पहिली फ्लाइट . . . . . . जरा हटके
माझी मुलगी पुनव कमर्शियल पायलटचं शिक्षण घ्यायला मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यांच्या कोर्सच्या दरम्यान कुठलीशी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी मिळते. तशी तिला मिळाली. बरोबर शिकणारे इतर विद्यार्थी एकमेकांबरोबर प्रवासी म्हणून बसायला उत्सुक असतातच. पण तिनं ठरवलं होतं की तिची पहिली पॅसेंजर बनण्याचा मान तिच्या आईला (म्हणजे मला) द्यायचा. मलाही तिच्या ह्या निर्णयाचं कौतुक वाटलं. (मुली लहानपणीच घरातनं बाहेर पडल्या की त्यांच्या बद्दल वाटणारी काळजी आणि कौतुक, दोन्ही जरा निष्कारण अतीच असतं.) तिच्या क्रिसमसच्या सुट्टीत मी तिला भेटायला जाणारच होते.