ओमर खय्याम भाग - १
ओमर खय्याम भाग - २
ओमर खय्याम भाग - ३
ओमर खय्याम भाग - ४
ओमर खय्याम भाग - ५
ओमर खय्याम भाग - ६
ओमर खय्याम भाग - ७
ओमर खय्याम भाग - ८
ओमर खय्याम भाग - ९
ओमर खय्याम भाग - १०
ओमर खय्याम भाग - ११
ओमर खय्याम भाग - १२
ओमर खय्याम भाग - १३
अमोल क्षणांची फुले !
खय्यामला माझ्या मते मित्र आणि सवंगडी यांच्याशिवाय मुळीच करमत नसावे. आपल्या सारखेच. त्याच्या सगळ्या मित्रांना त्याच्या प्रेयसीएवढेच महत्व आहे. किंबहुना जरा जास्तच आणि त्यामुळे मित्रांमधील एखादा जाणे यासारखी दु:खद घटना तो सहन करु शकत नसावा.
एखादा मित्र जाणे हा त्याला देवाचा दुष्टपणा वाटत असे. अर्थात त्याचे मित्रपण त्याच लायकीचे असणार हे निर्विवाद.
ज्यांचे जीवनावर प्रेम आहे त्यांना मित्र असणे अपरिहार्य आहे. त्यांची, एखादा मित्र गेल्यावर काय अवस्था होते हे आरती प्रभूंनी फार छान सांगितले आहे -
एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्म्रृतींवर
हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
आणि मग कधीतरी झोपेतून उठून
स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
स्वत:लाच नमस्कार करतात !
एकमेकांच्या संगतीतील दिवस आठवून !
देवाच्या ह्या दुष्टपणाला उत्तर म्हणजे जास्त विचार करायचा नाही. म्हणजे हाच क्षण जगायचा नाहीतर गेलेल्या मित्रांशिवाय जगणे अशक्य आहे.
खय्याम म्हणतो,
त्याचा दुष्टपणा समजून घ्या मित्रांनो !
पहा हे रिकामे जग, त्याने ओढून नेले आहेत मित्र.
जगता आला तुझ्यापुरता हा क्षण तर जग,
उद्याकडे बघू नको, काल शोधू नको, पहा फक्त हाच क्षण.
आरती प्रभूंच्या कवितांवर इथेच या रूबायांनंतर लिहायचा विचार आहे.
वेदना आणि औषध
ज्याला अंतीम सत्य काय आहे हे उमगले आहे, तो अतीसुखाने वेडा होत नाही आणि तो अती दु:खाने कोलमडूनही पडत नाही. दोन्हीत तो तसाच तटस्थ असतो. हे पराकोटीचे अवघड आहे. चांगले, वाईट ही मानव निर्मित कल्पनांची जाळी आहेत. त्यात अडकणे म्हणजे कोळ्याने स्वत:च्या जाळ्यात अडकण्यासारखे आहे. आपण मात्र परमेश्वराच्या नावाने खडे फोडत असतो किंवा त्याची पुजा घालतो, जसे काही त्याला तेवढेच काम आहे.
खय्याम म्हणतो,
ज्याला विश्वाचे उलगडले गूढ ,
त्याला सारखेच सुख आणि दु:ख.
जर वाईट, चांगले याचा होणार अंत,
तू वेदना का औषध, काय आहे अंतर ?
एक लक्षात घ्या, या दोन्ही कल्पनांचा अंत होणारच आहे. आनंद आणि दु:ख हे काही अंतीम सत्य नाही. हे एकदा पटले की उमजेल – वेदना आणि औषध एकच आहे – “तू स्वत:”
निर्लज्ज !
आपण जगात जे चाललंय ते गुपचुप बघतो. आपल्याला अनेक महाराज, साधू असे दिसतात ज्यांनी आपल्या ह्या जीवनाची सुरुवात भोंदूगिरीने केली आहे. मध्यंतरी मी एक लेख इंटरनेटवर वाचला त्या लेखात सत्यसाईबाबांच्या सर्व काळ्या कृत्यांची इत्यंभूत माहिती दिली आहे. ज्यांना तो वाचायचा आहे त्यांनी तो माझ्याकडून घ्यावा.
आता जर आपण सत्यसाईबाबा हे एक भोंदू व बदमाश साधू आहेत हे सांगायला गेलो तर बहुतेक आपली हत्याच होईल. अशा ह्या जगाला उद्देशून खय्यामने ही उपरोधिक रुबाया लिहिली आहे.
खय्याम म्हणतो,
शक्य असल्यास त्या दुष्टबुद्धीचे अनुकरण कर,
तोड पाया त्या प्रार्थनांचा आणि उपवासांचा.
खय्यामकडून ऐक सत्य काय आहे,
मद्य पी, वाटमारी कर आणि त्याचा दानधर्म कर !
असे केले की मग तुम्हाला सगळे माफ आहे.!
टीप : अशा सर्व भोंदू आणि शक्तिमान बदमाशांचे इंटरनेट हे एक कब्रस्तान आहे. येथील मुडदे मातीत मिसळत नाहीत. तुम्ही ते केव्हाही उकरुन काढू शकता. सायन्सचे हे एक आपल्यावर प्रचंड उपकार आहेत.
सत्यानंद – भक्तगण ४५ लाखाच्यावर –अधिक लिहायला नको.
इच्छाधारी – भक्तगण २ लाखाच्यावर.-हे तर म्हणे वेश्या व्यवसाय चालवतात.
आसारामबापू – पोलीसांचे तोंड चुकवत फिरत आहेत.
हे फक्त हिमनगाचे टोक आहे.
कधी शहाणे होणार आपण, परमेश्वरच जाणे !
खरे निवांत !
आपल्याला जन्ममृत्यूच्या सात फेर्यातून जावे लागते असे म्हणतात. काय गंमत आहे बघा, कोणालाही विचारा, तो हेच म्हणेल की पुढचा जन्म नको रे बाबा. असे का होते ? मला वाटते याच्यामागे आपली चुकीची विचारधारा आहे. माणसाला परमेश्वराने विचार करण्याची ताकद दिली आहे म्हणून माणूस स्वत:ला फार महत्व देतो. मला नेहमी आश्चर्य वाटते, पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांचे काय ? कारण त्यांच्याकडे असतो तो फक्त instinct. जेव्हा माणूस, पुढचा जन्म माणसाचा नको रे असे म्हणत असतो तेव्हा तो खरंतर म्हणत असतो दु:ख पुरे. जे याच्या पलिकडे गेले आहेत त्यांना हा प्रश्न पडत नाही.
खय्याम म्हणतो,
मानवाच्या नशिबी ह्या जंगली जगात,
दु:ख, निराशेशिवाय आहेच काय ?
सह्रदयी पटकन या जगातून गेले,
खरे निवांत ते, जे आलेच नाहीत !
चांगले, सज्जन या जगातून लवकर जातात, आणि खरे नशिबवान आणि ज्यांना कसलाही त्रास नाही ते कोण आहेत ? जे या जगात आलेच नाहीत.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
3 Jul 2011 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> आरती प्रभूंच्या कवितांवर इथेच या रूबायांनंतर लिहायचा विचार आहे.
वाट पाह्तोय...!
-दिलीप बिरुटे