कविता

दुपार

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
18 Sep 2019 - 9:33 am

तिच्या पैंजनाची गाज,
त्यात रेंगाळे दुपार,
विसावल्या सतारीची
जणू छेडियली तार,

तिच्या कपाळी जी बट
त्याला कुंकवाची तीट,
लाल रेशमी लडीची,
तिच्या गालाशी लगट

तिच्या पाठीची पन्हाळ
त्यात घामाचा पाझर,
तिच्या नाजूक कटीला,
शोभे नाजूकसा भार..

तिच्या बाहूंचा मांडव,
लावी मदनाला वेड,
तिची महकती काया
तिचे ओझे अवघड..

सुस्त दुपारच्या वेळी,
ती येते का सामोरी,
मन हलते हलते,
त्याला सांभाळावे कोणी?

- शैलेंद्र.

शृंगारकविताप्रेमकाव्यमुक्तक

दोरीवरचे कपडे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
4 Sep 2019 - 2:37 pm

दोरीवरचे कपडे

दोरीवर कपडे कसेही वाळत असतात
कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात?

शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो
फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो
(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)

पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत
दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत

नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते
भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे

साडी घालून घडी बसते वाळत
वा-याने तिचा पदर असतो हालत

किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल
गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल

काहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविताहास्यकवितामुक्तकविनोदमौजमजा

पाणी-च-पाणी

बी.डी.वायळ's picture
बी.डी.वायळ in जे न देखे रवी...
3 Sep 2019 - 4:26 pm

असा कसा हा पाऊस |
पडला बेधुंद होऊन,
कित्येकांचे संसार ,
गेले पाण्यात वाहून |

शंभर वर्षाचा त्याने,
म्हणे रेकॉर्ड मोडला |
जणु फाटले आकाश,
असा पाऊस पडला |

सरला श्रावण मास,
भाद्रपद सुरु झाला |
तरी ही पावसाचा,
जोर कमी नाही झाला |

किल-बिलती पाखरे,
कशी झाली ओलीचिंब |
परी कधी नाही केली,
त्यांनी कुठे बोंबाबोंब |

मिळेना खेळायला,
मैदाने झाली ओली |
कंटाळुन गेली ती,
शाळेतील मूल-मुली |

माझी कविताकविता

पहाट

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
2 Sep 2019 - 3:26 pm

सांज सकाळी
निळ्या आभाळी
कुठून येतो
पंखांना आवेग...

कृष्णसावळ्या
चित्रकथेतून
कसा विहरतो
जडावलेला मेघ!

लज्जाभरल्या
गालावरती
कशी उमटते
गोड गुलाबी लाली...

घरट्यामधल्या
त्या पिल्लांना
कोण सांगतो
उठा, पहाट झाली!

कविता

पाय सरावले रस्त्याला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
2 Sep 2019 - 12:09 am

-: पाय सरावले रस्त्याला :-

मी चाललो, चाललो इतका की
रस्ता ओळखीचा झाला
दुसरी वाट धरावी तर
पाय सरावले रस्त्याला ||ध्रू||

खाच खळगे नेहमीचे झाले
नवे नव्हते वाटले
अडथळे तसेच होते
पायात काटे खुपसले
काट्यांनी तरी जावे कोठे
त्यांना कोण सोबती मिळाला?
पाय सरावले रस्त्याला ||१||

अडचणी अनंत आल्या
उभ्या राहील्या समोर
नेट लावून सामोरी गेलो
प्रश्न अनेक पुढे कठोर
जंजाळ पसरले समोर असता
एक पक्षी अचूक उडाला
पाय सरावले रस्त्याला ||२||

प्रेरणात्मकभावकवितामाझी कवितामुक्त कविताकविता

संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
1 Sep 2019 - 12:14 pm

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....
मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर
लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर
सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात
घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....
तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे
बघू देत लोकांना देवांना साधुंना
माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून
तिच्या देहात लयदार मिसळताना.....

कविता माझीकालगंगातहानप्रेम कविताभावकवितामनमेघमाझी कविताविराणीकरुणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमान

शब्द

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
29 Aug 2019 - 4:51 pm

शब्द निरर्थाचे भोई
शब्द अर्थभार वाही
शब्द धूसर सावली
शब्द दाहक बिजली
शब्द कोरडा व्यापार
शब्द अस्तित्वाचे सार
शब्द व्योमापार शिडी
शब्द गहनडोही बुडी
शब्द अटळ कुंपण
शब्दापार मुक्तांगण

मुक्त कविताकविता

ओठात दाटलेले...

निलेश दे's picture
निलेश दे in जे न देखे रवी...
28 Aug 2019 - 9:55 pm

ओठात दाटलेले ते भाव ओळखीचे
सांगू नकोस आता ते गाव ओळखीचे

हातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही
घेवू नकोस आता ते नाव ओळखीचे

सोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी
दावू नकोस आता ते घाव ओळखीचे

गावात बांधलेला वाडा उजाड आहे
पाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे

सोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही
खेळू नकोस आता ते डाव ओळखीचे

निलेश देऊळकार
अडगाव बुll
9767888855

gajhalकविता

शोक कुणाला? खंत कुणाला?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
25 Aug 2019 - 9:11 pm

हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी
धडधड धडधड रान पेटते......
शोक कुणाला? खंत कुणाला?

चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती
लपलप लपलप ज्वाला उठती......
शोक कुणाला?खंत कुणाला?

पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे
भडभड भडभड पाने रडती....
शोक कुणाला? खंत कुणाला?

पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे
चरचर चरचर डोळे झरती......
शोक कुणाला? खंत कुणाला?

कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते
करकर करकर शाप जीवांचे,
थरथर.... इथवर ऐकू येते.....

-शिवकन्या

आता मला वाटते भितीइशाराकविता माझीकालगंगामाझी कविताभयानकमांडणीवावरकवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलराहती जागा

कृष्णजन्म

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
23 Aug 2019 - 9:42 pm

कान्हा !

कुठून रे अक्षरं आणू?
कसे शब्द बांधू?
कश्या भावना गुंफू?
हजार नावं घेऊ?
का शब्दब्रह्म गाऊ?
तुळशींनी सजवू?
मनमखरात बसवू?
का पंचप्राणंच अर्पू?
सगळंच उष्टावलयंस तू ?
कशाचा नैवेद्य दाखवू?

निळाईसंग उत्तुंग आभाळी,
सावळदंग अभंग सावली,
मिस्कीलढंग अनंग माऊली,
मयूरपंखी रंग तुझ्या कपाळी ।।

सावरीत मुग्ध अलगुज,
ऐकवीत गुप्त हितगुज,
खेळवीत मुक्त गाईगुजं,
प्रकटीत तृप्त आत्मगुज ।।

कविता