अस्वस्थ करणारे उत्तर रामायण

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
10 May 2020 - 2:34 am

मागच्या लेखात (लिंक: पुन्हा एकदा रामायण) मी रामायण मालिकेचा मुख्य भाग संपल्या नंतर मनात घोळत असलेले विचार अगदी त्याच रात्री मांडले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पासुन उत्तर रामायण सुरु झालं, आणि ते संपल्यावर मात्र लगेच काही लिहायला हात उचलला नाही.

शेवटचे काही भाग इतके भावुक आणि व्यथित करून गेले कि मनात नेमकं काय चाललं आहे हे मला स्वतःला कळायला, विचार थोडे तरी स्पष्ट व्हायला काही दिवस जावे लागले.

(आज लिहुन झाल्यावर पाहतोय तर फारच मोठी पोस्ट झाली आहे, त्याबद्दल क्षमस्व.)

रामानंद सागर यांनी ३३ वर्षांपूर्वी उपलब्ध तंत्रज्ञान, आर्थिक पाठबळ, अभिनय, चित्रणकला यातली त्याकाळची प्रगल्भता ह्या सगळ्यांच्या आधाराने आणि स्वतःच्या (आणि अर्थात त्यांच्या संघाच्या) अभ्यास आणि भक्तिभावाने जी अद्भुत कलाकृती निर्माण केली आहे त्याचं पुष्कळ कौतुक मी मागच्या भागात आधीच केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा टाळतो.

शेवटच्या भागातलं लव कुश "हम कथा सुनाते है" हे म्हणतानाचा प्रसंग, त्यानंतर सीतेला पुन्हा अयोध्येच्या प्रजेसमोर स्वतःच्या शुद्धीचं प्रमाण देण्यासाठी शपथ देण्याचा प्रसंग, आणि तिने धरतीमातेला पोटात घे म्हणुन विनंती करण्याचा प्रसंग अंगावर काटा, डोळ्यात अश्रु, मनात किती तरी भावना, प्रश्न उभे करणारे होते.

आज त्याबद्दलच सविस्तर बोलणार आहे.

(सूचना: इथे मी तुम्हाला रामाची कथा अगदी तपशिलात नाही तरी संक्षिप्त स्वरूपात तरी माहिती असेल असं गृहीत धरतोय. त्याशिवाय हे मुद्दे तुम्हाला पूर्ण कळण्याची शक्यता कमी आहे. पोस्ट खूप मोठी होईल त्यामुळे ती कथा इथे सांगत नाही.)

१. लंकेतली अग्निपरीक्षा

मला खटकणारा पहिला प्रसंग म्हणजे सीतेची लंकेत झालेली अग्निपरीक्षा.

सीता रावणाच्या लंकेत जवळपास एक वर्ष राहिली त्यामुळे ती अजूनही पवित्र आहे कि नाही याबद्दलची शंका दूर करण्यासाठी घेण्यात आलेली अग्निपरीक्षा.

म्हणजे ज्या बाईला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेण्यात आलं आहे, त्या माणसाने तिच्यावर बळजबरी केली तर ती अपवित्र होते? तो माणुस अपवित्र, त्याची करणी अपवित्र, पण त्याचा परिणाम म्हणून ती स्त्री अपवित्र?

म्हणजेच आपला समाज हा आधीपासूनच असल्या सडक्या विचारांचा आहे. इतके ऋषी मुनी, विचारवंत होऊनही हि कीड मात्र तेव्हापासुन आजवर निघालेली नाही.

त्यामानाने सुग्रीवाने आपल्या पत्नीला फार मानाने वागवले. वालीने आपल्या भावाला राज्याबाहेर हाकलून त्याच्या पत्नीला बळजबरीने स्वतःची पत्नी बनवले होते. पण वालीवधानंतर सुग्रीवाने कुठली अग्नी परीक्षा घेतली नाही. तिलाही स्वीकारले आणि वालीच्या पत्नीशी लग्न करून तिचा महाराणीचा दर्जा तसाच ठेवला. तिच्यावर बळजबरी केली नाही. वालीच्या मुलालाही (अंगद) युवराज बनवले. वानर समाज मनुष्य समाजापेक्षा पुढारलेला होता असाच याचा अर्थ होतो.

रामाचा सीतेवर विश्वास होता, पण लोकांसाठी असे केले असे म्हणु.

रामायण मालिकेत तर असे दाखवले आहे, कि रावणाने सीतेला पळवण्याआधीच रामाने सीतेला अग्निदेवाकडे सुपूर्त केले होते, आणि तिचे प्रतिबिंब छाया सीता त्यानंतर एक वर्ष सीता म्हणुन वावरत होती. लंकेमध्ये रामाने फक्त अग्निदेवाकडून परत मुळ सीतेला आणले. आणि हि लीला लक्ष्मणालाही त्या क्षणापर्यंत माहित नव्हती.
आणि या घटनेचा लोकांनी अग्निपरीक्षा असा चुकीचा अर्थ लावला.

पण हि गोष्ट उगाच नंतर (रामानंद सागर यांनी नव्हे, पण त्यांनी संदर्भ घेतलेल्या कुठल्या तरी रामायणात) जोडली असेल असे मला वाटते. माझा तर्क असा आहे, कि जर रामाने सीतेला अग्निदेवाकडे सुपूर्त करणे लक्ष्मणालाही न सांगता फक्त अग्निदेवाला पाचारण करून केले होते, तर मग तिला परत आणताना सगळ्यांसमोर का? तेही तसेच एकांतात करता आले असते, म्हणजे कोणाचा गैरसमज झाला नसता.

आणि मग रामाने सीतेसाठी व्याकुळ होणे, दुःखी होणे हे प्रसंग दाखवले होते ते सर्व खोटे?

दुसरा तर्क असा कि ह्या लीलेचा खुलासा रामाने अयोध्येच्या प्रजेसमोर केला असता, तर पुढची गैरसमजाची साखळी टळली असती.

मागे दुसरं एक पर्यायी स्पष्टीकरण मी असं वाचलं होतं कि अग्नीपरीक्षा म्हणजे आगीवर चालणे नव्हे. रामाने सर्वांची खात्री पटावी म्हणून सर्वांसमोर सीतेला तू शुद्ध आहेस का असे विचारले. एका स्त्रीसाठी सर्वांसमोर अशा प्रश्नाला उत्तर देणे सुद्धा अत्यंत कठीण आहे म्हणून त्याला अग्निपरीक्षा म्हटले आहे.

असो. मला पीडित स्त्रीला अपवित्र मानणे या मानसिकतेचा प्रचंड त्रास होतो. बलात्कार हा तात्पुरता शारीरिक अत्याचार असतो, पण त्या बलात्काऱ्याहून अधिक मानसिक अत्याचार आपला समाज दीर्घ काळ करत असतो. म्हणून अनेक जणी याबद्दल बोलत नाहीत, लपवून ठेवतात, आत्महत्या करतात.

(काही वर्षांपूर्वी मी ह्याच विषयावर असाच अस्वस्थ असताना एक कथा लिहिली होती, वाचावी वाटल्यास जरूर वाचा. लिंक : ती आणि तो : भाग १
पुढचे भाग वरच्या भागात असलेली अनुक्रमणिका वापरून वाचता येतील)

असो. रामाचा सीतेवर विश्वास होता, पण लोकांची मानसिकता लक्षात घेऊन सीतेला हे दिव्य पार पाडावे लागले असे समजून पुढे चलू. कारण यानंतर दोघांनी अयोध्येत जाऊन पुन्हा सोबत संसार आणि राज्यकारभार सुरु केला होता.

२. अयोध्येत सीतेला सोडणे, दुसरी अग्निपरीक्षा

रामाने राज्यकारभार सुरु केल्यानंतर त्याला समजते कि प्रजेमध्ये सीतेबद्दल कुजबुज सुरु आहे, आणि तिला राणी म्हणुन बसवलेलं त्यांना आवडलेलं नाही.

रामाला आदर्श पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्याची धारणा अशी होती कि राजधर्म असे सांगतो कि राजा हा प्रजेचा सेवक आहे, आणि प्रजामतापुढे राजाने आपले वैयक्तिक आयुष्य दुय्यम ठेवायला हवे. त्यामुळे जनमतामुळे रामाने सीतेला सोडले.

मिथिलेची राजकन्या असूनही तिने मिथिलेला परत न जाता पुन्हा वनवास पत्करला, आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली.

मालिकेत असे दाखवले आहे कि सीतेने स्वतः हा निर्णय घेतला. तिला आशा होती कि काही काळानंतर प्रजेला आपली चूक कळेल आणि तिला तिचा मान परत मिळेल.

पुढे लव कुश आपल्या गाण्यांमधून लोकांना जाब विचारतात, त्यांच्या चुका दाखवतात. त्यानंतर तेच रामाचे पुत्र आहेत हे कळल्यावर रामाने पुन्हा सीतेला सन्मानाने आणून सर्वांना पुन्हा राजवाड्यात आणावे असे काही लोक म्हणतात, पण काही लोक तरीही सीतेची अग्निपरीक्षा आमच्यासमोर झालेली नव्हती, त्यामुळे सीतेने पुन्हा सर्वांसमोर आपल्या पवित्रतेची शपथ घ्यावी.

दुसऱ्या दिवशी सीतेआधी वाल्मिकी ऋषी स्वतः आपली प्रतिष्ठा, तपोबल सर्व पणाला लावुन सीता पवित्र आहे असे सांगतात, तरीही सीतेला शपथ घेण्यास सांगता येते. (दुसरी अग्निपरीक्षा)

या क्षणी सीतेचे हावभाव अत्यंत परिणामकारक होते. बाकी मालिकेत सीतेचा अभिनय अगदी अपेक्षित आणि ठरलेल्या मार्गावरून जाणारा होता. ह्या क्षणी मात्र त्या अभिनेत्रीने (दीपिका) तिच्या डोळ्यात जो अंगार आणला होता, तो लाजवाब होता.

सीतेला कळुन चुकते कि ह्याला काही अंत नाही. आधी लोकांसाठी म्हणून अग्निपरीक्षा, मग अयोध्येच्या लोकांनी स्वतः बघितली नाही म्हणून पुन्हा अग्निपरीक्षा, शपथ ग्रहण. उद्या अजुन कोणी येईल त्याची खात्री पटावी म्हणून पुन्हा तो प्रसंग उभा राहील.

त्यामुळे ती तिची मूळ माता, भूमिमातेला पाचारण करून पृथ्वीच्या पोटात परत जाते.

i1

मालिकेच्या ह्या भागांमध्ये राम हा अवतारी पुरुष होता, त्याला वेगवेगळे आदर्श प्रस्थापित करायचे होते, असं खूपदा म्हटलं आहे.

रामाने आदर्श राजा कसा असावा, त्याने प्रजेसमोर वैयक्तिक सुख दुःख दुय्यम मानावे, प्रजेचा सेवक बनुन राहावे हे दाखवले.

राम शक्तिशाली राजा होता. अशी कुजबुज करणाऱ्यांना दंड देणे सहज शक्य होते. पण काही लोकांना दंड देऊन कुजबुज थांबण्या ऐवजी वाढलीच असती हे मात्र खरे. आणि वैयक्तिक कारणासाठी कोणाला दंड देणे हे रामाच्या तत्वातही बसले नसते.

पण त्याने काय झाले?

हा राजाचा आदर्श किती लोकांना कळला? रामाच्या नावाने इतकं राजकारण होतं. पण रामाचा हा आदर्श राजकारण्यांनी ठेवला, तर त्यांच्यावर आरोप झाले, विरोधी जनमत तयार झालं तर त्यांना राजकारण सोडून घरी बसावं लागेल.

पण आजकालचे राजकारणी लोकांना रामापेक्षा जास्त ओळखून आहेत असं दिसतं. कुछ तो लोग कहेंगे, असं म्हणत ते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून जे करायचं ते करत राहतात.

कारण लोक सर्व प्रकारचे असतात. काही लोक आपल्या बाजूने, आणि काही लोक आपल्या विरुद्ध बाजूने सतत बोलत राहतात. शंभर टक्के सर्व लोकांना आपल्या बाजूने करणे राम आणि कृष्णासारख्या अवतारी माणसांना सुद्धा जमले नव्हते.

अशातच संसदेत ट्रिपल तलाक चा वाद चालू असताना कोणत्या तरी महाभागाने रामाने सुद्धा सीतेला सोडले होते असा उल्लेख केला होता. किती हे विचारांचे दारिद्र्य. रामाने सीतेपासून दूर राहून सुद्धा तिचा मनातून त्याग केला नव्हता. अश्वमेध यज्ञात सुद्धा तो तिचीच सुवर्ण प्रतिमा बाजूला घेऊन बसला होता.

राम एक पत्नीव्रता होता. रामाने सीतेला सोडले, पण तिच्याशी, ह्या व्रताशी प्रामाणिक राहिला. रामाच्या स्वतःच्या वडिलांना ३ राण्या होत्या. रामाच्या काळात आणि नंतर हजारो वर्षे माणसांना अनेक बायका असणं सामान्य होतं. त्यामुळे त्याचं हे व्रत वेगळं होतं. हा आदर्श नंतर किती जणांनी घेतला? आता ती पद्धत आपोआप बाद झाली ती गोष्ट वेगळी.

पण रामाने सीतेला सोडलं हे, आणि ज्या कारणामुळे सोडलं ते मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिलं. आणि स्त्री दुसऱ्या पुरुषासमवेत राहिली कि त्यागावी अशा समजाला मात्र बळ मिळालं.

रामाने किंवा सीतेने वेगळे झाल्यानंतर प्रजेच्या विचारांची पातळी वाढावी म्हणून मात्र काही केले नाही. स्वस्थ बसून राहिले. पुढे लव कुश यांच्या गीतांनी काय तो थोडा विचार लोकांनी केला.

आपल्या पुराणांमध्ये स्त्रीच्या पतिव्रताचं अति स्तोम माचवलेलं आहे. स्त्री हि जगतजननी पण, आदिशक्ती पण, सरस्वती आणि लक्ष्मी पण. पण तिच्या जन्माचं सार्थक म्हणजे पतिव्रता असणं.

पतीला परमेश्वर मानायला, पतीच्या नावाचं व्रत करायला पती त्या लायकीचा असावा हे कुठल्या कथेत सांगितलेलं नाही. उलट पत्नीच्या पतिव्रताच्या शक्तीमुळे असुरसुद्धा अवध्य झाले, आणि देवांना सुद्धा पतिव्रत भंग करण्याचे मार्ग पत्करावे लागले अशा विचित्र कथा आहेत.

आणि ते व्रत मानलं तरी स्त्रीने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले तर ते व्रत भंग होईल ना. पण अशा कथांमध्ये मात्र दुसऱ्या पुरुषाने कपटाने, बळजबरीने जरी तसे केले तरी ते व्रत भंग होते अशी आजच्या काळात तर अगदी न पटणारी कल्पना दाखवली आहे.

शाळेमध्ये असताना "महापुरुषांचा पराभव" नावाचा एक सुंदर धडा होता. त्याचा सारांश असा कि कुठलेही महापुरुष असो, त्यांचं स्वतःचं आयुष्य कितीही यशस्वी आणि कीर्तिमान असलं तरीही त्यांचे अनुयायी मात्र त्यांच्या जवळपासही नसतात. त्यांना त्या महापुरुषांच्या विचारांची आदर्शांची उंची झेपत नाही आणि त्यांच्याच विचाराचा पुढे विपर्यास होत राहतो, आणि अशा तर्हेने सर्व महापुरुषांचा या बाबतीत पराभव होतो.

रामाचा हा आदर्श राजाचा विचार वायाच गेलेला दिसतो. त्याने परपुरुषाच्या घरी राहून आलेल्या पत्नीला त्यागले हे सर्वांच्या लक्षात राहते. पण हे त्याने एक राजा झाल्यावर लोकापवादामुळे केले हे नाही लक्षात राहत. एक वनवासी असताना त्याने आपल्या पत्नीला सोबत घेऊन घरी घेऊन गेला होता, हे नाही लक्षात राहत.

कृष्ण म्हटलं कि काही लोकांना तर किशन कन्हैया, रास लीला, एवढंच आठवतं. कॉलेजात भरपूर फ्लर्टींग करणाऱ्या मुलांना कन्हैया म्हणतात. त्याच्या १६००० बायका होत्या हे लोकांच्या लक्षात राहतं. पण त्या त्याच्या खऱ्या बायका नसुन, नरकासुराने बंदिवासात ठेवलेल्या स्त्रिया होत्या हे लोकांना माहित नसतं.

कृष्णाने नरकासुराला मारले तेव्हा सुद्धा असाच प्रश्न निर्माण झाला होता. ह्या पीडित स्त्रियांना मुक्त तर केले, पण त्यांनी जावे कुठे, कोण त्यांना स्वीकारेल असा प्रश्न होता. त्यांना मान मिळावा म्हणुन कृष्णाने त्या सर्वांशी प्रतीकात्मक लग्न केले.

पण हा आदर्श तरी कोणी समजून घेतला? कृष्णाने मात्र स्वतः बदनामी पत्करली. १६००० लग्न करणारा असं अजूनही बरेच लोक समजतात.

मी मागच्याही लेखात म्हणालो होतो कि आपण आज जसे विचार करतो, त्यावर आपण आपल्या एक दोन आधीच्या पिढ्यांना सुद्धा पारखणं चुकीचं आहे. मग रामासारख्या हजारो वर्ष आधीच्या माणसाला कसं काही बरोबर चुक ठरवणार?

त्याचं असं आहे कि हि पात्रं, ह्या कथा हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा आहेत. ह्याचा आपल्या सर्वांवर खूप प्रभाव आहे. मग अशा महत्वाच्या गोष्टींना जरा विचारपूर्वक बघायला नको का? आंधळ्या श्रद्धेनं जे आजवर लोक मानत आले तेच आपण पुढे मानत राहिलो तर आपली प्रगती कधी होणार? आणि फक्त रामायण, महाभारत, गीता, भागवत यांचे सप्ताह आणि पारायण करत राहिलो तर त्यातले विचार आपल्याला कधी कळणार?

दिल्ली ६ नावाचा एक सुंदर चित्रपट येऊन गेला. तो काही चालला नाही, बऱ्याच जणांना कळलाही नाही. त्यात अतुल कुलकर्णीचं पात्र अस्पृश्यता पाळत असतं. (आजच्या काळातही).

एका प्रसंगात ते सर्व जण राम लीलेला जातात. रामाने शबरीचे उष्टे बोरं खाण्याचा प्रसंग येतो. तेव्हा अभिषेक बच्चन अतुल कुलकर्णीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. अतुल कुलकर्णी उत्तर देतो कि "वो तो भगवान है. वो कुछ भी कर सकते है."

हे असंच चालू आहे आपल्याकडे शतकानुशतकं. लोक ग्रंथांचे पारायण करतात, मुखोद्गत करतात, पण त्यातले विचार, आदर्श कधी आचरणात सोडा स्वतःच्या विचारातही आणत नाहीत.

शुद्ध तत्वज्ञान लोकांना आवडणं अवघड असतं म्हणुनच अशा बोधकथा आणि पुराणांची निर्मिती होते. पण त्यातला गर्भित अर्थ समजून घेतला तरच उपयोग आहे.

अशा खटकणाऱ्या गोष्टींमुळे आपल्या समृद्ध वारशाकडे पाठ फिरवणे, किंवा आहे त्याला विचार न करता डोक्यावर उचलून घेणे ह्या दोन्ही गोष्टी टोकाच्या आणि निरुपयोगी आहेत.

रामायणातून किती काय शिकण्या सारखं आहे हे मी मागच्या लेखातही बोललो आहे. समाजात बदल एका रात्रीत एका क्रांतीत होत नसतात. म्हणून असे महापुरुष त्या त्या काळानुसार संदेश घेऊन येतात. आपण या महापुरुषांकडून जे आजही शिकण्यासारखं आहे ते शिकत राहावं, जे आता कालबाह्य झालं ते सोडून द्यावं.

शेवट स्वदेस मधल्या ह्या माझ्या आवडत्या ओळींनी करतो.

राम हि तो करुणामे है, शांती मे राम है
राम हि है एकतामे, प्रगतीमे राम है

राम बस भक्तो नही शत्रुकिभी चिंतन मे है
देख तज के पाप रावण, राम तेरे मन मे है

राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है
राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है

राम तो घर घर मे है
राम हर आंगन मे है

मन से रावण जो निकाले
राम उसके मन मे है

मन से रावण जो निकाले
राम उसके मन मे है........

।। जय श्रीराम ।।

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

मन्या ऽ's picture

10 May 2020 - 7:45 am | मन्या ऽ

छान लेख! तुमचे स्पष्ट आणि मुळाशी घाव घालणारे विचार आवडले..

आकाश खोत's picture

12 May 2020 - 10:30 pm | आकाश खोत

धन्यवाद :)

Prajakta२१'s picture

10 May 2020 - 1:41 pm | Prajakta२१

खूप छान लिहिलेय
उत्तर रामायण अस्वस्थ करणारे आहे पण त्याला काही आधार नाही
https://en.wikipedia.org/wiki/Ramayana#Uttara_Kanda ह्या लिंक मध्ये उत्तरकांड आणि लवकुश कांड अशी विभागणी आहे त्यात लवकुश कांडात वरील प्रसंग आहे पण त्याला काही आधार नाही असे म्हंटले आहे (वाल्मिकी आणि तुलसीदास रामायणात )
"This is a book (kanda) which was not written neither in the original Valmiki Ramayan nor by Tulsidas.[23] This is totally an chapter added afterwards and no authentication of this chapter is seen in original Ramayana of Tulsidas and Valmiki." विकिपीडिया वरून साभार
एकदा हे काल्पनिक म्हंटले कि बरीच अस्वस्थता कमी होते

लेखातले बरेचसे विचार चांगले मांडले आहेत पटले

पातिव्रत्याच्या स्तोमाबाबत -तुळशी ची कथा हि अशीच पातिव्रत्याच्या स्तोमावर आधारलेली आहे जालंधर नावाचा महादेवाच्या अंशापासून/क्रोधाग्नीपासून उत्पन्न झालेला राक्षस आणि त्याची पत्नी काल्नेमी पुत्री वृंदा. वृंदा हि विष्णुभक्त असून खूप मोठी पतिव्रता होती तिच्या पातिव्रत्याच्या जोरावर जालंधर हा अजिंक्य आणि अमर होत चालला होता महादेव आणि त्याच्या युद्धात तो पराभूत होत नव्हता कारण वृन्दाचे पातिव्रत्याचे सामर्थ्य मग विष्णूने जालंधराचे रूप घेऊन तिचा पातिव्रत्य भंग केला आणि महादेवाने जालंधराचा वध केला इकडे वृंदेला हे कळताच तिने दुःखाने प्राणत्याग केला आणि विष्णूला शाप दिला कि तुमची पत्नी पण अशीच मोहात पडून छळली जाईल (रामावतारात हा आणि अजून एक नारदांचा शाप भोगावा लागला) विष्णूने प्रसन्न होऊन तिचे तुळशीच्या झाडात रूपांतर केले आणि आपल्याला प्रिय असल्याचे जाहीर केले दरवर्षी तुळशीचे लग्न शाळिग्रामसोबत(विष्णूचा अवतार ) लावतात

तसेच अहिल्या आणि गौतम ऋषींच्या कथेत तर अहिल्येचा काहीही दोष नसताना दगड होऊन पडून राहण्याची शिक्षा भोगावी लागली
अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या कथा आहेत काल्पनिक म्हणून सोडून द्यायच्या

आकाश खोत's picture

12 May 2020 - 10:34 pm | आकाश खोत

धन्यवाद :)होय, राम राज्याभिषेकानंतरचा भाग नंतर जोडण्यात आलेला आहे असे मीसुद्धा वाचले आहे. पण त्या भागाची शैली वेगळी आहे म्हणुन असा तर्क काढतात म्हणे. 
माझा मुद्दा असा आहे कि आता आधी जोडला किंवा नंतर जोडला, पण कसे का होईना आता हा भाग तर प्रचलित रामायणाचा भाग बनलाच, आणि लोकांच्या मनात सुद्धा आता हेच बसलेलं आहे. रामानंद सागर यांनी बरेच संदर्भ घेऊन तो भाग दाखवलाच. 
दुसरं असं कि राज्याभिषेकापर्यंत मुळ भाग धरला तरीही पहिली अग्निपरीक्षा त्यात येतेच. तेही मनाला क्लेशदायकच वाटतं. 

अर्जुन's picture

10 May 2020 - 3:35 pm | अर्जुन

महादेवाने जालंधराचा वध केला इकडे वृंदेला हे कळताच तिने दुःखाने प्राणत्याग केला आणि विष्णूला शाप दिला कि तुमची पत्नी पण अशीच मोहात पडून छळली जाईल

जर दोष विष्णूचा असेल, तर शिक्षापण त्यालाच दिली पाहीजे, त्याचा पत्नीचा काहीही अपराध नसतांना तिला शिक्षा का? आणि देणारी सुध्धा एक स्त्रीच हे विशेष.............

वृंदेने शाप विष्णूलाच दिला होता कि तो एका दगडात परावर्तित होईल (शाळीग्राम ) आणि त्याला पण पत्नी विरह सहन करावा लागेल
त्याने जशी तिची जालंधर बनून फसवणूक केली तशीच त्याची पत्नी मोहात पडून किंवा फसवणूक होऊन त्याच्यापासून दूर होईल (स्वर्णमृगाचा मोह पडून आणि रावणाकडून ब्राह्मणाच्या रूपात भिक्षेसाठी येऊन फसवणूक)
आणि त्याला विरह सहन करावा लागेल तिने विष्णूलाच शाप दिला होता पण सीतेला सहन करावे लागले शापाचे बाय प्रॉडक्ट म्हणून
आणि त्यापूर्वी एकदा नारदांना देखील लग्नाचा मोह झाला ते एका सौन्दर्यवतीच्या मोहात पडून तिला लग्नासाठी भेटायला जाणार होते जाण्यापूर्वी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी (आणि त्यांना तेवढ्यापुरते चांगले स्वरूप प्रदान करावे ह्यासाठी ) ते वैकुंठात गेले तेव्हा विष्णूने त्यांचे माकडाच्या स्वरूपात परिवर्तन करून त्यांना भेटण्यासाठी पाठविले तिथे त्यांचीच फजिती होऊन ते परत आल्यावर त्यांनी पण विष्णूला शाप दिला कि त्यांना पत्निविरह सहन करावा लागेल आणि तिच्या शोधासाठी त्यांना वानरांची/माकडांची मदत घ्यावी लागेल असा
ह्या दोन शापांची पूर्तता रामावतारात झाली
बऱ्याच कथांत स्त्रियांना /पत्नीलाच जास्त सहन करावे लागले आहे

सीतेने जे चटके सोसले त्याने रामाचे अंतःकरण देखील तेव्हढेच पोळले. फरक एकच, कि रामाच्या हाती कोदंड आणि राजदंड होता...

अवांतर - त्या जालंधर वृंदेच्या कथेत नारायणावरच अन्याय आहे आणि त्याच्या पत्नीवर लक्ष्मीवर तर जास्तच
इंद्र आणि ब्रह्मदेव एकदा महादेवाला भेटायला गेले असता महादेवाने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एका साधूचे रूप घेऊन त्यांना कैलासाबाहेर अडवले ब्रह्मदेवाने
महादेवांना ओळखले आपण इंद्राने न ओळखता अपमान केला त्यातून महादेवाचा क्रोधाग्नि जागृत होऊन त्यातून जालंधराचा जन्म झाला त्याला पालनपोषणासाठी
समुद्र आणि एका स्त्रीकडे सोपवले (समुद्राने अर्थात जलाने धारण केलेला म्हणून जालंधर) इंद्राने बाल्यावस्थेतच त्याला मारण्यासाठी प्रयत्न केले पण त्यात त्याची पालनकर्ती त्याला वाचवताना मरण पावली ह्याचाच सूड म्हणून जालंधराने मोठेपणी सामर्थ्यशाली होऊन स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला पराभूत करून स्वर्गाचे अधिपत्य मिळवले ह्याच सुमारास त्याचा वृन्देशी विवाह होऊन तिच्या पातिव्रत्याच्या जोरावर तो अजिंक्य बनला आणि उन्मत्त होत चालला एकदा त्याने पार्वतीला पहिले आणि तिच्यावर मोहित झाला तिची माहीत काढून महादेवाचे रूप घेऊन तो तिच्याकडे गेला पण पार्वतीने त्याला ओळखून कालीचे क्रुद्ध रूप धारण केले तेव्हा तो तिथून कसाबसा पळून गेला ह्यातून महादेव आणि जालंधराचे युद्ध सुरु झाले पण वृंदेच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे जालंधर पराभूत होत नव्हता व्यथित होऊन पार्वती नारायणाकडे गेली आणि सर्व कथा सांगितली नारायणाने सर्व जाणून वृंदेचे पतिव्रत्य भंग करायचे ठरवले आणि जालंधराचे रूप घेऊन वृंदेकडे गेला तिचे पतिव्रत्य भंग करताच इकडे महादेवाने जालंधराचा वाढ केला इकडे वृंदेला हे कळताच तिने दुःखाने प्राणत्याग केला आणि विष्णूला शाप दिला कि तुम्ही एक निर्जीव दगड होऊन पडाल (शाळीग्राम )आणि तुमची पत्नी पण अशीच मोहात पडून छळली जाईल (रामावतारात हा आणि अजून एक नारदांचा शाप भोगावा लागला) आणि विष्णूने प्रसन्न होऊन तिच्या राखेचं तुळशीच्या झाडात रूपांतर केले आणि आपल्याला प्रिय असल्याचे जाहीर केले दरवर्षी तुळशीचे लग्न शाळिग्रामसोबत(विष्णूचा अवतार ) लावतात

ह्या सर्व कथेत विष्णूने काहीच केले नव्हते तसेच लक्षमीने पण काही केले नव्हते तरी त्यांना भोगावेच लागले (दुसऱ्याला मदत करून स्वतः खड्ड्यात जाणे ह्याचे उदाहरण )

आकाश खोत's picture

12 May 2020 - 10:41 pm | आकाश खोत

इथे चर्चेत जी जालंधर वृंदा यांची कथा दिली आहे, तीच माझ्या डोक्यात लेख लिहिताना होती. 
कि आधीची पुरुषप्रधान संस्कृती ग्राह्य धरली तरी पती सद्वर्तनी आणि आदर्श असेल तर तो परमेश्वरासारखा असतो असा संदेश देण्याऐवजी स्त्री पतिव्रता असेल तर असुरसुद्धा देवांवर भारी पडतो असा संदेश दिला जातो. 
म्हणजेच पती कसाही असला तरी त्याला पूजा. या अशा नकळत मनावर बिंबत जाणाऱ्या गोष्टींमुळे अगदी अलीकडच्या पिढ्यांपर्यंत नवरा ठेवेल तसं राहण्याचं, जसं वागेल तसं निमुट सहन करण्याचं बंधन स्त्रियांवर होतं. 
आता आता कुठे या पगड्यातुन स्त्रिया बाहेर पडत आहेत, आणि लोक "मुलगी शिकली, प्रगती झाली", असा उपरोधाने उल्लेख करतात. मुली शिकल्या म्हणून घटस्फोट वाढले, मुलींच्या मागण्या वाढल्या अशा तक्रारी करतात. 
विवाहित स्त्रियांवर अपेक्षांचं जे ओझं इतकी वर्ष होतं त्यातलं थोडं आता मुलांच्या खांद्यावर आलंय हे अजुन काही पचनी पडत नाही. 

मला हनुमान साधना करायची इच्छा असूनही अनेक वर्षे करता आली नाही. कारण रामाबद्दल असलेला राग. श्रीराम देव असूनही अस कसं करू शकतात या प्रश्नाने खूप अस्वस्थ केलं होतं. उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला. स्वतःला रामभक्त म्हणवणाऱ्या महाभागांनीही 'प्रजेसाठी केलं' हेच असंबद्ध उत्तर दिलं.
पुढे काही पुस्तकांच्या आधारे , अध्यात्म क्षेत्रातील लोकांच्या चर्चासत्राद्वारे या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अनेक पुराव्यासकट हे सिद्ध झाले आहे की रामचारीत मानस मध्ये उत्तर रामायणाचा उल्लेखही नाही. तुलसीदासना स्वतः हनुमंताने रामायण ऐकवलं आणि त्यांनी ते लिहून काढलं. तसेच वाल्मीकी रामायण मध्येही उल्लेख नाही. शेवटचा सीता खंडाचा भाग नंतर कसा जोडण्यात आला याच स्पष्टीकरण देणारे अनेक पुरावे आहेत.
रामानंद सागर यांनी मुलाखतीत उत्तर रामायण बनवण्यासाठी काँग्रेस नेत्यांकडून प्रचंड दबाव टाकण्यात आला. याविरोधात त्यांनी याचिका दाखल करून ती 10 लढली. याच नेत्यांनी नंतर रामयनावर आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल केल्या असे सांगितले आहे.
ही एकच गोष्ट नव्हे तर अनेक खोट्या गोष्टी रामायणात नंतर जोडण्यात आल्या. उदा.
1. सीतेची अग्निपरीक्षा . स्त्री दोषी असो किंवा नसो. तिच्यावर अन्याय झालाच पाहिजे. तिने दंड भोगलाच पाहिजे या मानसिकतेच्या लोकांनी केलेला हा एक निव्वळ फालतूपाना आहे
2. रणांगणात लक्ष्मणाने रावणाकडून ज्ञानप्राप्ती केली. का तर रावण जातीने ब्राम्हण होता.
3. रामाला रावणवध केल्यामुळे ब्रह्महत्येचं पाप लागलं म्हणून त्याने रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. पुन्हा रावण निव्वळ जातीने ब्राम्हण होता.
4. रामाने सीतेचा त्याग केला. का तर काहीही दोष नसतानाही परपुरुषाचा स्पर्श झाल्यामुळे पुरुषाने स्त्रीला वाऱ्यावर सोडून दिले तरी चालते ही दळभद्री मानसिकता.
या सगळ्यात मुख्य उद्देश रामायणाला बदनाम करण्याचाच दिसतो

मला हनुमान साधना करायची इच्छा असूनही अनेक वर्षे करता आली नाही. कारण रामाबद्दल असलेला राग. श्रीराम देव असूनही अस कसं करू शकतात या प्रश्नाने खूप अस्वस्थ केलं होतं. उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला. स्वतःला रामभक्त म्हणवणाऱ्या महाभागांनीही 'प्रजेसाठी केलं' हेच असंबद्ध उत्तर दिलं.
पुढे काही पुस्तकांच्या आधारे , अध्यात्म क्षेत्रातील लोकांच्या चर्चासत्राद्वारे या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अनेक पुराव्यासकट हे सिद्ध झाले आहे की रामचारीत मानस मध्ये उत्तर रामायणाचा उल्लेखही नाही. तुलसीदासना स्वतः हनुमंताने रामायण ऐकवलं आणि त्यांनी ते लिहून काढलं. तसेच वाल्मीकी रामायण मध्येही उल्लेख नाही. शेवटचा सीता खंडाचा भाग नंतर कसा जोडण्यात आला याच स्पष्टीकरण देणारे अनेक पुरावे आहेत.
रामानंद सागर यांनी मुलाखतीत उत्तर रामायण बनवण्यासाठी काँग्रेस नेत्यांकडून प्रचंड दबाव टाकण्यात आला. याविरोधात त्यांनी याचिका दाखल करून ती 10 लढली. याच नेत्यांनी नंतर रामयनावर आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल केल्या असे सांगितले आहे.
ही एकच गोष्ट नव्हे तर अनेक खोट्या गोष्टी रामायणात नंतर जोडण्यात आल्या. उदा.
1. सीतेची अग्निपरीक्षा . स्त्री दोषी असो किंवा नसो. तिच्यावर अन्याय झालाच पाहिजे. तिने दंड भोगलाच पाहिजे या मानसिकतेच्या लोकांनी केलेला हा एक निव्वळ फालतूपाना आहे
2. रणांगणात लक्ष्मणाने रावणाकडून ज्ञानप्राप्ती केली. का तर रावण जातीने ब्राम्हण होता.
3. रामाला रावणवध केल्यामुळे ब्रह्महत्येचं पाप लागलं म्हणून त्याने रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. पुन्हा रावण निव्वळ जातीने ब्राम्हण होता.
4. रामाने सीतेचा त्याग केला. का तर काहीही दोष नसतानाही परपुरुषाचा स्पर्श झाल्यामुळे पुरुषाने स्त्रीला वाऱ्यावर सोडून दिले तरी चालते ही दळभद्री मानसिकता.
या सगळ्यात मुख्य उद्देश रामायणाला बदनाम करण्याचाच दिसतो

तुषार काळभोर's picture

20 May 2020 - 5:24 pm | तुषार काळभोर

आपण भारतात जन्मून, इथले संस्कार घेऊन अमेरिकेत कौमार्य भंगाचे वय इतके कमी का आणि घटस्फोटाचे प्रमाण इतके जास्त का, यावर चर्चा करणे वांझोटे आहे.
तितकेच चारशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या आणि जगभरातील लोकांनी मिळून बनलेल्या अमेरिकेतील एखाद्या व्यक्तीने भारतात पंचवीस तीस वर्षांपर्यंत तरुणांना सेक्सचा अनुभव नसतो किंवा भारतातील स्त्रिया घटस्फोट n घेता तसेच कुढत आयुष्य काढतात, असं मत व्यक्त करणं सुद्धा तितकंच निरर्थक आहे.

आपण आपल्या चष्म्यातून दुसऱ्याच्या वागण्याचा तर्क, योग्यायोग्याता नाही ठरवू शकत.

तुम्ही तुमच्या घरात कसे वागता, ते बरोबर की नाही यावर इथेच मिपावर चार वेगळी मते असू शकतात. तिथं काही शतकांपूर्वी च्या (सत्य घटनेवर आधारित अथवा काल्पनिक) काव्यामध्ये असलेल्या घटनांचा केवळ साहित्यिक आनंद घेणं जास्त चांगलं.
तत्कालीन समाजमान्य रितीनुसार जे काही योग्य अयोग्य आहे ते रामायण - महाभारतात आले आहे. त्याला आताच्या समाज मान्यता च्या फ्रेम मध्ये बसवायचा प्रयत्न केला तर एकतर ती फ्रेम तुटेल किंवा ती काव्ये बिघडतील. आपल्या हाती केवळ वाया गेलेली कलाकृती येईल.

तुडतुडी's picture

20 May 2020 - 5:45 pm | तुडतुडी

सामाजिक चालीरीती सामान्य माणसांसाठी असतात. ईश्वर मनुष्य अवतारात आले तरी अन्यायी , अधर्मी चालीरितींचा अवलंब कधीही करत नाहीत. त्यांचे आदर्श , त्यांचे ज्ञान स्थळ , काळाच्या पलीकडचे असतात.
त्यावेळी युद्धात वीरगतीला प्राप्त होण्यासाठी आणि अनेक मुले मरूनही वंश पुढे चालू ठेवण्यासाठी अनेक स्त्रियांशी लग्ने करून अनेक मुलांना जन्माला घालण्याची रीत असूनही श्रीरामांनी एकपत्नी व्रताचा आदर्श ठेवलाच की.
बलात्कारित , अत्याचारातून जन्माला आलेली मुले आणि त्यांच्या आया याना न स्वीकारण्याची रीत असूनही श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह करून त्यांना मानाचं स्थान मिळवून दिलंच की.
स्त्रीने एकापेक्षा जास्त लग्न करण्याची रीत नसतानाही द्रौपदी 5 जणांची पत्नी झाली आणि ज्यांच्या स्मरणानेही पापाचा नाश होतो त्या पंचकन्यांमध्ये तीचं स्थान आहे.
तुकाराम , ज्ञानेश्वर , मीराबाई , जनाबाई आणि अनेक महात्म्यांनी अन्यायी सामाजिक चालीरीती मोडून उत्तम आदर्श घालून दिलेले आहेत.

उच्च कोटीचे अध्यात्मिक ज्ञान सामान्य माणसांना समजत नाही. त्यामुळे पुराणांमध्ये सामान्यांसाठी सांकेतिक , रूपकात्मक कथा लिहिल्या गेल्या आहेत. त्याचा मूळ अर्थ फार वेगळा असतो. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात उल्लेखल्याप्रमाणे गौतम अहिल्या कथेमध्ये शापामुळे अहिल्या दगड झाली म्हणजे खरोखरची दगड झाली असा अर्थ नसून तापस्येमुळे मिळवलेलं ज्ञान , भक्ती , सिद्धी नष्ट होऊन सामान्य स्त्री झाली असा आहे. त्याच वेळी अहिल्येनेही गौतमाना उलट शाप दिला आहे . तिच्या शापामुळे गौतम ज्ञानहीन होऊन अनेक वर्षे वेड्यासारखे वनात भटकत होते. पुढे भगवान शंकरांच्या कृपेने त्यांना पुन्हा ज्ञानप्राप्ती झाली आणि अहिल्येला श्रीरामांच्या कृपेने.
पण स्त्रीने नवऱ्याला शाप देणं म्हणजे तोबा तोबा . या मानसिकतेतून अहिल्येच्या शापाला जास्त प्रसिद्धी मिळाली नाही

दण्डवत आपल्याला.

पण लहानपणापासून ज्या व्यक्तीरेखा विविध कारणांनी आपल्या मनात ठसवल्या जातात त्यांच्यावरील चर्चा जास्त खोल प्रभाव टाकतात म्हणून चर्चा व सीरिअल रामाची करायची इतकेच अन्यथा रामानंतर न्यायी वागलेले अनेक ज्ञात अज्ञात जीव जीव भारतीय संस्कृतीत निपजले पण सीरिअल सोडा त्यांची नावेही ठाउक नाहीत...

उत्तर रामायण बाजूला काढले तर सीता नंतर रामसोबतच राहिली,लवकुशांचा जन्म राजवाड्यातच झाला त्यामुळे त्या अश्वमेधात त्यांनी रामाचा घोडा अडवण्याची आणि रामाला धारेवर धरण्याची कथा बादच होते

अवांतर - कितीही स्त्रियांवर अन्याय झाला असला तरी रामायणच जास्त भावते
जास्त अस्वस्थ करणारे महाभारत आहे

उत्तर रामायण बाजूला काढलं तर लव कुशांचा जन्मच होत नाही, राम राजा बनतो आणि रामायण संपते. अगदी फलश्रुती देखील युद्ध कांडाच्या शेवटी आहे.

कारण महाभारतातील स्त्रिया फक्त अन्याय सहन करणाऱ्या नाहीत>>>>>>तर अन्याय करणाऱ्या पण आहेत
गंगा -अष्ट वसूंच्या मुक्तीसाठी जरी त्यांना जन्मताच नदीत बुडवून मारले (अपवाद:शेवटचे:भीष्म )तरी राजा शंतनूच्या दृष्टीने त्याला काहीही माहित नसताना त्याची बाळे मारण्यासारखेच आहे
सत्यवती -वंश पुढे चालण्यासाठी दोन्ही सुनांना व्यासांशी संग करण्यास सांगणे (त्यांच्या मनाविरुद्ध -त्यातूनच पंडू (पंडुरोगग्रस्त ) व धृतराष्ट्र (जन्मांध) अशी संतती जन्मली (अंबेला तिचे लग्न ठरले असताना देखील भीष्मांकरवी पळवून आणले हे अजून एक)
गांधारी-पुत्रप्रेमापायी पांडवांवर अन्याय
कुंती - खोट्या इभ्रतीपायी पोटच्या पोराचे आयुष्य संपूर्ण बरबाद केले (कर्ण ),द्रौपदी ला पांडवांत वाटून तिच्यावर अन्याय
द्रौपदी - हिने कोणावर अन्याय असा नाही केला,तिच्यावरच पाच पांडवांची पत्नी बनावे लागण्याचा अन्याय झाला तरीपण कर्णाला स्वयंवरात 'सुतपुत्राला varnar नाही'म्हणून हिणवणे (स्वयंवरात त्याला entrych द्यायची नव्हती मग ),मयसभेत कौरवांना हसणे (आंधळ्याचे पुत्रही आंधळे असे म्हणून तेव्हाच दुर्योधनाने तो अपमान मनात ठेवून त्याचा सूड घ्यायचे योजले होते त्यातून पुढे वस्रहरणाचा प्रसंग )ह्या तिच्या कृत्यांची शिक्षा तिला मिळाली. आणि पूर्ण महाभारत हिच्यामुळेच घडले (म्हणजे युद्धामुळे घडणाऱ्या विनाशाला जबाबदार )

जाऊदे काल्पनिक म्हणून सोडून द्यायचे

चौथा कोनाडा's picture

30 May 2020 - 1:41 pm | चौथा कोनाडा

बाकी, मला उत्तर रामायणातील कुश आणि लव, अर्थात स्वप्निल जोशी आणि मयुर क्षेत्रमाडे यांच्या भुमिका खुप आवडल्या, मग त्या मालिकेसंबंधी माहिती साठी स्वप्निल जोशीच्या "पिल्लू टीव्ही" वरील मुलाखती पाहिल्या (नंतर त्याच आशयाची त्याची संक्षिप्त मुलाखत एबीपी माझावर झाली, ती पण छान होती)