शेंगोळी
लॉक आऊटच्या दिवसात भाजीपाल्याची कमतरता असताना काय करायचे हा गृहिणींना पडणारा एक यक्षप्रश्न. आमच्या सौने आज हुलग्याची शेंगोळी करून तिच्या नियोजन कौशल्याची पावती दिली. शेंगोळी, बाजरीची भाकरी, पापड, कांदा, लसणाची चटणी हा मेनू म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेल्या चाकरमान्यांसाठी मेजवानीच असते. माझ्या लहानपणी ऐन उन्हाळ्यात बैलजोडीने नांगरट केली जायची, त्या दिवसांची आठवण येते. रहरखत्या उन्हात राबणाऱ्या घरधन्यासाठी कारभारीण जी न्याहारी घेऊन जायची त्यात शेंगोळी आवर्जून असत. प्रथिनांचा पुरवठा करणारे मोड आलेले हुलगे, मठ यांचाही समावेश जेवणात असे.
