ॲडमिशन Engineeringची : एक नाट्यछटा

Primary tabs

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
17 Nov 2018 - 11:24 pm

लेखक : कोणी का असेना.
स्थळ : इशान्य भारतातील एक राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कार्यालय
पात्र : सरकारी बाबू ( श्री. ना.पा. सघोडे)
पिता ( श्री. फा.र. चतापलेले)
पुत्र ( संदर्भास)
इतर सोयीनुसार

पार्श्वभुमी : अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागांचे सुयोग्य आणि यथार्थ वाटप व्हावे, म्हणून केंद्र सरकारने CSAB - NEUT ( Central Seat Allotment Board - North East & Union Territories) ची निर्मिती केली आहे. सदर प्रक्रियेनुसार जागांचे वाटप व भरती होऊन आता जवळपास दोन महीने लोटले आहेत.

( पडदा वर जातो. सरकारी बाबू कार्यसिद्धी करताहेतसे दाखवून समयप्रलाप करीत आहेत. तेवढ्यातच धाडकन दार उघडून श्री. फा.र. चतापलेले तावातावात आत शिरतात.)

फा.र.च. : अरे, काय चाललंय काय ह्या जगात? काही न्याय-बीय जिवंत आहे का नाही? किती ते सहन करायचं आम्ही?

स. बाबू : अहो, पण झालंय काय ते तरी सांगाल की नाही?

फा.र.च. : काय झालंय? काय झालंय? अहो, अन्याय झालाय अन्याय.. माझ्या लाडक्या पुत्रावर, नाजूकराज सुकुमारवर,त्या गोजिऱ्या इशान्य-भारतसुपुत्रावर घोर अन्याय होतोय त्या भारतभुमीत.. तरी मी त्याला सांगत होतो..

स.बाबू : अहो, पण काय झालंय ते स्पष्टपणे वदाल का?

फा.र.च. : ठिक आहे. सांगतो. आता अन्यायाला वाचा फोडायची म्हणजे भावनांच्या वारुंचे वेग आवरायलाच हवेत मला.. सांगतो.

माझ्या मुलाला दक्षिण भारतातील एका प्रख्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार. किती आनंदात होतो आम्ही सगळे ! पुत्रवियोगाचे दु:ख आणि मनातील अनेक किंतु दुर सारुन आम्ही त्यास भारतात धाडले. पण आता, पण आता त्यास...

स. बाबू : आता काय?

फा.र.च. : अहो, आता त्याला त्रास देताहेत हो त्या महाविद्यालयातील लोक.. काय तर म्हणे, तो बारावीत भौतिकशास्त्रात अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यास अभियांत्रिकी शिकता येणार नाही त्यांच्या राज्याच्या नियमानुसार. अरे, काय बोलताहेत हे?

स. बाबू (अचंब्याने) : अहो, काय बोलताय तुम्ही? बारावीत भौतिकशास्त्रात अनुत्तीर्ण झालाय तो, तरीही Engineering करतोय?

फा.र.च. (तडफेने) : तर काय झालं? झाला अनुत्तीर्ण भौतिकशास्त्रात, तर काय? अहो, गेले ते दिवस तुमचे PCM चे मार्क्स बघण्याचे.. केंद्रीय शिक्षण बोर्डानेच उत्तीर्ण केलाय त्याला, कारण की बाकीच्या विषयातले गुण मिळून Passing Percentage च्या वर आहेत त्याला..

स. बाबू ( कळवळून स्वगत) : हा हंत हंत ! अरे, जेव्हा नुस्ते तीन मार्क कमी पडले एका विषयात ऑक्टोबरची वारी करवलीस मला, तेव्हा कुठे रे गेला होता बोर्डा तुझा धर्म !?

फा.र.च.: तर आता तुम्ही लवकरात लवकर ह्या समस्येचे निराकरण करा..

स. बाबू : अहो, पण जर त्याला बारावीत भौतिकशास्त्रात उत्तीर्णही होता येत नसेल, तर तो Engineering..

फा.र.च. : (मधेच त्याला कापत) ते तुम्ही काही शिकवू नका.. त्याला बोर्डाने उत्तीर्ण केलाय, आणि मग त्याला इशान्य-भारतपुत्र असल्याने जागादेखील मिळालीय त्या प्रख्यात महाविद्यालयात. त्याच्यावर आता कुणीही कसलीही सक्ती करु शकत नाही..

(रुद्ध कंठाने) अहो, किती त्रास देताहेत ते माझ्या गोजिऱ्या पुत्रास! त्याला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पाचारण केले त्यांच्या कक्षात. त्यास त्याच्या अपयशाची आठवण करुन दिली. किती यातना झाल्या असतील त्याच्या कोमल, सुकुमार मनास? आणि कोण म्हणतो तो अनुत्तीर्ण झालाय म्हणून? त्याला बोर्डाने स्वत:हूनच उत्तीर्ण केलंय ना! मग?

स.बाबू : पण मी काय म्हणतो...

फा.र.च. : काही म्हणू नका.. ही बघा, मी तक्रार आणलीय माझ्या पुत्रावर तो इशान्य-भारतीय असल्याने पक्षपातीपणाने अन्याय होत असल्याची. जर त्याला कोणी काही बोललं ना, तर न्यायालयात खेचेन एकेकाला..

स. बाबू : अरे, भा$खा&, I mean, भावा, दम खा की जरा वाईच.. च्यायची, मी बघतो वरीष्ठांशी चर्चा करुन काय करता येईल ते..

फा.र.च. : बघाच, आणि करा लवकरात लवकर काहीतरी.. माझा लाडका सुपुत्र, इशान्य-भारतपुत्र वगैरे वगैरे...

(सरकारी बाबू, श्री. ना. पा. सघोडे सगळी घटना सांगायला आपल्या वरीष्ठांकडे जातात.)

वरीष्ठ : आँ ! Failed in physics in 12th and still studying Engineering?

स.बाबू : होय, सर.. (आणि त्यांना पुर्ण कहाणी सांगतो.)

वरीष्ठ : हम्म.. फारच वटवटतोस तू.. मला एक सांग. त्याने सगळ्या प्रक्रिया योग्यपणे पार पाडल्या होत्या का?

स.बाबू : होय, महोदय..

वरीष्ठ : आपल्या कार्यालयाने सगळ्या बाबी आणि प्रक्रिया पाळल्या होत्या का?

स. बाबू : होय, महोदय..

वरीष्ठ : झालं तर मग.. एक खरमरीत निषेध खलिता धाड, कि सदर व्यक्तीने परीक्षेची व प्रवेशाची सगळी प्रक्रिया पाळलेली आहे आणि केंद्रीय प्रक्रियेचे सुयोग्य पालन केल्यावर सदरहू दाक्षिणात्य राज्याचे नियम इशान्य-भारतातून आलेल्या आमच्या विद्यार्थ्याला लागू नसावेत.
आता व्यवस्थेतच ही त्रुटी आहे, त्याला तू तरी काय करणार आहेस, बाबा?

स. बाबू : जशी आपली आज्ञा, महोदय..

(मग सरकारी बाबू श्री. ना. पा. सघोडे दुरभाष, यांत्र-पत्र, पत्र इत्यादी सर्व पद्धतीने भौतिकशास्त्रात अनुत्तीर्ण झालेल्या नाजूकराज सुकुमार ह्याच्या अभियांत्रिकी शिकण्याच्या अधिकाराचा पाठपुरावा करतात, व महाविद्यालयाच्या नाकावर टिच्चून इशान्य-भारतपुत्र शिकत राहतात.)

नाट्यपद :

‘असेच आमचे जन्मस्थळ आणि ग्रहमानही असते थोडे
अम्हीही Engineer झालो असतो, वदले नापासघोडे..’

(पडदा पडतो.)

नाट्यवाङ्मयमुक्तकविनोदसमाजप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

नाखु's picture

17 Nov 2018 - 11:37 pm | नाखु

काय आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2018 - 11:16 am | डॉ सुहास म्हात्रे

सरकार आणि त्याने बनवलेले कायदे गाढव असतात याचा एक उत्तम नमुना ! :( =)) (हसू का रडू हे न कळल्याने ही दोन स्मायलीचिन्हे)

दुर्गविहारी's picture

18 Nov 2018 - 11:48 am | दुर्गविहारी

खरं आहे. आरक्षणाच्या सीटबाबत म्हणता येईल. कपाळ बडवण्याची ईमोजी टाका.

वरुण मोहिते's picture

18 Nov 2018 - 12:00 pm | वरुण मोहिते

लिहिलंय

चिगो's picture

18 Nov 2018 - 3:04 pm | चिगो

नाखुंनी विचारलंय कि, हे सगळं काय आहे? काही लोक ह्याला आरक्षणाशी जोडतील. सत्य घटनेवर आधारीत असल्याने तो एक लहानसा मुद्दा आहे, पण मी त्यामुळे हे लिहीलेलं नाही. कारण मला जे सांगायचं आहे, त्यात अनारक्षित वर्गाचाही समावेश आहे..

तर एका शब्दात सांगायचं झाल्यास, ही 'खंत' आहे.
'ओव्हरप्रोटेक्टीव्ह पॅरेंटींग' मुळे आता मुलांना अपयशच दिसू नये, ह्या शुद्धोदन अ‍ॅटीट्युड बद्दलची खंत..
'तो पडेल' म्हणून त्याला कुठे चढूच न देण्याच्या वाढत्या वॄत्तीबद्दलची खंत..
'त्याच्या मनाला धक्का बसेल', 'त्याला झेपणार नाही' म्हणून त्याच्या अपयशालाच यशाचा मुलामा देण्याच्या वृत्तीची खंत..
पांगळा नसतांनाही उगाच 'अ‍ॅडीशनल सपोर्ट' म्हणून कुबड्या काखेत देण्याबद्दलची खंत..
हीच वृत्ती आता सार्वत्रिक झाली असल्याने, व्यवस्थेनेही त्या वृत्तीलाच खतपाणी घालणारी skewed व्यवस्था निर्माण करावी ह्याबद्दलची खंत..
आता व्यवस्था निर्माण झालीच आहे, तर नैतिक अधिकार वगैरे चुलीत घालून 'अन्याय होतोय आमच्यावर'चा कंठशोष करण्याबद्दलची खंत..
आणि मनाला पटत नसतांनाही, व्यवस्थेचा भाग असल्याने ह्या विचित्र व्यवस्थेचे निर्वहन करण्याबद्दलची खंत..

'अपयश ही यशाची पहिली पायरी असते' हे शाळेत वाचलेलं वाक्य मानून माझी पिढी आमच्या छोट्यामोठ्या अपयशांशी लढली. कधी जिंकलो, तर कधी हरलो पण झगडायचं सोडलं नाही. आता 'अपयश' हा शब्दच नाहीसा करण्यासाठी सगळे धडपडताहेत असं दिसतंय. कदाचित आमचा स्वतःवरील आणि आमच्या पुढच्या पिढीवरील विश्वास डळमळीत झाला असावा. माझ्यापुरता तरी मी मुलांच्या भविष्याबद्दल अश्या परीस्थितीत जास्त चिंतीत आहे, कारण आता माझ्या वैयक्तिक धारणांच्या विरुद्ध व्यवस्थेनेच त्यांना 'सांभाळण्याचा' चंग बांधलाय, असं दिसतंय.

जाता जाता : मागच्या दोन-तीन वर्षांत महाराष्ट्रात कुणीही दहावी-बारावीत नापास झालं नसल्याचं ऐकलंय. हे खरं असल्यास, महाराष्ट्रातील समस्त विद्यार्थीवर्गाचा बुद्ध्यांक वाढल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो.. फक्त आता कुसुमाग्रजांची 'कणा' कविता पुस्तकांतून काढून टाकावी. तिचं तसंही काही प्रयोजन उरलेलं नाहीय.

झेन's picture

18 Nov 2018 - 4:27 pm | झेन

लेख छान आहे असं म्हणायचं का नाही कळत नाही, कारण वेदना छान मांडली आहे पण विषय अभिमानास्पद नाही. प्रतिसाद अगदी भिडला चिगो.
सोईस्कर पणे अस्मिता असतात पण 'कणा' विकणे आहे : (

नाखु's picture

18 Nov 2018 - 8:05 pm | नाखु

प्रकाश पडला!

विद्यार्थी वाचकांची पत्रेवाला नाखु

ईशान्य भारतीयांना आपण भारतीय आहोत असं वाटत नाही, ही आपल्या सीस्टीमची शोकांतिका म्हणावी का?

संदर्भ: पुत्रवियोगाचे दु:ख आणि मनातील अनेक किंतु दुर सारुन आम्ही त्यास भारतात धाडले.

आणि, मार्क्स, ऍप्टिट्युड वगैरे, वगैरे नसताना ईशान्य भारतीय पुत्रच काय भारतातले बरेच पुत्र आणि पुत्री बरंच काही शिकतात. ईशान्य भारतीय पुत्राला संधी मिळत असेल तर का नाही. निदान मुख्य प्रवाहात येतील. अख्खा भारत आपला आहे आणि आपण त्या अख्ख्या भारताचे आहोत, असं कधी तरी कुठल्या तरी ईशान्य भारतीय पिढीला वाटेल.. ( अशी माझी भोळी आशा आणि इच्छा)

चिगो's picture

18 Nov 2018 - 4:53 pm | चिगो

हे वाक्य असंच्या असं बोललेलं नाही कुणी मला कधीही.. ती माझी नाट्यमयता आहे.

असो.. सोयिस्कर असतील तर ‘अस्मिता’ गुंडाळून ठेवण्यात (संदर्भ : झेन ह्यांचा प्रतिसाद) ईशान्य भारतीयदेखील बाकींच्यासारखेच आहेत. गरज आणि फायदा असेल तर ‘भारत माता की जय’, नाहीतर आहेच.. बाकी विषय ईशान्य-भारतीयांना संधी न मिळण्याबद्दल नाहीच आहे.

विषय ईशान्य भारतीय लोकांना संधी मिळण्याचा नाही, हे लक्षात आले लेख वाचूनच.

हे वाक्य असंच्या असं बोललेलं नाही कुणी मला कधीही.. ती माझी नाट्यमयता आहे. > शस्त्रापेक्षा लेखणी अधिक धोकादायक म्हणतात, ते खरेच म्हणायचे! :)

चिगो's picture

18 Nov 2018 - 6:07 pm | चिगो

मला बोललं नाही कुणी, पण म्हणून मी ते कुणाला बोलतांना ऐकलेलंच नाही, असं होतं नाही ना? 
ते वाक्य नाही तरी ती भावना बरीच काॅमन आहे माझ्या अनुभवानुसार..

यशोधरा's picture

18 Nov 2018 - 6:43 pm | यशोधरा

ओके :)

ब-याच वर्षापूर्वीचा अनुभव आहे नागालँडची शाळकरी मुले यू ईंडीयन्स अशी बोलत होती तेंव्हा पहिल्यांदा शॉक बसला.

नुकतेच मिझोरममध्ये काही दिवस राहून आलो. ऐझॉल ह्या राजधानीच्या गावात, हॉटेलऐवजी "होम-स्टे" चा पर्याय मुद्दाम निवडला, जेणेकरून स्थानिकांशी काही संवाद होईलच खेरीज, काही अस्सल मिझो घरगुती खाद्य-पदार्थांचीही चव चाखता येईल (याविषयी नंतर कधीतरी)

घरमालक हा मोठ्या पदावरील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेला. स्वतःच्या तीन मजली घरातील वरच्या मजला हा पर्यटकांना देण्यासाठी ठेवलेला. बोलताना अनेक गोष्टी समजल्या. अतिशय उच्च साक्षरता असलेल्या ह्या राज्यात खासगी नोकर्‍या फारशा नाहीत. सगळी भिस्त सरकारी नोकर्‍या मिळवण्याकडेच. उच्च शिक्षणासाठीदेखिल राज्याबाहेरच बहुधा जावे लागते. तरीही त्याच्या किंवा अन्यांच्याही बोलण्यात वेगळेपणाची भावना फारशी आढळली नाही.

तरीही भोचकपणे विचारलेच!

त्याने कपाटातून एक चित्रमय पुस्तक काढून हातात दिले - THE MIZO ACCORD (The only insurgency in the world which ended with a stroke of pen)

संदर्भ अर्थातच ३० जून १९८६ रोजी झालेला मिझो नॅशनल फ्रन्ट (लालडेंगा) आणि तत्कालीन भारत सरकार (राजीव गांधी) यांच्यात झालेला शांती-करार.

नाट्यछटा आवडली हेवेसांनल.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2018 - 11:39 am | मुक्त विहारि

नाट्य छटा आवडली...

विनिता००२'s picture

19 Nov 2018 - 2:03 pm | विनिता००२

प्राध्यापकांची नावे आवडली आहेत :)

विनिता००२'s picture

19 Nov 2018 - 2:04 pm | विनिता००२

नाही नाही...सरकारी बाबू व पिता यांची नावे आवडली आहेत :हाहा:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2018 - 9:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुत्तीर्ण असून प्रवेश ? अवघड आहे सर्व.

-दिलीप बिरुटे