माझी काळोखाची कविता

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
11 May 2020 - 10:32 am

मी न चाहता उगवतीचा
येईल त्याला जातो सादर
पसरूनि अंगावरती घेतो
अंधाराची काळी चादर

मोहक तिरिपा उजेडाच्या
मृगजळ फसवे तिथेच होई
त्याहूनी प्रिय, मजला घेणे
बरबटून काळोखाची शाई

नवे समर नव्या दिसाचे
तयां सोबत आरवतेची
हलके घाव देते भरूनि
तमात शांती नीरवतेची

जर का आहे प्रकाश जीवन
नवसृजनाची नांदी काळोख
गूढ गहिरे व्योम आणिक
अज्ञाताचा प्रवास काळोख

- संदीप भानुदास चांदणे (११/०५/२०२०)

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 May 2020 - 10:52 am | प्रचेतस

व्वा..., शब्दयोजना आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2020 - 3:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आणि शब्दयोजना आवडली.

-दिलीप बिरुटे

राघव's picture

11 May 2020 - 11:11 am | राघव

चांगलं लिहिलंय.

गणेशा's picture

11 May 2020 - 11:21 am | गणेशा

मी न चाहता उगवतीचा
येईल त्याला जातो सादर
पसरूनि अंगावरती घेतो
अंधाराची काळी चादर

भारी.. आवडले..

मोहक तिरिपा उजेडाच्या
मृगजळ फसवे तिथेच होई
दोन ओळीमधे बरच काही सान्गणारी कविता!
तमात शांती नीरवतेची.. भारी.. आवडले.

मन्या ऽ's picture

11 May 2020 - 1:30 pm | मन्या ऽ

अप्रतिम!

त्याहूनी प्रिय, मजला घेणे
बरबटून काळोखाची शाई

ह्या ओळी अशा लिहिल्या तर?

त्याहूनी प्रिय, मजला ल्याणे
अंग वसनी काळोखशाई

कविता आवडली.

चांदणे संदीप's picture

12 May 2020 - 6:32 am | चांदणे संदीप

एसभाऊ, धन्यवाद! बऱ्याच दिवसांनी दिसत आहात.
मोहक तिरिपा उजेडाच्या
मृगजळ फसवे तिथेच होई
इथल्या मृगजळाच्या स्थितीवर आधी विचार झाला पाहिजे. मृगजळाच्या मागे जेव्हा तहानलेला जीव धावतो आणि ते मृगजळ आहे हे कळून त्याचा भ्रमनिरास होतो त्यावेळच्या आक्रोशाच्या अगदी विरूध्द जेव्हा रात्रीच्या शीतलतेत त्या जीवाला कसलीही तहान लागत नाही आणि तो नेहमी अनामिक सुखाचा, तृप्तीचा अनुभव घेत राहतो तेव्हा ते सुख, त्याची उत्कटता पराकोटीची आहे ती बरबटून घेतल्याशिवाय नाही दिसणार.

दांडियाचा सोज्वळ गरबा आणि गणपतीतला तुफान नागीण डॅन्स हा फरक लक्षात घ्या. इथे गणपतीतला डॅन्स अपेक्षित आहे. (दुसरं उदाहरण लवकर कळेल असं वाटतंय!)

सं - दी - प

खिलजि's picture

12 May 2020 - 3:00 pm | खिलजि

मी न चाहता उगवतीचा
येईल त्याला जातो सादर
पसरूनि अंगावरती घेतो
अंधाराची काळी चादर

दाट दाट काळोखात

दूर वात तेवते

चालतो मी मार्ग माझा

वात वाट शोधते

कोणते हे रूप माझे ?

मीच मजला शोधतो

घेतला दिवा तो हाती

तरीही काळोखात राहतो

सावली बघून मजला

कैक काळ लोटला

उगवेल कधीतरी सूर्य माझा

म्हणुनी श्वास रोखला