स्वच्छता आणि आपली मानसिकता
माझं डोकं हटलं होतं. कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. त्याच विचारात घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. त्यामुळे साहजिकच वातावरण तापलेलं होतं. ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. माझ्यासमोर एक माझ्याच वयाचा, कृश शरीरयष्टीचा (हे महत्त्वाचं आहे) मुलगा दाणे खात बसला होता. दाण्याची सालं खाली टाकत होता. ज्या प्लॅस्टीकच्या पिशवीतून खात होता ती पिशवी खाऊन झाल्यावर त्याने खिडकीतून बाहेर फेकून दिली. मी हा सगळा प्रकार मुकाट्याने बघत होतो. त्याने खिशातून दुसरी पिशवी काढून त्यातनं पुन्हा दाणे खायला आणि साल खाली टाकायला सुरुवात केल्यावर मात्र माझा ताबा सुटला. आधीच डोकं भडकलेलं असल्याने बोलण्यात चेव सुद्धा होताच.