पाती..
आज घरी नारायण दशमी आहे. विदर्भातल्या एक-दोन जिल्ह्यात फारच कमी कुटुंबांमध्ये हा सण असतो. 90 टक्के विदर्भात हा प्रकार माहितीसुद्धा नसेल. आमच्या मूळ गावातल्या घरी आज सूर्यनारायणाची पूजा असते.कित्येक पिढयांपासून हे अखंड सुरू आहे. हळूहळू कुटुंब रुंदावलं, लेकरं गावाबाहेर पडलीत, संबंध कमी झालेत, तरी बहुतांश कुटुंबीय आपापल्या घरी नारायण दशमी करतात. हे व्रत तसं कडक आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला कूळ बदललं तरी हे व्रत करावं लागतं.वडिलांच्या आत्याबाईंना वयाच्या पंच्यात्त्तरीपर्यंत नारायण दशमी करताना मी बघितलेलं आहे.