राग (अर्थातच सान्गितिक)
आशयाच्या अंबरांनी शब्द माझा टंच व्हावा
कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा ..
स्वर टिपेचा बरसुदे त्या भीमसेनी मार्दवाने
सूर शब्दांच्या द्वयाने जीव माझा धन्य व्हावा
सोहिनीच्या आर्जवांनी जीव स्वप्नाळून जावा
जोगिया वा भैरवाने सूर्य गगनी अवतरावा
विभासाच्या त्या सुरांनी नूर दिवसाचा ठरावा
कलिंगडाच्या भैरवाने अंतरात्मा शुद्ध व्हावा ..
मारावा अन सारंगाच्या साक्षीने दिन सार्थ व्हावा
श्री मधुवंती पूर्वी संगे मध्यांन्होत्तर वेळ जावा ...
यमन येऊदे संध्याकाळी साथ घेऊन शंकऱ्याला
हंसध्वनी वा कल्याणाने दिवस रोजचा अंत व्हावा..
.