तुझी आठवण येते.
हेच एक निर्विवाद सत्य कोपऱ्यात मुलासारखे उभे असते.
हवं ते म्हण, हव्या त्या व्याख्या आणि संज्ञा निवड.
जोवर देहाचे अस्तर नव्याने फुलत आहे तोवर माझं मन तुझ्या पास येत राहील.
चुकलेल्या क्षणांसाठी आकांत करावासा वाटतो मला,
करतोही तो जीव तोडून, आतड्यापासून.
जीविताचे गुपित जगजाहीर करू म्हणतोस तर तुझ्या आपलेपणाचा ध्यास ओरडून सांगावा लागेल.
तुला कितीवेळा ते ऐकू आलंही आहे,
तू तुझ्या दुर्लक्षाची मालकी मला दे आता.
तेव्हढी माया अजून दाटून येत असेल तुझ्यात.
ती देखील जीवापाड जपेन.
विश्वासाचा एक आभाळतुकडा तुझ्या अंतरंगात तरंगत असेल की,
बघ मी किती झरोके उघडतो त्यासाठी.
बोलण्यासाठी जेव्हा विषय नुरत जातील आणि
शब्दाला शोधावी लागतील उच्चारांची दारे,
तुझ्या मूक होण्याचे दिवे लागतील खोलीभर,
मला उमजून येईल काहीच न मालवता.
अश्या अजून रात्री येतील, व्याकूळ.
फैजचे, तुम मेरे पास रहो कितीवेळा ऐकतो मी.
तुझ्यापरीस ठाव धरून वाटांवरती बेभान न पळणं
जेव्हा जमेल मला तेव्हा,
तुझ्या अबोल्यातले न कळलेले संयत प्रवाह,
माझ्यातही पाझरू लागतील.
खडक होत जाईल माझा त्यांना उराशी जपलेला.
भूगर्भातून तेव्हा
समजुतीच्या-तडजोडीच्या सांदीचऱ्यातून वाहेन मी,
अंजनाची डबी डोळ्याला लावून पाहशील का तेव्हा मला?