बाप

Govind's picture
Govind in जनातलं, मनातलं
24 Aug 2020 - 10:38 pm

  सकाळची वेळ. सगळीकडे एकप्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरूवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्‍या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती. सकाळी शेजारच्या आनसानं दिलेला चहाचा कप तसाच त्याच्याजवळ पडलेला होता. त्यावर बसलेल्या माशा सगळीकडे भिरभिरत होत्या. त्यामुळे किळस येत होती पण ते सगळं समजण्याच्या पलीकडे ते गेलं होतं. सगळेजण आपापल्या नादात होते. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नव्हता. सातच्या सुमारास एक कपभर चहा दिला कि त्यानंतर दुपारी बाराच्या आसपास एक भाकरी आणि त्यावर दुपारी चारला चहा लागायचा. दरम्यान एखादी दुसरी बिडी आणि ती नसेल तर चिमूटभर तंबाखू एवढं भांडवल त्याच्या देहाचा कारखाना जिवंत ठेवायला त्याला पुरेसा होई. एकुलता एक मुलगा सुधाकर रोजंदारीवर कामाला जाई. जे मिळेल ते किडूकमिडूक घरी घेऊन येई. त्याच्याबरोबरीने त्याच्या फाटक्या संसाराला ठिगळ जोडायला त्याची बायको काशी कुणाच्यातरी शेतावर मजुरी करीत असे. संसाराच्या वेलीवर गेल्या बारा वर्षात एकही फूल फुललं नव्हतं. सगळे उपाय झाले, गावोगावचे बाबा, बुवा आणि सर्वप्ररकारचा झाडपालादेखील करून झाला पण यश मिळालं नाही. शेवटी हाताशी होती ती एकरभर जमीन या बाबाबुवांना आजमावण्यात खर्ची पडली आणि आपल्या नशीबात अपत्यप्रेम नाही हे कठोर वास्तव स्वीकारावं लागलं.

  दिवस भराभर निघून गेले. म्हातारा केरबा-सुधाकरचा बाप अधूनमधून त्याच्याजवळ बसलेल्या सुधाकरला चोरून विडी मागायचा. मग सुधाकर हळूच बाहेर जाऊन एखाद्या आण्याचं विडीचं बंडल घेऊन गुपचूप केरबाच्या हातात देई. जर चुकून एखाद्यावेळी काशीनं ते पाहिलं कि मग ती सुधाकरला रागवायची. आधीच दम्यानं हलकं झालेलं म्हातारं हातातून निसटून जायचं म्हणून कावायची.

  "मला काय होत नाय....!म्या मस खंबीर हाय..! मला नातू दावल्याबिगर ईटूबा बलीवणार न्हायी. माजी काळजी करती, खुळी..! "

  केरबाचं असं हसणं बघून काशीचा जीव सुपाएवढा होई. तिला वाटायचं आपला बाप असता तर असाच असता का? आठवत देखील नव्हतं. कळायला लागायच्या आधीच तिचा बाप तिला पोरकं करून गेला. आईनं मोलमजूरी करून तिला आणि तिच्या दोन्ही बहिणींना वाढवलं. लग्नं करून संसाराला लावलं आणि आपण एका झोपडीत आजदेखील एकटी राहते. टचकन डोळ्यात पाणी आलं. आई आज जेवली असेल का? कोण दिलं असेल तिला जेवायला? घरात काय हाय न्हाय कुणाला दक्कल!

  तिच्या डोळ्यातलं पाणी पाहताच केरबाचं काळीज गलबलून गेलं. आपल्या बोलण्याचं वाईट वाटलं कि काय असं वाटून एकदमच तिच्या डोयीवर हात ठेवत तो म्हणाला, "रडू नगस पोरी, ह्या बिडीशिवाय झ्वाप लागत न्हाय. तुला आवडत नसंल तर ही बग दिली टाकून. "

  सुधाकरला तिच्या अश्रूंचा अर्थ कळायला वेळ लागायचा नाही. मनकवडा असल्यागत तो म्हणाला, "मामीची याद आली काय गं? तिची काळजी करू नगं देव पांडूरंग तिची देखभाल कराया हाय. "

  "आवं, उद्या जाऊन बघून तर येऊ? "

  "माझ्या मनातलं बोललीस बग. चल खरं, सकाळीच जाऊन येऊ. "

  रात्री उशीरा अंगणात बाजेवर पडल्या पडल्या सुधाकर चांदण्या बघत होता. डोळ्यातील झोप कुठल्याकुठे गेली होती. त्या चांदण्यात त्याला आपली आई दिसत होती. त्याच्याकडं प्रेमानं बघत असलेली. झोपला नाहीस का बाळा? म्हणून प्रेमानं विचारणारी. अचानक डोक्यावर कुणीतरी थापटतंय असं वाटलं. सुधाकरनं वळून पाहिलं तर केरबा," व्हईल आज ना उद्या प्वार. लै ईचार करू नगस. माझा ईट्टलावर भरवसा हाय.त्येनं मला द्रुष्टांत दिलाय. झोप पोरा. "

  सकाळी लवकर उठून आवरलं आणि काशीनं केरबाला चहा देताना आपण आज आईला भेटायला जाणार असल्याचे सांगितलं. मान डोलवत म्हातारं हसलं आणि म्हणालं, "याची जल्दी करू नगंस, एखांदादिस र्हाऊदे  तिला म्हातारीपशी.! "

  म्हातार्याची देखभाल करायला शेजारच्या आनसाला सांगून काशी आणि सुधाकर बाहेर पडले. दिवसभर चालत येऊन म्हातारीच्या झोपडीपाशी आले तेव्हा म्हातारी जेमतेम उठून बसू शकत होती. अंगात कसलंही त्राण नव्हतं. झोपडीत पाणीदेखील संपलं होतं.ते आणून देणारं कुणी नव्हतं. कशीबशी तिला उठवून बसची केली आणि शेजारच्या आडावरुन एक कळशी भरून सुधाकर घेऊन आला. घरात काहीही नव्हतं. सोबत आणलेल्या भाकरीतलीच चतकोर भाकरी पाण्यात भिजवून म्हातारीला कशीबशी भरवली आणि भरल्या डोळ्यांनी काशी भिंतीशी टेकून बसली.

"कितीयेळा म्हणलं मामी तुमी आमच्याबरोबर र्हावा तर तुमीबी ऐकत न्हायसा. कोण हाय तुमाला बघायला हितं? चटाककून मरून जाशीला अशानं."

"नगं वं जावायबापू, तुमी एवडं म्हणलं त्येच्यातच समदं भरून पावले म्या! माज्या धन्यानं बांधल्याली झोपडी हाय ही.हितंच डोळं झाकूदी म्हून म्या ईटूबाला म्हणलेव..! " क्षीण आवाजात म्हातारी बोलली.

  आईच्या अशा उद्गारांनी काशीला हुंदका फुटला आणि तोंडात पदराचा बोळा कोंबून ती हमसाहमशी रडू लागली.

तिचं रडणं पाहणं असह्य होऊन सुधाकर बाहेर पडला. शेजारून जाणार्‍या एका माणसाला त्यानं विचारलं, "हितं डागदर हायती का कोण? "

  "ह्या हितनं दीड एक फर्लांग जावा, तिथं हायती...! "वाटसरूने सांगितलं.

  त्यानं सांगितलेल्या वाटेनं सुधाकर निघाला आणि त्या क्लिनीकसमोर आला. एक पन्नाशी पार झालेला डॉक्टर टेबलाशी बसून होता. सुधाकर त्याला घेऊन झोपडीत परत आला. काशीच्या आईला तपासून डॉक्टरनी सांगितलं, "अशक्तपणा खूप वाढलाय. गेले काही दिवस या पोटभर जेवलेल्या पण दिसत नाहीत. सलाईन लावावं लागेल. त्यासाठी खर्च येईल. "

  "पण डागदरसायेब, आमी गरीब माणसं.सलाईनचा खर्च झेपत न्हाय आम्हासनी.."

  "मग सरकारी दवाखान्यात न्या तिथे खर्च येणार नाही. मी चिठ्ठी देतो. " असं म्हणून डॉक्टरनी चिठ्ठी दिली आणि ते निघून गेले.

  सकाळी म्हातारीला घेऊन काशी आणि सुधाकर सरकारी दवाखान्यात आले. तिथं म्हातारीला भरती करून सलाईन चढवलं आणि त्यांचा मुक्काम एकदिवसाने वाढला. दुसर्या दिवशी संध्याकाळी सुधाकर सासूला आणि काशीला घेउन घरी आला तेव्हा दारात जमलेली गर्दी पाहून बावरला. जवळ आला तेव्हा पायातलं बळ संपल्याची जाणीव झाली. आणि अर्धवट शुद्धीत असलेला म्हातारा पाहून तो धावत जाऊन त्याला बिलगला.

  "दादा....! काय झालं रं तुला? आसा कसा मला सोडून चाललास....? "

  त्याचा शोक बघवेना. जो तो भावनानी व्याकूळ झाला होता. कुणीतरी म्हणालं, "आरं, म्हातारं कायतरी म्हणायलंय..! " हे शब्द ऐकताच सुधाकरनं केरबाच्या तोंडाकडे पाहिलं.

  "प्वारा, रडू नगस लेकराऽऽ तुझी आय मला बलीवत्याय...! ईटूबाचा खेळ हाय ह्यो  कुणालाच चुकत न्हाय. पण तुज्या पोटाला प्वार का दिलं न्हाई म्हून म्या त्याला ईचारणार हाय....! " म्हातार्यानं शेवटचा आचका दिला आणि मान टाकली. सुधाकरनं बापाला आर्ततेने मारलेली हाक देव्हार्यात कंबरेवर हात ठेवून उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचं देखील काळीज चिरत गेली.

  दिवस कुणासाठी थांबत नसतात. पाहता पाहता वर्ष लोटलं. सुधाकरच्या घरात आता लगबग सुरू झाली. लग्नानंतर तेरा वर्षांनी काशी आई होणार होती. केरबाचं म्हणणं विठ्ठलाला मान्य करावं लागलं. उशीरा का होईना सुधाकरला बाप होण्याचं सुख लाभलं.

  बाहेरच्या खोलीत येरझार्या मारून सुधाकर कंटाळला होता आणि इतक्यात दीर्घ प्रतिक्षेनंतर सुईणीनं बाहेर येउन सांगितलं, " सुटली बाबा तुझी बायकू...! जा पेडं घिऊन ये... तुझा बापच तुझ्या पोटी आलाय...! "

  दुपट्यात गुंडाळलेले ते इवलंसं गाठोडं पाहून सुधाकरच्या गालावर दोन अश्रू तरळले.

कथासमाजविचारआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

Bhakti's picture

24 Aug 2020 - 11:14 pm | Bhakti

अप्रतिम.

वामन देशमुख's picture

25 Aug 2020 - 12:03 am | वामन देशमुख

कथा खरंच मनाला भिडली, नकळत डोळे पाणावले.

अर्धवटराव's picture

25 Aug 2020 - 1:25 am | अर्धवटराव

सुंदर.

वीणा३'s picture

25 Aug 2020 - 2:26 am | वीणा३

साधीशी पण छान गोष्ट !

आनन्दा's picture

25 Aug 2020 - 9:13 am | आनन्दा

_/\_

तुषार काळभोर's picture

26 Aug 2020 - 12:56 pm | तुषार काळभोर

एकदम भारी कथा.
अजून लिहित जा गोविंदराव!

अवांतर - याच नावाची रामदासबुवांची कथा आठवली.

विनिता००२'s picture

26 Aug 2020 - 3:06 pm | विनिता००२

सुरेख!

सिरुसेरि's picture

26 Aug 2020 - 4:08 pm | सिरुसेरि

सुरेख! +१