एक चांदणी माझ्या घरात डोकावते
दुधाळ चांदव्यात,
प्रखर तेजाळते
एक चांदणी माझ्या,
घरात डोकावते
मी बसतो दडून,
तिच्यापासून
ती हलत नाही,
टक लावते
माझा मी लिहितो,
हळुवार गुणगुणतो
ही, मी लिहिलेले,
गावाला ऐकवते
चालत राहते रात्र,
ही चांदणी मात्र
अमीट असल्याच्या,
थाटात वावरते
उशीरा कधीतरी,
फिरते माघारी
ती गेल्यावर तिची,
टिमटिम आठवते
रात्रभर छळते,
मला जागवते
पहाटे निमूट माझ्या,
कवितेत उतरते
- संदीप चांदणे