नव्याने ...
बांधले आहेत आम्ही दोर जगण्याशी नव्याने
रोज घेतो जन्म आम्ही वैर मरणाशी नव्याने
कोरड्या डोळ्यात येथे आग नित्याचीच आहे
जोडले नाते जगाने यार सरणाशी नव्याने
भाकरी किंवा कट्यारी काय निवडावे कळेना
जोडती संबंध दोघी उदरभरणाशी नव्याने
जिंकण्याचे भास होती रोज लढताना स्वत:शी
नाळ जुडता वास्तवाशी, मैत्र हरण्याशी नव्याने
रोज रस्ते शोधतो, वाटा नव्या धुंडाळतो मी
ओळखी होतात तेव्हा मग हरवण्याशी नव्याने
विशाल