आर्र....राजकुमार

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
20 Apr 2014 - 10:46 am

आर्र... राजकुमार

पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले.

जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच. पण दोन अफीम माफियांचे एका गांवात कायम युद्ध चालू असते, त्याच गांवात चंदा नांवाची एक चटकचांदणी मटकत असते आणि वेळप्रसंगी लोकांची धुलाईही करते याचे ज्ञान प्राप्त झाले. त्यातला झिपर्‍या हिरो तर कायम चुंबनाच्या पोझमधेच उभा बघून परमसंतोष जाहला. हिरविणीला तो इतक्यावेळा 'लॉलीपॉप' म्हणत असतो की चित्रपटाचे नांव, ल... लॉलीपॉप' असे का ठेवले नाही असा विचार डोक्यांत आला. हिरवीण म्हणजे आपले पूज्य शॉटगन यांची सुकन्या, सोनाक्षी सिन्हा' हे मात्र लगेच ओळखले. मारामार्‍यांची भरपूर रेलचेल आहे. प्रत्येक मारामारीत लगावलेल्या ठोशांचा आवाज एखादा बाँबस्फोट व्हावा इतका मोठा होता. चित्रपटातील गाणी केवळ अविस्मरणीय आहेत. गंदी बात, सारीके फॉलसा, मतमारी, धोखाधडी, कद्दु कटेगा या गाण्यांमधे आशयगर्भ काव्याचा आपण आस्वाद घेऊ शकता. हिरोची जीवनाबद्दलची मते त्या थोर शायरांनी पद्यात छान उतरवली आहेत. हिरो म्हणतो, मैं तो प्यार करता हूँ या मारता हूँ. लगेच त्याबरहुकुम 'प्यार प्यार या मार मार, असे लाजवाब गाणे तयार झाले. अशी काव्ये वाचायला,ऐकायला मिळाली की पुढच्या पिढीचे भवितव्य किती उज्वल आहे त्याची कल्पना येते.

या चित्रपटाचे वेगळेपण असे की यांत व्हिलनला भरपूर न्याय दिला आहे. आत्तापर्यंत कुठल्याही हिंदी सिनेमात मी कधी हिरोची इतकी जबरदस्त धुलाई झालेली बघितली नाहीये. बाकी पोटांत सुरे खुपसून गाडला गेल्यावरही शेवटच्या मेगा मारामारीत हिरो परत कसा येतो असले प्रश्न विचारायचे नसतात. मसाला मात्र ठासून भरला आहे. सोनाक्षीचे साडी नेसताना पदर खाली टकण्याचे दृश्य, लग्न झाल्यावर हिरो माझी साडी फेडून कायकाय करेल हे रिपीटेड संवाद चित्रपटाची उंची दाखवून देतात. हिरोचे डायलॉग तर अफलातून. 'तू सायलेंट हो जा नही तो मैं व्हायोलेंट हो जाऊंगा' हा तर भलताच भारी! विनोदासाठी पुन्हा असराणीला वेठीस धरले आहे. एका माफियाचा चमचा, भविष्यवेत्ता आणि प्रत्येक डायलॉग नंतर ते खास असराणी टच असलेलं, शोलेपासून चालत आलेलं, हॅ हॉ!

दिग्दर्शकाने यांत, तरुण पिढीला बरेच संदेश दिले आहेत. कुठल्याही मुलीला सतत छेडत रहावे, एक ना एक दिवस ती गळाला लागतेच. तिच्यासमोरच, तिला कोणी और चाहनेवाला असला तर त्याचे हातपाय तोडून टाकण्याची धमकी द्यावी, म्हणजे मग, आता याला 'वरल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्या चाणाक्ष्/सोनाक्ष मुलींच्या लगेच ध्यानात येते. 'तुम किसी औरको चाहोगी तो मुष्किल होगी' असे राजकपूरप्रमाणे मुळमुळीत सांगण्याचे दिवस संपले आहेत. प्यार या शब्दातच इतकी ताकद आहे की तुम्हाला कोणी मरेस्तोवर मारो, पोटांत सुरा खुपसो वा गाडून टाको. तुम्ही मरणे शक्यच नाही. आणि त्या प्यार साठी तुम्ही कितीही खून केलेत तरी तो गुन्हा धरला जात नाही.

घरी आल्यावर माहितीजालावर कळलं की तो झिपर्‍या म्हणजे शाहिद कपूर, व्हिलन सूद आणि इतक्या महान सिनेमाचे दिग्दर्शक 'प्रभुदेवा'.

अवांतरः माझ्या पलिकडच्याच रांगेत एक मॉड मुलगी बसली होती. ती हा चित्रपट एन्जॉय करत होती. पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती. या आजोबांना काय वाटत असेल, असे भाव तिच्या चेहेर्‍यावर दिसत होते.

संस्कृतीकलासमाजमौजमजाचित्रपटआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Apr 2014 - 11:08 am | पैसा

हसून मेले! सॉलिड चिरफाड! पण प्रभुदेवाच्या डॅन्ससाठी बघू काय?

आतिवास's picture

20 Apr 2014 - 11:10 am | आतिवास

:-)

यसवायजी's picture

20 Apr 2014 - 11:35 am | यसवायजी

मस्त. मजा आली.
गंदी बात मधल्या "मुंह पे थू थू थू" सारख्या ओळींनी गाण्याला एक वेगळ्याच 'लेवल' वर पोचवले आहे.

अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती
कोणते हो ते प्रसंग??
ह्यो पिच्चर बघणं आमच्याकड्न तर काय होनार न्हाई, तुमीच जरा इस्कटून लिवा की. ;)

यशोधरा's picture

20 Apr 2014 - 11:46 am | यशोधरा

टैमपास शिणुमा हाय त्यो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Apr 2014 - 12:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती.

तुमच्यात तिला पंकज कपुर दिसत असेल. *secret*

बाकी अजुन लिहा सिनेमा बद्दल... कारण आता कोणत्याही चॅनेलवर लागला तरी बघायचे धाडस होणार नाही

मार्मिक गोडसे's picture

20 Apr 2014 - 1:14 pm | मार्मिक गोडसे

< जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच. >
मान्य.
< हिरवीण म्हणजे आपले पूज्य शॉटगन यांची सुकन्या, सोनाक्षी सिन्हा' हे मात्र लगेच ओळखले. >
मग हे कसे ओळखले? आपल्या पाळ्णाघरात पूज्य शॉट्गन सोनाक्षीला ठेवत असे का?

तिमा's picture

20 Apr 2014 - 1:58 pm | तिमा

आमचीच शॉटगन वापरुन आमचाच एनकाऊंटर करताय की काय ? मग लोक मला 'महात्मा' म्हणायला लागतील.emo

दादा कोंडके's picture

20 Apr 2014 - 3:03 pm | दादा कोंडके

हा अत्याचार दर महिन्याला बंगळुर-पुणे प्रवासात सहन करावा लागतो. मागच्या प्रवासात शारुकचा 'जब तक है जान' लावला होता. सगळं पब्लिक मस्त एंजॉय करत होतं. बायकोनी फोनवर कोणता पिक्चर लागलाय? असं विचारल्यावर त्यावेळी नाव माहित नसल्यानं मी, "तो नै का, लंडन मध्ये गिटार वाजवून भीक मागणारा तो पण्णाशीचा हिरो भारतात ब्वांब स्क्वाड चा लीड होतो' असं सांगितल्यावर शेजारच्या प्याशिंजरने माझ्याकडे अरेरे वाला द्रूष्टीक्षेप टाकला. :(

हाहाहा खूप हसले! :) मजा आली.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2014 - 8:06 pm | अत्रुप्त आत्मा

बेफ्फाम मारलय!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

@अवांतरः माझ्या पलिकडच्याच रांगेत एक मॉड मुलगी बसली होती. ती हा चित्रपट एन्जॉय करत होती. पण अवघड प्रसंगात हळुच माझ्याकडे बघत होती. या आजोबांना काय वाटत असेल,
असे भाव तिच्या चेहेर्‍यावर दिसत होते.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

बाबा पाटील's picture

22 Apr 2014 - 8:25 pm | बाबा पाटील

अवघड प्रसंगात ती तुमच्याकडेच बघत होती,आणी दुसर म्हणजे मॉड म्हणजे तीने अस काय घातल होत अथवा न घातल होत की अवघड प्रसंगात तुमच तिच्याकडे लक्ष जात होत.आजोबा! अजुन बरेच तरुण आहात की तुम्ही.

हा हा हा.. मस्तच काका.. ह.ह.पु.वा. :D

तिमा's picture

23 Apr 2014 - 1:51 pm | तिमा

सर्वच प्रतिसादकांचे आणि माझ्या आजोबापणाविषयी भलत्या शंका घेणार्‍यांचे आभार.