गणित..
चाळीशी ओलांडली की जगण्याचं गणित थोडं सोपं होतं.
करिअरचा दुभाजक पार केलेला असतो.
बायकोमुळे अपूर्णांकाचा पूर्णांक झालेला असतो.
घरातले लसावि, मसावि होत असतात.
नाकावर चाळिशी आणि नाकासमोर सरssळ रस्ता असं एकरेषीय समीकरण असताना अचानक ..
प्रमेय बनून ती येते.
सुरवातीचं अवघडलेलं अनोळखीपण गेलं की जाणवतं ते "मी"पणा दशांशानेही नसलेलं तिचं निर्मळपण.
खाचाखोचा नसलेलं निरागस, प्रसन्न हास्य.. वाहता दहाचा पाढा जणू!
रुढार्थाने ती सुंदर असेलच असं नाही; पण तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अमर्याद सुंदर ... प्रतलच..