प्रेमाचं गणित
तुझं शंकुसारखं धारदार नाक
शुभ्रवर्णी दंतमाला
अन हसल्यावर उमटणारा
गालावरचा पॅराबोला
इंटिग्रेशनच्या चिन्हासारखे तुझे
लिमिटबद्ध लांबसडक केस
डोळ्यांमधले कूटप्रश्न अन
देहबोलीचे अॅनालॉग संदेश
तू मॉडमध्ये टाकल्यासारखी
नेहमी पॉझिटिव्ह असायची
अपुर्णांक होतो मी
वजाबाकीच फक्त जमायची
तू आयुष्यात आलीस अन मला
शुन्याचा शोध लागला
जगण्याचा भाव माझा
दसपटींनी वाढला
माझ्या खिशातल्या पाकिटाचं
व्हॉल्यूम तू कधी पाहिलं नाहीस
तुझ्या नातेवाईकांच्या स्वभावाचं
घनफळ मी मोजलं नाही