वसूली
निवरादादा आता खूपच थकला आहे पण आजदेखील तो शिलाई मशिनवर बसून कपडे शिवत असतो. तीनही मुलींची लग्नं झाली आणि त्यांना मुलंबाळंदेखील झाली. आता कसली म्हणून चिंता उरली नाही. एक दीड एकर जमिनीचा तुकडा आहे तिथं त्याची बायको शेतीची कामं करते आणि निवृत्ती उर्फ निवरादादा आपला अपंग पाय घेऊन लोकांचे कपडे शिवत बसतो.
मला बघताच त्यानं हाक मारली आणि मी त्याच्याकडं गेलो. गावातील बर्याच लोकांच्या आतल्या गोष्टी याला ठाऊक. त्याच्यासोबत गप्पा मारत बसणं हा एक विलक्षण विरंगुळा असे. खूप सार्या गोष्टी त्याच्याकडून कानावर येत. त्याच्या जवानीतल्या कित्येक गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या आहेत.