स्वप्न मनाचे
असंख्य स्वप्ने मनी उद्याची
पंख जरी हे इवले इवले,
ध्येय गाठण्या आतुरलेले
हृदयाचे पाऊल कोवळे..
तरूणपणाची चढता झालर
मुक्त मनाला बसे ना आवर,
स्वप्न कुठे अन मार्ग कुठे
उगाच अंगी नसती पावर..
तिशी उलटता भरते अंगण
गळ्यात पडते नसते बंधन,
सांभाळताना नाती गोती
करी स्वप्नांना दुरून वंदन..
वर्षा मागुन वर्षही सरते,
स्वप्नांची ती यादच उरते,
मुलाबाळांचे स्वप्न उद्याचे
पुन्हा नव्याने मनात भरते..