वार्ता सुखाची घेऊन....
वार्ता सुखाची घेऊन , आता यावे घरी देवा..|
ओढ भेटीची लागली, होई तगमग जिवा..||
काही कळेना जीवाला, मना धाव घेऊ कोठे..|
ओढ तुम्हा दर्शनाची, धीर काळजात वाटे..||
तुमच्या येण्याची चाहूल, देवा आम्हा सुखावते..|
अवघी चिंता दुःख सारी, जशी दूर घालवते..||
आहे संकट हे मोठं, नाही माणसाच्या हाती..|
नाही श्रीमंतीचं मोलं, होते गरीबाची माती..||
वार्ता सुखाची घेऊन , यावे वाजत गाजत..|
नको दुःखाची किनार, कुणा ओल्या पापण्यात..||
नाव तुझं मंगलमूर्ती, विघ्नहर्ता तुझी कीर्ती..|
तुझ्या येण्यानं ही सारी, देवा उजळावी धरती..||