मातृभाषा
तू
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
हळूहळू लिहित जातोस,
तेव्हा
मी तुझे
राजस हात
लोभस डोळे
पहात राहते.
तुझ्यात इतका जीव का गुंतावा?
तू माझ्या हातांचे
देवनागरी चुंबन
घेऊन म्हणावे,
मातृभाषा कि काय
तिच्यातच जीव अडकतो बघ,
आई गंssss म्हटल्याशिवाय
प्राणसुद्धा जात नाही....
शाईचे बोट धरुन
तू परत रात्रीच्या
शांतप्रहरी
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
तुझेमाझे हितगुज
हळूहळू लिहित राहतोस...