शिवप्रतापाची झुंज ( भाग ३)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
15 Sep 2020 - 11:33 am

या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता
शिवप्रतापाची झुंज ( भाग १)

शिवप्रतापाची झुंज ( भाग २)

राजगडाच्या सदरेवर नेहमीप्रमाणेच कामकाज सुरु होते.बराच नवीन मुलुख स्वराज्याला जोडला गेला होता.त्याचे खलिते,महजर सदरेवर येत होते.कल्याणच्या बंदरात जहाजाची उभारणी सुरु होती.त्याच्या खर्चाची तजवीज लावायची होती.राजे स्वत उसंत न घेता या सार्‍या मसल्यात जातीने लक्ष घालत होते.ईतक्यात एक खलिता घेउन हेजीब विजापुरावरून आला आणि त्याने लखोटा थेट राजांच्या हातात दिला.तातडीने तो खलिता वाचल्यानंतर राजे चांगलेच गंभीर झाले, पण त्यांनी खलिता बाजूला ठेवला आणि रात्री खलबतासाठी जमण्याचा आदेश दिला.
रात्रीचे भोजन उरकून नेतोजी पालकर्,सोनोपंत डबीर्,रघुनाथ बल्लाळ, मोरोपंत पिंगळे,गोमाजी नाईक पानसंबळ, माणकोजी दहातोंडे, अनाजी दत्तो, सुभाजनी नाईक खलबतखान्यात जमले.सगळे आल्यावर राजांनी खलिता वाचून दाखवला.विजापुरवरुन अफझलखान स्वराज्याकडे निघाला आहे आणि त्याने मोठी तयारी केली आहे अशी चिंता वाढवणारी ती बातमी होती.
"हे आम्हाला अपेक्षित होते. मागे फत्तेखानाचे आक्रमण झाले तेव्हा सिंहगड देउन आम्ही शहाजी राजांना आदिलशाही कैदेतून सोडवले आणि काही काळ आहे या स्वराज्याची घडी बसवली.हाच अफझल त्यावेळी वाईत असल्यामुळे फार हालचाल करणे सोयीचे नव्हते.लगेच आपण जावळी ताब्यात घेतली.चंद्रराव आणि त्याच्या दोन मुलांना बाजी आणि कृष्णाजी यांना रायरीवर कैद करुन आणले, पण चंद्रराव स्वराज्यात रमले नाहीत. त्यांनी मुधोळच्या घोरपड्यांमार्फत विजापुर दरबाराशी संधान साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नाईलाजाने त्यांना आम्हाला मारावे लागले.रायरी ताब्यात आल्याने वैतरणा नदीपासून नागोठण्यापर्यंतचा कल्याण सुभा आणि त्याच्याखाली सावित्री नदीपर्यंतचा जंजिर्‍याच्या सिद्दीच्या ताब्यात असलेल्या सुभ्याकडे आम्ही लक्ष वळविले.कल्याणच्या सुभेदार मुल्ला अहमदला हरवून दादाजी आणि शेखोजी लोहकरे यांनी भिवंडी मारली तर आबाजी सोनदेव यांनी कल्याण काबीज केलेच पण तिथला खजिना ताब्यात घेतल्याने विजापुर दरबार आमच्यावर चिडला. वास्तविक हा मुलुख निजामशाहीचा मालकीचा पण शहाजहान आणि महमंद आदिलशहाच्या तहाने तो विजापुरकरांना मिळाला.औरंगजेबाचा डोळा या मुलुखावर होताच पण त्याला विजापुर ताब्यात घ्यायला शहाजहाने फर्मावले होते.कुतुबशहाचा वजीर मीर जुमल्याला हाताशी धरुन औरंगजेबाने बीदरचा आणि कल्याणीचा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याला विजापुरवर आक्रमण करायची संधी मिळाली. त्यासाठी जो करार कधी झालाच नव्हता त्याचे निमीत्त औरंगजेबाने काढले आहे. एक तर अलीशहा हा मुहंमदशहाचा खरा मुलगा नाही आणि मोघलांची परवानगी न घेता त्याला गादीवर बसवले असे निमीत्त मोघलांनी शोधले आहे. विजापुरवर कब्जा करायचा तर औरंगजेबाला आमची मदत हवी होती.तर औरंगजेबापासून वाचायचे तर विजापुर दरबाराला आम्ही मदत करावी असे वाटत होते.अर्थात यामध्ये आमच्या दृष्टीने एकच गोष्ट महत्वाची होती, स्वराज्याचा फायदा! दोघांच्या या भांडणात आम्ही अशेरीगडापासून, भिवंडी,माहुलीगड्,प्रबळगड, तळगड, घोसाळगड्,सुरगड हा प्रदेश ताब्यात घेतला शिवाय मावळाचा बराचसा भाग राजमाची,तुंग्,तिकोना,लोहगड ताब्यात घेतले.कल्याण बंदरात दुर्गाडी किल्ला बांधून आमचे आरमार उभारण्यास सुरवात झाली आहे. कुडाळ, सावंतवाडीचा मुलुख ताब्यात घेण जड गेले नाही. कारण रुस्तमेजमान आम्हाला विरोध करणार नाही याची कल्पना होतीच.पण आदिलशाहीचा हा मुलुखही ताब्यातून गेल्याने विजापुर दरबार आमच्यावर आणखी चिडला.जंजिर्‍याचा फत्तेखान विजापुरला अंकित झाला आहे, जंजिर्‍याच्या मुलुखात बिरवाडीचा किल्ला उभारुन आम्ही त्याला ही शह दिला आहे,हे हि विजापुर दरबाराला खटकले असणार. विजापुरकरांच्या मुलुखातील रायबाग,अडगल प्रांतावरही आपण छापा घातला,त्यात आता फार काही मिळाले नसले तरी हुबळी,धारवाडच्या संपन्न बाजारपेठा आणि तिथले रस्ते समजले,भविष्यात त्याचा आपल्याला उपयोग होईलच.कल्याण्,भिवंडीचा मुलुख ताब्यात रहावा आणि औरंगजेब विजापुरावर जाउ नये म्हणून आम्ही मोघलांच्या जुन्नर आणि अहमदनगरच्या तळावर हल्ला केला, त्यामुळे औरंगजेब चिडला.आम्हाला वाटले होते या मदतीची विजापुर दरबार जाण ठेवेल, पण त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला. औरंगजेबाने त्याच्या फौजांना आमच्यावर चालून जाण्याचा हुकूम केला खरा पण एनवेळी पावसाळा आणि नशीब दोन्ही मदतीला धावून आले.शहाजहान आजारी असल्यामुळे दारा शुकोह बादशहा होईल या भितीने हि दख्खनची मोहीम अर्धवट सोडून औरंगजेब तर दिल्लीला घाइघाईने गेला.अर्थात जाताना आमच्यापासून सावध रहाण्यासाठी त्याने विजापुर दरबाराला पत्र लिहीले. तेव्हाच आपल्याविरुध्द काहीतरी हालचाल होणार याचा अंदाज आम्हाला आला होता. शेवटी विजापुर दरबाराने अफझलला आमच्याविरुध्द पुन्हा पाठविले आहे" राजांनी सगळा खुलासा केला.
"पण राजे आता हा पेच सोडवायचा कसा ? खलित्यात फौजेचा मोठा आकडा आहे.उघड्या मैदानात अफझलला तोंड देणे सोपे जाणार नाही." मोरोपंत म्हणाले.
"खर आहे पंत तुमचे.अफझल जर सिंहगड्,पुरंदर भागात ईतकी फौज घेउन आला तर मुकाबला कठीण आहे.हा भाग मोकळ्या मैदानाचा आहे.पण आमच्या अंदाजानुसार तो आधी वाईला जाईल.वाई हि त्याची जहागीर आहे,त्या भागाची त्याला माहिती आहे.शिवाय त्याच्याबरोबर प्रतापराव मोरे आहेच.तो त्याला जावळी घेण्यासाठी भरीला घालेल. अर्थात खान वाईला येणे आपल्यासाठी फायद्याचे आहे.जावळीसारखा दुर्गम मुलुख आपल्याला गनीमी काव्याने लढण्यासाठी सोयीचा.तेव्हा आम्ही प्रतापगडावर बसून हि लढाई करण्याचा निश्चय केला आहे" राजांनी मनसुबा सांगितला.
"शिवाय स्वताला बुतशिकन्,कुफ्रशिकन म्हणवणारा खान सरळ स्वराज्यावर येईल असे आम्हास वाटत नाही.त्याच्या वाटेत तुळजापुर्,पंढरपुर हि दैवत येतात.कदाचित तो त्यांना उपद्रव देण्याचा प्रयत्न करेल.तेव्हा उद्याच आपले खलिते तिकडे तातडीने रवाना करा.मुळ मुर्ती लपवून ठेवण्यास सांगा.दुसरी एखादी उत्सवी मुर्ती त्याजागी तात्पुरती ठेवावी.तोपर्यंत भक्त त्यांचे दर्शन घेतील. खान तिकडे गेला नाही, उत्तम.पण जरी त्याने या देवस्थानांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या देवताच्या मुळ मुर्तींना धक्का पोहचता कामा नये.हा मुलुख लवकरात लवकर मुक्त करुन आम्हाला स्वराज्यात जोड्ण्याची तीव्र ईच्छा आहे. आमचे देव्,रयत हे सगळे सुरक्षित्,सुखी असतील तरच या स्वराज्याला काही अर्थ आहे."
"खर आहे, महाराज ! उद्याच खलिते रवाना करतो" मोरोपंत म्हणाले."हा अफझल मुलुखाचा क्रुर आहे.त्याची छावणी विजापुरच्या बाहेर पसरली असताना काही अपशकुन झाले म्हणे.म्हणून अफझल आपल्या गुरुला भेटायला गेला तर त्या अवलियाने सांगितले कि 'मला तुझे शिर विरहीत धड दिसते आहे.तु या मोहीमेवर जाउ नको'.या सल्ल्याला घाबरुन, चिडून अफझलने त्या अवलीयाला तर मारलेच पण आपल्या साठ बेगमांनाही मारलं म्हणतात.आपल्या बायकांनी आपल्या मागे व्यभिचार करू नये म्हणून आपल्या सर्वच बिब्यांना सुरुंग बावडीत ढकलून मारल्या व त्यांचे दफन केले".
"हं! अफझल मोठा नामांकित सरदार आहे.त्याला त्याच्याच शस्त्राने मारायला लागणार.कपटाने!" राजे निश्चयाने म्हणाले.
"पण राजे खानाशी थेट युध्द करण्यापेक्षा सला केला तर ? मोठी फौज खान घेउन आला आहे. स्वराज्याच्या रयतेची बरीच हानी होईल. ईतक्या फौजेशी मुकाबला करण्याईतकी कुमक आपल्याकडे नाही" पानसंबळ काका म्हणाले.
"खर आहे काका तुमचे.आपल्याकडे फौज कमी आहे.पण युध्द संख्येपेक्षा मनोबलावर जिंकले जाते. शिवाय आम्ही ही हे युध्द समोरासमोर करणार नाही आहोत.गनिमीकावा हाच मार्ग आहे.त्या दृष्टीने जावळी आमच्या नजरेसमोर आहे. आम्ही जावळीला गेलो तर खान आमच्या मागे निश्चीत जावळीला येण्याचा प्रयत्न करेल,यामध्ये आमच्या बाकीच्या रयतेला देखील तोषीश पडणार नाही. शिवाय खानाला देखील वाईचा मुलुख परिचित असल्यामुळे हेच सोयीचे आहे. काका राहता राहिला तर आमचा प्रश्न. एक संस्कृत श्लोक सांगतो,'जीतेन लभते लक्ष्मी मृत्युनापि सुरांगना | क्षण विध्वंसिनी काया का चिंता मरणे रणे ||' अर्थात युध्द केल्यास जय झाल्यास उत्तम, प्राण गेला तरी किर्ती आहेच.तशीही ही काया तात्पुरती आहे" राजांनी मनसुबा सांगितला.
"राजं ! कशापायी मरणाची भाषा बोलता ? अहो जीव द्यायला आम्ही सवंगडी तयार हायेच की.तुम्ही फकस्त इशारा करावा." माणकोजी काकुळतीने म्हणाले.
"माणकोजी आपण तर आमचे सरनौबत होतात.युध्दाचा आपल्या अनुभव आहेच.कधी आपली सरशी असते तर कधी गनीम डाव साधणार असतो.अफझलला आम्हालाच जातीने भेटले पाहीजे. हि मोहीम आम्ही आमच्याच अंगावर घेणार आहोत. जर अफझलचे निवारण करुन विजय मिळाला तर आपण मिळून आपण हे कार्य पुढे नेणारच आहोत.जरी आमच्या प्राणाचे मोल द्यावे लागले तरी आमच्या आउसाहेब हे श्री कार्य पुढे नेण्यास समर्थ आहेत.बाळ शंभुराजांना गादीवर बसवावे,आउसाहेबांचा शब्द प्रमाण मानावा आणि आपण सगळ्यांनी मिळून हे राज्य वाढवावे." राजे निश्चयी स्वरात म्हणाले.
हे निर्वाणीच बोलणे एकून सर्व बैठक निशब्द झाली.बाहेर फक्त बेभानपणे कोसळणार्‍या पावसाचा आवाज उमटत होता.
------------------------------------------------------------------------------
छावणी आवरुन निघण्यासाठी तयार झाली होती.मात्र अफझलने अजूनही कसे जायचे याची निश्चित दिशा कोणालाही सांगितली नव्हती.खानाच्या मेंदुत काय शिजते आहे याची अजून कोणाला कल्पना आली नव्हती. वातावरणात अद्याप वैशाखवणवा होता. अधूनमधून वळवाचे काळे ढग आकाशात गर्दी करायचे आणि एखादा तडाखा देउन जायचे.अद्याप पाउस सुरु झाला नव्हता. पण तो लवकरच सुरु होणार होता. तोरवेगावाच्या पुढे डोण नदी होती.या नदीचा उतार मोठा कठीण होता.पावसाळ्या अखेर हत्ती बुडेल ईतका चिखल त्यात असायचा. लवकर कुच करणे आवश्यक होते.आणि अचानक सकाळी अफझलखानाचा हुकुम सुटला."तुळजापुर जायेंगे".
सैन्य थोडे बावचळले.मुळ वाटेपासून तुळजापुर बरेच बाजूला होते. पण सेनापतीचा आदेश होता,त्याला आव्हान देण्याचा प्रश्न नव्हता.डोण नदीला डावे घालून फौजा तुळजापुरच्या दिशेने वाटचाल करु लागल्या.
----------------------------------------------------------------------------------
सोलापुर ओलांडून अफझलच्या फौजेने तुळजापुरच्या दिशेने कुच केले. बालाघाटचे डोंगर समोर दिसत होते. वरुन सुर्य भाजून काढत असला तरी हत्ती, उंट आणि सैन्य निकराने तो घाट चढू लागले. ईतका मोठा सेनासागर बघून बावचळलेले गावकरी आपापले साहित्य घेउन गाव सोडून पळून निघाले. मात्र देवीचे पुजारी अद्याप मंदिरात ठामपणे ठाण मांडून बसले होते.देवीची मुळ मुर्ती सुरक्षीतपणे तळघरात लपवली होती.पातशाही मुलुख, त्यामुळे या आक्रमणाची सवय झाली होती.त्यात शिवाजी राजांचा खलिता वेळीच सावध करुन गेला होता. एक साधी पाषाणापासून बनवलेली मुर्ती पाथरवटाकडून घाईघाईने बनवून मंदिरात बसवली होती. एकेकाळी कृष्ण सुरक्षित गोकूळात पोहचावा म्हणुन रोहिणी त्याजागी झोपली होती.फार वर्षांनी तसाच प्रसंग आला होता.देवीची मुळ मुर्ती वाचावी यासाठी काळ्या पथ्थराची ती साधी मुर्ती त्याजागी उभी राहिली होती.
"दुर हटो" खानचा तीक्ष्ण स्वर मंदिराच्या प्रागंणात घुमला.मंदिराच्या पहारेकर्‍यांना दुर लोटून खान थेट गाभार्‍यात घुसला.पुढे काय होणार याची कल्पना असूनही हात जोडून पुजारी पुढे आला आणि विनंती करु लागला,"हुजुर्,दया करा.आईच्या मुर्तीवर हात पडू देउ नका.आम्हा हिंदुची हे श्रद्धास्थान आहे.जशी आपली मक्का तसे आमचे हे तुळजापुर.देवस्थानाला त्रास देउ नका."
अर्थात त्या कळकळीच्या शब्दाचा खानावर तसुभरही परिणाम झाला नाही.एकटक मुर्तीकडे बघत तो पुढे झाला आणि दोन्ही हात पसरून म्हणाला,“ए भवानी, बताओ तुम्हारी करामत, या हम हमारी करामत बताये.यही मुरत उस सिवाके खानदान कि देवी है.हम इसे आज मिटाते है.पहाडी मुल्क मे छिपा बैठा सिवा अब जरुर बाहर आयेगा” अन खानाने हशमांना इशारत केली.ताताडीने त्यांनी दिलेल्या हातोड्याने ती मुर्ती खान तोडू लागला. झालेले तुकडे त्याने जात्यात घालून भरडण्याचे आदेश दिले. हताशपणे हे दृष्य बघणार्‍या देवीच्या पुजार्‍यांच्या आणि गुरवांच्या डोळ्यात पाणी वाहू लागले.मात्र एनवेळी मिळालेल्या माहिती मुळे देवीची मुळ मुर्ती वाचली हाच काय तो दिलासा होता.
-------------------------------------------------------------------
"पांडुरंग हरी! वासुदेव हरी" मोठ्याने गजर घुमला आणि रघोबा बडव्यांच्या वाड्याच्या ओसरीत एक माळकरी मावळा टेकला. लगेच त्याच्या समोर गुळपाणी ठेवले गेले. वारकर्‍यांचा राबता वाड्याला नवा नव्हता.त्यामुळे आलेल्या वाटसरूला दुपारच्या जेवणाचा आग्रह झाला. जेवण होउन पडवीत रघोबा वामकुक्षीसाठी पडले.मावळा जवळ आला आणि त्याने चंचीतून पान काढले आणि अडकित्त्याने बारीक सुपारी कातरून टाकली आणि पान पुढे केले. रघोबांनी विडा घेतला आणि पृच्छा केली, "काय विशेष येणे केलेत?"
"आता मानुस पंढरीला कशापायी येतय ?आवो विठोबाच्या दर्शनाला आणि काय" मावळा तोंड भरुन हसत म्हणाला.
"ते ठिक,पण थेट आमच्या वाड्यावर आलात म्हणून विचारल झाल" रघोबा म्हणाले
"अवो देवाला भेटायचे तर आधी पुजार्‍याशी जवळीक असावी"
"कोन गाव तुमच ?" रघोबांना काही ओळख लागत नव्हती.
"हाय तकड लइ लांब मावळात. बाकी तुम्हास्नी काय विशेष नव, जुनं म्हायती असलच ?" मावळा बारीक डोळे करुन म्हणाला.
"म्हणजे ? कोण आहात तुम्ही ?" रघोबांना आता संशय येउ लागला.
"एक काम करा दरवाजा लावून घ्या.समद बयजवार सांगतो"
घाईघाईने उठून रघोबांनी उठून वाड्याचा दरवाजा लावला आणि जवळ येउन विचारले,"तुम्ही कोण हि ओळख दिली तर बरे होईल" समोर असणारा ईसम फक्त देवदर्शनाला आलेला वारकरी नाही याबध्दल त्यांची खात्री पटली होती.
"सांगतो.मी बहिर्जी नाईक.शिवाजी राजांचा माणुस. तुम्हाला म्हायती असल कि विजापुरास्न अफझुलखान राजांवर चालून निघायला. आता राज्य करायचे तर लढाया होणारच.पण ह्यो बाबा सरळ चालीचा न्हायी.आपल्या देवदेवतांना तरास देत त्यो चाललाय.तुळजापुरच्या भवानीआईला उपद्रव देउन त्यो पंढरपुराकडं येणार अशी पक्की खबर हाय.तवा येक काम करा, ईठोबाची मुर्ती देवळातून हलवा आणि मंदिर मोकळ ठेवा.सरळ बंद करा.येउ दे त्यो खान.त्याच्या हाताला काय घावाय न्हाय पायजे"
हादरलेले रघोबा बर्हिजींच्या तोंडाकडे बघतच बसले.
----------------------------------------------------------------------
आषाढ सरींचा जोर हळूहळू कमी होउ लागला. श्रावणाची चाहुल लागली होती.राजगडाच्या बालेकिल्ल्याभोवती वेढा घालून बसलेले ढग अद्याप हटले नव्हते.संपुर्ण गड हिरव्या गवताच्या मखमलीने मढला होता. मध्येच ढग बाजुला व्हायचे आणि सुर्याचे किरण ढगांची चादर भेदत मुलुख उजळायचे.निसर्गाला आनंदाचे भरते आले कि ईंद्रधनुची कमान उभारुन तो साजरा केला जायचा.गुजंन मावळाचे हे रुप एरवी मनमोहक आणि तासनतास भान हरपुन बघत रहावे असे होते.पण आज त्या सौदंर्याचा आस्वाद घ्यायच्या मनस्थितीत राजगडावरचे कोणी नव्हते.त्याला कारणही तसेच होते.वळवाचा काळा मेघ स्वराज्यावर चालून आला होता.हा ढग तहान भागवणारा नव्हता, पिकांना नवीन संजीवनी देणारा नव्हता. हा काळमेघ बरोबर फुफाटणारा वारा घेउन सारे काही मोडून टाकणारा होता.याला थांबवणार कोण ?
देवघरात सांजवात लावून आउसाहेबांनी हात जोडले.डोळे मिटून हात जोडून शांतपणे देव्हार्‍यासमोर बसलेल्या आउसांहेबांचा मनात मात्र खळबळ माजली होती.खबराच तश्या होत्या.बेंगळुराहून कर्यात मावळात आल्यानंतर पुन्हा एकदा नव्या हिंमतींनी त्यांनी हा डाव सुरु केला होता.पतीबरोबर एकदा अपयशी ठरलेला डाव पुन्हा कंबर कसून सुरु केला पण प्रत्येक वळणावर दैव परिक्षा बघत होत.हि कसोटीही साधीसुधी नव्हती.आता आलेले संकट तर ज्या मुलाच्या भरवश्यावर स्वराज्याचे स्वप्न बघीतले त्याच्या प्राणांशी गाठ आणणारे होते.
ईतक्यात मागे चाहूल लागली.राजे देव्हार्‍यात आले होते. राजांनी जमीनीवर मांडी घातली आणि देवघरातील देवांना मनोभावे नमस्कार केला. डोळे उघडल्यावर त्यांना समोर पदरांनी डोळे टिपणार्‍या आउसाहेब दिसल्या.
"आउसाहेब्,आपण ईतक्या भावूक झालात.आम्हाला कर्तव्यकठोर हो म्हणून सांगणार्‍या आपण, आम्हाला स्वराज्यकार्यात भावनेला स्थान द्यायचे नाही हे सांगणार्‍या आपण, आपले देव्,धर्म,रयत यांच्यासाठी प्राणांचे मोल द्यायला लागले तरी चुकता कामा नये हि शिकवण देणार्‍याही आपणच.मग आज आमच्यासाठी आपले डोळे भरुन येतात ?
"शिवबा.आपण रयतेचे राजे आहात.या धर्म आणि ईश्वरी कार्यासाठी आशास्थान आहात.पण त्याच बरोबर आपण आमचे पुत्र आहात, हे विसरता येत नाही.आईचे काळीज आम्हाला स्वस्थ राहू देत नाही.शेवटी आईभवानीला साकड घालावं म्हणून देवघराशी आलो." व्याकुळ स्वरात आउसाहेब म्हणाल्या.
"आउसाहेब, आपण चिंता न करावी.जो खान आमच्या दैवतांकडे वाकड्या नजरेने बघतो, त्याचे पारिपत्य आम्ही करणारच आहोता.यासाठी आमच्या प्राणांची पर्वा आम्हाला नाही. एक शिवाजी मेला तर हि माती असे हजारो शिवाजी पैदा करेल.पण या भुमीला बाटवायला आलेल्या गनिमाला हि काळी आई ईथेच गाडेल." राजांनी धीर देण्यासाठी आउसाहेबांच्या खांद्यावर हात ठेवला.
"खर आहे शिवबा, शिवाजीची आई म्हणून मेंदू आल्या प्रसंगाला तोंड दिले पाहिजे हे मानतो,पण शिवबाच्या आईचे काळीज तुटते" पुन्हा एकदा जिजाउंनी पदर डोळ्याला लावला. "हा खान तर आमचा जन्मजात वैरीच आहे जणु. आधी यानेच राजांना जिंजीच्या वेढ्यात कैद केले. विजापुरात हत्तीवर नेउन कैद केले.आपल्या थोरल्या बंधूना संभाजी राजांना कनकगिरीच्या वेढ्यात कपटाने मारले. आमच्या सुनबाई जयंतीबाईंना विधवा पहाण्याची वेळ आमच्या नशिबी आणली ती याच नीच माणसामुळे.आज तो आमच्या आणखी एका मुलाच्या जीवावर उठला आहे. काळी सावली बनूनच अफझलखान आमच्या आयुष्यात आलेला आहे."
"खर आहे आउसाहेब.खानाचे हे आमच्या कुटूंबाशी असलेले वैर आठवले कि संताप होतो. या माणसाचे आमच्या सर्व आप्तस्वकीयांशी नेमके काय वाकडे आहे समजत नाही.आउसाहेब अहो शिशुपालाचे शंभर अपराध भरेपर्यंत साक्षात भगवंतालाही थांबावे लागले.खानाचीही वेळ भरली आहे, त्याने केलेल्या सर्व दुकृत्याची शिक्षा आता होणार हे निश्चित आहे.आई जगदंबा हे कार्य आमच्या हातून घडवेल याचा आम्हाला विश्वास आहे.फक्त आपण निशंक रहावे" शिवबाच्या या बोलण्यावर आउसाहेब समाधान झाले आणि त्यांनी मायेने राजांच्या डोक्यावरुन हात फिरवला.
-----------------------------------------------------------------------
"हुजुर,अंदर आने की ईजाजत है क्या?" हेजीब मुजरा घालत आत आला.
"आवो. मावळ्यातल्या सगळ्या देशमुखांना पाठवायची फर्मान तयार आहेत.आजच ती रवाना कर.जितके वतनदार आमच्या बाजुला येतील तितके चांगले. एकदा सिवाला या लोकांची कुमक मिळाली नाही कि निमुट्पणे आम्हाला शरण यावे लागेल.जावो.आजही फर्मानोको भेज दो" खानाने हुकुम दिला आणि हुजुर्‍या मुजरा घालत बाहेर गेला. मलवडीचा मुक्काम आवरुन खानाची छावणी रहिमतपुरला पडली होती.
खान आणि सरदारांची बैठक बसली होती.नकाशा अंथरुन खान पुढचा मसला ठरवत होता. सिवाला बाहेर खेचायचा तर त्याचा मुलुखही घेतला पाहीजे. त्याने पुन्हा एकदा नकाशा निरखला आणि आदेश दिला, "विजापुरसे निकलकर हमे दो मास हो गये.आम्ही तुळजापुर्,माणकेश्वर्,पंढरपुर, कुरकुंभ,भोसे,शंभु महादेव ईन सब काफीरोके मंदिर को नुकसान पहुंचा के भी सिवा पहाडी मुल्को से बाहर नही आया. अब हमेही सिवा का मुल्क हतीयाना होगा. जाधवराव आप सुपेपे जाईये आणि तिथली गढी ताब्यात घ्या,पांढरे सरदार आप सिरवलपे जाव और सुभानमंगलपे कब्जा करके उधरसे सब रास्ते रोक दो.खराडेजी आप सासवड के लिये रवाना होंगे और पुरंदर किलेसे सिवा को मिलनेवाली मदत रोकेंगे.सिद्दी हिलाल तुम पुनेपे हमला बोल दो.अब रहा ये कोकन" खानाने नकाशावर बोट ठेउन हबशी सैफखानाला हुकुम सोडला, "तुम पुरा कोकण काबु मे लाओगे. सब लोग तयारी करके कल ही रवाना होंगे"
खानाने पक्का व्युह रचला होता.पुढची चाल त्याच्या डोळ्यासमोर होती.आपली स्वताची जहागीर वाई.
-------------------------------------------------------------------------------------
एन पावसात पुन्हा एकदा कान्होजी जेधे पुन्हा एकदा लगबगीने राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणला आले. राजे आणि कारभारी काही मसलतीचा निपटारा करत होते.गेले काही दिवस आउसाहेब हि कारभारात लक्ष घालत होत्या.राजे प्रतापगडी जाणार असल्याने हि व्यवस्था करण्यात आली होती.कोणत्याही परिस्थितीत रयतेचे काम राजे नाहीत म्हणून अडता कामा नये हा मायलेकराचा कटाक्ष होता.
ईतक्यात कान्होजी सदरेवर आले,यावेळी सोबत त्यांचे सगळे लेक म्हणजे बाजी,चांदजी,मताजी,नाईकजी आणि शिवजी हे होते. मुजरा घालून अस्वस्थपणे चुळबुळ करत कान्होजी उभेच राहिले.राजांनी त्यांना बसण्यास सांगितले.पण कान्होजी काहीतरी कारणाने अस्वस्थ आहेत हे समजून विचारले, "कान्होजी काका, ईतक्या त्वरेने येणे केलेत ?"
"राज्,अवो प्रसंगच तसा आला आहे.त्यो अफझलखान वाईत येउन टेकलाय.त्याच्या संगट प्रतापराव मोरे हायच्,त्याचा ईरादा जावळी घ्यावा असा हाय.पर नुसता प्रतापराव त्याला पुरा पडणार न्हायी.त्याला मावळातल्या समद्या देशमुखांची मदत पाहिजे हाय.म्हणून त्यान समद्यांना खलिते धाडल्यात.येक खलिता मला बी आलाय.शिवाजी राजाला साथ द्यायची न्हायी न्हाई तर आदिलशहाकडून मिळालेले वतन परत घेउ, असा सांगावा आहे"
"हं बघू खलिता" राजांनी ती गुंडाळी उलगडून वाचायला सुरु केली.

'सर्व उत्पन्नाचा धनी इश्वर आहे.
हे अली पैगंबरा मदद कर!
सुलतान मुहमद पातशहानंतर, ईश्ववराच्या कृपेने अलिआदिलशहा पातशहा यांनी चंद्रसूर्यावर शाही शिक्का उमटवीला आहे. मशहुरल अनाम कान्होजी जेधे देशमुख यांस हा फर्मान सादर केले जातो जे. सुहुर सन तिसा खमसैन व अलफ.
शिवाजीने अविचाराने व अज्ञानाने निजामशाही कोकणांतील मुसलमानांना त्रास देऊन, लुट करुन पातशाही मुलुखांतील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत.यास्तव त्याच्या पारिपत्यासाठी अफझलखान महमंदशाही यास तिकडील सुभेदारी देउन नामजद केले आहे.तरी तुम्ही खानमजकुरांचे रजामंदीत व हुकुमात राहून शिवा़जीचा निर्मुळ फडश्या करावा.शिवाजीच्या पदरच्या लोकास आश्रय न देता त्यास ठार मारावे व आदिलशाही दौलतीचे कल्याण चिंतावे.अफझलखान यांची शिफारस होईल त्याप्रमाणे तुमची सर्फराजी केली जाईल. त्यांचे हुकुमाप्रमाणे वागावे. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही हे जाणून या सरकारी हुकुमाप्रमाणे वागावे. तेरीख हिजरी १०६९ सवाल ५ अतिश्रेष्ठ, कल्याणकारक व अतिपवित्र सुर्यवत प्रसिध्दी हुजुरची परवानगी झाली असे.'
फर्मान तर मोठे दमदाटीचे आहे. तरीच तुमच्या शेजारच्या गावचे केदारजी व खंडोजी खोपडे उत्रवळीकर असोत वा मसुरचे सुलतानजी जगदाळे असोत, खानाला जाउन मिळाले. तुमचा काय विचार आहे ? तुम्हीही खानाला जाउन मिळालेले बरे.नाहीतर तो खान सैल सोडायचा नाही.वतन जाईल हे नक्की.आमचं तर काही खर नाही.चढे घोडीयानिशी कैद करतो म्हणूनच खान स्वराज्यावर चालून आला आहे.आमची साथ देण म्हणजे सक्षात मृत्युशी शर्यत.बघा कान्होजी काका,विचार करा"
राजांनी थोड्या मिष्कील स्वरात विचारले.
कान्होजी खाली मान घालून निमुट्पणे उभे होते.त्यांनी क्षणभराने डोळे वर केल, ते पाण्याने भरले होते."महाराजं ! हिच परिक्षा केलीसा व्हय या कान्होजीची ? अवो,मागची सत्तावीस साल ह्यो देह झिजला तो भोसल्यांसाठीच.शहाजी राजांनी मला हिकड पाठवलं त्ये तुम्हास्नी साथ द्यायला.स्वराज्याच्या कार्यात हातभार लावायला. आवो ह्यो जेध्याचा, एका मराठ्याचा शबुद हाय.एकदा दिल्येला शबुदाला प्राण गेल तरी पाळणारा हा जेधे आहे.आता जरा कठीण समय आला तर धन्याची साथ सोडन जमणार न्हायी. राहीता रहिला वतनाचा प्रश्न. राज तुम्ही देवा,धर्माचं,रयतेच स्वराज्य स्थापन करायचा खेळ मांडलाय.त्याच्यापुढ त्या दिडदमडीच्या वतनाची काय किंमत ? ह्ये घ्या, ह्ये सोडल वतनावर पानी"
कान्होजींनी आवेशाने शेजारी ठेवलेल्या पाण्याचा गढु उचलला आणि हातावरुन पाणी सोडले.आउसाहेब आणि राजे थक्क होउन पहात राहिले.
"राजे, ह्यो कान्होजी जीवाला घाबरत न्हायी.आवो जन्मलो त्येच मरणाच्या सावलीत.वाढलो त्ये धनगरासंगट्,रोजच कोल्ह्,लांड्ग्,बिबट्याशी लढाइ. लई जवळून मराण बघीतलय.त्या खानाच मला भय न्हायी"
न रहावून महाराज उठले आणि कान्होजींना घट्ट मिठी मारुन म्हणाले,"माफ करा काका ! प्रसंग बाका आला आहे.घर फिरले कि वासे फिरतात.संकट बघून जेव्हा स्वकीयांची साथ मिळेल कि नाही याची खात्री उरलेली नाही. आज तुम्ही जे केलत त्याने आम्हाला शंभर हत्तींचे बळ चढले आहे.तुम्ही सोबत असाल तर आता एक खान काय्,असे छप्पन खान लोळवू. तुम्ही आपल्या जीवाची पर्वा करणार नाही याची कल्पना आहे, पण आपला कुटुंबकबीला मोलाचा आहे.आपल्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालायचा आपल्याला अधिकार नाही. तुमचा कुटुंबकबीला आणि कल्याणचे आमचे सुभेदार दादाजी कृष्ण लोहकरे यांचे कुटूंब तळेगाव ढमढेरे येथे पाठवा.तुम्ही सामील होत नाही हे समजल्यावर कदाचित खान कारीवर फौजा पाठवेल."
"जी राजं,जशी आज्ञा "कान्होजी आणि त्यांची पाचही मुल मुजरा घालून निघाली.राजे आणि आउसाहेबांचा चेहरा समाधानाने उजळला होता.
( क्रमशः )

इतिहासलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

सतिश म्हेत्रे's picture

15 Sep 2020 - 10:17 pm | सतिश म्हेत्रे

मस्त सुरू आहे लेखमाला.

बोलघेवडा's picture

15 Sep 2020 - 10:48 pm | बोलघेवडा

जगदंब! जगदंब!!
अतिशय उत्तम लिखाण!
पु ले शु
पू भा ल टा.

वाट बघत होतो लेखाची...
मस्त

बेकार तरुण's picture

17 Sep 2020 - 11:57 am | बेकार तरुण

सुरेख लेखन.....

राघव's picture

17 Sep 2020 - 12:41 pm | राघव

वाचतोय.

युध्द संख्येपेक्षा मनोबलावर जिंकले जाते..... :)

नीलस्वप्निल's picture

17 Sep 2020 - 2:26 pm | नीलस्वप्निल

उत्तम लिखाण.... अफझल खान वध कितीहि वेळा वाचू शकतो