्याने मी विचलित झालो. रिता माझे बूट रोज साफ करून देत असे. अचानक एक बूट घेऊन ती माझ्याकडे आली, आणी म्हणाली, " काळ्या बुटांना लाल रंग लावायचा प्रयत्न करत होतात की काय ? "तिने माझ्या पुढे बूट धरला. खरंच बुटाच्या एका कडेला लालसर काळसर रंगाची लाइनच चिकटलेली दिसली. मी तिच्या हातातून तो घेतला आणि घाईघाईने धुतला. म्हणजे त्याच्या रक्ताच्या थारोळ्यातलं रक्त माझ्या बुटांना लागलं होतं. इतक्या पावसात ते तसच कसं राहिलं कोण जाणे, आणि मी तरी घरी आल्यावर बूट धुवायचे कसे विसरलो मला कळेना. ....मग रेंगाळत मी निघालो. माझ्या अपेक्षे प्रमाणे प्रतिभा आलेली नव्हती. आल्या आल्या नारायणने बोलावले. आत गेल्यावर तो म्हणाला, " तुम निकलनेके तुरंत बाद प्रतिबाका फोन आया था, तुमको यही कहनेके लिये मैने फोन किया था, लेकीन तुमने तो फोन उटायाही नही . देको वो लेटर पर लिखा हुवा आड्रेस नया था. जो प्रतिबाने कंपनि को इंफोर्म किया नही था. "

आता मी याला काय सांगणार , मी जुन्या पत्त्यावरच जाऊन लेटर देऊन आलो होतो आणि तेही प्रतिभाच्या हातात. म्हणून पत्त्याचा प्रश्नच नव्हता. आता पत्ता हा कंपनिच्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता. अर्थात माझ्याजवळ लेटर दिल्याची पावती नव्हती. प्रतिभा जर लेटर मिळालंच नाही असं म्हणाली तर ? मला थोडा घाम फुटला. म्हणजे माझ्याजवळ लेटर देण्यासाठी गेलो असल्याचा काहीही पुरावा नव्हता. पोलिसांच्या दृष्टीने हे महत्वाचं होतं. पोलिस माझ्या पर्यंत पोहोचायला अजून बराच वेळ लागण्याची शक्यता होती. मी काहीच बोलत नाही असं पाहून नारायण म्हणाला, " कुच प्रोब्लेम है क्या " ....... मग मी बाहेर जाण्यासाठी वळणार एवढ्यात त्याच्या केबिनच्या दारावर टकटक झाली. नारायण ती ऐकून म्हणाला, " येस , कम इन " आत शिरलेल्या पोलिस इन्स्पेकटरना पाहून माझ्या छातीत कळ आली. तोंडाला कोरड पडली. नारायणने

त्यांनी बसण्याची खूण करता करता मला जाण्याची खूणही केली. मी खालच्या मानेने केबिनच्या बाहेर आलो. मला आश्चर्य हे वाटलं की पोलीस एवढ्या लवकर इथे कसे पोहोचले. याचाच अर्थ मी गल्लीतून बाहेर पडल्यानंतर ते अर्ध्या पाऊण तासात आले असले पाहिजेत. आता प्रतिभाने माझं नाव सांगितलं होतं की नारायणचं ? आतली प्रश्नोत्तरं काय चालू होती कळायला मार्ग नव्हता. बरं झालं प्रतिभा नव्हती ते. ती हायपर झाली असती तर तिने पोलिसांना सगळं , म्हणजे आपण केलेला पाठलाग वगैरे , सांगितलं असतं. आपल्याला ते भारी पडलं असतं. अजून तरी आपल्याला आत बोलावलं नव्हतं. आतमध्ये इन्स्पेक्टर साहेब अर्धा पाऊण तास होते. अधून मधून नारायणचा चिडका स्वर येत होता. .......

आतले आवाज न संपल्याने माझेही कामात लक्ष लागेना. काहीतरी करायचे म्हणून मी क्लायंट लिस्ट वाचायला घेतली. पण माझे सगळे लक्ष केबीन मधल्या आवाजांकडे होते. मला थोडी ही पण भीती होती, की मला आत बोलावले तर काय करायचे. तेवढ्यात माझ्या खांद्यावर हात पडला. मी गर्रकन वळून मागे पाहिले. एक हवालदार माझ्याकडे पाहत होते. ते माझ्या जवळच्याच खुर्चीवर बसले. मला म्हणाले, " काय नाव तुमचं? . " मी संशयाने त्यांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, " अहो घाबरता काय? मी काय तुम्हाला पकडून नेतोय का? " माझ्या चेहऱ्यावरचे तणावाचे भाव थोडे कमी झाले असावेत. मी माझं नाव सांगितलं. त्यावर ते म्हणाले, " उत्तम साहेब, आपण मराठी माणसं, नाकासमोर चालणारी. आपण गुन्हे बिन्हे काही करीत नाही हो. " माझ्या छातीतला तणाव कमी झाला आणि प्रथमच रोखलेला श्वास बाहेर पडला....... माझ्या चेहऱ्याचे जवळून निरिक्षण करीत त्यांनी विचारले, " या प्रतिभा ताई कुठे बसतात? " मी पटकन उत्तर दिले, " तुम्ही बसलाय त्याच खुर्चीवर. "........ त्यांनी हातातली तंबाखू तोंडात टाकली. माझ्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा पाहून ते म्हणाले, " अहो असं काय करताय , मी आपलं सहज विचारलं . " ते थोडावेळ थांबले आणि म्हणाले, " न्हाई म्हनजे , काल प्रतिभा ताईंनी तुमचं बी नाव घेतल ना . " मला आतून धक्का बसलाच होता. तोंडाला कोरड पडली. तरीही मी अगदी सहजपणा दाखवीत म्हणालो, " माझं नाव ? " . हवालदार म्हणाले, " अहो कशापायी इतकं घाबरता ? आं ? काल साहेबांनी बरोबर काम करनाऱ्यांची नावं विचारली ना ." मग हवालदार साहेब इकडे तिकडे नजर फिरवीत राहिले. आणि मग अचानक म्हणाले, " काल तुमी तिकडं गेल्ता काय ? " ........... " " तिकडं , म्हणजे कुठं ? " .......... मला काही सुचेना, आता हा आणखी काय विचारतो कुणास ठाऊक. प्रतिभाने आणखीन काय काय सांगितलय कोण जाणे. माझी अस्वस्था पाहून हवालदार म्हणाले, " चला जाऊ द्या. अहो मी सहजच विचारलं. " मग माझ्या खांद्यावर हात ठेवित म्हणाले, " अहो किती टेन्शन घेता साहेब ? " असं म्हणून ते इकडे तिकडे पाहत राहिले. या सवाल जवाबातून सुटका व्हावी म्हणून मी जागेवरून उठलो. ते त्यांच्या लक्षात आलं असावं, त्यांनी विचारलं. " कुठं निघालात , साहेबाकडं ? " मी नाही म्हंटले आणि मला वॉशरुंमला जायचं असल्याचं सांगितलं. मी पटकन वॉशरूमकडे निघालो.

खरंतर मला वॉशरुममध्ये काहीच काम नव्हतं. मी आत शिरलो. उघाचंच एक दोन नळ सोडले. तोंडावर पाण्याचे हबके मारले. रुमालाने तोंड पुसले. आणि वॉशरूमचं डोअर किलं किलं करून पाहिलं. हवालदार गेला का? पण मला तो तिथेच बसलेला दिसला. तो माझ्या टेबलाकडे पाहत होता. मी तोंड पुशीतच माझ्या जागेवर येऊन बसलो. मी मुद्दामच काल काय झालं या बद्दल त्याला विचारलं नाही. रुमाल घडी घालून खिशात ठेवणार एवढ्यात नारायणच्या केबिनचं दार उघडून इन्स्पेक्टर साहेब बाहेर आले. हवालदाराने उठून अदबीने सलाम ठोकला. त्यांनी बाहेर पडण्याची खूण त्याला केली. ते दोघे बाहेर गेले. आणि साधारण पंधरा वीस मिनिटांनंतर नारायणने केबीन मध्ये बोलावले. मी बसल्यावर नारायण म्हणाला, " ये पुलिस लोग भी, हमेशा डाउट करता है. इनका बस चले तो अपने फादर पर भी डाउट करेगा. " तो काय काय सांगतो ते ऐकायचं ठरवल्याने मी काहीच बोललो नाही. तो पुढे म्हणाला, " मेरेको क्या पूछा उसने मालूम है, ये , मर्डर आपने उत्तम के जरिये किया है और आपके प्रतिबाके साथ संबंध है. मेरेको एक बात बताओ उत्तम तुमने प्रतिबाके पुराने आड्रेस पर जाकर ये लेटर दिया, तब प्रतिबाका हसबंड का मर्डर हुवा था ? " .......... आता माझी ट्युब पेटली. मी काहीच उत्तर देत नाही असे पाहून तो ओरडला. " उत्तम , सच क्या है बता दो . " ....... मी विचार करून मान होकारार्थी हालवली. ते पाहून तो म्हणाला, " सिर्फ मुंडी मत हिलाना. ये तुमने मुझे , फोन पर क्यू नही बताया ?कही तुम्हारा और प्रतिबाका चक्कर तो नही चल राहा है. ? " आता मात्र मी ओरडलो. " नही. जब मै गया तो उसके हसबंडका मर्डर हो चुका था, और वो वहां नही थी. वो अचानक वहां आ धमकी. जल्दबाजीमे मैने उसको आपका सील्ड एन्व्हलप दे दिया और मै भाग आया. "......... थोडा विचार करून तो म्हणाला, " द्येको, उत्तम मेरेको कल पुलिस स्टेशन बुलाया है, शायद वो तुमको भी वुला सकता है. टीक है, अब तुम जाओ. कलका मिटिंग तुम एटेंड करो., ये लो फाइल, स्टडी. मै आनेतक तुम और प्रतिबा आयी तो उसके साथ मिटींग संमालना. " असं म्हणून त्याने मला एक फाइल दिली. मी बाहेर आलो. म्हणजे मी गेलो होतो हे त्या हवालदाराला माहित होतं. याचाच अर्थ प्रतिभाने पोलिसांना लेटर दिलं होतं. आणि माझ्याबद्दलही सांगितलं होतं. पाच वाजून गेले होते. मी अर्धा तास कसातरी काढला. आणि नारायणला सांगून निघालो. तो थोडा वैतागला. त्याने जाताना मला दिलेली फाइल घरी घेऊन जायला सांगितलं. आणि मी लवकर जाण्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

मी मनामध्ये बरीच आंदोलनं घेऊन घरी पोहोचलो. रिता कुठेतरी जाण्याच्या तयारीत होती. मला लवकर आलेला पाहून ती म्हणाली, " आज, आपण बाहेर जाऊ या जेवायला. मला आज घरी करण्याच कंटाळा आलाय. " मी विचार केला. आपलंही डोक अस्थिर आहे. काय हरकत आहे जायला. तास दीड तासाने निघण्याचं मी ठरवलं. ती खूश झाली. फाइल रात्री बसून वाचता येईल असं ठरवून मी तयार झालो. कुठे जायचं असं रिताला विचारल्यावर ती म्हणाली, " आपण चँग वँगला जाऊ या. मला चायनीज खायचंय. " मला चायनीज फारसं आवडत नसलं तरी मी हो म्हणालो. मग लवकरच टॅक्सी पकडून आम्ही साडे आठच्या सुमारास चँग वँगला पोहोचलो. हे एक जुहू चौपाटी वरचं मिडियम साइझचे रेस्टॉरंट होतं. चौपाटी रंगी बेरंगी दिव्यांनी चमकत होती. असली चायनीज हॉटेलं तिथे बरीच होती. रस्त्यात असताना रिताची उत्साही बडबड चालू होती. जणू काही ती प्रथमच हॉटेलमध्ये जेवायला जात होती. पण मी तिला नाराज न करण्याचं ठरवलं होतं. माझ्या मनात पोलिसांसारखा विचार चालू होता. खरंच प्रतिभा आणि नारायण यांचे संबंध असतील का? मी विचित्र जोडी एकत्र आणण्याचा प्रयत्न करित होतो. मन सारखं ही आयडिया धुडकावून लावीत होतं. मी विचार केला प्रतिभासारख्या दगडी चेहऱ्याच्या स्त्री बरोबर प्रेमसंबंध कोण ठेवणार? ..... का तू ठेवणार नाहीस? माझ्या मनाने टोचायला सुरुवात केली. त्याला प्रतिसाद द्यावा लागू नये म्हणून मी समोरच्या लोकांनी फुललेल्या बीचकडे पाहिलं. वेगवेगळी आकर्षक जोडपी इकडे तिकडे फिरत होती. कोणी कोपरा पकडून " चुकचुकाट " करीत बसले होते.

मी तिकडे पाहतोय असं पाहून रिताने मला ओढले आणि म्हणाली, " यासाठी आलोय का आपण ? " मी चेष्टेच्या सुरात म्हंटले, " काय हरकत आहे? अजून आपण म्हातारे नाही झालो. " मागून कुणाचा तरी धक्का लागल्याने मी चिडून पाहिले. एक म्हातारा एका तरूण युवतीच्या कमरेत हात घालून समुद्राकडे धावत होता. रिता काहीच बोलली नाही. पण "जनाची नाहीतरी मनाची ठेवा " असं मला ऐकू येईल इतपत पुटपुटली. ती असं का म्हणाली मला कळलं नाही. पण उगाच मूड खराब व्हायला नको, म्ह्णून मी रेस्टॉरंटमध्ये तिला घेऊन शिरलो. चिनी (तो चिनी असण्यापेक्षा नेपाळी जास्त वाटत होता. मुंबईचा काही भरवसा नाही इथे काहीही सापडेल. ) वेटर आदबीने पुढे आला. कमरेत वाकत त्याने विचारले, " शाब अंदर बैठेगे या बाहर लगवा दूं टेबल? " समुद्रावरून येणारा वारा पाहून रिता म्हणाली " बाहरही लगाव. "..... त्याने बसण्याची व्यवस्था करी पर्यंत मी सहज म्हणून रेस्टॉरंटच्या आतल्या भागावर नजर टाकली. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. .....आतल्या एका टेबलापाशी नारायण आणि प्रतिभा बसले होते. ..... मला मनाने अर्धवट सोडलेला प्रश्न नव्याने विचारला. अर्थातच मी उत्तर न देता त्यांच्याकडे पाहत उभा राहिलो. नारायण मला पाठमोरा होता. पण प्रतिभा मात्र नीट दिसत होती............ मला आश्चर्य आणि राग या दोन्ही भावना एकदम जाणवल्या. या बाईच्या नवऱ्याचा खून कालच झालाय आणि आज ही प्रियकराबरोबर हॉटेल मध्ये? मी नारायणचं नामकरण केलं. दगडी मुखवटा चढवणारी प्रतिभा इतकी पुढे गेलेली असेल असे मला वाटले नाही. मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना रेडहँड पकडण्याच्या विचारात होतो. तेवढ्यात रिताने हाक मारली. मला मागे येणं भाग पडलं. परत वेटर आला. मी ऑर्डर देण्याचा विचार करू लागलो, पण माझं त्यात लक्ष नव्हतं. त्या दोघांचा माग आता मला सोडावासा वाटत नव्हता. रिता आणि माझा मोठा मुलगा( वय वर्ष आठ ) चिकन टिक्क्याचा आग्रह धरू लागले. आणि इतर चायनीज स्टार्टर्स मागू लागले. मग धाकटा मुलगाही मागे कसा राहणार? साहेबांना पापलेट हवा होता. ऑर्डर तर दिली. मेन कोर्सचं मग बघू असं सांगितलं. मी उठलो आणि वेटरला बाजूला घेऊन प्रतिभा बसलेलं टेबल दाखवलं आणि तो निघाले की मला सांगण्यास सांगितले. तो म्हणाला, " शाब, ऐसा काम हम नही करता ये अच्छा नही है " त्याला शंभराची नोट दाखवून मी म्हंटले, " अब करेगा ना? ...... " तरीही तो नाही म्हणाल्यावर मी आणखी एक नोट काढली. आणि त्याला दाखवली. तो हो म्हणाला. मग मी त्याला सांगितले, " वो आदमीने गाडी लाया होगा, उसका नंबरभी मुझे चाहिये " त्यावर घाबरून तो म्हणाला " शाब आप है कौन? " मी उत्तरादाखल त्याला म्हंटले, " ठिक है, लगता है तुम्हे पैसेकी जरुरत नही. " मी पैसे परत मागितले. त्यावर तो म्हणाला, " ठीक है शाब करेगा " त्याने पैसे खिशात घातले आणि तो गेला. रिताने मला विचारले, " ऑर्डर बदलली नाहीत ना? असलं काही करू नका. कितीतरी दिवसात आपण बाहेर आलो नाही. " ऑर्डरला वेळ लागेल असे समजून मी प्रतिभाकडे पाहत राहिलो. तिथे दुसऱ्या एका वेटरने ऑर्डर घेतली . जरी ते हॉटेलमध्ये बसले होते तरी प्रतिभाचा चेहरा ओढलेला वाटला. ह्या दोघांनी मिळूनच नवऱ्याचा खून केला असला तर ? मला ही आयडिया आवडली. मला आता इन्स्पेक्टर वाघमाऱ्यांची कल्पना पटली. नारायणचे आणि प्रतिभाचे संबंध असणार हे त्यांनी बरोबर ताडले होते. शेवटी ते पोलीस होते. त्यांना अनुभव होता. पण इथे काय मोटीव्ह होता कोण जाणे . शोधण्याचं काम पोलिसांचं होतं. मला मनाच्या कोपऱ्यात प्रतिभा कुठे तरी अडकावी असं वाटत होतं. कारण तिने मला पाहिजे तसा रेस्पॉन्स दिला नव्हता. खरंतर तिने मला रेस्पॉन्स द्यायलाच पाहिजे ही माझी अपेक्षा चुकीची होती. पण सध्या मला हे पटलं होतं.

आता आम्हाला हॉटेलमधे येऊन अर्धा पाऊण तास झाला होता. आमचा मेन कोर्स चालू झाला. मी सारखा प्रतिभाकडे पाहत होतो. ते काहीतरी खात असावेत. मला त्यात अजिबात रस नव्हता. ते काय बोलत होते हे मला कळत नव्हते. मी नारायणच्या गाडीचा नंबर घेऊन काय करणार होतो , कोण जाणे. कदाचित पोलिसांना त्यांचं आजचं येणं सांगितल तर उपयोगी पडेल असं मला वाटलं. ते दोघेही उठले . त्यांनी बिल वेटरकडे दिलं असावं. माझा वेटर अचानक दिसेनासा झाला. मला त्याचा राग आला. एवढं सांगूनही त्याने त्यांचा माग घालवला. ते गेल्यावर आम्ही अर्ध्या तासाने म्हणजे दहा वाजायला आले असताना उठलो. माझा वेटर आता अवतीर्ण झाला होता. तो बिल घेऊन आला . मी त्याला नजरेनेच विचारले .त्याने रिताला ऐकू जाणार नाही अश्या बेताने " बिल के पीछे देखो " असा संदेश दिला. मी बिलाची मागची बाजू पाहिली. त्यावर नारायणच्या गाडीचा नंबर होता. मी बिलामागे पाहतोय , हे रिताच्या लक्षात येऊन ती म्हणाली, "बिलामागे काय पाहताय " असं म्हणून तिने माझ्या हातातून बिल घेतले. मला आवडले नाही. मग ती म्हणाली, " कोणाच्या तरी गाडीचा नंबर दिसतोय. तिने ते बिल चुरगळून टाकून दिले. मला राग आला. पण मी ती उठून पुढे गेल्यावर ते उचलले आणि निघालो. तिच्या लक्षात आले नाही. आम्ही रात्री आइस्क्रीम वगैरे खाऊन घरी पोहोचे पर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते. रिताने झोपायची घाई केली. पण मी आणलेली फाइल घेऊन बसलो. ती वैतागून म्हणाली, " घरी कसली कामं करता हो. " तिला आता मी जवळ हवा होतो. पण मी प्रतिसाद न देता तसाच बसून राहिलो. ती लवकरच निद्राधीन झाली.

*******************************

रात्रीचे दहा वाजत आले होते. प्रतिभा इन्स्पे. वाघमारे साहेबांच्या समोरच्या खुर्चीत बसली होती. वाघमारेंनी विचारले, " बोला मिसेस राजवाडे ,मिस्टरांच्या मर्डरला कोण कारणीभुत आहे ? तुमचा कोणावर संशय आहे ? " हा प्रश्न त्यांनी आल्यापासून पाच सहा वेळेला तरी विचारून झाला होता. पण प्रतिभाचं एकच म्हणणं होतं. आमचा घटस्फोट झालेला आहे . मला काहीही माहिती नाही. शेवटी त्यांनी एकच प्रश्न विचारला, " यांचा खून संध्याकाळी पाच ते सहामध्ये झाला असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. अजून वैद्यकीय अहवाल यायचा बाकी आहे. त्या वेळात तुम्ही कुठे होतात ? " आणि खून झाल्यावर अचानक तुम्ही तिथे कशा पोहोचलात. की खुन्याचा तुम्हाला फोन आला होता ?.......... "मी माझ्या घरीच होते. "प्रतिभा थोडक्यात म्हणाली. तिच्या लक्षात आलं इथे जास्त बोलणं म्हणजे निष्कारण अडकणं आहे. थोडावेळ वाट पाहून इन्स्पे. म्हणाले, " हे पाहा मॅडम, तुम्ही जेवढे तपशीलवार सांगाल तेवढं आम्हाला खुनी शोधणं सोपं पडेल. उगाच माहिती लपवू नका. आणि तुमच्या पर्समध्ये इतके पैसे तुम्ही का आणले होते. एक लक्षात ठेवा नवऱ्याचा खून झाला तर आमचा पहिला शक त्याच्या पत्नीवर जातो. ". ...... मग तिने ती राजेश पैशासाठी, घटस्फोट झाला असला तरी, कसा त्रास देत असे आणि आज मी त्याला अखेरची रक्कम द्यायला आले होते असे सांगितले. त्यावर इन्स्पे. म्हणाले, " त्यांच्या आणि तुमच्या चर्चेतून काही निष्पन्न होईना म्हणून तुम्ही त्यांना मारून टाकलत? कोणाच्या मदतीनी केलंत हे सगळं ? बोला मॅडम लवकर बोला. " त्यावर ती तापून म्हणाली, " खरं आहे ते मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे. माझा कोणाशीही संबंध नाही आणि मी कोणाच्याही मदतीनी त्यांचा खून केलेला नाही. " ....... "म्हणजे तुम्ही स्वतःच केलाय असं म्हणायचंय का तुम्हाला ? " त्यानी खंवचटपणे विचारले. मग मात्र वैतागून ती म्हणाली, " मला यावर काहीच बोलायचं नाही. तुम्ही कितिही वेळा जरी विचारलंत तरी माझं उत्तर एकच आहे. पाहिजे तर घटस्फोटाची डिक्री तुम्हाला आणून देईन. माझा नवरा मला त्रास देत होता. पण त्याला मारण्याचा मी कधीच विचार केला नाही. विश्वास ठेवा की नका ठेवू. " ........." डिक्रीची कॉपी लागेलच. वैद्यकिय अहवाल आला की खून केव्हा झाला हे जास्त स्पष्ट होईल. आणि हे एक , तुम्हाला उत्तमने लेटर दिले ते तुमच्या नव्या पत्त्यावरचे होते, मग या पत्त्यावर येऊन त्याने हे लेटर तुम्हाला का दिलं ? का त्याला आधीच बोलावून ठेवलं होततं. ? त्याचे आणि तुमचे काय संबंध होते. ? विचार करून ठेवा मिसेस प्रतिभा राजवाडे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला लागणार आहेत. " आत्ता निघू शकता तुम्ही मी जास्त वेळ थांबवणार नाही, पण परत बोलावीन. आणि आमच्या परवानगी शिवाय या शहरातून बाहेर जायचा प्रयत्न करू नका. पासपोर्ट असेलच , तोही घेऊन या. " ती उठली. जाण्यासाठी दाराकडे वळली. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणाले, " मि. नारायण तुमचे बॉस घरी येत असत्तील ना ? " तिच्या अंगार फुललेल्या डोळ्यांकडे पाहत मवाळ पणे ते म्हणाले, " सॉरी, पण माझा एक अंदाज. " ती निघाली.

लेडी कॉन्स्टेबलने शुचीला आणून दिलि. त्या दोघी निघाल्या. रात्री बारा साडेबाराला ती घरी पोहोचली. कपडे बदलून ती झोपण्याची तयारी करीत असताना , दरवाज्याची बेल वाजली. इतक्या रात्री कोण असणार ?असा भीतीदायक विचार करीत ती दार उघडायला गेली. दारात भुस्कारलेल्या केसांचा प्रकाश उभा होता. प्रकाश तिचा सख्खा भाऊ. ........... हा आत्ता कशाला आला असावा याचं तिला आश्चर्य वाटलं आत पाय ठेवित प्रकाश म्हणाला, " ताई किती घाबरतेस ? "

आत येऊन बसत तो म्हणाला, " आजची रात्र तुझ्याकडे राहण्याचा विचार आहे. " प्रतिभाच्या चेहऱ्यावर नापसंतीची आठी पाहून तो म्हणाला, " तुझा चेहरा असा बारा वाजल्यासारखा काय दिसतोय? अगं आता तर खरोखरीचे बारा वाजून गेलेले आहेत" ती काहीच बोलली नाही. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्याचं म्हणणं खरं होतं. राजेशच्या आयुष्यात रजनी आल्यापासून तिच्या संसाराचे बारा वाजले होते. पण तिला तो विषय आता नको होता. तिला खरंतर आत्ता एकटीनं राहायचं होतं. म्हणजे काहीतरी मार्ग दिसला असता, ज्याने घाबरलेलं मन स्थिर झालं असतं. तिला आता आधार कोणाचाच नव्हता. आई केव्हाच गेली होती. बाप्पा काही वर्षांपूर्वी गेले होते, आणि आता राजेश. मनाने राजेशचं नाव मुद्दाम घुसडलं....... राजेशचा आधार? आता आपण त्याची विधवा होतो. आत्तापर्यंत तिने , म्हणजे राजेश पासून लांब राहायला लागल्या पासून, गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं होतं ते घटस्फोट झाला तरीही काढलं नव्हतं. आणि यापुढेही ती काढणार नव्हती. तिच्या दृष्टीने मंगळसूत्र म्हणजे एक प्रकारची दुसऱ्या पुरूषांपासून वाचवणारी ढाल होती. निदान ते पाहून तरी दुसरा पुरूष तिच्या मागे लागला नाही. बहुतेक जण विवाहित स्त्रीच्या पुरुषाला घाबरत असावेत. आपला सामना दुसऱ्या न पाहिलेल्या आणि न अजमावलेल्या पुरुषाशी कुणालाच आवडत नसावा. हे सगळे विखुरलेले विचार तिला सतावू लागले. तिने अहेतुकपणे प्रकाशकडे पाहिलं. हा का आलाय.......??? तिला तो बाप्पा गेल्यापासून नकोसा झाला होता. आपल्याला पाठचा भाऊ आहे या भावनेचं तिला केवढं कौतुक होतं. पण याने स्वतःच्या वर्तणुकीने सगळं घालवलं. बाप्पांना यानेच मारलं, असं तिला सारखं वाटायचं. तो त्यांचा छळ करीत होता अस बाप्पांच्या बोलण्यात एक दोन वेळाआल्याचं तिला आठवलं. ती त्याच्या प्रत्येक कृतीकडे गढूळ नजरेनेच पाहायची. आता जाण्याची शक्यता नव्हती आणि इतक्या रात्री त्याला जायला सांगणं माणुसकीला धरून झालं नसतं. नाइलाजाने ती म्हणाली, " तुला पाहिजे तर तू पलंगावर झोप. मला खालीच झोपायचंय. "

त्याने अंगातला शर्ट काढला. तो झोपण्याची तयारी करू लागला. अचानक त्याच्या खिशातून चाव्यांचा गुच्छ पडला. त्याने तो घाईघाईने उचलून खिशात घातला. का कोण जाणे हा चाव्यांचा गुच्छ तिला पाहिल्यासारखा वाटला. तिने विचारले, " अरे, या चाव्या कोणत्या? " ........ तो विचार करून बोलत असल्यासारखा तिला वाटला. वेळ घेऊन तो म्हणाला, " अग, आपल्या शेजारी चित्रा आंटी राहते ना तिनेच तर ठेवायला दिलाय. तिच्याच घराच्या चाव्या आहेत. " असं म्हंटलं पण त्याने त्या दाखवल्या नाही. चित्रा आंटीच्या चाव्या तो बरोबर घेऊन का फिरतोय, घरी ठेवायला पाहिजेत. पण तिने तसे काही विचारले नाही. तिने लाइट बंद केला. ती दमली होती. पण झोप लागेना. प्रकाश खोटं बोलत होता असा तिला पक्का संशय होता. शंख असलेली चावी, तिला आठवलं. अशी कीचेन राजेशच्या चाव्यांची होती. मग ती याच्याकडे कशी आली. चित्रा आंटी पण अशी कीचेन वापरू शकते, मनाने संशयात संशय निर्माण केला. तिचे समाधान होईना. तिला अचानक आठवलं. लग्न झाल्यावर ती आणि राजेश हनिमूनसाठी उत्तर भारतातल्या कोणत्यातरी हिल स्टेशनला गेले होते. तिथे तिने ती कीचेन राजेशला घ्यायला लावली होती. मग राजेशच बोलणं तिला आठवलं. तिला जवळ घेत म्हणाला होता, " कमाल असते बायकांची, काहीतरी महागडं गिफ्ट मागायचं सोडून असलं फालतू गिफ्ट घेतात. " ती म्हणाली होती, " तुला घ्यायचय की नाही..... " तिने फुरंगटल्याचा अभिनय केला होता. ते पाहून त्याने ती कीचेन घेतली होती. प्रसंग अगदीच फालतू होता. पण तो चावीचा गुच्छ घटस्फोट घेईपर्यंत तिच्याकडेच होता. तो गुच्छा तिच्याकडून त्याने तो कोर्टातून बाहेर पडताना मागून घेतला होता. पण अशा कीचेन्स खूप असतात. चित्रा आंटीने असाच आणला असेल. तिचं डोकं आता गरगरायला लागलं. सकाळी बघू. उठल्यावर त्याच्याकडून घेऊ...........

सकाळ झाली. प्रतिभा प्रकाशला काही विचारणार इतक्यात तिच्या लक्षात आले की त्याचा बिछाना रिकामा आहे. तिची नजर मुख्य दरवाज्याकडे गेली. तो अर्धवट उघडा होता. तिने प्रथम बाथरुम तपासले. तिथेही प्रकाश दिसला नाही. हा न सांगताच गेला की काय. तिला त्याचा संशय आला. आपली कीचेन त्याच्याकडे आहे यात काहीतरी गूढ असणार आणि आपण त्याला विचारू म्हणूनच तो गेला असावा. याचे असे लपवाछपवीचे धंदे लहानपणापासूनच होते. प्रथम प्रथम तिला त्याचा कळवळा यायचा, पण नंतर तो निर्ढावल्यासारखा झाला. त्याला एकदा शाळेत असतानाच पोलिसांनी अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ग्रुपमध्ये पकडला होता. बाप्पांची पोलिसात ओळख असल्याने थोडेफार पैसे देऊन त्याला सोडवून आणला होता. आणि त्या धक्क्याने आईने अंथरुण धरले होते. पुढे पुढे त्याच्या वेगवेगळ्या लीला दिसायला सुरुवात झाली आणि आईचं आजारपण वाढायला लागलं. तिचं लग्न व्हायच्या आतच आईने या जगाचा निरोप घेतला होता. राजेशलाही हे सगळं माहीत होतं. पण त्याने दुर्लक्ष केलं. अर्धवट शिक्षण झालेल्या प्रकाशने बाप्पांना दहशत दाखवून पैसे उकळण्याचा धंदाच चालू केला होता. पैसे दिल नाही तर तो तमाशा करायचा लोकांना गोळा करायचा, बाप्पांबद्दल वाट्टेल ते सांगायचा. पुढे पुढे बाप्पांच विरोधही कमी झाला. पण तेही काही वर्षातच गेले. नाही म्हणायला घटस्फोटाचा निर्णय घ्यायच्या आधीच ते गेले. तिला आता माहेरचे असं कोणीही नव्हतं की ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती तिच्या भावनांना वाट करून देऊ शकली असती. तिच्या मनाने तिची कींव करण्याची संधी सोडली नाही. ती वाहवत चालली आहे हे तिच्या लक्षात येताच तिने इतर कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. तिला अचानक नारायणने पाठवलेल्या लेटअरची आठवण झाली. पण ते तर पोलिसांकडे होतं. त्यात तीन दिवसात कामावर गैरहजर असल्याचे कारण कळविण्यास सांगितले होते, नाहीतर तिच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी होती. कामावर गेले तर पोलिस तिथे गाठतील आणि निष्कारण ऑफिसमध्ये तमाशा होईल. त्यापेक्षा न जाता पत्राला उत्तर द्यावं आणि बोलावलं तर पोलिस स्टेशनला जाऊन यावं. खरंतर तिला दोन्हीकडे जाण्याची इच्छा नव्हती. अचानक बेल वाजल्याने ती दरवाज्या उघडायला गेली. दारात पोलिस हवालदार उभा होता. त्याने आत नजर फिरवीत म्हंटले, " मॅडम तुम्हाला बाघमारे साहेबांनी बोलावलंय. " तिला काय उत्तर द्यावं कळेना. ती पटकन म्हणाली, " पण मला तर ऑफिसला जायचंय. मी संध्याकाळी येईन . " मग अजिजीने तो म्हणाला, " मॅडम असं म्हनून कसं चालंल ? चौकशी पूर्ण होईपर्यंत हे असंच चालंल. " पाहिजे तर , स्टेशनला येऊन साहेबांच्या परवानगीनं हापिसात जावा " असं म्हणून तो तर गेला. तिला खरंतर आज कुठेच जायचं नव्हतं. तिने कसातरी नाश्ता बनवला. शुचीला उठवून तिच्या शाळेत जाण्याची तयारी केली. मग ऑफिसमध्ये उशिरा येत असल्याचं कळवण्यासाठी तिने फोन केला. नारायणने तिचा फोन उचलला नाही. तिने दोन चार वेळा प्रयत्न केला. तिला उत्तमशी बोलायचं नव्हतं. शेवटी तिने फोन न करण्याचे ठरवले. अचानक तिला नारायणचा फोन आला. तो पोलिस स्टेशनला आलेला होता. तिला त्याने तिकडे येण्यासाठी सांगितले होते. ती फोन बंद करून काय करायचं हे न ठरवता आल्याने ,अगतिकपणे बिछान्यावर बसली.तिच्या पायाला कोणती तरी वस्तू टोचल्याचं तिला जाणवलं. ती खाली वाकून वस्तू उचलायला गेली. ती तिची कीचेन होती. पण ......"फक्त कीचेन ."..... चाव्या नव्हत्या. हातात घेतलेल्या शंखाकडे ती निरखून पाहू लागली. तिला त्या शंखावर "पी " हे अक्षर रंगवल्याचे दिसले. म्हणजे हि तीच कीचेन आहे. चित्रा आंटिचा काहीही संबंध नाही. कीचेन काढून फेकण्यात प्रकाशचा काय हेतू असावा, तिला कळेना. राजेशच्या घराच्या चाव्या गेल्या कुठे ? पोलिसांना हे सांगायचं का ? एक नाही अनेक प्रश्न उभे राहिले. कोणत्या संदर्भात सांगायच ? आणि ही कीचेन आपल्याकडे कशी आली आणि प्रकाशकडे काय करीत होती ?

तिने ती कीचेन तशीच कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवली. आता ती पोलिस स्टेशनला जाण्यासाठी तयार होऊ लागली. .........

तासाभराने ती पोलिस स्टेशनला पोहोचली. वाघमारे साहेबांच्या समोरच्या खुर्चित नारायणन बसला होता. तो पाठमोरा असल्याने त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना तिला दिसल्या नाहीत. प्रतिभा आल्याची खबर हवालदाराने त्यांना येऊन दिली होती. नारायणला ते ऐकू न येईल याची काळजी घेतली होती. आता नारायण जाम कंटाळला होता. तेच तेच प्रश्न , त्यांची तीच तीच उत्तरं आणि तेच तेच संशय यांनी त्याच्या डोक्याचा पार भुगा केला होता. प्रतिभा आत शिरली . तिला बसायची खूण करीत वाघमारे म्हणाले, "मॅडम , सध्या, ऑफिस वगैरे विसरा. आम्हाला जेवढ्या लवकर खुन्याचा माग लागेल तेवढ्या लवकर तुम्ही सुटाल. वाईट वाटेल तुम्हाला, पण तुम्ही आणि हा नारायण अजिबात सहकार्य करित नाही आहात. " तिने दगडाचा मुखवटा चढवल्याने ती नारायणकडे पाहत नव्हती. थोडावेळ जाऊन देऊन वाघमारे म्हणाले, " अरे जाधव जरा मॅडम आणि नारायण साठी चहा सांग , म्हणजे थिजलेली डोकी जरा नीट चालतील. तोपर्यंत हे दोघे आपल्याला काहीतरी लीड नक्कीच देतील. " तेवढ्यात नारायणने पाणी मागितले. वाघमारे साहेबांनी तिथलाच पाण्याचा ग्लास त्याला दाखवला. तो घेऊन पाणी पिऊन झाल्यावर ते म्हणाले, " मि. नारायण , क्रिमिनॉलोजीके मुताबिक जब सस्पेक्ट पानी पिता है ना तब वो सच को छिपाने की कोशिश करता है . बोलिये , इनका और आपका संबंध कितना पुराना है ? " ते जोरात ओरडले. मग मात्र नारायण वैतागून म्हणाला, " आपको कितनी बार कहां हमारा कोई संबंध नही है. ना हम एक दूसरेको पर्सनल लेव्हल पर पहचानते है. " ...... त्यावर वाघमारे म्हणाले, " काम डाऊन मि. नारायणन , ये पोलिस स्टेशन है , नीची आवाजमे बात कीजिये . जबतक आप दोनो सच नही बोलते तबतक आपको हम यहां बुलाते रहेंगे और आपके ऑफिसमे आके भी मिलेंगे. एक आदमीका मर्डर हुवा है मि. नारायणन. " मग ते प्रतिभाकडे वळून म्हणाले, " तर मॅडम आता आपण परत एकदा या घटनेकडे बघू. तुम्ही नेमक्या खून झाल्या झाल्या तिथे कशा पोहोचलात ? " तेवढ्यात हवालदार आत येऊन त्यांच्या कानाशी कुजबुजला . ते ऐकून ते म्हणाले, " मॅडम फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे. खून पाच ते साडेपाचमध्ये झालेला आहे. तुम्ही आणि उत्तम सहा वाजता तिथे होतात. ....का ? आणि कसे ? .... " .....थोडं थांबून तिचा चेहरा निरखीत ते सावकाश विचारले, " कोणाचा तुम्हाला फोन आला होता का ? मोबाइल द्या तुमचा.......... ‌ सरळ सांगितलंत तर बरं होईल . तुम्ही उत्तमला तिकडे मुद्दाम बोलावलंत. तो तिकडे येणार आहे तेही तुम्हा दोघांना माहित होतं. तुमचं काम आयतंच झालं. " मग नारायण कडे वळून ते म्हणाले, " तुमने लेटर खुद क्यूं बनाया ? वो भी नये पतेपर ? और उत्तम को लेटर लेके पुराने पतेपर भेजा. .....एचारको क्यूं नही बनानेको बोला ? " नारायण कडे डोळे वटारून पाहत त्यांनी विचारलं . मध्येच चहा आला. तो त्यांनी घ्यायला सांगितला नाही. ........ मग ओरडून ते म्हणाले, " बोला, खरं काय आहे ? " नारायण म्हणाला, " देको साब जो मालुम था वो बता दिया. अभी आपको जो करना है वो करो. " असं म्हंटल्याबरोबर ते चिडले आणि त्यांनी हाक मारली, " जाधव याला आत घ्या, नारायण कडे पाहत ते म्हणाले, " आपको हमारी मेहमाननवाजी देखनी है ? अभी हम अपना तरीका अपनायेंगे. " असं म्हंटल्याबरोबर नारायण शहारला. कॉन्स्टे. जाधवने त्याला हाताला धरून उभा केला.

मग त्याने एकदा प्रतिभाकडे पाहिले. तिने कोणताही इशारा केला नाही. नरम आवाजात तो म्हणाला, " हम एक दुसरेको जानते है. ये मेरी क्लासमेट थी. " वाघमारे चिडले त्याच्याकडे येऊन त्यांनी त्याला एक कानफटात दिली आणि म्हणाले, " आमचा पेशन्स पाहतोस काय रे ए, कुत्र्या ? ..... आता लवकर लवकर सगळ ओक. " प्रतिभाचा चेहरा पडला होता. दगडी मुखवटा सरकला होता. तिचा चेहरा काळजीने काळवंडला होता. तरीही नारायण म्हणाला, " हम थे क्लासमेट . उससे क्या फरक पडता है ? " मग हलक्या आवाजात वाघमारे म्हणाले, " सिर्फ क्लासमेटस या और कुछ? हफ्ते हफ्तेमे जानकारी मत देना आगे बोलो. " ....... थोडं थांबून तो म्हणाला, " मैने तरस खाके इसे ये नौकरी दी. उसने डिवोर्सके बारेमे मुझे कहां था. और हमारा कोई संबंध नही था. " ....... मग थोडा वेळ थांबून ते प्रतिभाला म्हणाले, " कसं वाटतंय मॅडम हे सगळं ? " ती काहीच बोलली नाही. नारायणच्या लक्षात आलं की यांना अजून कोणताही पुरावा मिळालेला नाही. म्हणूनच हे वैतागलेले आहेत. यांना जास्त माहिती देण्यात अर्थ नाही. तो काही तरी विचार करित आहे असे पाहून इन्स्पे. म्हणाले, " क्या सोच रहे हो ? कुछ तो पकडके बैठे हो. हम ढुंढनेसे पहले बोलो , वरना तेरी ऐसी पिटाई करूंगा की जिंदगीभर याद रखोगे. " आज तुम जा सकते हो. फिर बुलाउंगा बो भी बार बार. निकलो........ " असं म्हंटल्यावर प्रतिभा पण उठली. ते पाहून इन्स्पे. म्हणाले, " अरे , तुम्ही कुठे चाललात ? तुम्हाला जायला सांगितलं नाही ......? तसा नारायण चांगला माणूस आहे नाही ? " ती काहीच बोलली नाही. ती बोलत नाही असं पाहून ते म्हणाले, " मॅडम तुम्ही डिवोर्स घेतल्यावर याच्याशी लग्न करणार होतात का ? रागावू नका पण एकेक इच्छा असते नाही का माणसाच्या मनात. त्यानी तुम्हाला तरस का काय ते खाऊन नोकरी पण दिली. याचाच अर्थ तुमचा त्याच्याशी नियमित संपर्क होता. ...... होता की नाही ? बोला मॅडम . लवकर लवकर बोला. तुमच्या मिस्तरांचा " खू........ न " झालाय मॅडम. सीरियसली घ्या. " तरीही ती काहीच बोलली नाही. तिचा दगडी लुक परत आला. काही वेळ जाऊन देऊन ते म्हणाले, " ठीक आहे , निघा. बहुतेक तुम्हाला घरी चौकशी केलेली आवडत असावी. बघू या काय जमतंय ते. " ........ ती जरा वेळ रेंगाळली. पण उठत म्हणाली, " हे पाहा मी माझ्या मिस्टरांचा खून केलेला नाही आहे. . " काय माहीत ? अशा अर्थी हात करीत वाघमारेंनी तिला जाण्याची खूण केली. ती गेल्यावर त्यांनी जाधवला बोलावून या दोघांवर लक्ष ठेवण्यास सांगितले.

***********************************

मी लवकरच ऑफिसमध्ये पोहोचलो. मला वाटलं लेटर पाहून प्रतिभा नक्कीच येईल. पण ती आली नाही. प्रतिभा आणि नारायण यांचा ब्रॅकेट असलाच पाहिजे,नाहीतर ते एकत्र जेवायला कसे आले. आज मला एकट्यालाच मिटींगची खिंड लढवायची होती. कदाचित नारायणनिच तिला येऊ नकोस म्हणून सांगितलं असलं पाहिजे. आत्तापर्यंत पेपरातल्या बातमीमुळे कंपनीमध्ये प्रतिभाच्या नवऱ्याचा खून झाल्याची बातमी पसरली होती. अजून तरी जंबोसिंगने कारवाई केली नव्हती. केली असली तरी मला कळणं कठीण होतं. ते व्यवस्थापन ठरवणार . मी जास्त ताप न करून घेता मिटींगला निघालो. प्रेझेंटेशन खूप चांगलं दिलंही. पण कस्टमरचा मॅनेजर बिजलानिला ते पटत नव्हतं असं दिसलं. तो सारखा कॉस्ट कटिंग करो असं म्हणत राहिला. मग मात्र मी नारायण कडे बोट दाखवलं आणि गप्प बसलो. दोन अडीच वाजता मिटिंग संपली. जेवून जेमतेम जागेवर बसतोय तोच फोन वाजला. मला वाटलं, नारायण असणार , पण ते होते इन्स्पे. वाघमारे.

मी घाबरलो. त्यांनी पाच वाजता मला बोलावले होते. मला हलकासा घाम फुटला. मी त्यांना काय सांगायचं आणि किती सांगायचं याचा विचार करायचा सोडून जे काही आहे ते खरं खरं सांगायचं हे ठरवलं. अगदी नारायण आणि प्रतिभाची भेटसुद्धा. तेवढ्यात नारायण आला. आल्या आल्या त्याने मला केबीन मध्ये बोलावलं. तो थोडा काळवंडलेला दिसला. पोलिसांनी त्याला त्रास दिला असावा. आत गेल्यावर त्याने प्रथम मिटिंगची माहिती घेतली. बिजलानी बद्दल मी त्याला सांगितलं. त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता ऐकून घेतलं. आणि अचानक तो मला म्हणाला, " देको पुलिस बुलायेगी तो ज्यादा इंफॉर्मेशन मत देना. सब कुत्ते लोग है. " मग मी त्याला मला आज बोलवले असल्याचे सांगितले. तो म्हणाला, " तुमको समन्स भेजा है क्या ? " मी नाही म्हंटले, त्यावर तो म्हणाला, " तो , मत जाना. " मी केबीन बाहेर आलो. प्रतिभाच्या टेबलापाशी परवाचाच हवालदार बसला होता. ते ओळखीचे हसू हसले. आणि म्हणाले, " सायबान तुमका बलवल्यानी. हे घ्या समन. " त्याने ते दिले आणि माझी सही घेतली . तो पुढे म्हणाला, " खरंतर तुमास्नी घेऊन यायला सांगितलंन. पन , एक तासाभरात आलास तरी चालंल . " असे म्हणून तो उठला. मी पुन्हा नारायण कडे गेलो. त्याला समन्स दाखवले . अजून जायला तासभर तरी होता. मी तसा विचलित झालो होतो. मी कधीच पोलिस स्टेशनला गेलो नसल्याने थोडा ताण होताच. एखाद्या सिरियलमध्ये पोलिस स्टेशन मधले व्यवहार पाहणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथे जाणं वेगळं. नुसते बसून मला कंटाळा आला होता. तेवढ्यात फोन वाजला. तो रिताचा होता. ती लवकर या म्हणजे आपल्याला पिक्चरला जाता येईल असे म्हणाली. मी अर्थातच नाही म्हंटलं . तिने नेहमीप्रमाणे मी किती अरसिक आहे ते सांगितलं. तिला काय माहित माझ्या आयुष्याचा आता पिक्चर चालू होणार होता ते. इतका मी घाबरलो होतो. ......... ‌शेवटी एकदाचा मी निघालो.

पोलिस स्टेशनला पोहोचलो. पिवळ्या प्रकाशाचे बल्ब . त्यामुळे जास्त वाटणारा अंधार . खुर्च्यांमध्ये बेपर्वा आणि गणवेषात बसलेली माणसे . त्यांचे रुक्ष चेहरे या सगळ्याचा सामना करीत मी एका कॉन्स्टेबलला विचारले, " वाधमारे साहेबांनी बोलवलयं. त्यांची केबीन कोणती ? " विचारलेल्या प्रश्नाला उत्तर मिळेल तर ते पोलिस स्टेशन कसले ? त्याने माझ्याकडे पाहिले. पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळून झाल्यावर तो म्हणाला, " राजवाडे केस काय ? " मी हो म्हंटलं. तो अशा रितीने बघत होता की माझ्या आर्थिक परिस्थितीचा तो अंदाज घेत असावा. त्याने एका केबीन कडे बोट दाखवलं. मी अर्थातच तिकडे वळलो. धडधडत्या छातीने दारावर बोटे वाजवली. आतून पोलिसी आवाजात " येस कम इन ...... " आणि आत शिरल्यावर लक्षात आलं की टेबला पलिकडील दगडी चेहरा मला न्याहाळत होता. आता तुम्ही म्हणाल की मला दगडी चेहरा पाहण्याची सवय होती. खरं आहे , पण इथे नुसता चेहरा नव्हता तर त्यातील संशयाची बॅटरी माझ्या चेहऱ्याचं स्कॅनिग करीत होती. त्यांनी समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. पण अनिच्छेनीच , असं मला वाटलं. आपण दुसऱ्याला बसायला सांगतो तेव्हा थोडेतरी सौम्य भाव असतात. पण हे पोलिस स्टेशन होतं. मला त्यांनी नाव विचारलं. मी म्हणालो, " उत्तम राजाराम कोनकर " त्यावर त्यांनी विचारले, " म्हणजे आमचे एसीपी कोनकर तुमचे कोण ? " मी म्हंटले, " फक्त नावबंधू. आमचे कोणीही नातेवाईक नाहीत " त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते थोडा वेळ जाऊन देत म्हणाले, " मि. कोनकर मला सांगा , नारायण बद्दल तुम्हाला काय माहिती आहे ? " मला कल्पना नव्हती . असा प्रश्न समोर आल्याने मी बावचळलो. मी म्हंटले, " म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला ? " त्यावर ते भडकून म्हणाले, " इथे फक्त प्रश्नांची उत्तरं अपेक्षित असतात , प्रतिप्रश्न नाही. बोला काय काय माहिती आहे तुम्हाला, नारायणची. " मी म्हंटले, " तशी काही फार नाही. तो वांद्य्राला राहतो, आणि कामामध्ये अतिशय तज्ञ आहे. बाकी त्याची वैयक्तिक माहीती फार नाही. तो डिव्होर्सी आहे असं ऐकलं होतं. नक्की माहित नाही. " मग जरा वेळ जाऊन देऊन त्यांनी एक आलेला फोनही घेतला. मग म्हणाले, " मि. कोनकर, तुम्ही ज्या वेळी राजेशचा मृतदेह रक्ताच्या थोरोळ्यात पडलेला पाहिला तेव्हा ताबडतोब पोलिस स्टेशनला का फोन केला नाहीत ? " माझ्या जवळ याला स्पष्टीकरण नव्हते. पण अचानक मला सुचले. " साहेब मी फार घाबरलो होतो आणि रक्ताळलेला मृतदेह मी जवळून प्रथमच पाहत होतो. "

त्यावर ते म्हणाले, " तुम्ही भोळसटपणाचा आव आणलाय तो तुम्हाला खरा आहे असं म्हणायचंय ? नक्की बोला तुम्हाला नारायणने राजेश मृत्यू पावला आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी तिकडे पत्राचा बहाणा करून पाठवलेलं होतं की नाही ? " आता मला कळलं की यांचा दृष्टिकोन कसा आहे. म्हणजे मी आणि नारायणने मिळून कोणाकरवी तरी राजेशचा खून केला होता. अशी यांची कल्पना झाली होती. मला आता पाठीवरून घामाचा थंड ओघळ खाली उतरताना जाणवू लागला. मग मी ठरवलं की यांना काहीही खरं सांगून उपयोग नाही. यांना जर कळलं की मी प्रतिभाचा पाठलात करून हा जुना पत्ता आधीच शोधला होता आणि नवीनही. तर ते मला नक्कीच या प्रकरणात गोवतील. मी माझा लेटर देण्यापलीकडे या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याच सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, "पण तुम्हाला तर नारायणने तिथे असताना आणि त्याही नंतर तीन चार वेळा तरी फोन केल्याचं दिसतंय. ते कशासाठी ? " खरंतर हा प्रश्न त्यांनी नारायणला विचारलाच असणार तरी मला तो परत विचारण्याची गरज काय. पण मी तसं विचारल नाही. मी काहीच उत्तर देत नाही असं पाहून ते म्हणाले, " बोला मि. उत्तम , मी इथे किर्तन सांगायला बसलो नाही. माझी स्टोरी पुढे गेलीच पाहिजे. बोला " ते ओरडले. मग ते म्हणाले, " आपण एक काम करूया.आता मीच तुम्हाला कथा सांगतो. म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही लेटर द्यायला गेलात त्या लेटरच्या पाकिटावर जुना पत्ता लिहिला होता. जो तुम्ही एचार मधून घेतलात. नारायणने प्रतिभाला छळणाऱ्या राजेशला संपवण्यासाठी सुपारी दिली. तो गुंड आधीच तिकडे पोहोचला होता. त्याने राजेशला मारण्याचं काम केलं. पण नारायणचा विश्वास नव्हता म्हणा , किंवा खात्री व्हावी म्हणून त्याने लेटर पोहोचवण्याचा बहाणा केला. तुम्हाला लेटर घेऊन पाठवले आणि गुंडाने काम झालं असा मेसेज अथवा फोन नारायणला करण्याचा धोका नारायणला किंवा प्रतिभाला घ्यायचा नव्हता म्हणून त्याने तुम्हाला पाठवलं. बरोबर ? (त्यांनी माझ्याकडे पाहिलं) .... किती पैसे नारायणने तुम्हाला दिले, बोला मि.उत्तम. " मी असं काही झालं नाही म्हणालो. पण ते ओरडून म्हणाले, " मग नारायणने तुम्हाला ते लेटर देऊ नये म्हणून का सांगितले ? पण तुम्ही ते लेटर देण्याची चूक केलीत. गुन्हेगार चूक करतातच. मि . उत्तम. .....असा सगळा तुमचा प्लान होता. बोला. मधल्या रिकाम्या जागा भरण्यासाठीच तुम्हाला मी बोलावलंय. " ...... आता मात्र आपण कशात गुंतत चाललोय याची मला जाणीव झाली. मी ओरडून म्हंटलं "अजिबात नाही. माझा राजेशच्या खुनाशी काहीही संवंध नाही. " ........ मग ते म्हणाले, " तुम्हाला ओरडायचंय मि. कोनकर , चला आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला पाहिजे तितके ओरडा, कारण आत आम्ही ओरडायची संधी देत नाही, ओरडायला लावतो आणि खरं बोलायला पण. .....जाधव, याला आत घ्या. "

तिकडून जाधव (ज्याने मला बाहेर न्याहाळले होते तो ) आला त्याने मला कॉलर धरून उचलले. मला धरून त्याने एका कोठडीकडे ओढत नेले. अधिकच अंधारलेल्या त्या कोठडीतल्या अंधुक प्रकाशात मला आतले सगळे धरलेले मेंबर दिसले. सगळेच निर्ढावलेले गुन्हेगार आणि निर्लज्जही. इथे जायचं ? बापरे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मी म्हणालो, " जाधव साहेब मी जे आहे ते सगळे सांगतो, प्लीज मला आत नका नेऊ. " तशी जाधव म्ह्णाला, " अरे आपली गिरीपच अशी आहे , भले भले कापत्यात. " ते ऐकून वाघमारे ओरडले , " जाधव , तुझी ताकत नंतर दाखव, घेऊन ये त्याला इकडे. " मला परत जाधवने ओढत आणले. आता मला बसू न देता वाघमारे म्हणाले, " बोल लवकर लवकर. इतक्या लवकर तुटशील अस वाटलं नाही रे. " मग मी प्रतिभाच्या कंपनीतल्या येण्यापासून तो आजपर्यंतची सगळी माहिती सांगितली. अर्थातच ती एका कॉन्स्टेबलने लिहून घेतली. मग माझ्यापुढे ते पेपर टाकीत वाघमारे ओरडले, " सही कर

त्याच्यावर " मी थरथरत्या हाताने सही केली. मग विचारले, " आता मी जाऊ शकतो का सर ? आपण बोलवाल तेव्हा तेव्हा येईन मी. " वाघमारे म्हणाले, " बोलवल्यावर तुझा बापही येईल. समजलास. हे बघ ,आजपासून मला नारायणची इत्थंभूत खबर पाहिजे. लपवाछपवी केलीस ना तर तुझ्यासाठी कोठडीतच बिछाना लावायला सांगतो. चल नीघ. " मी शर्टाची कॉलर सारखी करीत निघालो. तेव्हा ते म्हणाले, " तुला काय वाटतं तू सांगितलंस याच्यावर आमचा विश्वास बसला ? " ...... त्यांनी जाधवला बोलावून उत्तमवर लक्ष ठेवण्यास सांगितले. .............................

मी काही न बोलता निघालो. निघालो कसला भराभर चालत , पळालोच म्हणा ना. बाहेर पावसाने झोंड उठवली होती. पण मला आता भिजण्याची पर्वाही नव्हती आणि भीतिही. कशी तरी रिक्षा पकडून मी स्टेशनवर आलो. भिजलेल्या अवस्थेतच मी गाडी पकडली.

रात्रीचे आठ वाजून गेले होते. मला माझी मानसिक अवस्था नक्की समजत नव्हती. मन अस्थिर नसलं तरी बरंचंस रिकामं झाल्यासारखं वाटत होतं. मला थोडं पिळल्यासारखं वाटत होतं. मी धसका घेतला असावा. बसलेल्या एक दोन लोकांनी माझ्याकडे अहेतुकपणे पाहिलं. मग त्यांच्या नजरा दुसरीकडे वळल्या. माझा चेहरा ओढल्यासारखा झाला असावा. घरी आल्या आल्या दोघा मुलांनी जाम तक्रारी सांगितल्या. मला जरा राग आला. त्या भरात मी त्यांना म्हंटलं तुम्ही दोघंही खोटं बोलताय. अचानक मी खऱ्या खोट्याची भाषा कशी काय केली कुणास ठाऊक. ते रिताच्या लक्षात आलं असावं. तिने इतकावेळ माझं निरिक्षण केलं असावं. तिने मुलांना " अरे बाबा आत्ताच कामावरून आल्येत त्यांना त्रास देऊ नका. तुमच्या खोलीत जाऊन खेळा . चला " मुलं थोडी हिरमुसली होऊन निघून गेली. मग माझी बॅग जागेवर ठेवीत रिता म्हणाली, " काही प्रॉब्लेम आहे का ? , घरी आल्या आल्या तुम्ही इतकं विचित्र मुलांशी तरी वागत नाही. काय झालं त्या प्रतिभाचं ? " मला आत्ता तिचा विषय नको होता. मी वैतागून उत्तर दिले , " खड्यात गेली ती प्रतिभा, ती माझी बायको आहे का , तिचा विचार करायला ? " असं म्हणून मी फ्रेश होण्यासाठी गेलो. जाता जाता रिता पुटपुटली. ' बायकोचा तरी कुठे विचार करता ? " मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मला आत्ता तरी रिताबरोबर काहीही शेअर करायचं नव्हतं. जेवणं वगैरे झाली . मी सीरियल पाहत बसलो होतो. माझा फोन फुरफुरला. मी दुर्लक्ष केलं. मग तो दोन तीन वेळा फुरफुरला . रिता म्हणाली, " फोन घेतलात तर बरं होईल कोणाचं तरी कामही असेल. बाबांचाही असू शकेल. येत्या रविवारी आपल्याला जेवायला बोलावलेलं आहे. नितेशला नोकरी लागल्ये ना. " नितेश माझा मेहुणा. मी शेवटी फोन घेतला तो नारायणचा होता. मी गॅलरीत आलो. नारायणने विचारले" क्या हुवा पुलिस स्टेशनमे ? मेरे बारेमे पूछा होगा. " मी नाही म्हणून म्हंटले. मी विचार केला आपल्याला जर याच्यावर नजर ठेवायची असेल तर याला बेसावध ठेवलं पाहिजे. मी त्याचा भाग सोडून बाकी सर्व सांगितलं. त्यावर तो म्हणाला, " सरप्रायझिंग . लेकीन संम्हालके. ज्यादा बात नही करना. मेरेकू तेरे बारेमे बहोत पूछा. लेकीन मै ज्यादा कुछ बोला नही. जाने दो . कल आ जाओ . दांडी मत मारना "

दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. हल्ली रिता जरूरीपुरतेच बोलायची. बहुतेक माझं वागणं फारच संवेदनशील झालं असावं. मी त्याचा फार विचार न करण्याचं ठरवलं. आश्चर्य म्हणजे , प्रतिभा आज कामावर आली होती. तिचा दगडी मुखवटा आज नव्हता. तिला त्याचा कंटाळा आला असावा. माझ्या मते माणूस जेव्हा आपल्या स्वभावाशी विसंगत वागतो तेव्हा उसनं वागणं फार दिवस त्याला सांभाळता येत नसावं. अर्थात, तिच्यामध्ये जास्त चिकाटी होती. मी माझ्या कामात व्यग्र होतो. ती तिच्या. मी तिच्याकडे अधून मधून पाहत होतो. मुखवटा नसल्याने तिचे डोळे थोडे रडके वाटत होते. तिच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसत होती , एरव्ही पण असणारच. पण तिच्या मुखवट्यात अडकलेला माणूस तिचं निरिक्षण सोडून देत असावा. मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, " प्रतिभा,पोलिसांकडून बॉडी ताव्यात मिळाली का ? " हा प्रश्न अगदी सहजच होता. त्यावर तिने चक्क न भडकता मला नीट उत्तर दिले, " नाही, पोलिसांनाच अंत्यसंस्कार करायला सांगितले आहेत. केव्हा करतील ते तेच कळवतील. " पुढचा प्रश्न तिने बंद करून टाकला. मी काहीच न बोलता कामाला लागलो. थोड्या वेळाने नारायणने प्रतिभाला आत बोलावले. मला नारायणवर लक्ष ठेवायचे होते. पण केबीन मध्ये काय बोलणे चालू आहे ते मी ऐकू शकत नव्हतो. साधारण अर्ध्या तासाने ती बाहेर आली. तिची चाल मंदावली होती. तिने एक दोन फाइल्स काढल्या आणि त्यातली रोझ आणि कंपनीची फाइल माझ्याकडे देत म्हणाली, " हे तुम्हालाच हँडल करायला सांगितलं आहे. माझे रिपोर्टस आत आहेतच. " म्हणजे पुन्हा पुढचा संवाद बंद. ...... अजूनही तिला क्रॅक करणं मला जमत नव्हतं. मी फाइल उचलली आणि नारायण कडे गेलो. बोलण्यातला काहीतरी निदर्शक शब्द तो बोलेल म्हणून मी गेलो होतो. तो म्हणाला, " कंपनीका मॅनेजर रामचंद्रन को मेरा नाम बोलो , वो कोऑपरेट करेगा. " मी सर्व तपशील त्याच्याशी बोलून घेतले होते म्हणून निघालो. केबिनचा दरवाज्या ढकलणार एवढ्यात त्याने मला विचारले, " तुम प्रतिभाको फॉलो क्यूं करता है ? " असला प्रश्न तो विचारील याची मला कल्पना नव्हती. खोटं बोलण्यात आणि नाकबूल करण्यात अर्थ नव्हता. याचा अर्थ प्रतिभाने त्याला सगळं सांगितलं असणार. मी काही न बोलत बाहेर आलो. त्यामुळे त्याचा संशय बळावणार होता. मला त्याची पर्वा नव्हती. मी हे सगळंच पोलिसांना सांगितलं होतं आणि त्याला त्याची माहिती नव्हती. आता मला पोलिसांचं संरक्षण होतं. त्याच्यावर नजर ठेवणं जरूर होतं. त्याला बहुतेक संशय आला असावा. आणि मी त्याचाही पाठलाग करीन म्हणून तर तो मला रोझ आणि कंपनीकडे पाठवित नव्हता ? माझी शंका बरोबर असावि. म्हणजेच प्रतिभा आणि तो यांचा काही तरी संबंध असावा. मी रोझ आणि कंपनीचं काम लवकर उरकण्याचं ठरवलं . लंचनंतर मी त्याला सांगून निघालो.

साधारणपणे रोझ आणि कंपनीचे काम मी सव्वा पाच पर्यंत उरकले. मला माहिती मिळावी की नारायण कुठे आहे त्यासाठी मी त्याला फोन केला. बराच वेळ फोन वाजत राहिला. मी फोन खाली ठेवणार एवढ्यात तो उचलला गेला. आमचा शिपाई कासम याने फोन घेतला होता. मी त्याला नारायणबद्दल विचारले त्यावर त्याने "साब वो प्रतिभा मॅडमके साथ अभी अभी निकला है. " असे त्याने

सांगितले. काही लोक न विचारलेली माहितीही पुरवतात आणी माझ्यासारख्याचा फायदा होतो. आत्ताच निघाल्येत म्हंटल्यावर मी कंपनीच्या कार पार्किंगमध्ये जाऊन डोकावलो. तिथल्या वॉचमनला आश्चर्य वाटून तो म्हणाला, " क्या साब नया कार लिया पेडाभी नही खिलाया. " आता माझी कार नाही हे त्याला माहिती होते. मग त्याला म्हंटले , " अरे मेरेको मुरुगन साब गया क्या ? ..... " मी मुद्दामच नारायणचे नाव घेतले नाही. त्यावर तो म्हणाला, " मुरुगन साब तो अभी तक आया नही. हां नारायण साब और एक मॅडम अभी गया. " मला पाहिजे ती माहिती मिळाली . मी त्याच्याकडे लक्ष न देता भराभर रस्त्यावर आलो. मला त्याच्या गाडीचा नंबर माहीत होता. पण एक दोन मिनिटं जरी झाली असली तरी गाडी बरीच पुढे गेली असणार . असे ठरवून मी नाद सोडला. रिक्षा पकडली. आज मला रिताने भाजी आणायला सांगितलं होतं. तिचा भाऊ नितेश यायचा होता. खरंतर मला असलं भाजीबिजी आणणं मान्य नव्हतं. पण माझं काम होत नसल्याने मी बाजारात शिरलो. एकदाची भाजी घ्यायची म्हणून मी समोरच बसलेल्या एका भाजीवाली कडून मिळेल त्या भावात भाजी खरेदी केली. मी पैसे देऊन वळलो. रिक्षाला हात दाखवणार तेवढ्यात मला नारायणची गाडी एका रेस्टॉरंटजवळ उभी असलेली दिसली. मी सहज भाव तोंडावर ठेवून आत शिरलो. माझी भिरभिरती नजर नारायण आणि प्रतिभाच्या टेबलापाशी स्थिरावली. ते एकाच सीटवर मला पाठमोरे बसले होते. नारायणच्या शर्टावरून मी त्याला ओळखले. मी मुद्दामच त्यांना लागून असलेल्या टेबलापाशी त्यांना पाठमोरा होऊन बसलो. ते दोघेही माझ्या मागेच असल्याने मला आता त्यांचे संभाषण ऐकू येणार होते. प्रतिभा म्हणत होती " मेरेको जाना पडेगा . बादमे मिलेंगे नही तो ऑफिसमे. " त्यांचं आधी काहीतरी बोलणं झालं असावं. ती उठणार असावी. सावधतेचा पवित्रा म्हणून मी टेबलावर असलेला पेपर उचलला , कोणतातरी हेराल्ड बिराल्ड होता आणि पसरून माझ्या तोंडापुढे धरला. माझ्या लक्षात आलं नाही की तो कानडी पेपर आहे. ती उठायच्या आधी तो म्हणाला, " बॉडी मिला क्या ? ..... " तिने नकारार्थी मान डोलावली असावी. ( नाही मिळाली हे मला माहित होतं ) त्यावर दोघे उठल्यावर तो म्हणाला " मै फ्युनरलको आउंगा ........." मग वळल्यावर ती म्हणाली, " किसीकोभी आनेकी जरुरत नही है. ..... " तरीही ते बोलत होते. मला ऐकू येणं शक्य नव्हतं मग कौंटरवर बिल देऊन नारायण निघाला. तशी मला काही फार मोठी माहिती मिळालेली नव्हती. आता यांचा पाठलाग करणं कठीण आहे. असं समजून मी रिक्षा पकडली आणि सहजच त्यांच्या गाडीकडे पाहिलं. प्रतिभाने त्याला हात हालवून बाय केले. ती नंतर रिक्षाने स्टेशनला गेली असणार. माझी निराशा झाली होती. मी फारसा मूडमध्ये नव्हतो. ही माहिती वाघमारेंना देऊन काय होणार ? मी पुन्हा विचार करित राहिलो, पुढे काय ? आपण का ह्या प्रकरणात लक्ष घालावं. वाघमारेंनी सांगितलं म्हणून मला थोडं बळ आलं होतं. पण प्रकरण अंगाशी आलं तर काय होतं याची थोडी झलक मला पाहायला मला मिळाली होती. मग माझी ट्यूब अचानक पेटली , वाघमारेंनी मला यांच्यावर पाळत ठेवण्यास सांगितलं होतं तशीच पाळत त्यांनी माझ्यावरही ठेवली असणार . मी उगाचंच गाडीत इकडे तिकडे पाहिलं. एका ताकतवान माणसाचा मला विनाकारण संशय येऊन मी जागा सोडून गर्दीमध्ये उभा राहिलो. हळू हळू मी माझ्या घरी आलो. बेल दाबली मेव्हण्याची गप्पाष्टकं चालू होती. रिताचे बाबाही आले होते. आत शिरलो. म्हाताराही खूष होता. त्याच्या मुलाला नोकरी लागली होती. का कोण जाणे मला माझा मेव्हणा नेहमी बिनडोक वाटत आला होता. बहुतेकांना बायकोचे भाऊ बिनडोक वाटत असतात. असो. मी सध्या त्यांच्या गप्पांमध्ये झोकून दिलं.

अचानक फोन फुरफुरला. तो वाघमारे साहेबांचा होता. मी तो घेऊन गॅलरीत आलो. त्यांचा दणकट आणि उपरोधीक आवाज आला " काय मग डिटेक्टिव्ह उत्तम ? काय खबर ? " मी म्हणालो, " सर कसला डिटेक्टिव्ह ? आज ते दोघे एकत्र आले होते. पण ती त्याला नंतर भेटेन म्ह्णाली आणि तो फ्युनरलला येऊ नये असं तिने त्याला सांगितलं. यात काहीच खबर नसल्याने मी आपल्याला फोन केला नाही. " मग ते म्हणाले, " मि. उत्तम , यू आर डुइंग फाइन , असंच लक्ष ठेवा. तुम्ही सांगितलंत यात बरीच खबर आहे. तुम्ही जास्त डोकं चालवू नका. ते आम्ही चालवू. लक्षात ठेवा या केसमधले तुम्ही फार महत्त्वाचा दुवा आहात. " त्यांनी फोन ठेवला. मी कसला महत्त्वाचा दुवा माझ्या मनात आलं. मला थोडं टेन्शन आलं. मनाने सदिच्छेचा (?)सल्ला दिला, तू अडकू शकतोस.मी आतल्या हॉलमध्ये शिरल्यावर रिता म्हणाली, " हे असंच असतं. काय हो तुम्ही घरी आल्यावरच तुमच्या बॉसला कामाची आठवण जास्त होते का ? " त्याबरोबर माझा मेव्हणा आणि सासरे माझ्याकडे कौतुकाने पाहू लागले. आणि रिताला बरं वाटलं. आपला नवरा ऑफिसमध्ये साधारण नाही काही , तर फार महत्त्वाची व्यक्ती आहे, असा भाव तिच्या चेहऱ्यावर आला. पुढे सगळ्या रुटीन गोष्टी घडल्या. पण माझ्या माहिती मध्ये काय खबर वाघमारेंना वाटली मला कळेना. रात्र बरी गेली. रात्र बरी जाण्याची आमच्या प्रत्येकाची ( म्हणजे सासरे आणि मेहुणा सुद्धा) कारणं वेगळी होती. पुढचे दोन तीन दिवस

काहीच घडले नाही. मला अजुनही पोलिस स्टेशनमध्ये बोलावले नाही. थोडक्यात सगळेच झोपले होते. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. असे पुढे घडलेल्या घटनांवरून वाटले. ........एक दिवस अचानक नारायणचा फोन आला जेव्हा तो ऑफिसमधे नव्हता. तो फोन मी घेतला पलिकडचा माणूस आवाजावरून लहान असावा असे वाटले. " अरे नारायण साब ? फोन मत रखना. " मी उगाचंच मध्ये बोललो, " नारायण साब नही है, वो बाहर गया है. आप कौन है ? " तो म्हणाला, " प्रकाश.... " आणि त्याने फोन ठेवून दिला. मी केबीन बाहेर आलो. हा प्रकाश कोण ? नवीन दुवा की काय, की असाच कोणीतरी ? मला असला कोणी माणूस पाहिल्याचे आठवत नव्हते. ...... आज नारायण आणि प्रतिभा दोघेही एकत्रच व्हिजीटला गेले होते. त्यामुळे मला काहीच करता आले नाही. दुपारी साडेचार वाजता ते दोघे परत आले. प्रतिभा फाइली ठेवीत होती , नारायण केबीन मध्ये शिरणार एवढ्यात मी त्याला मुद्दाम सांगितले, " कोई प्रकाश नामके आदमीका आपके लिये फोन था. " मी बारकाईने प्रतिभाकडे पाहत होतो. नारायणने तिच्याकडे पाहत उत्तर दिले, " मै तो किसी प्रकाशको नही जानता. " पण प्रतिभाचा चेहरा बदलला होता. पण एखाद सेकंदासाठीच. मी नीट लक्ष ठेवून राहिलो नसतो तर मला तो बदल दिसला नसता. मी प्रकाश कोण ते शोधण्याचे ठरवले.

प्रकाश कोण हे शोधणं माझ्यासाठी कठीणच होतं. माझ्या दृष्टीने जे काही झालं होतं, त्यात फक्त प्रतिभा, तिची मुलगी आणि नारायण एवढ्याच व्यक्ती समाविष्ट होत्या. पण माझी एक थिअरी होती. आपल्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी आपण फक्त योग्य माणसाची निवड करावी आणि वाट बघावी. ती व्यक्ती स्वतः च अशी वागते किंवा बोलते की आपल्याला हवी माहिती आपोआप मिळते. पण ही थिअरी नेहमीच उपयोगी पडते असे नाही. काही वेळेला या थिअरीचा परिणाम दिसायला वेळ फार लागतो. नाहीतर मी पाठलाग केलाच नसता. ...माझ्या मनात नारायणचा प्रतिभाच्या नवऱ्याच्या प्रेतयात्रेला जाण्याचा काय संबंध आहे असेच होते. पण समोर काही वेगळेच घडायचे असावे. अचानक मला वाघमारेंचा फोन आला . " उद्या सकाळी दहा वाजता पो. स्टेशनला या. " काम किंवा कारण काहीही सांगितले नाही. विचारणंही कठीण. अजूनही मला नारायण आणि प्रतिभा एकमेकांना बरेच आधीपासून ओळखत असणार असे वाटत होते. पण काहीच माहिती मिळत नव्हती. मी नारायणकडे गेलो. तो थोडा कामात मग्न होता. मी बोलावल्याशिवाय आलेला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. पण मी पर्वा न करता त्याला मला उद्या पो. स्टेशनला बोलावले असल्याचे सांगितले. त्यावर तो भडकून म्हणाला, " तुम उनको मना कर सकते थे. यहां कल साडेगॅरा को अर्जंट मिटींग है. वो भी डायरेक्टर के साथ. वो अपने कामका रिव्यू भी लेगा. और तुम है कि ऐसा बर्ताव करते हो ,जैसे तुम पुलिस डिपार्टमेंटमे काम करते हो. तुम्हे इतना इंक्विझिट्यूव बननेकी जरुरत क्या है ? तुम मेरेपर और प्रतिबापर नजर रखते हो. मुझे सब समझता है. " मला बोलून देण्याची संधी न देता तो भडकत राहिला. मी काहीच न बोलण्याचे ठरवले. शेवटी तो म्ह्णाला, " जाओ , तुमको जो करना , वो करो. लेकीन मुझे अब रिपोर्ट करना होगा , ये भी ध्यानमे रकना. " मी केबीन बाहेर पडलो. आता आली का पंचाइत. मी उद्या गेलो तर प्रॉब्लेम नाही गेलो तरी प्रॉब्लेम . प्रतिभा कशीही वागली तरी त्याला चालत होतं. ती वाटेल तेव्हा येत होती. या दोघांमध्ये काहीतरी भावनिक कनेक्शन असणार याची मला आता खात्री पटत चालली होती. म्हणूनच तो भडकत होता. मी बहुतेक फार आत शिरत होतो की काय . विचारांच्या गुंत्यात मी माझ्या टेबलापाशी येऊन बसलो. यांत्रिकपणे मी काम करू लागलो. एकदाचे दुपारचे चार वाजले. प्रतिभा ऑफिसमध्ये आली. मी मुद्दामच लक्ष दिले नाही. म्हणजे तिच्या लक्षात येईल असे लक्ष. अचानक ती माझ्या टेबलाशी येऊन उभी राहिली आणि म्हणाली, " उद्या तुम्ही माझी व्हीजिट कराल का ? तसं सगळं ठरलेलंच आहे. तुम्हाला एकदा सगळं स्पष्ट करायचंय आणि ऑर्डर घेऊन यायची आहे , बस , इतकंच " मी जरा वैतागून म्हंटले, " मग तुम्हीच का जात नाही ? माझा वापर का करता ? " माझ्या तोंडून शब्द गेले आणि माझ्या लक्षात आलं की नारायणचा राग मी तिच्यावर काढीत होतो. तरीही ती मागे न हटता पुन्हा म्हणाली, " प्लीज , मि. उत्तम, उद्या मला माझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारांसाठी जायचंय. तेही पोलिसांच्या उपस्थितीत. " मी पाहत राहिलो. मग मला एकदम जाणवलं. आपल्याला पो. स्टेशनला का बोलावल असावं. मी आणि प्रतिभाच्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारांसाठी ? वाघमारेंची कमाल आहे. माझा काहीच संबंध नसल्याने आश्चर्य वाटलं. मी तिला काहीच बोललो नाही. ती तिच्या टेबलापाशी जाऊन बसली. तिचा चेहरा थोडा आक्रसलेला होता. कदाचित नारायणला मी मिटिंग चालवावी असं वाटत असावं. म्हणजे तोही प्रेतयात्रेला जाऊ शकेल. ..................................................पाच वाजून गेले. नारायण आज लवकरच बॅग घेऊन बाहेर आला आणि मला म्हणाला, " सॉरी उत्तम, मैने ऐसा नही बोलना चाहिये था. तुम्हारी भी मजबुरी होगी. तुम चाहो तो निकल सकते हो. " प्रतिभाकडे न बघताच तो निघाला. मी पण पडत्या फळाची आज्ञा मानून निघालो. मला वाटतं तिची निराशा झाली होती . पण मी चुकलो होतो.

लवकर घरी जायचं म्ह्णून मी रिक्षा पाहत होतो. संध्याकाळी पाच ते आठ रिक्षा मिळणं कठीण असतं हे मला आता अनुभवाने कळलं होतं. एकही रिक्षा थांबायला तयार नव्हती. रस्त्याच्या दूरच्या टोकाला उभ्या असलेल्या नारायणकडे माझी नजर गेली. आणि मला आश्चर्य वाटलं तो त्याच्या गाडीजवळ उभा होता. प्रतिभाची वाट तो पाहत असावा. मी मुद्दामच एका स्टॉलपाशी सिगारेट घ्यायला उभा राहिलो. मी सिगारेट शिलगावण्यासाठी मान थोडी खाली केली आणि कोपऱ्यातून नारायण कडे पाहत असताना मला प्रतिभा रस्ता ओलांडताना दिसली. ती नारायणच्या गाडीजवळ पोहोचली. मग ते दोघे गाडीत बसून निघाले. मला भान राहिले नाही .मी पाठलाग करायला हवा होता. आज काही तरी उलगडा झाला असता. मला चुकचुक लागली त्याच भावनेत मी घरी गेलो. मी आता वेगळ्याच विचारात गुंतलो . नारायणला कामात मदत करणं माझं कर्तव्य होतं आणि वाघमारेंनी मला समन्स पाठवलेलं नव्हतं. तसच मला वाघमारेंनाही मदत करणं भाग होतं. कारण त्यांनी मला जर सह आरोपी केलं असतं तर निष्कारण एक फौजदारी खटला माझ्या मागे लागला असता. मला काही समजेना. एखाद्या वकिलाचा सल्ला घ्यावा की काय या विचारात मी होतो. त्यात परत एकदा वाघमारेंचा फोन आला. खरंतर मी आत्ता त्यांचा फोन घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. तरीही घेतला. ते म्हणाले, " मि. उत्तम , तुम्हाला कंपनीकडून जर काही त्रास झाला तर मी येऊन तुमच्या डायरेक्टर साहेबांना समजावून सांगेन आणि तसे लागल्यास लेखीही देईन. फक्त तुम्ही आम्ही सांगतो तसं करा. तुम्ही त्या लाइव्ह सिच्युएशन मध्ये आहात. घाबरू नका . पण जर का आम्हाला मदत करणं पटत नसेल तर मात्र बाकिच्यांनी तुम्हाला अडकवलं तर केस चालू झाल्यावर तुम्हाला त्यांच्या ग्रुप मध्ये उभे राहावे लागेल. (मी काही बोलत नाही असे पाहून ते म्हणाले )या , उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत. " फोन बंद झाला. सध्या तरी त्यांच्या बाजूने बॉल टोलवण्याशिवाय माझ्या हातात काही नव्हतं. झोप सारखी चाळवत राहिली. सकाळ झाली. मी कसातरी ऑफिसला जायला तयार झालो. मी रिताला काहीच सांगितले नव्हते. हल्ली ती माझा चेहरा गंभीर असला तरी विचारीत नसे. कदाचीत ती घाबरत असावी. तिला वाईट वाटू नये म्हणून जसं मुलांना जवळ घेतलं तसच तिलाही घेतले. तिचे डोळे ओले झाले असावेत असा मला भास झाला. ती हळवी झाली होती. पण भावूक न होण्याचं मी ठरवलं. बोरिवलीला पोहोचल्यावर प्रथम मी पो‌. स्टेशनला गेलो. वाघमारे माझी वाटच पाहत असावेत. पण ते आणखीही कोणाची वाट पाहत होते. मला बसवून चहा वगैरे झाल्यावर त्यांनी मला कालच्या दिवसाचे अपडेटस विचारले. मी प्रकाशचं नाव घेतलं आणि प्रेतयात्रेला नारायणचीही तयारी असल्याचे सांगितले. त्यावर ते म्हणाले, " उत्तम, म्हणून तर आपण थांबलोय.त्याला मुद्दामच बोलावलेलं नाही त्यामुळे तो आला तरी अडकणार आहे आणि नाही आला तरी . बॉडी काल रात्रीच ताव्यात दिलेली आहे. आमच्या उपस्थितितच अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिलेली आहे. " नारायणच्या अडकण्याबाबत मला काही कळले नसल्याचे त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून वाचले असावे. त्यावर ते म्हणाले, " तेही कळेल तुम्हाला. विचार करा. " ......... पुन्हा एकदा चहा आला. तो घेऊन मग वाघमारे म्हणाले, " मला वाटतं आता तो येत नाही , निदान इथे तरी. थेट स्मशानात आला तरच. " असे म्हणून त्यांनी उभ्या असलेल्या गाडीत मला बसण्यासाठी फर्मावले. दोन चार कॉन्स्टेबल्स, अर्थातच एक लेडी कॉन्स्टेबलही होत्या. आम्ही अर्ध्या तासाच्या अवधीत बोरिवलीच्या स्मशानभूमीत पोहोचलो. ............ स्मशानातलं वातावरणं असं वैराण का असत कोण जाणे. खरतर ही मुडद्यांची वस्ती. मेलेली माणसं म्हणजे जगातली सर्वात निरुपद्रवी माणस. जे काही करायचं ते जिवंत माणसंच करतात. असो. अजून बॉडी घेऊन कोणीच आलेले नव्हते. मी सगळीकडे नजर फिरवली. मला नारायण कुठेही दिसला नाही. त्याची गाडीही . याचा अर्थ तो जवळ पास नसावा असा होत नाही. मीही आता पोलिसांसारखा संशय घेत होतो. वाघमारेंनी फोन केला. प्रतिभालाच असावा. मग ते म्हणाले, " हर्स निघालेली आहे. प्रतिभा मॅडम त्यांचा भाऊ ज्याला अजून पाहिलेला नाही , आणि जवळच राहणारी चार पाच माणसं. " त्यांनी फोन बंद केला आणि थोड्याच वेळात मुख्य गेट जवळ एक हर्स थांबल्याचे दिसले. आतून आधी प्रतिभा, मग एक मुलगासा पण अत्यंत अव्यवस्थित दिसणारा असा एक माणूस तिचा भाऊ असावा तो , इतर माणसं आणि भटजी असे उतरले. बॉडी पूर्ण झाकलेली होती. आणि डिझेलमध्येच टाकायची असल्याने विधींना अर्थ नव्हता. केवळ एक उपचार. विधी करण्यासाठी जो मुलगासा माणूस आला होता तो बसला. एक कॉन्स्टेबल आलेल्या चार पाच जणांची नावं आणि पत्ते लिहून घेत होता. लवकरच , तरीही अर्धा पाऊण तास लागला . बॉडी डिझेल भट्टीमध्ये टाकण्यासाठी तयार झाली. भट्टी तापत होती. प्रतिभा रुमालाने डोळे पुशीत होती. लेडी कॉन्स्टे. तिला धीर देत होत्या.

तिच्या मनातले विचार कळणं कठीण होत. नाही म्हंटलं तरी तो तिचा नवरा होता. एकेकाळी ज्याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता . अचानक तिला उमाळा आला. ती रडू लागली. वातावरणाचा परिणाम असावा. प्रतिभाचं लक्ष आजूबाजूला गेलं . तिने उत्तमला पाहिलं. तिला तो आलेला आवडला नाही. .तिला सुरुवातीचे दिवस आठवत होते. राजेशच्या आयुष्यात रंजना नसती आली तर कदाचित पुढचं आयुष्य नीट गेलंही असत. त्याच्यासाठी तिला सासू सासऱ्यांचे जातीवरचे टोमणेही सहन करावे लागले. तेही तिने केले. पण हाच असा निघाल्यावर काय करणार ? तिचा बांध आता फुटत असावा. पार अगदी घटस्फोटा पर्यंतच्या आठवणी तिच्या मनात वाऱ्याच्या वेगाने आल्या. पण तिने तटस्थ राहण्याचे ठरवले. अचानक तिने रडणं थांबवलं. सतःवर ताबा मिळवला. आता तिने चेहऱ्यावर दगडाचा मुखवटा चढवला . मी जणू अस्तित्वातच नाही अशा रितिने ती वागू लागली. बॉडी भट्टीमध्ये टाकल्यावर सगळेच निघाले. सहज म्हणून माझं लक्ष मुख्य गेटजवळ गेलं. तिथे नारायण आला होता. त्याला पाहून मला आश्वर्य वाटलं. वाघमारेंनीही त्याला पाहिलं आणि ते पुढे होऊन त्याला म्हणाले, " अरे आपको तो बुलाया नही था, आप कैसे आये ? " गेटजवळ पोहोचणाऱ्या प्रतिभाकडे बोट करून ते म्हणाले, " इन्होने बुलाया था क्या ? और वैसेभी आप लेट हो गये. " त्यावर तो फक्त सॉरी म्हणाला आणि रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या गाडीकडे गेला. वाघमारे साहेबांनी प्रतिभाला मुलगासा माणसाकडे बोट करून विचारले, " हा कोण , तुमचा भाऊ का ? " ती हो म्हणाली. त्याचं नाव प्रकाश असल्याचं कळलं. अशा रितीने प्रकाश कोण ते सापडलं. मग सगळेच निघाले. वाघमारे मला म्हणाले, " मी तुम्हाला नंतर बोलावतो, किंवा ऑफिसला येतो. म्हणजे बोलता येईल. " मी काही न बोलता रिक्षा पाहू लागलो . त्यावर नारायण मला म्हणाला, " उत्तम तुम भी चलो मेरे साथ, ऑफिसही तो जाओगे ना ? " याचा अर्थ प्रतिभा पण त्याच्याबरोबर येणार होती. वाघमारे अर्थपूर्ण नजर माझ्याकडे टाकून निघून गेले. मी गाडीत बसताना मुद्दामच मागच्या सीटवर बसलो. म्हणजे प्रतिभाला पुढे बसण्याशिवाय मार्ग राहू नये. ती पुढे बसली. ऑफिसला पोहोचेपर्यंत कोणीच काही बोलले नाही. प्रकाश आणि इतर माणसे वेगवेगळ्या रिक्षांनी आपापल्या घरी गेली. ........... आज ऑफिसमध्ये दिवसभर नारायण आणि प्रतिभा कामाशिवाय काहीच बोलली नाहीत. माझ्याशीही ते औपचारिक वागले. मिटिंग पुढे ढकलल्याने कोणालाच ताण आला नाही. मी तिने काकुळतीने सांगितलेली व्हिजिट मी मुद्दामच केली नाही. पुन्हा एक दोन दिवस काहीच घडले नाही. मी मात्र प्रतिभाचा दोन्ही दिवस पाठलाग करू शकलो. ती घरीच गेली होती. कथा पुढे सरकत नव्हती. माझ्याजवळ सांगण्यासारखं काही नसल्याने मी वाघमारेंना फोन केला नाही की त्यांनी मलाही. ते कदाचित कामात व्यग्र असावेत. तिसरा दिवस मात्र असा उजाडला, की अचानक लिंक लागल्यासारखी वाटली.

त्याचं असं झालं, संध्याकाळी मला नारायणने बोलावले आणि एक दोन कंपन्यांमध्ये व्हिजीटला जायला सांगितले. अर्थातच आता तो अगदी सौम्य वागत होता. त्याला कदाचित मी त्याच्या पार्टीत यावं असं वाटत असावं. तो म्हणाला, " देको, तुमको खुदको ऍडजस्ट करना है, व्हिजिटको कभीभी जा सकते हो. बस काम होना चाहिये. मतलब ऑर्डर चाहिये. " आता तो प्रतिभाला केबीन मध्ये क्वचितच बोलवू लागला. का ते कळलं नाही. त्यांच्यात काहीतरी समझौता झाला असला पाहिजे. किंवा त्यांचा काहीतरी प्लान असला पाहिजे. कदाचित पोलिसांची पण त्याच्यावर नजर असावी आणि त्याला ते कळलं असाव, प्रतिभाचा पाठलाग करण हे आता माझं ऑफिस रुटीन प्रमाणे रुटीन झालं होतं. त्यामुळे होणारा उशीर घरी रिता सहन करीत होती आणि मला नाराज करीत नव्हती. तिच्याबरोबरच्या प्रणयाच्या धुंदीत मी हे सगळे विसरून जात होतो. तसा माझा काहीही संबंध नव्हता. ही सगळीच परिस्थिती माझ्या आजूबाजूने होती. आणि माझ्या आयुष्यावर त्याच परिणाम होणे शक्य नव्हते. एक दिवस मी या सगळ्यावर जाम विचार केला. जास्तीत जास्त काय वाईट होईल हे पाहिलं आणि स्वस्थ झालो. आता मला भीती वाटत नव्हती. भीती ही एक स्टेज असावी. ती एकदा का ओलांडली की माणूस स्वस्थ होत असावा आणि परिस्थिती स्वीकारणं त्याला सोपं जात असावं. असो. मला आता या परिस्थितिचे टेन्शन येईनासे झाले. असाच मी एकदा माझ्या व्हीजीट संपवून घरी निघालो होतो आणि आज माझ्या मनात देखील पाठलाग करण्याचं नव्हतं. पण अचानक प्रकाश की कोण तो मला प्रतिभाला संध्याकाळी ऑफिस बाहेर भेटायला आलेला दिसला. तिच्यात आंणी त्याच्यात काहितरी वादावादी चालू असावी . मी लांब असल्याने ऐकू शकलो नाही मग तो भडकून निघून गेला. प्रतिभाही निघून गेली. पण ती घरी गेली नाही . तर ती अचानक बांद्याला गेली. म्हणजे तिला उतरताना पाहून मी घाईघाईने उभ्या असलेल्या प्रवाशांच्या शिव्या खात उतरलो. काय झालं होतं कोण जाणे पण ती फार भराभर चालत होती. आज मला तिचा पाठलाग करणं कठिण जात होतं. संध्याकाळची वेळ असल्याने गर्दी होती. ती चुकवीत तिचा माग सांभाळणं मला जिकीरीचं वाटू लागलं अचानक तिला रस्ता ओलांडल्यावर नारायण दिसला. तो गाडीला टेकून उभा होता . आता हे जर गाडीने गेले तर मागे लागणं कठिण होतं. पण माझं नशीब जोरावर होतं. ते दोघेही पायी निघाले. काही अंतर चालल्यावर ते एका लॉजसमोर आले. त्याचं नाव रमेश लॉज होतं. आता आत कसं जाणार ? साधं हॉटेल असतं तर मी आत जाऊ शकलो असतो. मला अचानक वाघमारेंची आठवण झाली . मी त्यांना फोन करण्याचं ठरवलं. मुख्य दरवाज्यापासून थोडा लांब उभा असल्याने मला प्रकाश तिथे येताना दिसला. अर्थातच ते दोघे आत गेल्यावर. याचा अर्थ त्यांनी तिघांनी आज भेटण्याचं ठरवलं होतं. वाघमारेंना फोन लावण्यापेक्षा मी स्वतःच एक रूम बुक करण्यासाठी कौंटरकडे पोहोचलो. तो पर्यंत प्रकाश जिना चढून जाताना दिसला. याचा अर्थ प्रतिभा आणि नारायण पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच गेले असले पाहिजेत. मी पण त्याच्यामागे जिना चढून जाण्यास सुरुवात केली. मला कौंटरवर बसलेल्या मॅनेजरने हटकले. " ओ मिस्टर , कुठे निघालात ? ही काय धर्मशाळा वाटली की काय ? " मी एकदा प्रकाशकडे पाहून घेतले. माझ्या अंदाजाप्रमाणे तो बरोबर पहिल्या मजल्यावरच्या जिन्यावरून डावी कडे वळला. मग मी मागे वळत कौंटरपाशी गेलो. आणि म्हणालो, " अहो, आमचे साहेब वर गेल्येत . आमची आत्ता मिटींग ठरली आहे. हे पाहा माझं ओळखपत्र म्हणून मी त्याला कंपनीचे कार्ड दाखवले. माझ्याजवळ असलेल्या व्हिजीट फाइल्सही दाखवल्या. त्याला हे पटलं असावं. तो म्हणाला, "ठीक आहे, पण तुमचं आय कार्ड तेवढं माझ्याकडे जमा करून जा. जाताना परत मिळेल. " मी वेळ न घालवता जिन्याकडे निघालो, कारण मॅनेजरला दुसरा विचार सुचायच्या आत मला वर जाणं भाग होतं. त्याने माझ्यासाठी अडचणी निर्माण केल्या असत्या. मी एक महत्त्वाची गोष्ट केली. ती म्हणजे प्रथम वाघमारेंना फोन लावला. आणि मी कुठे आहे आणि इथे काहीतरी घडण्याची शक्यता आहे असे सांगितले. ते काहीच बोलले नाहीत. आता मला रुम शोधणं भाग होतं. मी मॅनेजरला विचारले नाही. पण एका दरवाज्याजवळ काहीतरी पडल्याचे जाणवल्याने ती वस्तू उचलली. ती होती कीचेन. त्यात कोणत्या चाव्या होत्या कोण जाणे. पण त्या कीचेनवर "पी " हे अक्षर रंगवलेले दिसत होते. मला उगाचच ती कीचेन प्रकाशची असावी असे वाटले. म्हणजे प्रकाश याच खोलीत शिरला होता. मी दरवाज्याला बाहेरून कान लावून ऐकू लागलो. दरवाज्या उघडा असावा. तो हळूहळू अर्धवट उघडला गेला. आत कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज येत होता. त्यात " मुझे पैसा चाहिये " असे वाक्य ऐकू आले. मला अचानक तो आवाज त्या दिवशी नारायणला आलेल्या फोनवरच्या आवाजासारखा वाटू लागला. मग मला प्रतिभाचा किंचाळल्यासारखा आवाज आला. शब्द नीट कळले नाहीत. . ....आता मला प्रतिभाचे ओरडणे ऐकू आले. ती म्हणत होती, " तुला पैसे कशासाठी हवेत. मी देते ना नेहेमी ? त्यांच्या कडून पैसे का मागतोस? " मध्येच नारायण म्हणाला, " तुमको कितना पैसा चाहिये एक बार बोलो. .... बोलो कितना पैसा चाहिये ? " त्यावर खवचट पणाने प्रकाश म्हणाला, " अरे जीजाजी , अब तो हमारे जीजा बनेंगे, इसलिये तो सब कुछ किया ना ? अपना तो लेन देन चलताही रहेगा. " नारायणलाही समजावण्याचा कंटाळा आला असावा. पण मध्येच प्रतिभा भडकून म्हणाली, " जा देत नाही काही. काय करणार आहेस ? " ........ मग नारायणही म्हणाला, " हां जाव जाव जो करना है वो करो. " मग प्रकाश म्हणाला, " ताई तुला जे पाहिजे ते सगळं मी केलं. तुला सगळं मिळेल असं म्हणाली होतीस ना ? मग शब्द का फिरवतेस ? आणि मी काय करीन , पोलिसांकडे जाईन . मग तर सगळी मजाच आहे आपण तिघेही मिळून बसू जन्मभर चक्की पिसत. चालेल ......? " मधला वेळ असाच गेला. म्हणजे काही क्षण कोणीच काही बोलले नाही. नारायणने खिशात हात घातला. मी ऐकण्याच्या भरात मागे पाहिलेच नाही. अचानक माझ्या कमरेच्या भागात काहीतरी अणकुचीदार वस्तू टोचत असल्याची जाणीव झाली. आणि शब्द ऐकू आले. " मि. उत्तम , यासाठी आला होतात नाही का ? चला आत . " त्याने पायाने दरवाज्या ढकलला आणि बंद केला. मी घामट आणि घाबरलेल्या चेहऱ्याने आत शिरलो. आतले तिघेही धक्का बसलेल्या अवस्थेत माझ्याकडे पाहू लागले. प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी होती. प्रतिभाच्या डोळ्यात अंगार फुलला होता. नारायण अचंब्याने माझ्याकडे पाहत होता. आणि प्रकाशच्या चेहऱ्यावर अनोळखी भाव होते. मागून मॅनेजरचा आवाज आला, " सॉरी सर, पण हा माणूस दरवाज्या बाहेरून तुमचं बोलणं ऐकत होता. " माझ्याकडे पाहत नारायणने मॅनेजरला जाण्याची खूण केली. तो गेला.

मॅनेजर गेल्यावर प्रकाशने माझ्याकडे निरखून पाहिलं. मग तो म्हणाला, " अरे बॉस आप तो हमारे बिरादरीके लगते हो. " मग तो हात पुढे करून म्हणाला, " आय ऍम प्रकाश , ग्लॅड टु मीट यू. " मी हात मिळवला नाही. नारायण मधेच म्हणाला, " उत्तम तुम यहाँ क्या कर रहे हो ? मैने तुमको वॉर्न किया था .... फिर भी तुम हमारे पीछे लगते हो? " . एकूण परिस्थितीत आपल्या फायद्याच्या कोणत्याच गोष्टी होत नाहीत असे दिसल्यावर प्रकाश म्हणाला, " जीजा , अरे यार मेरे पैसे का क्या करोगे ? कमसे कम एक दो लाख रुपिया तो देदो. कुछ दिनके लिये तो मै मुह बंद रखूंगा . वरना ये मूह को खुलने की बुरी आदत है. ताई तू तरी सांगना भावजीना. " प्रतिभाच्या तोंडावर एवढा तिरस्कार होता की ती त्याला मारण्याच्या पवित्र्यात केव्हाही आली असती. पण नारायणने विवेक करून म्हंटले, " देको प्रकाश इसपर बादमे बात करते है . " ते ऐकल्यावर प्रकाश भडकून म्हणाला, " मतलब आप कुछ देना नही चाहते है. ठीक है. मै पह्यले इस बॉस को पूरा स्टोरी बताउंगा,फिर पुलिसको. फिर चलेंगे सब मिलके चक्की पीसने. " नारायणची पोझिशन अवघडल्यासारखी होत होती. कारण सगळं माझ्यासमोर उघडं होणार होतं. नक्कीच काहीतरी या तिघांचा स्वार्थ असला पाहिजे. नारायण आणि प्रतिभा फार जवळ आले होते. हे आता अगदी स्पष्ट झालं होतं. माझ्या अंगावरून सरकणाऱ्या घामाच्या धारा थांबायला तयार नव्हत्या. मग नारायणने त्यातून मार्ग काढला. " प्रकाश तुम इस आदमीको तुम्हारे घर लेके जाओ और बांधके रखना. " त्याबरोबर प्रकाश म्हणाला, " मैने इतना कुछा किया है अभी ये भी करूंगा लेकीन पह्यले दाम बादमे काम " ......... थोडा वेळ तसाच गेला. त्या तिघांनाही अस्वस्थता घेरू लागली. मला पकडून ठेवून नारायण आणखी गोष्टी क्लिष्ट करीत होता. त्याने जवळच ठेवलेल्या ब्रिफकेस मधून चेकबुक काढले. आणि भराभर एक लाखाचा चेक लिहून त्याने प्रकाशपुढे धरला. प्रकाशने त्याच्या हातातून तो खेचूनच घेतला. न जाणो नारायणचा विचार बदलला तर ......?? आता जवळ जवळ साडेनऊ वाजले होते. वाघमारेंना फोन करून मी चूक तर केली नाही ना , मला कळेना. ते येतील का. कारण तेच या परिस्थितीतून माझी सुटका करू शकतात. उभं राहून माझे पाय दुखायला लागले होते. नारायणने फोन करून मॅनेजरला बोलावले. थोड्याच वेळात बेल वाजली. मला आशा वाटली. मॅनेजर ऐवजी पोलिस आले तर ? पण प्रकाशने दरवाज्या उघडला आणि मघाचाच मॅनेजर आत आला. तो माझ्याकडे संशयाने आणि रागाने बघत होता. अचानक प्रतिभाला कंठ फुटला. ती नारायणला म्हणाली, " देखो इसको पकडके हम और फस जायेंगे. .... सोचो जरा. पुलिसको इसके बारेमे सब कुछ मालूम है. इसकी वाइफ पुलिस स्टेशन गयी तो ? हम तीनो फालतूमे फस जायेंगे. इसे छोडनेमेही अपनी भलाई है. " त्याबरोबर नारायण म्हणाला, " इसको बहोत ज्यादा जानकारी है. ये जिंदा रखनेके लायक नही है. " त्यावर प्रकाश म्हणाला, " देखो , जीजा इस बार मै कुछ नही करनेवाला. वो भी इतने कम पैसोमे. " मग नारायण भडकून म्हणाला, " तुमको पहले काम का पैसा बहोत बार दे चुका हूं. और ये हर बार ये जीजा , जीजा कहना बंद करो. समझे ? " मग मॅनेजर कडे वळून म्हणाला, " ये गाडीका चाबी लेलो और गाडी लॉजके गेटके सामने खडी करो. जाओ जल्दी . " असे म्हणून त्याने मॅनेजरला चावी दिली. तो दरवाज्या लावून बाहेर गेला. आता मात्र आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. मी दरवाज्याकडे पाहू लागलो. ते प्रकाशच्या लक्षात आलं . तो पुढे होऊन माझा दंड पकडीत म्हणाला, " ज्यादा स्मार्ट मत बनना बॉस. भागनेकी कोशिश मत करना. " नारायण हसून म्हणाला, " उत्तम तुमने क्यूं इतना स्मार्टनेस दिखाया. तुम्हे इसमे क्या फायदा था ? अब तो तुम कामसे गया. जिंदाभी नही रहोगे. " मी पण मग स्पष्ट बोलायचे ठरवले, " मतलब तुम तीनोने मिलकर राजेशको रास्तेसे हटाया ? " त्यावर निर्लज्जपणे तो म्हणाला, " ये बोलना चाहिये क्या ? अब तुम्हे बतानेमे कोई हर्जा नही. (प्रतिभाकडे बोट करून तो म्हणाला ) मै और प्रतिबा एक दूसरेको जानते है कॉलेजके टाइमसे. राजेश और हम दोनो क्लासमेट थे. राजेश अच्छा था . लेकीन इसको बहोत तकलीफ दिया और मेरेसेभी पैसा लेकर वापिस किया नही. मै प्रतिबाको बहोत चाहता था. उसकी बच्चीसे मुझे कोई शिकायत नही. उसको मै सम्हाल लूंगा. अब हम दोनोंको शादी करनेसे कोई रोक नही सकता. तुमको जरुरतसे ज्यादा जानकारी है. इसलिये तुम्हे छोड नही सकते. दुसरेके लाइफमे इतना ज्यादा इंटरेस्ट नही लेना चाहिये. जो तुमने लिया. कोई बात नही. अब गाडीसे तुम्हे प्रकाशके घर लेके जायेंगे और वही रकेंगे. ". माझे हात पाय आता थरथरायला लागले. मी शेवटचा प्रयत्न म्ह्णून प्रकाशला म्हंटले, " प्रकाश तुला पैसेच पाहिजेत ना मी तुला पाच लाख द्यायला तयार आहे, तू पोलिसांना शरण जा आणि माफीचा साक्षीदार बन. हे दोघेही संधिसाधू आहेत. माझ्या नंतर तुझीही अशीच वाट लावतील . विचार कर. " मला माहीत होतं मी वेळ काढीत होतो. मी खिशात हात घातला. माझा मोबाइल मी आतल्या आत उघडू लागलो. एकदा तरी वाघमारे साहेबांना

मिस कॉल तरी द्यावा . म्हणून मी संधी घेण्याची ठरवली. मला माहीत होतं की पाहिल्याशिवाय मी त्यांना कॉल करू शकत नव्हतो. पण आतल्या आत कॉलचे बटण टच केलं. शेवटचा कॉल त्यांनाच केला होता. त्यांनाच लागला तर लागला. मी परमेश्वराचे नाव घेतले. नक्की काय झालं असावं मला माहित नाही. पण नारायणने माझी खिशातली हालचाल टिपली असावी. तो पटकन पुढे झाला आणि त्याने माझ्या खिशातला मोबाइल खेचून काढला. त्याने उघडला. आणि त्याला वाघमारेंन कॉल लावल्याचे दिसले. त्याने प्रकाशला खूण केली. त्याने पुढे होऊन माझ्या इतक्या जोरात कानफटात मारली की मी भेलकांडलो. आणि प्रतिभाच्या बाजूला पडलो. ती तिरासारखी पळून नारायणकडे गेली. मग प्रकाश मला पुन्हा पुन्हा मारू लागला. तो बॉक्सींगच्या कोणत्या तरी घाणेरड्या ट्रिक्स शिकला असावा. मीही बॉक्सींग शिकलो होतो. म्हणून मी पण त्याला एक दोन ठोसे देऊ शकलो. आणि माझा एक ठेवणितला ठोसा होता. ज्याला हॉर्स शू फाइट म्हणतात , ती मी दिली . अचानक इतक्या जोरात त्याच्या डाव्या जबड्यावर ती फाइट बसली की त्याचा परिणाम म्हणून त्याचा जबडा डिसलोकेट होऊन जागेवरून वर सरकला. तो वेदनेने तळमळत होता. तेवढ्यात दरवाज्या उघडण्याचा आवाज झाला. जवळ आलेल्या नारायणला मी धक्का देऊन दरवाज्याकडे धावलो. दरवाज्या उघडून मॅनेजर आत येत होता. आणि त्याच्यामागे वाघमारे साहेब त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहित आत शिरले. त्यांना पाहून माझ्या जिवात जीव आला.

आल्या आल्या वाघमारे म्हणाले, " थॅक्स मि. उत्तम. एवढं धाडस सहसा कोणी दाखवीत नाही. " त्यांच्या बरोबर असलेल्या लेडी कॉन्स्टेबलना त्यांनी प्रतिभाला ताव्यात घेण्यास सांगितले. त्याबरोबर नारायण भडकून म्हणाला, " लेकीन हमने किया क्या है ?" त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी सगळ्यांनाच ताव्यात घेण्यास सांगितले. प्रकाश अजूनही तळमळत होता. त्याला पाहून वाघमारे म्हणाले, " तुला आधीच पोलिस रेकॉर्ड आहे. चल ऊठ तू तर हवाच होतास. अमली पदार्थांचा पुरवठा करतोस आणि सभ्य माणसा सारखा फिरतोस काय ? " त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. त्याने एक हात गालावर ठेवला होता. त्याचा जबडा चांगलाच सुजला होता. नारायण कडे वळून ते म्हणाले, " एक आदमीको धमकाने और पकडके रखनेका इल्जाम काफी नही है ? और वैसे भी मै तुमको पकडनेवाला ही था. तुम इंक्वायरीमे टिकोगे नही. कोशिश करके देखो. " मॅनेजरचे बकोट आधी धरलेच होते . सगळीच यात्रा मग पोलिस व्हॅनमध्ये बसली. मी वाघमारे साहेबांच्या जीपमधे बसलो होतो. साहेब म्हणाले, " तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरी जाऊ शकता, पण मला विचाराल तर तुम्ही पो. स्टेशनला येऊन लगेचच स्टेटमेंट दिलत तर बरं होईल. म्हणजे काही तपशील सुटणार नाही. काय करता ? " मी घड्याळाकडे पाहिलं, साडेदहा होऊन गेले होते. मला रिताचा चेहरा आठवला. पण मी त्यांना आधी स्टेटमेंट देणार असल्याचे सांगितले. पो. स्टेशनला पोहोचायला आम्हाला तासभर लागला. गेल्या गेल्या सगळ्यांना आत टाकण्याची ऑर्डर देऊन त्यांनी प्रथम माझं स्टेटमेंट नोंदवले. घरी सोडायला गाडी देऊन ते म्हणाले, " मि. उत्तम, आता हे सगळे पोचल्यातच जमा आहेत. तुमच्या डायरेक्टर साहेबांशी मी एक दोन दिवसात बोलणार आहेच. उद्या मी तुम्हाला ऑफिसमध्ये फोन करीन आणि मग परत सगळे धागे जुळवून पाहीन. या बदमाषांना कोर्टापुढे हजर करावे लागेल आणि रिमांडही घ्यावा लागेल. " ......मी रात्री साडेबाराच्या सुमारास घरी पोहोचलो. रिता जागीच होती. तिला जवळ घेत मी म्हणालो, " आत्ता काही विचारू नकोस, जे असेल तेच वाढ आणि मला झोपू दे. " ती तर आज्ञाधारक होतीच . झोपलेल्या मुलांवरून मायेने हात फिरवित मी स्वतःशीच म्हणालो, "चला एक ताण नाहीसा झाला. जे काही करायचं ते कायदा करील. " त्या रात्री मला अतिशय शांत झोप लागली.

सकाळी उठल्यावर माझा उल्हसित चेहरा पाहून रिता म्हणाली, " आज अगदी उत्साह ओसंडून जातोय काल काहीतरी असं झालंय का की एकदम तुमच्यात बदल होईल" मी उत्तरादाखल फक्त हासलो आणि म्हणालो, " आज माझ्याकडून तुला मस्त फीस्ट. लवकर आलो काय नाही काय , पण आजचं जेवण नक्की. " असे म्हणून मी तयार झालो,तिला जवळ घेतली. ऑफिसला जाण्यासाठी निघालो. मी दरवाज्या उघडला आणि पाहिलं तर बाहेर "शुचिता " उभी होती. तिने बेलवरचा हात काढला. म्हणजे ती बेल वाजवणार होती . मला काही समजेना तिला काय म्हणावं. आता सगळं संपलं होतं मग हे परत काय चालू झालं ? तिला नाही म्हंटलं तर माणुसकी नसल्यासारखं दिसलं असतं आणि ये म्हंटलं तर नसता संबंध . मला काही समजेचना. रिताही पाहत राहिली . मग रिताच म्ह्णाली , " कोण ग तू ? " त्यावर तिने मला तिला आलेला एसएमेस दाखवला. तो वाघमारे साहेबांचा होता. "या मुलीला सध्या तुमच्याकडेच ठेवा, लवकरच सोशल वर्करच्या मदतीने आम्ही तिची सोय करू. तिला एकटीला राहणं कठीण आहे . आणि मुख्य म्हणजे प्रतिभानेच हे सुचवले आहे की तुम्ही तिला थोडे दिवस तरी सांभाळाल. मी तुम्हाला संपर्क करणारच आहे. एकदा का रिमांड घेतला की तुम्हाला बोलावून घेईन. प्लीज कोऑपरेट. आणि थँक्स. " तरीही मला सुचेना. प्रतिभा जी आपल्याशी एक अक्षर बोलायला तयार नसायची, तिने आपल्याकडे मुलीला कसं पाठवलं. तिला माझी खात्री कशी वाटली की मी शुचिताला सांभाळेन. मी तिला आत घेतली. रिताला म्हंटले, " मी आलो की सगळं सांगेन . तिला सांभाळून घे. आपल्या दोन्ही मुलांना बहीण आहे असे समज. " ती हो म्हणाली. कुणास ठावूक , तिला आवडलं होतं कि नाही. की ती माझ्याकरिता हे करीत होती. मग मात्र मी ऑफिसला गेलो. ....... गेल्या गेल्या कासम भेटला. कासम आमचा प्यून. त्याचा चेहरा घाबरल्यासारखा वाटला. ऑफिसमधले सगळेच गटा गटाने चर्चा करताना दिसले. मी आजचा पेपर वाचला नव्हता. अधून मधून ते माझ्याकडे पाहत होते. मी विचारले, " काय रे काय झालंय काय , असा घाबरल्यासारखा काय दिसतोस ? " तो म्हणाला, " तुम्हाला माहिती नाही नारायणसाहेबाला आणि प्रतिभा मॅडमला पोलिस पकडून घेऊन गेले ते . पेपर पाहा . " असं म्हणून त्याने मला पेपर आणून दिला . पहिल्याच पानावर बातमी होती. .. " एका मल्टिनॅशनल कंपनीचा एचोडी पोलिसांच्या जाळ्यात. मागच्या काही दिवसात झालेल्या राजेश राजवाडे यांच्या खुनाचेही धागेदोरे पोलिसांना सापडण्याची शक्यता. .......... " पुढे मी वाचणार एवढ्यात मला जंबोसिंगने बोलावल्याचे कासमने सांगितले. आता या सरदारला माझ्याकडून काय हवंय ? याचा विचार करीत मी त्याच्या केबिनचा दरवाज्या वाजवला. आतून आवाज आला., " येस कम इन..... " मी आत शिरलो. मी बसल्यावर तो म्हणाला, "उत्तम, तुम ये पुलिसके चक्करमे कैसे आ गया ? नारायण तो अब गया, उसे रखेंगे नही और वो प्रतिभा , वो भी गयी. वैसेभी उसे नारायणके कहने पर ही तो काम पे रखा था. शायद कल परसू एमडी साब तुमको बुलायेंगे" ते ऐकल्यावर माझ्या काळजाचा ठोका चुकला. आमचा एमडी थडानी , एक नंबरचा खवचत. त्याने कधी कोणाला चांगलं म्हंटलं असल्याचं आठवत नाही. मी घाबरतच माझ्या टेबलापाशी आलो. जवळच्याच काही स्टाफ मेंबर्सनी मला बऱ्याच गोष्टी विचारल्या. या सगळ्यात माझा रोल काय याचं त्यांना कुतुहल होतं . मग मी त्यांना एमडी कदाचित अचानक भेट देईल असे सांगितल्यावर ते आपापल्या जागेवर बसले. पण आतून मला काळजीच होती. मी ह्यात गुंतलो होतो असा त्याचा समज तर झाला नाही ना , पण मी माझं काम तर चोख ठेवलेलं होतं. दिवस असाच गेला. घरी गेल्यावर ठरल्याप्रमाणे आम्ही जेवायला गेलो. अर्थातच शुचिताला घेऊन. आता ती माझ्या मुलांची ताई झाली होती. मुलगी अतिशय मृदुभाषी होती. आई सारखी तिरसट आणि करडी नव्हती. दोन दिवस असेच गेले काहीच घडले नाही. मला दोन दिवसांनी वाघमारेंनी पो. स्टेशनला बोलावले...........

सकाळीच मी पो‌. स्टेशनला गेलो. मला प्रतिभाचं आश्चर्य वाटलं. शुचिताला माझ्याकडे पाठवण्यात तिचा काय हेतू होता मला कळेना. गेल्या गेल्या वाघमारे साहेबांनी अपडेटस दिले. या सगळ्यांना कोर्टाने दहा दिवसाचा रिमांड दिला होता. खुनाचा आरोप असल्याने त्यांना जामीन मिळणार नाही याची वाघमारेंना खात्री असल्याने ते आनंदात होते. अर्थात कोर्टाकडून कोणताच आदेश त्या बाबतीत नव्हता. अजून तपास चालू होता. मग त्यांनी मला प्रकाशची स्टोरी सांगितली. खून प्रकाशनेच केला होता. पण नारायण आणि प्रतिभाच्या सांगण्यावरून. प्रतिभाची तशी इच्छा होती की नाही काही कळायला मार्ग नव्हता. नारायण आणि प्रतिभा एकमेकांना फार वर्षांपासून ओळखत होते. नारायणच्या ओळखीनेच प्रतिभाला नोकरी मिळाली होती . आणि मला मिळालेली कीचेन प्रकाश कडे असली तरी त्यात राजेशच्या खोलीच्या चाव्या नव्हत्या. तर त्या त्याने खून केल्यावर तिथेच फेकून दिल्या होत्या. तपासात तेही सापडले. शेवटी मी वाघमारेंना विचारले , " साहेब शुचिताला माझ्याकडे प्रतिभाने कसे काय पाठवले ? तिला तर माझा तिरस्कार वाटायचा. " त्यावर ते म्हणाले," तसे प्रतिभाला कोणीच नातेवाईक नाहीत. आम्ही तिच्या मुलीला एकटं राहावं लागेल अशी भीती तिला घातली आणि सगळ्या गोष्टी कबूल करून घेतल्या. मग तिला तुला मुलीला कोणाकडे ठेवायला बरं वाटेल असे विचारल्यावर तिने तुमचे नाव घेतले. सोशल वर्कर येईपर्यंत तुम्हाला थोडं सहकार्य करावं लागेल, नाहीतर तिची सोय एखाद्या अनाथाश्रमात करावी लागली असती. तुम्ही नाही म्हंटलंत आणि तिला आमच्या ताब्यात दिलित तरी चालेल. " मी अर्थातच जास्त विचार न करता होकार दिला. काही दिवसांचाच तर प्रश्न होता. त्यांनी एक लेटर माझ्या एमडी साहेबांना पाठवल्याचे सांगितले. आणि लागल्यास त्यांना ते व्यक्तिशः भेटतील असे ही म्हणाले. आता प्रश्न थडानीचा होता. हाउ ही टेक्स इट. पुढचे तीन चार दिवस असेच गेले. मला अजून थडानीने बोलावले नव्हते. मग अचानक एक दिवस इन्स्पे. वाघमारे ऑफिसमध्ये दिसले. ते म्हणाले, " आत्ताच तुमच्या एमडी साहेबांना भेटून आलो. पूर्ण रिपोर्टही दिलाय. ते तर करणं भागच होतं. आणि खास तुमच्याबद्दल प्रशंसा करणारं लेटरही दिलय. बहुतके तुम्हाला साहेब बोलावतील. " मग ते गेले. मी तपासाबद्दल मुद्दामच विचारले नाही. मला माहिती होतं की नारायण , प्रतिभा आणि प्रकाश तिघेही पक्के अडकलेले आहेत. त्या दिवशीही एमडीने बोलावलं नाही. शुचिता घरीच होती . मध्यंतरी एकदा वाघमारेंचा फोन आला . शुचिताची सोय एका सोशल वर्करने केली आहे. तिला पो. स्टेशनला घेऊन या म्हणजे पेपर्ससहित सोशल वर्करला तिचा ताबा देता येईल. मग मी मुद्दामच त्या दिवशी शुचिताशी बोललो. ती म्हणाली, " काका, मला तिकडे नाही जायचंय. प्लीज मला तिकडे नका ना पाठवू........ " आणि ती हमसाहमशी रडू लागली. रिताला ही ती आवडत होती. मग आम्ही दोघे काहीच बोलत नाही पाहून ती काकुळतीने म्हणाली, " ठेवाल का मला , ठेवा ना . तिकडे माझ्या ओळखीचं कोणीच नाही. प्ली...... ‍ज ! " मी रिताकडे पाहिलं. तिला भरून आलं होतं. तिने होकार भरला. शुचीला हे न कळून ती रडत रडत म्हणाली, " काका , मी खूप मदत करीन कधीच त्रास देणार नाही. " रिता म्हणाली, " एखाद्या अनाथ मुलीला आपण दत्तक घेतलंय असं समजू या. ती एकटी तरी कुठे जाणार. मला चालेल. " मग माझेही डोळे पाणावले. शुचीला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवीत मी म्हंटलं, " आता तुला कुठेच जाण्याची गरज नाही. आम्ही सांभाळू. " मात्र दुसऱ्या दिवशी शुचीला घेऊन पो. स्टेशनला जाणं भाग होतं. रिताही बरोबर आली होती. वाघमारे साहेबांच्या समोर एका खुर्चीत मध्यम वयीन बाई बसल्या होत्या. माझी ओळख करून देताना वाघमारे म्हणाले, " मि. उत्तम, या नमिता मावशी , या सोशल वर्कर आहेत आणि या अनाथ मुलींची चांगल्या कुटुंबात सोय करतात किंबा अनाथाश्रमात पाठवतात. " मी त्यांना हाय हॅलो केलं. पण का कोण जाणे त्या अनोळखी स्त्रीच्या हातात शुचीचा हात द्यायचा, माझा जीव धजेना. त्यातून ती थोडी करड्या चेहऱ्याची वाटली. तुम्ही म्हणाल प्रतिभासारखी. मग काय हरकत होती तिच्याकडे द्यायला. प्रतिभाच्या जवळ शुची होतीच की. पण ती तिची आई होती. मी वाघमारे साहेबांना माझा निर्णय सांगितला. त्यावर ते म्हणाले, " वा , हे तर फारच छान . नमिता मावशीच्या चेहऱ्यावर थोडी निराशा दिसली. कदाचीत प्रसिद्धीची एक संधी मी तिच्या हातून घेतली होती. काही असो, शुचीला घेऊन आम्ही निघालो. वाघमारेंनी शुचीला विचारले, " काय ग ममीला नाही भेटायचं का तुला ? " त्यावर तिने "अजिबात नाही " असे म्हंटले.

कदाचित आपल्या ममीचा तिला तिरस्कार वाटत असावा. काही असो , आम्ही शुचीताला घेऊन घरी आलो.

जवळ जवळ सात आठ दिवसांनी मला एमडीने बोलावलं. मी जंबोसिंगकडे मुद्दामच गेलो. तो म्हणाला मला बोलावलेलं आहे याची त्याला काहीच माहिती नाही . मग मी त्याला माझ्याबरोबर चलण्याची गळ घातली. तो म्हणाला, " मेरा क्या काम, तुम तो एमडी को जानते हो. कुछ भी बोल सकता है. " मी निराशेने उठलो. दरवाज्याशी पोहोचल्यावर तो म्हणाला, " अरे उत्तम, मै भी चलता हूं. मेरे पास भी एक केस है. वो डिसकस करनी है. लेकीन एक बात है , मै पह्यले जाता हूं. तू बादमे आ जाना " असे म्हणून तो घाईघाईने फाइल घेऊन निघाला सुद्धा. मी एमडीच्या सेक्रेटरीला जाऊन भेटलो. तिचं नाव प्रियंका. मला बोलावल्याचं सांगितल्यावर ती म्हणाली, " तुम्हाला थोडं थांबावं लागेल. आत्ताच जंबोसिंग आत गेल्येत. मी सरांना सांगते तुम्ही आल्याचं. तोपर्यंत बसा ना, प्लीज. " असे म्हणून तिने आत फोन केला. फोन बंद करून ती म्हणाली, " जा, तुम्ही . " मला जरा बरं वाटलं. चला , निदान जंबोसिंग समोर तरी थडानी नीट बोलेल. माझी भाबडी अपेक्षा. मी दरवाज्या वाजवून गुड मॉर्निंग म्हंटलं. थडानी एक मध्यम वयाचा सिंधी एका मोठ्या अंडाकृती टेबलामागे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो नक्की काय विचार करीत आहे हे सांगणं कठीण. त्याने बसण्याची खूण केली. मी बसलो . का कोण जाणे त्याच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी दिसली. मी घाबरलो हा आता काय बोलेल कुणास ठावूक. नेहमीप्रमाणे मी बरोबर वर्क रिपोर्टचं स्टॅटिस्टिक आणलं नव्हतं. खरंतर ही भेट का होती हे कळलं नाही. पण नारायणची ही पद्धत होती. कोणी सीनियर बोलवो आपण लेटेस्ट प्रोग्रेस रिपोर्ट जवळ ठेवायलाच पाहिजे. आता तो पोलिसांच्या ताब्यात होता . पण त्याने घालून दिलेली पद्धत फारच उपयोगी होती. माझ्या तळहाताला घाम येत होता. आपली ड्रिल करणारी नजर रोखून मला म्हणाला, " आपको तुरंत आनेको क्या हो गया ?. धिस इज बॅड मॅनर्स. एनीवे ये नारायणका क्या लफडा है ? मेरे कंपनीमे कभी पुलिस नही आयी. आप दोनोने क्या किया है ? " वास्तविक त्याच्या कडे इन्स्पे. वाघमारेंच लेटर होतं, म्हणजे त्याला माहिती होतं. मला उगाचच हलकासा घाम येऊ लागला. आता याला काय काय सांगणार ?माझी काहीच इन्व्हॉलमेंत नव्हती. मग मी त्याला थोडक्यात सगळं सांगितलं. त्यावर तो काहीच म्हणाला नाही. जंबोसिंगनेही तोंड बंद ठेवलेलं होतं. नाहीतर त्याची बडबद अखंड चालू असायची. त्याने जंबोसिंगला बादमे आओ असे सांगून घालवला. आता तर मला जास्तच असुरक्षित वाटू लागलं. जंबो गेल्यावर थडानी मला म्हणाला, " देखो ,

यू हेब डन अ गुड जॉब बाय कोऑपरेटिंग पुलिस. मैने तुम्हारा पूरा करियर चेक किया है. इट इज फाइन. आय थिंक यू डिझर्व्ह अ प्रमोशन. देखता हुं क्या कर सकता हूं. वुई विल ट्राय टू टॉक इन डीटेल्स. तुम्हारा प्रोग्रेस रिपोर्ट भेज दो. ओके ? यू कॅन गो नाऊ . " त्याने हसरी मुद्रा करण्याचा प्रयत्न केला असावा असं मला त्याच्या ओठांवर आलेल्या लहानश्या सुरकुतीवरून वाटले. मी पडत्या फळाची आज्ञा मानली आणि

एकदाचा केबीन बाहेर आलो. प्रियंका फोन वर व्यग्र होती. मी घाईघाईतच माझ्या टेबलापाशी आलो. मला जरा बरं वाटलं. प्रमोशन ? सहा सात वर्षांनंतर ? शुचिताचा पायगुण म्हणायचा की काय ? माझ्या मनात भलतेच विचार आले.

एक दिवस मला वाघमारेंचा सकाळी सकाळी फोन आला . आज बांद्रा कोर्टात या, अकरा वाजेपर्यंत. प्राथमिक सुनावणी आहे. मी विचारले, " माझं काय काम आहे ? ' त्यावर ते म्हणाले, " असं काय म्हणता , तुम्ही तर आमचे महत्त्वाचे साक्षिदार आहात . आम्ही तुमचे नाव कोर्टाकडे पाठवले आहे. " मी हो म्हंटले. पण मला कोर्टात जाणं या प्रसंगामुळे अस्वस्थ वाटू लागले. पेपरात असल्या गुन्ह्यांच्या संदर्भात कोर्टरुममध्ये झालेलं वाचलं होतं. पण प्रत्यक्षात माझा संबंध आल्याबरोबर नको वाटू लागले. तरीही मी जाण्याचे ठरवले. शुचीलाही तसे सांगितले. पण तिने ठाम नकार दिला. मग मी गेलो. कोर्टात वातावरण एकदम गंभीर होते. वाघमारे साहेब , त्यांचा स्टाफ , आणि प्रतिभा, प्रकाश आणि नारायण हेही आले होते. अजूनही ते पोलिसांच्या ताब्यात होते. कोर्टासमोरील एका बाकड्यावर ते तिघे बसले होते. त्या तिघांचे चेहरे ओढल्यासारखे दिसत होते. प्रतिभाचे डोळे तर खोल गेलेले आणि मान बाहेर आल्यासारखी वाटली. नारायणचा ताठा संपलेला होता. प्रकाशचा प्रश्नच नव्हता. त्याचा जबडा बैद्यकीय उपचाराने ठीक झाला असावा. त्यांना झोप लागली नसावी असे दिसत होते. पोलिसी खाक्याचा परिणाम त्यांच्या लाल डोळ्यांवरून दिसत होता. मला पाहिल्यावर प्रतिभाला माझ्याशी बोलण्यासाठी यायचं असावं पण नारायणने तिचा हात घट्ट धरून ठेवलेला दिसला. ती तशीच बसून राहिली. तिला शुचीबद्दल विचारायचे असावे. मी पण काही न बोलता वाघमारे साहेबांना जाऊन भेटलो. अकरा वाजता कोर्ट स्थानापन्न झालं. प्रतिभाची केस पुकारली गेली. तिघे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. मग एक म्हातारेसे वकील आले . ते त्या तिघांचे असावेत. सरकारी वकिलांनी सगळी कथा सांगितली आणि उर्वरित तपासासाठी रिमांड मागितला. तसेच माझेही नाव पुकारले गेले. मला फक्त तिथे उभे राहून हजेरी द्यावी लागली. मी फार महत्त्वाचा साक्षीदार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. नंतर रिमांड देण्यात आला. पण खुनाची केस असल्याने जामीन मान्य झाला नाही. पुढची तारीख पडली. मी वाघमारेंना सांगून निघालो. मला त्या वातावरणात क्षणभरही उभं राहण्याची इच्छा नव्हती. केस चालू झाल्यावर बकरं कापायला घेतल्यासारखं वातावरण असतं. मी दरवाज्या बाहेर पडणार तेवढ्यात माझ्या हाताला स्पर्श झाला. तो प्रतिभाचा होता. तिने पाणावलेल्या डोळयांनी विचारले, " शुची माझी आठवण काढते का ? " मला आता तिच्याकडे पाहवत नव्हतं. पण एका आईला मुलीची आठवण येणारच. मी उत्तरादाखल फक्त "नाही " असे म्हंटले . आणि घाईघाईने निघालो. तिच्याशी जास्त बोलण्याही माझी इच्छा नव्हती. आज ही बाई इतकी हीनदीन झाली होती. मला ते फार वेळ पाहायचे नव्हते. नारायण लांब उभा राहून प्रतिभाकडे रागाने पाहत होता. त्याला माझ्याशी बोललेलं आवडलेलं नव्हतं. कदाचित त्याच्या डोळ्यात असे भाव असावेत, की हाच तो माणूस ज्याच्यामुळे आपण अडकलो. पण मला पर्वा नव्हती. मी कदाचित अतिकुतुहल दाखवणारा ठरलो असेन पण माझ्यामुळे एक बाईट हेतू असलेले त्रिकुट समाजातून शिक्षेप्रत जाणार होते. मी जास्त विचार न करता ऑफिसला गेलो. ................... गेल्याबरोबर मला जंबोसिंगने बोलावले. त्याने मला प्रमोशनची ऑर्डर दिली. आता मी नारायणच्या रिक्त पदावर बसणार होतो. आणि माझे सहकारी नवीन नियुक्ती झालेले फ्रेशर्स होते. पण का कोण जाणे त्या पदावर नारायणच्या ठिकाणी बसण मला आवडलं नाही. अर्थात, मला चॉइस नव्हता. जमेल तेव्हा मी आमच्या कंपनीच्या दुसऱ्या कोणत्यातरी रिजनल कार्यालयात ट्रान्स्फर करून घेण्याचे ठरवले. तसं माझं एकदा वाघमारेंशी फोन वर बोलणं झालं. ते म्हणाले, " मि. उत्तम , केस मुंबईला चालणार , आणि तुम्ही ट्रान्स्फर घेतलीत तर तुम्हाला तारखांसाठी यावं लागेल, माझ्यामते तुम्ही हा प्रयत्न तुमचं कोर्टापुढे झाल्यावर केलत तर बरं होइल. अर्थात, हे सगळं केव्हा होईल मी सांगू शकत नाही. " त्यांचं म्हणणं मला पटलं. मला एक दिवस थडानीनेही बोलावलं आणि कामाची कल्पना दिलि. आता त्याचा रवय्या बदलला होता. तो म्हणाला, " मि. उत्तम, कुछ डिफिकल्टी होगी तो जरुर आना. "

मी घरी गेल्यावर रितालाही फार आनंद झाला. पण इथेच राहायचंय म्हंटल्यावर तिला फारसं बरं वाटलेलं दिसलं नाही. शुची आमच्यासाठी चांगलीच लकी ठरली होती . वाईटातून चांगलं होतं , ते हे असं . असं म्हणायचं. तीन चार वर्षानंतर केसचा निकाल लागला. तेव्हा मी बंगलोरला होतो. माझं स्टेटमेंट झाल्यावर मी जंबोसिंगला हाताशी धरून बंगलोरला ट्रान्स्फर करून घेण्यासाठी थडानीच्या मागे लकडा लावला. तेव्हा कुठे माझं काम झालं . निकाल लागल्यावर एकदा वाघमारेंचा फोन आला होता. पण आता मला त्यात काहीही रस नव्हता. पण अजूनही मला दगडाचा मुखवटा लावलेली प्रतिभा आठवते.

(संपूर्ण )

(पूर्व प्रकाशन मायबोलि .कॉम )

साहित्यिकप्रतिभा

प्रतिक्रिया

मोनाली's picture

20 Apr 2017 - 12:11 pm | मोनाली

मी वाचलिये हि कथा याआधी...
तुमचा ब्लॉग आहे का...बहुतेक त्यात या कहानीचे ११ भाग आहेत..
छान आहे कथा..आवडली.

राजाभाउ's picture

20 Apr 2017 - 1:07 pm | राजाभाउ

मस्त माबो वर अर्धवट वाचली होती, आता पुर्ण वाचली. धन्यवाद.

जवळजवळ पुस्तकंच छापलंय की हो एका दमात...भाग टाकले असते तर वाचायला सोपं होतं...

असो. कथा उत्कंठावर्धक आहे. शैली उत्तम !!

अमरप्रेम's picture

20 Apr 2017 - 2:10 pm | अमरप्रेम

कथा आवडली

पैसा's picture

20 Apr 2017 - 2:12 pm | पैसा

कथा आवडली

अफगाण जलेबी's picture

20 Apr 2017 - 2:29 pm | अफगाण जलेबी

पण वर चिनार यांनी म्हटल्याप्रमाणे जर भागांमध्ये टाकली असती तर अजून उत्कंठावर्धक झाली असती. अगदी सध्यासरळ प्रकारे सुरु होते आणि वेगळ्याच वळणावर जाते. तुमच्या अजून कथा वाचण्यास उत्सुक.

कोणीतरी याचे चार पाच भाग करा प्लिज.

अरूण गंगाधर कोर्डे's picture

20 Apr 2017 - 7:26 pm | अरूण गंगाधर कोर्डे

प्रथम प्रतिसादाबद्दल आभार. पूर्वी याचे दहा भाग केले होते. भागांमधे पाठवल्यावर उगाचच उत्कंठा ताणली जाते असे वाटल्याने व भाग लक्षात ठेवून पाठवावे लागत असल्याने एकदम पाठवली. गैरसोयी बद्दल दिलगीर आहे.

मोबाईल वर वाचताना त्रास होतो खुप म्हणून विंनती केली. क्षमा असावी.

संजय क्षीरसागर's picture

20 Apr 2017 - 2:41 pm | संजय क्षीरसागर

आंतरजालावर मी कुण्या एकाच लेखकाचा फॅन असेन तर ते तुम्ही आहात. कथा सावकाश वाचेन पण तुम्हाला इथे पाहून आनंद झाला म्हणून हा प्रतिसाद.

अरूण गंगाधर कोर्डे's picture

20 Apr 2017 - 7:23 pm | अरूण गंगाधर कोर्डे

तुम्ही बरेच दिवसांनी भेटलात. बरं वाटलं.

कपिलमुनी's picture

20 Apr 2017 - 3:03 pm | कपिलमुनी

छान कथा आहे पण ...
क्रमशः टाकली असती तर उत्तम झाले असते

बोका-ए-आझम's picture

20 Apr 2017 - 4:16 pm | बोका-ए-आझम

कलाटणी मस्त आहे. पण जर अनेक भागांमध्ये आली असती तर उत्कंठा राहिली असती. पुलेप्र.

संपूर्ण कथा वाचली! हुश्श!!! भारी आहे.

मितान's picture

20 Apr 2017 - 4:58 pm | मितान

उत्तम कथा !

नीलमोहर's picture

20 Apr 2017 - 5:37 pm | नीलमोहर

थोडी लांबलीय पण छान जमलीय कथा,

अरूण गंगाधर कोर्डे's picture

20 Apr 2017 - 7:27 pm | अरूण गंगाधर कोर्डे

प्रतिसादाबद्दल मिपा वरील सर्वच वाचकांचा मी आभारी आहे.

अस्वस्थामा's picture

20 Apr 2017 - 8:17 pm | अस्वस्थामा

कथा मस्तच.. :)
मुख्य म्हणजे चांगली फुलवलीय.. पण काही ठिकाणी बॉलिवुडी थरार आणण्याचा प्रयत्न विनाकारण वाटतो (उदा. हॉर्सशू फाईट! )
त्याचबरोबर काही शंका :
१. तिचा घटस्फोट जवळपास झाल्यात जमा होता आणि असं असताना देखील खुनाचा प्रयत्न अस्थानी वाटला. ते पण प्रकाशसारख्या बेभरवशी, त्रासदायक आणि जास्त खर्चिक मार्गाने. हे काही पटलं नाही. यामुळे नारायण आणि प्रतिभाला विनाकारण खूप वाईट असे विलन बनवल्यासारखं जास्त वाटलं.
२. खुनाचा प्लॅन होता तर प्रतिभा २-३ दिवस गायब का होती आणि नारायणाने तिला पत्र पाठवायची घाई कशाला करायची ? हे म्हणजे आ बैल मुझे मार सारखं नाही का ? तिला माहित होते असे गृहित धरले तर तिथे जाऊन नक्की काय साध्य केलं तिने ? तिला माहित नव्हते तर नारायणाने असे काही करण्याआधी तिला न सांगणे पटत नाही. खासकरुन तिचाच भाऊ हे काम करणारे तर.
३. प्रकाश तिच्या घरी आला आणि तिला किचेन सापडली. यावेळेस तिला माहित नसेल तर ती गुन्हेगार कशी ? तिला फार फार तर गुन्ह्याची माहिती पोलिसांना न देण्याबद्दल शिक्षा होऊ शकेल पण तिच्या भावाचा इतिहास बघता ते पण तिच्या बाजूने व्हायला हरकत नसावी. थोडक्यात ती या खुनाच्या कटात आणि गुन्ह्यात थेट सहभागी आहे असे कथेवरुन तरी वाटत नाही, तेव्हा शेवटी तिलाच (आणि तिच्या मुलीला) सर्वात जास्त शिक्षा झाल्यासारखी वाटतेय.
४. हिरो सगळी चुकीची कामं (पाठलाग, पाळत, बायकोशी वागणं) करुन पण शेवटी एका निराधार पोरीला सांभाळून वर प्रमोशन पण! जगात न्याय नाही हेच खरं. बिचारी प्रतिभा - नवर्‍याने छळलं, भावाने पिडलं, सहकर्मचारी हे असे सतत टकामका बघणारे नि दारापर्यंत पाठलाग करणारे, आणि प्रियकर तो असा येडा न सांगता, गरज नसताना खुनाची सुपारी देणारा. शेवटी कारावास पण तिलाच.

अरूण गंगाधर कोर्डे's picture

8 May 2017 - 5:32 pm | अरूण गंगाधर कोर्डे

आपण सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल मी आभारी आहे. प्रकाश हा भाऊ असला तरी प्रतिभा आणि नारायण यांचे संबंध आहेत हे त्याला माहिती होतं. आणि तो त्यांना
ब्लॅकमेलही करीत होता. काहीही न करणारा प्रकाश डोईजड झाल्याने नारायणने असा विचार केला असावा की याला फुकट पोसण्या पेक्षा याचा उपयोग करून राजेशचा काटा काढावा म्हणजे प्रतिभाशी लग्न करता येईल. पोलिसांना प्रकाश हवाच होता याचा फायदा नारायणने घेतला . लेटर पाठवणं वगैरे कंपनीच्या पद्धतीप्रमाणे असल्याने त्याने फारसा फरक पडत नाही. प्रतिभाला माहित होते असे गृहित धरले तरी फारसा फरक पडत नाही. शेवटी दोघांच ध्येय सारखे असल्याने आणि गुन्हेगार काही ना काही चूक करतातच , त्याप्रमाणे त्यांच्या हातून झालेल्या चुका आहेत असे धरायला हरकत नाही. राजेशने प्रतिभाला बोलावल्याने ती गेली होती. कारण तिला एकदा यातून बाहेर यायचे होते. काही झालं तरी प्रतिभाला राजेश पासून सुटका हवीच होती. त्याचप्रमाणे सहकर्मचारी कसे असतात हेच मला दाखवायचे होते. त्यातले उत्तम सा रखे तर अति खोलात शिरणारे असतात . खरंतर मला सहकर्मचार्‍यांची प्रवृत्ती दाखवायची असल्याने मी ही कथा लिहिली. उत्तम बॉक्सिंग शिकलेला असल्याने त्याने त्यातल्या ट्रिक्स वापरल्या तर बिधडलं कुठे ? थरार कथा लिहिण्याचे माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं. ते सगळं आपोआपच येत गेलं. असो . हे स्पष्टिकरण बरोबर आहे असा माझा दावा नाही. कदाचित आपणास पटणार नाही . असो. यापेक्षा मला सध्या तरी वेगळं सुचत नाही . फेरविचार करून काही सुचल्यास अवश्य लिहिन.

सुरुवात वाचताना वाटले एखादे व्यक्ति चित्रण वाचत आहे, मग भराभर रंग बदलत गेला.
पात्रांची उत्तम ओळख करुन दिलीत, रहस्य उत्तम रित्या राखलेत., शेवट तर खासच.

मिपावर स्वागत.. अगोदर वाचलेय.. मस्त आहे

पूर्ण वाचणे झेपले नाहीये ! भागात टाकली असती तर लयं ब्येस्ट झाल असत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सपनों में इंडिया है जाना है मुझको... :- Arash - Bombay Dreams (feat. Aneela & Rebecca)

बापू नारू's picture

21 Apr 2017 - 11:40 am | बापू नारू

छान जमली आहे कथा