माझं नाशिक
माझा जन्म नाशिकचा. अशोकस्तंभाजवळच्या कुठल्याश्या हॉस्पिटलात माझा जन्म झाला. ४१२, वकीलवाडी हे माझं आजोळ. तिथं मामाचं कुटुंब आणि आजी आजोबा राहायचे. ४१२ चं घर भाड्याचं. जुन्या पद्धतीचं वाडावजा घर. त्यात बरेच भाडेकरु असंत. मुख्य दरवाजातून आत शिरताच एक अंधारा बोळ, त्यातून बाहेर पडल्यावर चौक, तिथून करवादत्या लाकडी जिन्याने वर जाताच दुसर्या मजल्यावर मामाचं घर. पुसटसं आठवतंय आता. बाहेरची मुख्य खोली, माजघर आणि रस्त्याकडेला उतरत्या कौलांनी निमुळती झालेली एक माडी. दिवाळीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी नाशिकला जायचा. कधी आईवडीलांबरोबर तर कधी मामांसोबत. त्या घरातली माडी ही माझी आवडती जागा.