तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे ।
नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।।
तिचे मौनही पल्याड देशी दरवळते ।
अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।।
दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते ।
ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।।
कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे ।
क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।।
तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा ।
तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।।
चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची
अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।।
-चैतन्य
प्रतिक्रिया
19 Apr 2016 - 9:04 pm | विजय पुरोहित
सुंदर... अप्रतिम...
पण जरा लय गडबडल्ये...
20 Apr 2016 - 10:41 am | वेल्लाभट
सहीच...
सुरेख आहे
20 Apr 2016 - 5:41 pm | मनमेघ
प्रतिसादाबद्दल आभारी आहे विजयजी आणि वेल्लाभटजी.
विजयजी, लय कुठे गडबडली सांगता का?
20 Apr 2016 - 7:00 pm | विजय पुरोहित
क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे...
याऐवजी यदाकदाचित गाण्याचा त्या सूर गळे असा बदल केला तर?
21 Apr 2016 - 12:16 pm | मनमेघ
जसे लिहिले तसेच वाचले तर लय सांभाळली जाते.
कधितरी यात धि ह्रस्व ठेवलाय, तो दीर्घ वाचला तर लय बिघडेल.
धन्यवाद.
20 Apr 2016 - 6:13 pm | प्रसाद गोडबोले
खुपच सुंदर :)
20 Apr 2016 - 6:29 pm | एस
कविता आवडली.
20 Apr 2016 - 6:38 pm | चांदणे संदीप
पहिली ओळ वाचली अन "वाचनखूण साठवा"वर क्लिक केलं!
धन्यवाद,
Sandy
21 Apr 2016 - 12:17 pm | मनमेघ
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार _/\_
22 Apr 2016 - 9:29 am | रातराणी
सुंदर!