फॉरेस्ट गम्प- एका मुलाची कथा

भीमराव's picture
भीमराव in जनातलं, मनातलं
25 Jul 2020 - 12:47 am

काल पर्यंत मला हा चित्रपट काय आहे खरच माहित नव्हतं. अगदी सहजच मिळाला आणि वेळ घालवायला दुसरं काही नाही म्हणून पाहिला. आणि काही तरी वेगळं पाहिलंय याची जाणीव झाली.

एका अनोळखी गावात बस स्टॉपवर बसलेला एक तरुण. शेजारीच ठेवलेली आटोपशीर बॅग. लोकं येतायत आणि जात आहेत. त्यालाही कुठे तरी जायचं आहे, पत्ता विचारावा तर कसा आणि कोणाला? शेजारीच बसची वाट पाहत बसलेल्या एका बाई बरोबर तो बोलायला सुरुवात करतो. तसं बघायला गेलं तर त्याला फक्त नऊ नंबर च्या बस शी देणं घेणं असतं, पण तो अगदी सुरूवातीपासूनची गोष्ट चालू करतो. आणि एक एक करत आपल्या समोर उलगडत जाते त्याच्या आयुष्याची कथा. ऐकणारा श्रोता बदलत जाते पण आपण मात्र त्या गोष्टी मधे गुंतत जातो.

अख्खा चित्रपट हा त्याच्या आयुष्याची कथा म्हणुन पुढे येतो, पण एकाही ठिकाणी आपल्याला जराही कंटाळा येत नाही इतकं आपण त्या कथेशी जोडले गेलेलो असतो.

चित्रपटात काय नाहीय? एकट्या आईने वाढवलेलं एक अपंग त्यात बौद्धिक कुवत बेताची असलेलं पोरगं, आईची इच्छा असते माझ्या मुलाला हा इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच समान संधी मिळायला हवी. त्याला घेऊन ती शाळेत पोहोचते. तिथला प्राचार्य मुलाला स्पेशल मुलांच्या शाळेत पाठवायचा सल्ला देतो. जिद्दीला पेटलेली आई प्रसंगी शाळेच्या मास्तरड्याला सुखी करुन मुलाला शाळेत दाखल करते. हे अपंग मुल पुढे जाऊन दोन खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवतं. सैन्यात भरती होतं आणि शौर्य पदक मिळवतं. दोन-तीन राष्ट्राध्यक्षांना भेटतं. स्वतःचा व्यवसाय करुन श्रीमंत सुद्धा होतं. चर्च आणि हॉस्पिटल बांधतं. अख्खा देश धावत पार करतं. काही लोक त्याचे अनुयायी होतात. एका टप्प्यावर त्याची मैत्रीण सुद्धा आयुष्यात परत येते. लहानपणी मंद म्हणुन गणना झालेल्या मुलांसाठी हे सगळं म्हणजे अचाट कारनामाच की.

हि एका मुलाची कहाणी आहे. त्यात बाल मैत्रीणीवर वर केलेलं उत्कट आणि निरागस प्रेम आहे, सैन्यातील मित्रा सोबतची निखळ मैत्री आहे, आपल्या सैनिकी अधिकाऱ्या बद्दलचा आदर आहे, सुखात आणि दुःखात ही असलेली स्थितप्रज्ञता आहे. मित्राला दिलेले वचन त्याच्या पश्र्चातही पुर्ण करण्याचा प्रामाणिकपणा आहे. देवा वरचा विश्वास आहे, आणि एका आईचे संस्कार आहेत. प्रेमात धोका भेटल्यावर तीन वर्ष सलग धावणारा दिल जला आशिक आहे.

हि एकट्या पालकांची सुद्धा गोष्ट आहे, फक्त आईने वाढवलेला नायक आईच्या संस्कारांमुळे कुठच्या कुठे जाऊन पोहोचतो तर एकट्या बापाने वाढवलेली, शोषणाची शिकार झालेली त्याची मैत्रीण हिप्पी लाईफ, नग्न गायिका, स्वैराचारी व व्यसनाधीन मुलगी, अशी पार भरकटत जाते. पुढे जाऊन ती सुद्धा एका मुलाची आई होते आणि मरणाच्या दारावर असताना ते मुल नायकाच्या हातात देऊन मरून जाते.

नितांत सुंदर अशी दृष्य, मांडणी आणि नायकाचा निरागस आवाज. गोष्टींमध्ये गुंतवत पुढे घेऊन जात राहणारं कथानक. या सर्वांसोबत अजून एक गोष्ट अशी कि चित्रपटातली नायकाच्या सोबत येणारी इतरही सशक्त पात्रं. जी तुम्हाला कथेच्या आणखी जवळ जायला भाग पाडतात.

कोणताही आव न आणता अगदी सहजपणे हा चित्रपट आपल्याला जीवनाच तत्वज्ञान सुद्धा शिकवून जातो.

"आयुष्य काय आहे? आपल्या सर्वांचं ध्येय आधीच निश्र्चित आहे? किंवा आपण सगळे आयुष्याच्या नावेवर स्वार झालेले यात्री आहोत? मला वाटतं आपण दोन्ही आहेत" ---फॉरेस्ट गम्प.

संस्कृतीमौजमजाचित्रपटप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

माझा अतिशय आवडता सिनेमा. टॉम हँक्स ने खूपच मस्त काम केलंय यामध्ये .

विजुभाऊ's picture

25 Jul 2020 - 7:09 am | विजुभाऊ

नक्की पहातो.
छान वर्णन केलंय तुम्ही याचं

गणेशा's picture

25 Jul 2020 - 9:06 am | गणेशा

या lockdown मध्ये पाहिलेल्या सिनेमा मध्ये हा सर्वात आवडीचा picture माझा..

अप्रतिम.

मला वाटते या सिनेमाला best picture चे ऑस्कर पण मिळाले होते 1994 ला.
सर्वांनी पाहावा असा सिनेमा..

श्वेता२४'s picture

25 Jul 2020 - 10:20 am | श्वेता२४

जरुर बघेन हा सिनेमा

नितांत सुंदर चित्रपट. तुम्ही लिहिलेली ओळख सुद्धा खूप छान. तसंही टॉम हॅँक्स आपला फेवरिट. त्याचे असेच काही अप्रतिम चित्रपट आहेत -
The Terminal
Sully
Bridge of spies
Cast Away
You have got mail
Catch me if you can

Catch me खरंतर लिओनार्दोचा. पण टॉम हॅँक्स सुद्धा तेवढाच खास त्यात.
आठवण करून दिल्याबद्दल खूप खूप आभार. आता परत एकदा बघणे आले! :)

mrcoolguynice's picture

25 Jul 2020 - 12:01 pm | mrcoolguynice

Saving Private Ryan

चांदणे संदीप's picture

25 Jul 2020 - 4:57 pm | चांदणे संदीप

The Ladykillers

सं - दी - प

सुमो's picture

25 Jul 2020 - 11:03 am | सुमो

सिनेमा . माझ्या ऑल टाईम लिस्ट मध्ये आहे.

तुषार काळभोर's picture

25 Jul 2020 - 12:33 pm | तुषार काळभोर

मी सुद्धा खूप वर्षे या पिक्चर विषयी फक्त ऐकून होतो. जानेवारी फेब्रुवारी मध्ये कधीतरी डाऊनलोड करून बसमध्ये येताना जाताना पाहिला. आणि मग लॉक डाऊन मध्ये अजून दोन वेळा पाहिला. अजिबात कंटाळा येत नाही. सुंदर चित्रपट.

डॅनी ओशन's picture

25 Jul 2020 - 1:30 pm | डॅनी ओशन

लुटेनंट डॅन, कायम श्रिम्प बद्दल बोलणारा मित्र, गम्पची आई अगदी सरस पात्रं आहेत.
बऱ्याच ऐतिहासिक व्यक्ती/ घडामोडींचा गम्प साक्षीदार असतो हे पण एकदम भारी घेतलंय.
प्रायव्हेट रायन, कास्ट अवे, द पोस्ट पण आवडतात हॅंक्सचे.

अशाच प्रकारची एक व्यक्तिरेखा "व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप ?" नावाच्या सिनेमात लिओनार्डोने केली आहे. त्यात त्याचे आणि जॉनी डेपचे काम अगदी सुंदर आहे.

बोका's picture

25 Jul 2020 - 1:31 pm | बोका

आमीर खान याचा हिंदी अवतार बनवतो आहे असे कुठेसे वाचले होते.

डॅनी ओशन's picture

25 Jul 2020 - 1:34 pm | डॅनी ओशन

नाव आहे रिमेकचं. यात अमिरचा अभिनय पीके मधल्यासारखाच होईल अशी शंका आहे.

विजुभाऊ's picture

25 Jul 2020 - 2:10 pm | विजुभाऊ

पी के मधला "अभिनय"?

लालसिंग चढ्ढा याचा रिमेक आहे? फॉरेस्ट मनात घर करुन जातो. अमिर खान कितपत करू शकतो माहिती नाही.

उन्मेष दिक्षीत's picture

25 Jul 2020 - 5:25 pm | उन्मेष दिक्षीत

मजा अशी आहे कि इतक्या सगळ्या गोष्टी जर तो अचीव करायच्या म्हणुन गेला असता तर झाल्या असत्या कि नाही माहीत नाही.

या गोष्टी त्याच्याबरोबर चक्क आणि चक्क को-इन्सिडेंन्स म्हणून घडत जातात. मला तरी त्यातून काही मेसेज दिलेला वाटला नाही. इट्स अ प्लेन सिंपल आयरॉनीक स्टोरी..
धिस मुव्ही इज अ‍ॅन आयरनी उ. दा. त्याला सैन्यात शौर्यपदक मिळतं, पण त्याच्या बॉस चे दोन्ही पाय तुटलेले असतात आणि तो कितीही ओरडून सांगत असतो कि मला न घेता निघून जा कारण आता त्याला जगायचं नसतं, तर तो त्याला खांद्यावरुन घेउन हॉस्पिटल मधे नेऊन ठेवतो आणि त्याला पदक मिळतं पण बॉस लाआयुष्य तसंच काढावं लागतं, आणि हा मात्र नंतर मिलिटरी सोडून त्याच्या मित्राला दिलेलं वचन पुर्ण करण्यासाठी बुबा गंप श्रिंप काढतो. आणि नंतर ते ही सोडून देतो. त्याचा बॉस नंतर जेव्हा त्याला भेटतो तेव्हा काय ऐकवतो ते बघा, आणि तरीही याला त्याचा काही रिमोर्स नसतो कारण त्याला ते फील च होत नाही.

हा पिक्चर पहिल्यांदा बघून नेमका पॉईट काय आहे ते न कळल्यानं मी लगेच दुसर्यांदा पुन्हा बघितला होता.
मला वाटतं माय नेम इज खान चं कॅरॅक्टर यवरून घेतलंय, पण शाहरुख खान इंटेलिजंट दाखवलाय.

राघव's picture

25 Jul 2020 - 6:24 pm | राघव

जर त्रयस्थपणे बघीतलं तर त्याच्या अचीवमेंट्स भारी वाटतात. पण एक अलिप्तपणा सुद्धा जाणवतो.
फॉरेस्ट गम्प कॅरॅक्टर च्या अनुषंगानं बघीतलं, तर त्याला स्वतःला आपण काही खूप मोठं काम केलंय असं वाटत नसतं. तो सगळ्या ठिकाणी आपला, लहान मुलासारखं जगत, काम करत असतो.
आपण सिनेमा बघतो तेव्हा त्याचा इनोसन्स जाणवतो आणि तोच अपील होतो. अर्थात् हे सगळं माझं मत! :-)

कुमार१'s picture

28 Jul 2020 - 9:29 pm | कुमार१

पाहिला. छान आहे