शिवप्रतापाची झुंज ( भाग ४)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
19 Sep 2020 - 7:28 pm

या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता
शिवप्रतापाची झुंज ( भाग १)

शिवप्रतापाची झुंज ( भाग २)

शिवप्रतापाची झुंज ( भाग ३)

दक्षिणेकडे आडवातिडवा पसरलेला महाबळेश्वरचा डोंगर्,त्याला चिकटून दक्ष असलेला वैराटगड, पुर्वेला चंदन-वंदनची दुर्गजोडी, उत्तरेला एखादी पेटी डोक्यावर घ्यावी तसा दिसणारा आणि आई काळुबाईच्या वाटेवर भुत्या असावा तसा खडा असलेला पांडवगड, कातळाची टोपी घालून रायरेश्वराला बिलगलेला केंजळगड्,एका अंगाला कृष्णा नदी तर एका अंगाला वाळकी नदीला घेउन मध्येच ठाण मांडलेला कमळगड आणि त्याच्यामागे दाट झाडीचा पसारा घेउन खडा असलेला कोल्हेश्वराचा डोंगर या सर्व पर्वतांच्या कोंदणात अचूक वसलेली आहे विराटनगरी वाई. कृष्णेच्या पात्रात पाय सोडून बसलेली आणि महाबळेश्वराचा आशिर्वाद सदैव मस्तकावर असणारी हि विराटनगरी आषाढ-श्रावणातील महामुर पावसात रात्रीची चिडीचुप असे.गेल्या पंधरवड्यापासून मात्र एकाएकी गजबज वाढली होती.कारण स्पष्ट होत.अफझलखानाचे औरंगपुर्‍यात आपल्या वाड्यात छावणी केली होती. त्याच्या फौजेचा पसारा गावाच्या चारही बाजुला पसरला होता. खानाची छावणी अत्यंत बलाढ्य, समृद्ध, श्रीमंत, बेदकार आणि अत्यंत हिम्मतबाज होती. तोफा, दारुगोळा, खजिना, उंट, बैल, अमाप शस्त्रसामग्री कशाचीच कमी नव्हती. इतकेच काय पण शिवाजीचा पराभव होईल या आशेने विजापुरातील जवाहिरे, मोतिवाले आपल्याबरोबर हिरीमोत्यांच्या संदुका घेऊन आले होते. छावणीच्या मुक्काम पडेल तिथे नवीन खरेदी विक्री करण्यासाठी. ईतरवेळी फक्त सुक्तांचे उच्चार कानावर पडणार्‍या या नगरीत नाच्,गाण्याच्या लकेरी एकायला येउ लागल्या, खोज्यांचे दबके हसणे कानावर पडू लागले.'सुभान्नला,माशाल्लाचे' आरोळ्या उठत होत्या.अजून किती काळ हा त्रास सहन करावा लागणार, ते एक महाबळेश्वरच जाणत होता.
वाई शहरावर रात्र उतरली होती.छावणीतही निजानिज झाली होती. खानाच्या तंबुत मात्र दिपदान जळत होती.फाझलखान्,अंकुशखान्,फत्तेखान आणि खासा अफझलखान खलबत करत बसले होते
"हमने तुलजापुर्,पंढरपुर्,माणकेश्वर बहोतसे काफिरोके मंदिर को नुकसान पहुचाया, लेकीन सिवा बाहर नही आया.हमने उसका मुल्क हतिया लिया,फिर भी सिवाने हमारी ओर रुख नही किया.हमने सब देशमुख लोगोको को खत लिखे लेकीन दो चार जन छोड के हमे किसीकी मदत नही मिली. फाझल आम्ही जितका विचार करत होतो तितकी हि मोहीम आसान नही.प्रतापराव मोरे जावळीवर जाउया म्हणून आग्रह धरतो आहे, पण तिथे हमला करने सोपे नाही. काहीही करुन सिवाशी लवकरात लवकर सामना व्हायला पाहीजे. नाहीतर नुसते बसून वक्त जायज होगा" अफझल थोडा चिंतेत होता.
"चिंता नको हुजर! सिवा आपल्याला घाबरला आहे. मला वाटते त्याला मुलाखतीसाठी वाईला बोलावून घ्यावे" अंकुशखानाने सल्ला दिला.
"देखते है. फाझल इस सिवा को हम बचपन से जानते है.रणदुल्लाखान के पास मैने खिदमदगिरी की और अपनी खुद के हुनर पे मैने शोहरत हासील की.शहाजीला निजामशाहीतून आदिलशाहीत आणले तेव्हा बापाबरोबर हा दरबारात यायचा.तेव्हाही महमदशहा पातशहाना या सिवाने कुर्निसात केला नाही.शहाजीचा बेटा म्हणून जिल्हे सुभानींनी दुर्लक्ष्य केले.पुढे बेंगलोरमध्ये या सिवाला बघीतले तेव्हाही आम्हाला याचा जोष दिसला.उस वक्त सिवा सिर्फ बारा सालका बच्चा था,लेकीन हमे अंदेशा था जरुर ये कोई सुरमा है.तेच आज खरे झाले.मला वाटते आपण आपला वकील पाठवून सिवाला आमच्याबध्दल विश्वास देउया.अंकुशखान,उद्या खलिता तयार कर आणि सिवाकडे पाठव" खानाने आज्ञा दिली आणि सगळे झोपायला आपल्या महालाकडे वळाले.
-------------------------------------------
पंचमीचा सण तोंडावर आला होता.माहेरी जायला मिळणार म्हणून सासुरवाशीणींच्या तोंडावर हसु फुटत होते, छोट्यामुलींनी झाडांना झोपाळे बांधले होते आणि गावोगाव नाग बनवण्याची लगबग सुरु होती.राजगडावरचे मळभ मात्र हटायला तयार नव्हते.राजे प्रतापगडावर जायची तयारी करत होते.कोणी थेट एकमेकाशी काही बोलत नव्हते, पण प्रत्येकाच्या मनात काय खळबळ सुरु होती हे सर्वांनाच माहिती होते. सकाळी राजे मोठ्या उत्साहात सदरेवर आले,त्यांची मुद्रा विलक्षण प्रसन्न दिसत होती.सगळ्यांना अचंबा पडला होता.ईतक्या जीवावरच्या मोहीमेवर निघाले असताना राजे ईतके खुष कसे ? ईतक्यात आउसाहेबही सदरेवर आल्या. त्यांनी विचारले, "शिवबा,आज तुमची स्वारी प्रसन्न दिसते आहे.इकडे आम्हा सर्वांच्या जीवाला घोर लागला आहे आणि तुम्ही ईतके आनंदी कसे?"
"मांसाहेब, आता चिंता नको. काल रात्री आम्ही निजलो असता साक्षात आई भवानी आमच्या स्वप्नात आली.तीने आम्हाला दृष्टांत दिला.अफझलखानाने तुळजापुरला उपद्रव दिला, तिथेच त्याने आपला मृत्युलेख लिहीला. आईने आमच्या तलवारीत प्रवेश केला आणि 'या तलवारीने खानाचे पारिपत्य कर' असा आदेश दिला.खानाचा शेवट आता नक्की आहे. साक्षात ईश्वराचे पाठबळ आपल्याला आहे.सर्वांनीच निश्चिंत असावे.सावंतांनी दिलेली हि तलवार आता साधीसुधी राहीली नाही.साक्षात जगदंबा त्यात वास्तव्य करत आहे.आम्ही हिला आता 'भवानी' म्हणू" राजांच्या या उदगारांनी सगळी सदर उत्साहाने हसली.सर्वानी हात जोडले.
दुपारचे भोजन उरकून राजे थोरल्या राणीसाहेबांच्या महाली जाउन आले.जड अंतकरणाने निरोप घेउन महाराज सदरेवर आले.सर्व तयारी झाली होती. सोयराबाई,पुतळाबाई,सकवारबाई पंचारती घेउन पुढे झाल्या.आउसाहेबांचे पाय आपल्या लाडक्या लेकाचा निरोप घेताना विलक्षण जड झाले होते,पण कर्तव्यापुढे भावनेला थारा देणे शक्य नव्हते. धाराउच्या कडेवरचे अवघ्या दोन वर्षाचे संभाजी राजे उतरुन महाराजांच्या कंबरेला मिठी मारुन हट्ट धरुन बसले."आबासाहेब्,मी पण येणार".
त्या बोलांनी सर्वांचेच काळीज पिळवटले.नाईलाजाने ती बाळमिठी कशीबशी सोडवून महाराजांनी तोंड फिरवले.
राजांच्या मस्तकी कुकुमटिळा लावला गेला,पंचारती ओवाळल्या गेल्या आणि महाराज पाली दरवाज्यातून बाहेर पडून पायर्‍या उतरु लागले. पुढेच दृश्य कोणालाच दिसेना कारण डोळ्यातील आश्रुंनी सगळेच धुसर झाले होते.
-------------------------------------------
"खलिता लिहीला का?" खानाच्या जरबेच्या स्वरानी लेखनीक दचकला.त्याने खलिता पुढे केला,खानाने तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णींना उघडायला सांगितला आणि आदेश दिला, "पढो !"
कृष्णाजी वाचु लागले, 'निजामशाही संपल्यावर शांतता नांदावी म्हणून मुलुख आदिलशाहीने मोघलांना दिला, डोंगरी किल्ल्यांनी भरलेला हा मुलुख तुम्ही बळकावून बसलात.जंजिरा,राजापुरीचा आमच्या सरदाराच्या पाण्यातील किल्ल्याला तुम्ही वेढा घातलात्,त्याचा मुलुख तुम्ही ताब्यात घेतलात, तो तुमच्यावर नाराज आहे.आमचा अजून एक सरदार चंद्रारावाचे हे राज्य किती दुर्गम् तुम्ही त्याच्यावर आक्रमण करुन हे मोठे राज्य जबरदस्तीने बळकावले आहे.
आमच्या मुलुखाचा कल्याण्,भिवंडी भाग तर ताब्यात घेतला, पण तिथेल्या मशीदी नष्ट केल्या.तुम्ही मुसलमानांचे सर्वस्व नष्ट केले,त्यांचा अपमान केला.ते तुमच्यावर दातओठ खाउन आहेत.आपली शक्ती किती याची तुम्हाला जाणीव नाही.तुम्ही इस्लामच्या धर्मशास्त्र्यांना आणि फकीर, अवलीयांना निर्बंधात ठेवले.मुसलमानांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्यात अडथळे आणले.तुम्ही राजेशाहीची चिन्हे मुक्तपणे वापरता.सुवर्ण सिंहासनावर अन्यायाने बसता. स्वताच्या सत्तेने तुम्ही लोकांना दंड करता,शिक्षा देता अगर कृपा दाखविता.आणि ज्यांची ताबेदारी करायची त्यांची आज्ञापालन करण्यास दुराग्रहाने नकार देता.
तुम्ही मनाला येईल तसे स्वच्छंदपणे फिरता. तुम्हाला कोणाचा धाक नाही.या कारणाने थोर अश्या आदिलशहाने मला पाठविले आहे. माझ्याबरोबर असलेले सैन्य,मी तुमच्याशी लढावे म्हणून सारखा आग्रह धरीत आहे. मुसेखान आणि माझे ईतर अधिकारी यांचीही लढण्याची ईच्छा आहे. जावळी परत घेउ पहाणारे सरदार प्रतापराव मोरे यांचीही हिच ईच्छा आहे.मी तुमच्यावर चालून जावे असे त्या सर्वांचे मला पुन्हा पुन्हा सांगणे आहे.म्हणून हे सरदारा, माझ्या आज्ञेचे पालन कर, तुझा सगळा मुलुख आणि किल्ले देउन टाक.सिंहगड आणि लोहगड हे बळकट किल्ले,पुरंदरचा किल्ला,चाकणचे गाव, नीरा आणि भीमा या नद्यांच्या मधील प्रदेश हा सर्व भाग तुम्ही अमाप शक्ती असलेल्या दिल्लीच्या सम्राटांना परत करा.आणि आदिलशाहा यांची मागणी आहे,चंद्रराव याकडून जबरदस्तीने बळकावलेले जावळीचे राज्य तुम्ही देउन टाकावे"
कृष्णाजींनी खलिता वाचून खानाकडे पाहिले.खान कपटाने एका गालात हसला आणि त्याने आज्ञा दिली, "जाव्,जावलीमे जा के सिवा का जवाब लाव".
-----------------------------------------------------
राजे,मोरोपंत,माणकोजी,पानसंबळ फिरत फिरत टेहळणी बुरुजावर उभे होते.राजांनी मोरोपंतावर खुष होउन म्हणाले,"पंत गड मोठा नेटका बांधलात.अगदी पारघाटाच्या ओठात आणि महाबळेश्वराच्या जटात. खानासारख्या प्रबळ शत्रुला तोंड द्यायला हि जागा एकदम नामी. उत्तरेच्या रायगडापासून ते दक्षीणेच्या वासोट्यापर्यंतचा मुलुख ईथून ध्यानी येतो.मावळतीकडून कोकणावर नजर फेकता येते आणि उगवतीला हा महाबळेश्वराचा पहाड आहेच. जंगलाचे कवच भेदणे तर केवळ अशक्य.अगदी मोक्याचा आहे हा प्रतापगड".
"राजे,आपल्या आज्ञेवरुनच चोख बांधकाम झाले आहे" नम्रपणे मोरोपंत म्हणाले. "गडाला मजबुत बालेकिल्ला,गडाच्या माथापासून खालचा बाजुला माची,वळणदार तटबंदी,गोमुखी दरवाजा, मुख्य दरवाज्याबरोबरच एकापेक्षा अधिक उपदरवाजे, पाण्याची भरपुर टाकी आणि तलाव अगदी आपण घालून दिलेल्या शिरस्त्यानुसार बांधला आहे गड.
"रायरीची काय खबरबात ? तिकडे चोख बंदोबस्त आहे का ?"
"होय राजे,त्रिंबक भास्कर आणि शामराजपंत पद्मनाभींना तिकडे नामजद केले आहे, तिकडची चिंता नसावी"
"हं! आम्हाला खरी चिंता आहे ती मावळातल्या देशमुखांची.कान्होजी काका बारा मावळातील देशमुखांना आणायला गेलेत्,त्यांचीच वाट पहातो आहोत" सगळेच जण वळाले आणि बालेकिल्ल्याकडे चालु लागले.
---------------------------------------------------------
प्रतापगडाच्या सदरेवर कोकणातून खबरा आल्या होत्या,त्याच्यावर खल सुरु होता.दाभोळ बंदरात बरीच आदिलशाही गलबत माल लादून उभी होती.तसेच विजयदुर्गाजवळच्या वाघोटन खाडीत अफझलखानाची गलबत तैनात असल्याची खबर होती.हाच अफझल थेट स्वराज्यावर, महाराजांच्या प्राणावर चालून प्रतापगडाच्या जवळ असतानाही या मसलतीत महराज बारकाईने लक्ष घालत होते.दाभोळसाठी दोरोजीला फौजा तयार ठेवण्याचा आदेश देण्यात आला,तर अफझलच्या गलबतावर चालून जायला खारेपाटणच्या किल्ल्यासाठी खलिता पाठवायची व्यवस्था झाली.ईतक्यात हुजुर्‍या पळत पळत आला,मुजरा घालून म्हणाला, "महाराज्,गडाखाली देशमुखांच्या फौजा जमा झाल्याची वर्दी आली आहे. तुम्हाला तातडीने सांगावा पाठवायला कान्होजी जेध्यांचा स्वार आला आहे."
"कान्होजी काका आले! आता चिंता मिटली म्हणायची.चला आम्ही खाली दरवाज्यापाशी त्यांचे स्वागत करतो" राजे सदरेवरुन बाहेर पडून पायर्‍या उतरु लागले. ईतक्यात स्वत: कान्होजी काकाच आपल्या लेकांसह वर चढून आले.मुजरा घालून म्हणाले, "राजे ,शबुद दिल्यापरास गडावर फौजेसह आलोया.म्या येकला आलो न्हायी संगट बारा मावळातील देशमुख हायेत. दिपाबाई बांदल अक्कानी त्यांची फौज धाडली आहे, पौड खोर्‍याचे ढमाले सरदार,कानद खोर्‍याचे मरळ सरदार ,वेळवंड खोर्‍याचे देशमुख ढोर ह्या समद्यांच्या फौजा बरुबर हायत.आता खानाची चिंता करु नगासा" कान्होजीनी धीर दिला.
"खानाची चिंता नाही.तो आपल्या पावलांनी त्याची अखेरची वाट चालून आला आहे.महत्वाची आहेत ती आमची माणस.तुम्ही त्यांना मेळ करुन आणलात हि फार मोठी कामगिरी केलीत."
"राज!खान अजून गप्प बसला न्हायी. देशमुख सगळे जाणत्या वयाचे,अनुभवी हायत.त्ये त्याच्या दरडावण्याला घाबरत न्हायीत्,ह्ये जाणल्यावर त्यानं आमच्या मुलाबाळांना धमकावणारी पत्र धाडल्यात.माझ्या ल्योक सिवाजी त्याला ह्यो खलिता आलाय बघा" कन्होजींनी खलिता पुढे केला.
"बघू" राजांनी खलिता उघडला आणि वाचायला सुरवात केली,'शिवाजी फर्जंद कान्होजी जेधा देसाई तर्फ भोर यास-कृष्णाजी पंडित हवालदार व अमाजी आनंदराउ किल्ले रोहिडा येही तुमचे जावे मालुल केले.तुमचा बाप व बिरादर दहावीस वरिसे शिवाजी भोसलेचे चाकरी करतात.तुम्ही त्या बातेचा उजूर व शक अंदेशा न करिता येणे. आलेवारी सर्फराजी होईल.'
"हं! खान आता मुलाबाळांना अमिष दाखवून कौलनामा पाठवतो आहे तर !" राजे विचारात पडले.
"आवो कोन भीक घालनार त्याला. आम्ही जाणते विचारत न्हायी ह्ये समजल्यावर पोरखेळ चाललाय".
"असो ! कान्होजी काका, तुम्ही आणि सारे देशमुख आज गडावर चला आणि आमचा पाहुणचार घ्या.सारे मिळूनच आज अंगतपंगत करुया"
सर्व जण हसत,गप्पा मारत गड चढू लागले.
--------------------------------------------
"तर हा आहे तुमच्या खानसाहेबांचा मजकुर" खानाचा खलिता वाचून राजांच्या मुद्रेवर मिष्कील हसु उमटले होते.खलित्यातील मजकूर एकून सदर मात्र थोडी चपापली होती. खानाचे वकील कृष्णाजी उत्तराच्या अपेक्षेने एका बाजुला बसले होते. कृष्णाजी भास्कर महाराजांना आग्रह करून लागले,"महाराज ! आपण वाईला चलावे. खानसाहेब खूप दिलदार आहेत, ते तुम्हाला क्षमा करतील."
"कृष्णाजी, आजवर आम्ही खूप चुका केल्या. आता खानसाहेबांनी जावलीस येऊन मला क्षमा करून, माझ्या बोटाला धरून बादशहा कडे न्यावे. मी सर्व किल्ले परत करतो.खान आम्हाला वडिलांसारखे आहेत त्यांनीच येथे यावे. खानसाहेबांनी अभयाची क्रियाशापथ द्यावी याकरिता आमच्या वकीलांना तुम्ही खानाकडे घेऊन जावे."
शिवरायांनी असा नेटाचा आग्रह धरला तेव्हा कृष्णाजीस इतके बरोबर पटले कि त्याने हे सर्व खानास सांगण्याचे कबूल केले.
"कृष्णाजी पंत तुमची आमची जुनी घसट.वाईचे आपण कुलकर्णी.आम्ही या खलित्याला जवाब उद्या देउ.आज आपण गडावर विश्रांती घ्यावी.या आपण" राजांनी रजा देताचा कृष्णाजी हुजर्‍याबरोबर निघून गेले.
"अपेक्षेप्रमाणेच खानाचे पत्र तर आले.खानसाहेबांची आज्ञा झाली आहे कि सगळा जिंकलेला मुलुख अगदी जावळी आदिलशाहीला आणि मोघलांना देउन टाका आणि तह करावा. काय वाटते तुम्हा सर्वाना?आपला जवाब काय असायला हवा ?" राजांनी सवाल फेकताच माणकोजी दहातोंडे म्हणाले,"महाराज तुम्ही तह करणार न्हायी ह्ये ठरल्याल हाय्,पण खानाची भाषा तहाची दिसतीया.तवा आपला खलिताबी तसाच जायला हवा"
"बरोबर ! जर खान तहाची भाषा करत असेल तर आम्हाला वाईला जाउन त्याला भेटायची गरज नाही.फक्त तहाची कलम मंजुर झाली म्हणजे झाले,बाळाजी, खलिता लिहायला घ्या" राजे सांगु लागले तसे बाळाजींची लेखणी वेगाने चालु लागली
"तुम्ही युध्दामध्ये कर्नाटकातील राजे लोकांचा निपात केला, तुमच्यासारख्या श्रेष्ठ माणसाने माझ्यावर ईतकी कृपा करावी हीच मोठी गोष्ट होय.तुमच्या बाहुंची शक्ती केवळ अतुलनीय आहे, तुमचे शौर्य म्हणजे अग्नीसारखे आहे.तुम्ही म्हणजे पृथ्वीचे भुषण आहात.तुमच्यामध्ये कपट नाही.ईकडील रानावनांचे सौदंर्य पहायचे असल्यास आपण ईकडे यावे आणि जावळीचा परिसर पहावा.
माझ्या मते आपण आत्ताच ईकडे येणे अतिशय योग्य होईल.आपण आल्याने मी सर्व प्रकारे निर्भय होईन आणि माझ्या उन्नतीचा मार्ग मोकळा होईल.मोघलांचे सैन्य मी तुच्छ समजतो.आदिलशाही सैन्याबाबत माझी हिच भुमिका आहे.याला अपवाद म्हणजे भयंकर शक्तीने युक्त असलेले तुम्ही होय.
आपण यावे,आपला प्रवास सुखाचा व्हावा.मी आपले किल्ले देउन टाकेन आणि आपण मागितल्याप्रमाणे जावळीही देउन टाकीन.तुमच्याकडे दृष्टी टाकून पहाण्याची हिंमतही कोणालाच होत नाही.पण मी निशंकपणे तुमच्याकडे पाहीन आणि माझे शस्त्र तुमच्यासमोर ठेवीन.हे प्राचीन व अफाट अरण्य पहाताना आपले सैन्य पाताळाच्या छायेचे सुख अनुभवील".
बाळाजींनी मोर्तब उमटवली. मोरोपंतानी विचारले,"पण राजे वकील म्हणून कोणाला पाठवायचे?"
"आम्ही त्याचा देखील विचार केला आहे.पारवरुन गोपिनाथपंत बोकील गडावर आलेले आहेत.आम्ही त्यांनाच वकील म्हणून पाठवणार आहोत".
शिवरायांनी कृष्णाजी भास्करांस मानाची वस्त्रे दिली व पंताजी काकांकडे खानासाठी मानाची वस्त्रे देऊन काकांची रवानगी कृष्णजीसोबत केली. ती म्हणजे एकच कानमंत्र देऊन 'काका खानाची भेट घेऊन , बोलचाली करून खानाकडून क्रियाशपथ घेणे व तुमच्याजवळ मागितल्यास कोणतेही अनमान न करणे. हरप्रकारे खानास जावळीस घेऊन येणे, याखेरीज छावणीतील हर एक प्रकारे खबर घेऊन येणे.'
दुसर्‍या दिवशी खलिता घेउन काही घोडेस्वारांबरोबर दोन्ही वकील गड उतार झाले.
---------------------------------------------------------
पसरणीच्या घाटातून खाली ईटुकले वाई गाव दिसायचे,मात्र आज नजारा थोडा वेगळाच होता.कापडी शामियानाच्या गर्दीत वाईची वाडे कोठे हरवून गेले होते. सगळीकडे हत्ती झुलत फिरत होते.उंट सामानाचे गाडे ओढत होते. तोफाना ईकडून तिकडे नेउन तेलपाणी चालु होते. फौजेचा वर्दळीमुळे या तिर्थक्षेत्राची रया गेली होती. वाईचे हे गलिच्छ रुप पहात निमुटपणे गोपिनाथपंत अफझलखानाच्या वाड्यापाशी आले.
"तो ये है सिवा का जवाब. बोलता है हमसे डर गया.लेकीन डर कि क्या बात ?हम उसके वालीद के शहाजी राजे के दोस्त है.जैसे वो,वैसे हम.तो यहा वाई मे आने और हमसे मिलने मे क्या तकलीफ है" खानाने उर्मटपणे पंताना विचारले.
"हुजुर! ते तुमच्यासमोर कोणत्या तोंडाने येतील ? त्यांनी आदिलशाहीचे ईतके अपराध केलेत आणि ईतक्या चुकीच्या गोष्टी केल्यात की ते आपल्या समोर येण्यास घाबरत आहेत.आपल्याशी तह करायला राजे तयार आहेत.फक्त आपण त्यांचा पाहुणचार घ्यावा हि त्यांची छोटोशी विनंती आहे. आपण एकदा प्रतापगडावर त्यांचा समोर उभारलात की राजे तलवार आपल्यासमोर ठेवून माफी मागायला व आपला घेतलेला मुलुख परत करायला तयार आहेत. अगदी जावळीचा मुलुखसुध्दा आपल्याला सुपुर्द करायचा आहे,असा राजांच्या निरोप आहे". पंताजी थोड्या अदबीने म्हणाले.
"क्या कहते हो ? आमचा विश्वास बसत नाही.सिवा ईतक्या सहजासहजी शरण येईल असे आम्हाला वाटले नव्हते. ईसमे उसकी कोई चाल तो नही ? जावळी दाट जंगलाचा अवघड मुलुख आहे,तिथे जाणे आम्हाला सुरक्षित वाटत नाही. तु बामण आहेस्,तु खात्री देतोस सिवा आम्हाला मुलुख देईल याची ?" खानाच्या स्वरात गुर्मी होती.सिवाचा वकील गरीब गायीसारखा आपल्यासमोर उभा राहिल्याने अभिमानाने त्याची छाती फुगून आली होती.
"हो हुजुर! राजांनी आपल्याला स्पष्ट खलिता धाडलेला आहे. ते आपल्याला सर्व मुलुख द्यायला तयार आहेत.फक्त आपण प्रतापगडावर यावे अशी इच्छा आहे.राजे ईथे वाईला सुध्दा आले असते.पण आपण त्यांच्या पित्यासमान आहात.तेव्हा आपला पाहुणचार करावा आणि मगच मुलुख हवाली करुन तह करावा हे त्यांना जास्त योग्य वाटते"
"हं! ठिक कह रहे हो.लेकीन हम सला मशवरा करेंगे और तुम्हे जवाब देंगे.तब तक तुम हमारे छावणी मे रहोगे" खानाने पंताजींना जायची आज्ञा केली.
-----------------------------------------------------------------
भाद्रपदाचा प्रसन्न महिना सुरु झाला होता. श्रावणातील सरींनी सह्याद्रीतून वहाणारे झरे अजून सुरुच होते.नदीचे फुफाटत वहाणारे पाणी थोडे निवळले होते आणि निमुटपणे पात्रातून वहात होते.ढगांची गर्दी विरळ झाली होती.क्वचित संध्याकाळी ढग हटायचे आणि मावळतीचा दिनकर त्यांच्या बरोबर रंगपंचमी खेळायचा.राजे संध्याकाळी यशवंत बुरुजावर उभे होते.मावळतीच्या अंगाला या बुरुजावरुन खाली कोकणचे खोरे दिसायचे.त्या दिवशीही ढग थोडे कमी असल्यामुळे आकाशाने भगवा साज ल्यालेला होता.मात्र एक मोठा काळा ढग सुर्यासमोर आल्याने सगळीकडे काजळी पसरली होती,वातावरणात एक अनामिक उदासिनता दाटून आली होती.कसली तरी हुरहुर जाणवत होती.मागे चाहुल लागल्याने राजांनी वळून पाहीले तो एक खबरी मान खाली घालून उभा होता,राजांनी विचारले, "अरे बोल्,काय बातमी आणलीस ?"
"वाईट बातमी आहे महाराज ! आपल्या थोरल्या राणीसाहेब सईबाईजी यांना ईश्वरज्ञा झाली" तसाच मान खाली घालून तो निघून गेला.
'सई गेली ! आम्हाला खरी गरज होती तेव्हाच सई गेली.गेली अठरा वर्ष जीने सुखदुखात साथ दिली,आमचे खरे मनोगत जाणणारी,महाराज साहेबांना आदिलशाही कचाट्यातून सोडवण्यासाठी मार्ग सांगणारी, आमच्या शंभुबाळाला पोरक करुन सई तु गेलीस ?' राजे निमुट्पणे माघारी वळाले आणि महालाच्या दिशेने निघाले.अनेक आठवणी त्यांच्यासमोर फेर धरुन उभ्या होत्या.लालमहालात सइसह केलेला प्रवेश्,मावळातील ती घोडदौड्,राजगडावर रहायला आल्यावर निसर्गात रमलेली सई, किती म्हणून त्या आठवणी.पण आता ईथून पुढे राजगडावर तो मुखडा पुन्हा दिसणार नव्हता.
त्या रात्री राजांच्या महालासमोरचे भोजनाचे ताट तसेच राहीले.
----------------------------------------------------------------------------------

"पंडीतजी अत्तर चाहीये क्या ? बहोतसे खुशबुवाले अत्तर हमारे पास है" डोक्याला हिरवा फेटा, डोळ्यात सुरमा, लांब दाढी, अंगात पांढरा डगला आणि लुंगी घातलेला फकीर गोपिनाथ पंताच्या राहुटीच्या दारात उभा होता. पंताची राहुटी मुख्य छावणीच्या एका बाजुला होती,पंत वकील असल्यामुळे अशी व्यवस्था स्वाभाविकच होती. त्यामेळे सहसा ईकडे कोणी येत नसत्,पण आज हा फकीर राहुटीच्या दारात उभा होता. त्याला बघून पंताच्या कपाळावर अठी चढली, 'ईथे राजांच्या, स्वराज्याच्या काळजीने घालमेल होते आहे.काय मसलत होणार हे समजत नाही.आठवडा झाला कि खलित्याची ने आण्,सतत प्रतापगड-वाई दगदग आणि हा फकीर सुवासीक अत्तर घ्या म्हणून मागे लागला आहे'
तरीही कसाबसा संयम बाळगून पंत म्हणाले, "जा बाबा, मला नको तुझे अत्तर".
पण फकीर चिकटपणे म्हणला,"लेकीन हुजूर, खुशबु लेने मे क्या हर्ज है? जरा इस मोगरे कि खुशबु सुंघ तो लिजीये,आप को यकीनन पसंद आयेगी". फकीर थेट आत घुसलाच आणि त्याने कनातीचा पडदा ओढून घेतला. तो थेट असा आत आलेला पाहून पंताना विलक्षण राग आला, ते ताडकन उठून म्हणाले,"तुला मी आत बोलावले होते ? चालायला लाग बघू. तुझे अत्तर मला नको.आता गेला नाहीस तर बाहेरच्या हशमांना बोलावीन"
"अवो, असं काय कराय लागलासा पंत, आता आपली माणसं बी तुम्हास्नी वोळखनात व्हय" फकीरने नकली दाढी काढली. पंत दचकलेच,"कोण तु ?"
"अवो, म्या विश्वासराव नागोजी मुसेखोरेकर ,राजांचा माणुस,बर्हिजींच्या हुकुमावरन खानाच्या छवणीत घुसलोय.पाक तुळजापुरापास्न खानासंगट हाये,काय चाललय, काय न्हाई समद ध्यान हाय माझं. राजांना एक खबर पोहचवायची हाय म्हणून तुमच्या तंबुत आलो"
ते बोलणे एकून पंत हसत म्हणाले,"धन्य तुझे राजे आणि त्यांची हि माणसं ! अरे कसा धक्का द्याल त्याचा नेम नाही.आण बर तुझा मजकुर"
"ह्ये घ्या,हि चिठ्ठी हाय" विश्वासरावांनी चिठ्ठी पुढे केली. "काय लिहीले आहे ? म्हणजे चुकून चिठ्ठी सापडली तर पंचायत व्हायची "पंताना काळजी पडली.
"काय बी चिंता करु नगासा.कारभारीना लिहील्याल मजकुर हाय म्हणून सांगा.त्यात लिवलय यंदा पिक चांगल झालय पण टोळधाड येतीया,खबरदार रहा" विश्वासराव म्हणाला.
"म्हणजे? पंतानी पृच्छा केली.
"अवो पंत, खानाने दगा करायचं योजलयं.बाहेर खबर पसरवलीया की चढे घोड्यानिशी सिवाला कैद करणार, पण राजांचा घात करायचं त्याच्या मनात हाय.पातशहाचा बी त्याला तसाच हुकुम आहे" हळू आवाजात विश्वासराव म्हणाले.
"पण तुला कस समजल ?"
"म्या अत्तर देउन फाझलखानाच्या तंबुवरच्या पहारेकर्‍याशी दोस्ती केली,त्याच्याबरोबर गप्पा मारत असलो तरी कान आत काय खलबत चालतात तिकडच होते,एक दिवस रहिमतपुरला फाझल हि गोष्ट आपल्या कलावंतीणीला बोलत हुता, तवा म्या एकल."
"मला वाटलच होत.खान तहाच्या गोष्टी बोलत असला तरी त्याचा मनसुबा दगा द्यावा असाच आहे,त्याची किर्तीही तशीच आहे.एकंदरीत खान तोंडाने एक बोलत असला तरी त्याचे डोळे वेगळेच सांगत होते.आता खात्री पटली.तुला नवीन काही समजले तर मला येउन सांगत जा" पंत विचारमग्न झाले.
"व्हय पंत! म्या बारकाईने लक्ष ठेवून हायच.पुढच्या वेळी तुम्ही आलासा कि पुन्हा भेटतो.हां आता फकस्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती ?" विश्वासरावांनी डोळे बारीक करुन विचारले.
"मोगर्‍याचे अत्तर!" पंत हसत हसत उत्तरले. दोघांच्या हसण्याने तंबु भरुन गेला.
-----------------------------------------------------------------
"हमे जावली चलना चाहीये.दुसरा कोई रास्ता नाही" खानाचा करड स्वर त्याच्या महालात घुमला. मात्र खलबतासाठी समोर बसलेले फाझल्,अंकुश आणि मुसेखान मात्र नाखुष होते.
"पण अब्बुजान ! जावळी अगदी अडचणीची जागा आहे,शिवाय सिवा धोकेबाज आहे. वहां जाना मुझे खतरा लग रहा है" फाझलच्या कपाळावर आठ्या आल्या.
"अगर डर लगता है तो तुम यही रुको फाझल्,जनाने के साथ. हा अब्दुल्ला स्वताच्या हिमतीवर अफझलखान झाला,तो कोणाला घाबरत नाही. जरा सोचो.गेली सहा महिने आपण हि मोहीम चालवतो आहोत. आपण तुळजापुर्,पंढरपुर फोडले, सिवा बाहेर आला नाही, आपण सिवाचा मुल्क ताब्यात घेतला फायदा झाला नाही. अजून किती दिवस वाट बघायची ? मोहीमेचा खर्च ही वाढत चालला आहे.खाविंदाचे आम्हाला खलिते येत आहेत, सिवाला अजून का मारला नाही म्हणून. आता सिवा जावळीतच बसणार असेल तर आपल्याला त्याला जावळीत जाउन मारावे लागेल. तसेही आपल्याला जावळी ताब्यात घ्यायचीच आहे. जावळी मुलुख अडचणीचा, पण आपल्याकडे त्या मुलुखातील माहितगार प्रतापराव आहे.शिवाय आपण एकटे जाणार नाही आहोत्,आपली फौज सोबत असणार आहे.आता आमचा निश्चय झाला आले.सिवाला भेटायला आम्ही जावळीत जाणार.कल से तयारी शुरु करो" खानाने चर्चेचा शेवट केला.
फाझल,अकुंश आणि मुसेखान नाराजीने बाहेर पडले.
-------------------------------------------------------------------------
"भले शाब्बस ! वा ! पंत फार मोलाची कामगिरी तुम्ही बजावलीत. ईतके दिवस आपल्याला वाट बघावी लागली,पण शेवटी जे ठरवले होते ते साध्य झालेच.पंत खान एकदा जावळीत उतरुन आला की आपला कार्यभाग साधने अवघड नाही.मात्र आता तुमची जबाबदारी वाढली आहे.खानाच्या छावणीतील प्रत्येक हालचाल दक्ष राहून तुम्हाला टिपावी लागेल. खान धोका देणार हे तर सुर्यप्रकाशा ईतके स्वच्छ आहे,तेव्हा तो कोणती चाल रचतो आहे आणि काय करणार आहे यावर घारीची नजर ठेवावी लागेल.आपल्या हेरांचे जाळे खानाच्या छावणीत पसरलेले आहेच.तेव्हा आता यापुढे तुम्ही ईकडे प्रतापगडाकडे न येता खानाच्या छावणीत दक्ष रहा,नजरबाजांकडून खबरा पाठवा. "
राजांनी बोलणे संपवून पंताचे हात हातात घेतले आणि म्हणाले "पंत्,फार पृथ्वीमोलाची कामगिरी बजावलीत.योग्य वेळी आपल्याला याचे ईनाम देउच. फार दगदग आणि मानसिक ताण तुम्हाला सोसावा लागतो आहे याची कल्पना आहे"
"राजे या बोकीलाचे काय घेउन बसलात.येउन जाउन जीभ चालवायची आहे. खर जीवावरचे संकट तुम्ही आपल्या शिरी घेतले आहे.आम्हाला खरी चिंता तुमची वाटते" पंताच्या स्वरात काळजी दाटली.
"आता चिंता नको पंत.आई भवानी आणि शंभु महादेव आम्हास यश देतील याची खात्री आहे" राजे व पंत सदरेबाहेर पडले.
-------------------------------------------------------------------
कार्तिक महिन्याच्या उत्तरार्ध सुरु होता.वाई गावावरुन अजून धुके हटायला तयार नव्हते. पण खानाच्या छावणीत लगबग सुरु होती. हत्तींना चारा टाकून त्यांच्या सकाळचे खाणे उरकून सज्ज केले जात होते.उंटावर जेजाला चढवल्या जात होत्या. गाड्यावरच्या तोफा हशम रेटत रांगेत उभे करत होते. फुरफुरणारी घोडी, स्वार काबु करुन रपेट करत होते.आवश्यक त्या घोड्यांना नाल मारली जात होती.लोहारांना तर श्वास घ्यायची उसंत नव्हती, शस्त्रांची किरकोळ दुरुस्ती करायला हशमांचे त्यांच्याकडे वारंवार हेलपाटे सुरु होते. सगळे जण सज्ज झाले.खान खासा पालखीत बसला आणि त्याने आदेश दिला,"चलो! जल्दी करो.जावली के लिये फौज रवाना हो"
संथ गतीने हा काफिला पसरणीचा घाट चढून पाचगणीच्या दिशेने निघाला. भिलार,गुरेघर्,लिंगमळा अशी वाट धरुन हा काफिल्याला पुढे निघाला होता.
--------------------------------------------------------------------------------
प्रतापगडाच्या सदरेला आता उसंत नव्हती.सरनौबत नेतोजी पालकरांना घाटमाथ्यावर जाउन वाटा अडवण्याचा हुकुम रवाना झाला. आता मसलत बसली होती ती भेटीच्या योजनेसाठी.
"खान आपल्या मोठ्या फौजेबरोबर येतो आहे.आपल्याला खानाला एकटं पाडणे गरजेचे आहे. अन्यथा हा मुकाबला आपल्यालाही जड जाईल. त्यासाठी आमचे मत पार गावाच्या हद्दीत खानाची छावणी करावी. पार गावातून थेट गडावर वाट तर आहे,पण गडमाथ्यावर काय चालले आहे हे मात्र थेट दिसत नाही. शिवाय ती वाट उभ्या चढणीची, तिथून चढणारे पादशाही सैनिक वाटेतच दमतील. गडाच्या रेडे बुरुजावरुन आपण खानाच्या तळावर नजर ठेवू शकतो. " राजांनी प्रस्ताव मांडला, सगळ्यांनाच तो पटला.
"पण भेटीची जागा कोणती ठरवायची ?" माणकोजींनी विचारले
"काका,आम्हाला टेहळणी बुरुजाच्या खालची जनीच्या टेंब्याची जागा योग्य वाटते.एकतर ती जागा थेट बुरुजावरुन मार्‍यात आहे, शिवाय गडावरुन तिथली हालचाल टिपता येईल. भेटीची जागा अत्यंत अडचणीची आहे. गडाच्या अगदी पायथ्याशी नसेल तर निम्मा डोंगर चढून गेल्यावर एका पसरट सोंडेवर होईल. हेतू हाच कि खानाने काही दगाबाजी केल्यास त्याचे सैन्य सहजा-सहजी पोहचू नये. भेटीची जागा खानाच्या छावणीपासून अथवा डोंगराच्या पायथ्यापासूनही दिसत नाही.अनाजी रंगनाथ मालकरे यांना बोलावून घ्या. त्यांना शामियाना उभारण्याची जबाबदारी देउ. ते चोखपणे पार पाडतील."
थोड्यावेळात अनाजी मुजरा घालून राजांसमोर उभे राहिले, "अनाजी तुम्ही पुरंदरवरचे जुनेजाणते सरदार.आज तुम्हाला एक महत्वाची कामगिरी पार पाडायची आहे.ईथे प्रतापगडावर जनीच्या टेंब्यावर जाग साफ करुन शामियाना उभा करायचा आहे.लक्षात ठेवा.शामियानाचे तोंड गडाकडे पाहिजे.टेहळणी बुरुजावरुनसुध्दा आतील हालचाल टिपता येईल ईतका मोठा दरवाजा असु द्या. शामियान्याच्या मागच्या बाजुला झाडी तोडून आडवी टाका, मागे पातशाही फौजेतील कोणी जाता कामा नये. त्या बाजुला झाडीत खड्डे खणून ठेवा.हे काम शक्यतो रात्री होउ देत्,गडावर एखादा खानाचा हेर असला तरी त्याला सुगावा लागता कामा नये.शामियाना अलिशान झाला पाहिजे, याबाबत थोडा हात सैल सोडा आणि खान आतले वैभव पाहून दीपला पाहीजे असा रत्ने,अलंकाराचा वापर करा.आतील सदर थोडी उंच ठेवा आणि त्यावर डेरे,बिछाने,अस्मानगिरी, गिर्द्या,तक्के अशी व्यवस्था असु देत.कळस सोन्याचे हवेत,सगळीकडे मखमली पडदे आणि सोन्याच्या झालरी लावा.आपल्या स्वराज्याचा साज त्या खानाला दिसु देत"
"जी महाराज ! जशी आज्ञा" मुजरा घालून मालकरे गेले.
"पंत तुमच्यावर एक मह्त्वाची जबाबदारी म्हणजे महाबळेश्वरावरुन प्रतापगडाकडे येणार्‍या जास्तीच्या वाटा बंद करणे.खान एखादे वेळी थोडी फौज तिथे मुरवण्याच्या धोका आहे. फक्त एकच वाट ठेवा आणि ती सुध्दा झाडे,पाचोळा पसरुन आणि दगड टाकून सहजासहजी चालता येणार नाही अशी करा.वाटेने येणारे खानाचे लष्कर वाटचाल करतानाच दमले पाहिजे. शिवाय पार गावाजवळ खानाला छावणी उभारण्यासाठी झाडे तोडून मोकळी जागा करायला गवंडी पाठवा."
"जी राजे !" मोरोपंत आज्ञा घेउन बाहेर गेले.
राजे सोबत्यांशी चर्चा करुन योजना पक्की करु लागले.
-------------------------------------------------------------------------
महाबळेश्वरचा मुक्काम आटोपून खानाने पुढे कुच करण्याची आज्ञा दिली.त्या झाडीभरल्या प्रदेशातून वाटचाल करुन विजापुरी फौज अक्षरशः वैतागून गेली होती. सततचे चढ त्यात बरोबर असणार्‍या हत्तींची मंद गजगती, खडकाळ वाटा त्यामुळे तोफा ओढताना हशमांचे प्राण कंठाशी आलेले, वाळवंटात आणि सपाटीच्या प्रदेशात तोफा अंगावर घेउन युध्द करायची सवय असलेले उंट टकामका आजुबाजुच्या डोंगराकडे बघत कसेबसे पाय उचलत होते, दमून त्यांची लाळ गळायची आणि उंटानी बसायचा प्रयत्न केला कि सांडणीस्वार त्यांना चाबकाने फोडुन काढायचे, नाईलाजाने उंट पुन्हा उभे रहात.सैन्याचे हाल तर विचारू नका. हत्ती निमुटपणे खडा चढ चढत असले तरी दगडाला घासून त्यांची चामडी लोंबु लागली.माहुत वारंवार चुचकारत असल्यामुळे वाटेत झाडांना सोंडेने विळखा घालत कसेबसे स्वताचे शरीर रेटत होते.शेवटी हत्तींच्या शरीरावरील ओझी उचलून हमालांनी आपल्या खांद्यावर घेतली. घोडे संथ गतीने चढत असल्यामुळे पाठीवरचे मोत्तदार खाली उतरले. खडी चढण आली की सैनिक झाडांना पकडून वर चढायचे,नेमके ते झुडुप तुटले की रप्पकन तो फौजी आपटला जायचा. हत्तीच्या पायातून घसरलेल्या धोंड्यानी कित्येक जण जागीच मेले. कड्यावरुन पडून ही बरेच सैनिक डोळ्यादेखतच मेले. निशाणधार्‍यांचे ध्वज सारखे फाटायचे, मग दर्ज्याच्या मागे लागून शिवायचे तरी नाही तरी नवे निशाण बाहेर काढायचे. अंगावरचे कपडे काटेरी झाडात अडकून फाटले होते,पण ते शिवायची ईच्छा ही कोणाकडे नव्हती.कधी ती जावळी आणि प्रतापगड येतो असे फौजेला झाले होते. जी फौज विजापुरवरुन निघताना लढायला आतूर होती तीच फौज आता कधी मोहीम संपते याची वाट पाहू लागली.रात्रीचा मुक्काम तरी सुखाचा असावा ? छे, महाबळेश्वरच्या त्या उंच पठारावर एन कार्तिकातील हाडे गोठवणार्‍या थंडीने सैनिक कातावून गेले होते.
चढाचा रस्ता संपवून महाबळेश्वरला पोहचल्यानंतर सगळ्या फौजेने सुटकेचा निश्वास सोडला होता, पण त्यांना अजून कोठे माहीती होते कि खरी परिक्षा पुढेच होती ते.त्यात त्या कुबल प्रदेशाचा जाणकार प्रतापराव सारखा धीर देत होता, 'थोडेच राहिले आता.पुढचा रस्ता सोपा आहे,चिंता नको'. कधी खानसाहेब त्या शिवाजीला मारतील आणि कधी जावळीची आपल्याला सत्ता मिळते याचीच त्याला घाई झाली होती.
ईतक्यात आघाडीच हशम पळत खानाकडे आले आणि म्हणाले,"हुजुर, आपल्या निशाणाचा हत्ती चालेनासा झाला आहे,महवतने बहोत कोशीस की,लेकीन वो अपने जगह से एक कदम भी आगे नही आ रहा.फौजेत घबराट पसरली आहे हुजुर.सैनिकांचे म्हणने आहे, हा अपशकुन आहे"
'अपशकुन ! हा आणखी एक अपशकुन !' खान चिडलाच.लाल डोळ्यांनी त्याने हुकुम दिला,"त्या हत्तीचे डोळे फोडा आणि निशाण दुसर्‍या हत्तीवर चढवा".हुकुमाची ताबीली झाली हे सांगायला पाहिजे का ?
आजची वाटचाल म्हणजे जणु पाताळलोकाची वाटच होती. आज रडतोंडीचा घाट उतरायचा होता, हे नाव कोणी ठेवले हे नेमके ठाउक नसले तरी आज आदिलशाही फौज हे नाव सार्थ करणार होती. काट्याकुट्यातून्,दगडातून वाटचाल करुन फौज दमून गेली.त्या खड्या वाटेने तोफा उतरवताना गाड्यांना आवरताना हशमांच्या छतीचे भाते फुगले. हत्ती पुढे जायला तयार होईनात म्हणून माहुत सारखा अंकुश टोचत होता.खानावर मात्र याचा काही परिणाम होत नव्हता.पालखीत बसून धुंद डोळ्यांनी तो जावळीचा मुलुख निरखत होता. 'बस जावली का मुलुख मेरा ही है" गुर्मीत तो पुढ्चे मनसुबे रचत होता.

( क्रमशः )

इतिहासलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

गावातले देवळासमोरचे तोंड फुटके नंदी, शेजारच्या गावातील मंदिराचे सोंडतुटके हत्ती, अस्ताव्यस्त दगड, अरबवाडी, इब्राहिमपुर, रणदुल्लाबाद अशा नावाची गावं अफजल खानाच्या स्वारीची साक्ष देतात अजून सुद्धा.

तुमच्या लेखणीतून पूर्ण चलत चित्र उभ केलं डोळ्यासमोर

बेकार तरुण's picture

20 Sep 2020 - 5:33 pm | बेकार तरुण

अप्रतिम लेखन....
फार आतुरतेने वाट बघत असतो नेहमी पुढल्या भागाची ईतके खिळवुन ठेवतात प्रत्येक भाग.....

गामा पैलवान's picture

20 Sep 2020 - 6:19 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

कथानक माहित असलं तरी तुमची कथा खिळवणारी आहे. धन्यवाद! :-)

एक प्रश्न आहे. हा बाळाजी लेखनिक कोण? बाळाजी आवजी असावेत बहुतेक. पण प्रतापगडाच्या स्वारीच्या वेळेस ते महाराजांच्या पदरी होते का अशी शंका आहे.

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

21 Sep 2020 - 12:40 pm | दुर्गविहारी

प्रतिसादा बध्दल धन्यवाद ! :-)

एक प्रश्न आहे. हा बाळाजी लेखनिक कोण? बाळाजी आवजी असावेत बहुतेक. पण प्रतापगडाच्या स्वारीच्या वेळेस ते महाराजांच्या पदरी होते का अशी शंका आहे.

बाळाजी आवजी चित्रे हे महाराजांच्या पदरी १५ मार्च १६६१ च्या सुमारास ईंग्रजांच्या राजापुर वखारीवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी आले. या प्रसंगाच्या वेळी ते शिवाजी महाराजांचे लेखणीक नव्हते.कथेच्या सोयीसाठी बाळाजी हे ईथे काल्पनिक पात्र आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Sep 2020 - 10:06 am | अनिरुद्ध.वैद्य

वाई विराटनगरी होती हे ठाउक नव्हते!

सहि सहि प्रसंग उभा केलाय पुर्ण स्वारीचा !!

नीलस्वप्निल's picture

21 Sep 2020 - 1:26 pm | नीलस्वप्निल

वाचतोय... नेहमीप्रमाणेच उत्तम