"द्वारकेचा राणा"
मुखी नाम विठ्ठल, गळा तुळशीमाळा,
वाहतो प्रवाह ओलांडून काळा,
चाले रीघ आता, सुखाच्या शोधात ,
रूढीचे आवर्तन की भाव भोळा ,
उसळती अंतरी, कैक सलतात व्यथा ,
मनातून पाहती पंढरीच्या नाथा
असे रान तान्हे परी फुटे जीवा पान्हा,
समूहाची धुंदी नादावते माथा,
लाख शंका मनी, परी पाहता या जना
पेशीतून वाजे मृदुंग नी वीणा
मन माझे डोले, पडती तालात पाउले
रक्तातून वाहे द्वारकेचा राणा
- शैलेंद्र