मुंबईचे धडे - १
२००५ साली बी कॉम ची परीक्षा दिली नि मी नवीन कोर्स करिता कोकणातून मुंबईला येऊन दाखल झाले. ठाण्याला काकांकडे राहण्याची सोय झाली. स्टेशनपासून काकांचं घर अगदीच जवळ होतं. तशी मुंबईला राहायची आणि मुंबईची सवय करून घायची हि पहिलीच वेळ. याआधी कधीतरी फिरायला म्हणून कुणाबरोबर तरी मी मुंबई पाहिलेली. मुंबई बाहेरची असल्याने लोकल जिथपर्यंत जाते त्याला सगळ्याला मुंबई म्हणायचे. माझा क्लास विद्याविहार स्टेशन जवळ होता. तेव्हा रोज ठाणे ते विद्याविहार रोज लोकलचा प्रवास करावा लागणार होता. पूर्णपणे अनोळखी वातावरणात माझ्याबरोबर होती माझी मैत्रीण केतकी जीला थोडी तरी मुंबईची माहिती होती.