मंगळ कार्य !
आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा?