मौनाइतके कुणीच नाही
अथांग, उत्कट, उधाणले तरि
किनार ओढुन जसा समिंदर..
स्थितप्रज्ञ कधि सळसळणारे
जळाकाठचे वा औदुंबर..
प्रेमळ, नाजुक, पोक्त, समंजस
प्राजक्तासम हळवे लोभस..
काजळ रेखुन कधि भिडणारे
खट्याळ हट्टी अवखळ ओजस..
कितीहि काही आत उकळले
संतापाला घट्ट आवरे.
शालिन कधि तर भळभळणारे
मिटल्या ओठी दु:ख गोजिरे..
.......
असे देखणे, असे बोलके
मौनाइतके कुणीच नाही.... कुणीच नाही.