चिरंतन भेट
तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे ।
नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।।
तिचे मौनही पल्याड देशी दरवळते ।
अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।।
दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते ।
ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।।
कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे ।
क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।।
तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा ।
तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।।
चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची
अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।।
-चैतन्य