गीतबाधा
तुम्हाला होतं का कधी असं? भूतबाधा व्हावी तशी गीतबाधा होते मला. एखादं गाणं कचकचून चावतं आणि त्याची बाधा होते. मग ते गाणं मला बरेच दिवस सोडत नाही. कित्येक दिवस मी फक्त तेच गाणं ऐकतो, म्हणतो, ओरडतो, कोकलतो, पुटपुटतो. शेवटी बायको वैतागून ते गाणं बंद करायला सांगते. तरी ते गाणं मला सोडत नाही. संपूर्ण गाणं त्यातल्या संगीताच्या एक-एक तुकड्यासकट तोंडपाठ झाल्याशिवाय मीदेखील त्या गाण्याला सोडत नाही. आधी गाणं मला बाधतं, मग मी गाण्याला बाधतो. एका वेळेस १५-२० वेळा आणि असं किमान ८ ते १० वेळा मी ते गाणं ऐकतो.