सभोवताली उदासी साचून राहीली आहे
तीचा परीघ केवढा हे माहीत नाही
माहीती करुन घेण्याची गरजही वाटत नाही
इथे फक्त मी आहे आणि माझ्यामध्येही ती आहे
अगदी तुझ्यासारखीच...
ती सुद्धा हल्ली कधीतरीच येते भेटायला, पण येते...
मग मी सुद्धा तीच्यासोबत काही क्षण घालवतो
ती लवकर जाऊ नये म्हणुन मुद्दाम एकटाच राहतो
आता तर वाटतं तीच मला जास्त जवळची आहे
अगदी तुझ्यापेक्षाही...
ही उदासी मला बर्याच ठिकाणी फिरवते
त्यातल्या काही जागा अजुनही ओळखीच्या वाटतात
मग तिथले गंध, आवाज मनात दाटतात
पण खरतर त्या सार्याच आता अनोळखी आहेत,
अगदी तुझ्यासारख्याच...
मला माहीत आहे ही जास्त वेळ राहणार नाही,
पण तरीही मी तीची मनधरणी करत राहतो
थांबेल थोडावेळ अजुन हे स्वतःला पटवत राहतो
ती मात्र अचानक, आली तशी निघुनही जाते
अगदी तुझ्यासारखीच...