"द्वारकेचा राणा"

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
13 Jul 2015 - 12:02 pm

मुखी नाम विठ्ठल, गळा तुळशीमाळा,
वाहतो प्रवाह ओलांडून काळा,
चाले रीघ आता, सुखाच्या शोधात ,
रूढीचे आवर्तन की भाव भोळा ,

उसळती अंतरी, कैक सलतात व्यथा ,
मनातून पाहती पंढरीच्या नाथा
असे रान तान्हे परी फुटे जीवा पान्हा,
समूहाची धुंदी नादावते माथा,

लाख शंका मनी, परी पाहता या जना
पेशीतून वाजे मृदुंग नी वीणा
मन माझे डोले, पडती तालात पाउले
रक्तातून वाहे द्वारकेचा राणा

- शैलेंद्र

कालगंगासंस्कृती

प्रतिक्रिया

तुडतुडी's picture

13 Jul 2015 - 12:37 pm | तुडतुडी

छान

शैलेन्द्र's picture

13 Jul 2015 - 3:32 pm | शैलेन्द्र

धन्यवाद

कंजूस's picture

13 Jul 2015 - 4:47 pm | कंजूस

अगदी वेळेवर आणि छान !
पंढरीचा नाथ ,विठु,इट्टल हेच अधिक ऐकतो, द्वारकेचा राणा कमीच.

शैलेन्द्र's picture

13 Jul 2015 - 5:46 pm | शैलेन्द्र

धन्यवाद राम कृष्ण व विट्ठल या कल्पनांचे एकत्व नेहमीच भावते

वाहतो प्रवाह ओलांडून काळा,

छानच आहे. वरील ओळी वाचून "रात्र काळी घागर काळी" याची आठवण आली. आणि मग कविता आनखीच आवडली.

समूहाची धुंदी नादावते माथा,

हे मात्र खरे! सामूहिक उपासनेचा हा फायदा. भक्ती अनेक पटींनी ताकदवान होते. अष्टसात्विक भाव अशा वेळीस चटकन अनावर होतात. चपखल शव्दरचना!

शैलेन्द्र's picture

13 Jul 2015 - 7:47 pm | शैलेन्द्र

सामुहीक उपासनेचे जसे फायदे आहेत तसच् ती काही प्रश्नही उभे करतेच,
असो मनापासून धन्यवाद

तुडतुडी's picture

14 Jul 2015 - 4:45 pm | तुडतुडी

राम कृष्ण व विट्ठल या कल्पनांचे एकत्व नेहमीच भावते>>>
पंढरीचा विट्ठल म्हणजे द्वारकेचाच राणाच . एकदा श्रीकृष्ण रुक्मिणी मध्ये काही वाद झाला . रुक्मिणी तिच्या माहेरी विदर्भात निघून गेलि. तिला समजवण्यासाठी निघालेल्या श्री क्रीष्णाना आपल्या भक्त पुंडलिकाची आठवण झाली . ते त्याच्या घरी घेले तेव्हा पुंडलिक आईवडिलांची सेवा करीत होता . (हाच पुंडलिक आधी आई बापाला शिव्या घालायचा .वय गेलेला मुलगा होता तो . नंतर तो अंतर्बाह्य बदलला . नक्की काय झालं होतं कुणाला माहित आहे का ? ). आईचं डोकं मांडीवर घेवून चेपत होता . आईला झोप लागलेली . उठता येईना म्हणून त्याने तिथे पडलेली वीट पांडुरंगाला बसायला दिली . देव त्याच्यावर उभा राहिला आणि अजून उभाच आहे .

त्यानंतर प्रत्येक एकादशीला लोक भजन कीर्तन करत देवाच्या दर्शनाला येवू लागले . वैष्णव संप्रदायात एकादशीचं फार महत्व आहे . दूरच्या लोकांना प्रत्येक एकादशीला यायला जमत नसल्यामुळे त्यांनी आषाढी एकादशीला दर्शन घ्यायचं ठरवलं आणि वारीची प्रथा सुरु झाली .

शैलेन्द्र's picture

17 Jul 2015 - 10:37 am | शैलेन्द्र

छान माहिती

द-बाहुबली's picture

14 Jul 2015 - 5:37 pm | द-बाहुबली

पांडुरंग म्हणजे नेमका कोणता रंग ? काळा नसेल तर विठ्ठलाला काळा का म्हणतात ?

- अवघा रंग एक झाला मनी रंगला श्रीरंग.

जडभरत's picture

15 Jul 2015 - 10:04 am | जडभरत

हा रंगाचा गोंधळ ह्याच देवाबाबत जास्त दिसून येतो. माझ्या मते विठ्ठल हा परब्रह्म म्हणून मानला तर पांडुरंग अर्थात शुद्ध शुक्ल वर्ण! आणि वारकर्‍यांना अति प्रिय असणारे क्रिष्णाचेच रूप मानले तर त्याचा प्रसिद्ध काळा वर्ण.
काळा रंग हा सर्वात सामर्त्यवान समजला जातो कारण त्याच्यावर दुसरा कुठलाहि रंग चढत नाही. परब्रह्म तसेच आहे. तसेच शुद्ध विश्वाचा रंग काळाच आहे. प्रकाश फार मर्यादीत आहे. अंधःकार मात्र अनंत आहे. म्हणून तर कालीमातेला "काजळाऐसी दिसे काळी, म्हणोनी नाम महाकाळी" असे म्हणतात.

द-बाहुबली's picture

15 Jul 2015 - 1:37 pm | द-बाहुबली

होय रंगाचा गोंधळ आहेच पुन्हा हाच देव ज्याला भक्त "जिवलगा" असे आरतिमधेच संबोधतात. (राईच्या वल्लभा पावे जिवलगा). आता जिवलगा म्हणजे मित्र म्हणून ती हाक आहे, की ज्यावर जिव (परिणामी संसार) ओवाळुन टाकला आहे, ज्याचा एकमेव ध्यास लागला आहे ते तत्व म्हणून तो उल्लेख आहे हे सुधा उमजत नाही.

स्पा's picture

15 Jul 2015 - 10:27 am | स्पा

ओहो

हा आयडी कविताही करतो तर :)

मस्तच रे

शैलेन्द्र's picture

16 Jul 2015 - 9:17 am | शैलेन्द्र

पडतो रे अधुनमधुन )

कविता१९७८'s picture

15 Jul 2015 - 2:31 pm | कविता१९७८

छान कविता , द्वारकेचा राणा ऐकलेलं नाही पण "जोंधळाच्या भाकरीला चव लय न्यारी... पंढरीचा राणा येई जनाईच्या घरी.." हे ऐकलंय.

शैलेन्द्र's picture

17 Jul 2015 - 10:39 am | शैलेन्द्र

ते गीत मीही ऐकलय , सुंदर

शैलेन्द्र's picture

16 Jul 2015 - 9:14 am | शैलेन्द्र

विट्ठल आणि श्रीकृष्ण ही परंपरेने एकाच देवाची दोन रुपे मानली जातात, माझ्यासारखा नास्तिक माणूस देवाला मनुष्याची निर्मीती मानतो. जसा समाज तसा त्याचा देव, कर्तव्यापारायन कृष्णभक्तीतुन् संपूर्ण समर्पित विट्ठल भक्तीकडे जाताना समाजावर परचक्र आलेले होते; या परचक्रातही स्वत्व जपण्यासाठी जोवर शक्ती मिळत नाही तोवर संपूर्ण समर्पण ठेवून देवभक्ती करण्याचा मार्ग समाजाने स्वीकारला. कृष्णनीती हे माझ्या आवडीचे तत्वद्न्यान पण विठ्ठल भक्ती मात्र घराण्यातून , रक्तातून चालत आलेली; आजही जेंव्हा वारी बघतो तेंव्हा जीव खुळावतो; बुद्धीला पटत नसल तरी; तेच मांडायचा प्रयत्न केलाय, आणि कृष्ण -विठ्ठलाचे एकत्व म्हणून द्वारकेचा राणा तोच पंढरीचा राणा

प्यारे१'s picture

16 Jul 2015 - 9:33 am | प्यारे१

कविता आणि मनोगत आवडलं. कवितेच्या आधी/नंतर हे टाकल्यास कवीची भूमिका जास्त स्पष्ट होईल.

पैसा's picture

16 Jul 2015 - 9:18 am | पैसा

शैलेन्द्रची कविता म्हणून आश्चर्य नाही वाटलं. तुला लिहिता येतंच! बुद्धि आणि मन यात द्वंद्व चालूच असतं. छान लिहिलं आहेस.

शैलेन्द्र's picture

16 Jul 2015 - 4:06 pm | शैलेन्द्र

धन्यवाद पैसाताई

अजया's picture

16 Jul 2015 - 5:24 pm | अजया

छान आहे कविता.आवडली.

मनीषा's picture

16 Jul 2015 - 9:23 pm | मनीषा

अतिशय सुंदर आणि लयबद्ध .

शैलेन्द्र's picture

18 Jul 2015 - 11:16 am | शैलेन्द्र

धन्यवाद अजया आणि मनीषा..