सांत्वना

तिथली दिवाळी.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
9 Nov 2015 - 7:18 pm

तिथली दिवाळी.....

तीरकामठा रंगीत कागद
चिखलमाती अर्धा किल्ला....
शिवाजीच्या मावळ्यांहाती,
परत फराळ ठेवशील का?

पहाट झोपेत हळूच उठवून
घमघमणारी आंघोळ घालून,
फुलबाजांची हजार फुले
परत हातात ठेवशील का?

रांगोळीतील हुकले ठिपके
रेषांमधील नाजूक वळणे,
तुळशीमाईचे लगीन लटके
परत दणक्यात लावशील का?

किणकिण बांगड्या काचेच्या
घिरघीर झालरी पोरींच्या!
सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या
परत उडवण्या येशील का?

कविता माझीभावकविताविराणीसांत्वनाकरुणसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानदेशांतर

एक माणूस मिशी काढून..............

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
29 Oct 2015 - 8:08 pm

एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला
बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला.
वर्ग भरला मुलामुलींनी
सुरेख हसणे पानांमधूनी
हळूच पाही शाई सांडूनि,
बघते का ती मान वळवूनी!

हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून भाषा हुकली
कितीक राजे आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
छंद जीवाला एकच लागे
रिबिनीमागचे भोळे कोडे!

इकडे तिकडे बघून झाले
मास्तर सगळे येऊन गेले
मधली सुट्टी चिंचा बोरे
मैदानावर सुटली पोरे.....
वर्गासहित उठून गेले
साधेभोळे हळवे कोडे!
भान आले, बाहेर आला....

कविता माझीप्रेम कविताभावकवितासांत्वनाकरुणकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजशिक्षण

चालत राहू......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
20 Oct 2015 - 8:19 pm

रेषांसंगे चालत आलो, रेषांसोबत चालत राहू,
गति नाही, स्थिती नाही, केवळ लय, चालत राहू.

उठल्यावरती सूर्य नाही, थकल्यावरती चंद्र नाही
कुठला देश, कुठले घरटे, आपली कुडी, चालत राहू.

जंजाळाशी रडणे नाही, गुंत्यापाशी थटणे नाही,
कोण आले, कोण गेले, कुणी न उरले, चालत राहू.

दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही,
आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू.

नाव उलटली आक्रोश नाही, नाव तरली जल्लोष नाही,
कुठली लाट, कुठली वाट, आपला किनारा, चालत राहू.

कविता माझीविराणीसांत्वनावाङ्मयकवितासाहित्यिकदेशांतर

चारचा चहा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 Oct 2015 - 8:43 pm

चारचा चहा touch screen असतो!
कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि
आतल्याआत मस्तसे हसतो,
How's the day? म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!

चारचा चहा screen saver असतो!
शरीराचा tab refresh करतो
मनाचे software update करतो,
What's on your mind? म्हणून
खोडीलपणे विचारतो!

चारचा चहा google map असतो !
मनाचा cursor global होतो
पण हातातला mouse local च राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो
अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

आरोग्यदायी पाककृतीकविता माझीकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितासांत्वनासंस्कृतीकविताप्रेमकाव्यमुक्तकसमाजजीवनमानदेशांतर

दयेच्या छावण्या

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
9 Oct 2015 - 11:19 am

पाणी पितो ती नदी आमची नाही
अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत
आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या
ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत!

युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा
WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स
RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त
युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या
यातलं काहीच आमचं नाही!

अनर्थशास्त्रइशाराफ्री स्टाइलमुक्त कवितासांत्वनाभयानकबिभत्सकरुणरौद्ररसधोरणमांडणीवावरकवितामुक्तकसमाजजीवनमानराहणीभूगोलदेशांतरराहती जागाअर्थकारणअर्थव्यवहार

जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
2 Oct 2015 - 9:11 am

जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळे १:

सासं नसूनही तबला तू
सकल मिपाचा झमेला तू

धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र
अन्... सुप्त बोक्याची जागा तू

मोकळाढाकळा रांगडा तू रे
सुमडीत सोपान डोम ही तू

ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू
कधी फसलेली चारोळी तू

मिपात असूनही.. एकटाच तू रे
तुझ्या लाट्णीचा आधार तू

जुळे २:

छान छान यावे धागे
छान छान वंदावी थेट

टीआर्पी जसा चॅनेलला
येऊन मिळतो थेट थेट

मग येतो नवा धागा
जुना जातो अंधारात

टीच्भर प्रतीसाद मागून
तोही मिटतो अंधारात

अनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितासांत्वनाहास्यअद्भुतरससंस्कृतीनृत्यनाट्यवाङ्मयचारोळ्याविडंबनऔषधोपचारशिक्षणमौजमजा

ll गंगास्मरण ll

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Sep 2015 - 1:11 am

सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो.
(जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे!

तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती
तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती

तू कल्याणी, नीरदायिनी
तुलाच नमितो सांबसदाशिव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
भगिरथाचे पुत्र चिरंजीव

प्रकटयोगिनी बिकटगामिनी
तुझ्या तटाचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या किनारी शांत निमाले

कविता माझीभावकवितासांत्वनाकरुणमांडणीवावरसंस्कृतीइतिहासवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोल

हे काय कमी काय?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
16 Sep 2015 - 9:46 pm

उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून
घरी परततात माणसं, हे काय कमी काय?
सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा
नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय?
सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता
पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय?
भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

कविता माझीभावकवितामुक्त कवितासांत्वनाकरुणकवितासाहित्यिकजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतर

किती भाग्यवान आम्ही!

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
11 Sep 2015 - 12:15 am

किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
किती गंडलो आम्ही!
मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही,
'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले!

उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक!
नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच,
छातीठोकपणे सांगावेच कुणी!

आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या...
नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत,
असे पाय दाखवावेतच कुणी!

प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत?
'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत
अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही
असा त्रिशंकू भेटावाच कधी!

अनर्थशास्त्रकविता माझीफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितासांत्वनावावरसंस्कृतीकवितामुक्तकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतर

निरोप

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
23 Aug 2015 - 6:02 pm

थकल्या दोन चरणांवरती
हलका झुकला माथा
'सुखी रहा'च्या शब्दांपाशी
निरोप अडला साधा!

अनुबंधांची कि जन्मांतरीची
अशीच असते रेषा
परतो, अथवा जावो दिगंता
चिवट असते आशा.

वाटला तितका सोपा नव्हता
वृद्ध अनोळखी धागा
जुन्यापान्या झाडांचाच
खोल असतो ठिकाणा!

भावकवितासांत्वनाकविता