ओमर खय्याम.....भाग - १०

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Jun 2011 - 6:47 pm

ओमर खय्याम भाग - १
ओमर खय्याम भाग - २
ओमर खय्याम भाग - ३
ओमर खय्याम भाग - ४
ओमर खय्याम भाग - ५
ओमर खय्याम भाग - ६
ओमर खय्याम भाग - ७
ओमर खय्याम भाग - ८
ओमर खय्याम भाग - ९

सुरई आणि खुजे प्याले !

खय्यामला ढोंगीपणाची आणि वैचारिक भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. पाचवेळा नमाज पढणे आणि त्याचवेळी भ्रष्ट मार्गांचा अवलंब करायचा हे त्याला उमजत नसे. ह्या असल्या माणसांपेक्षा दारु पिणारे ( दारु पिणे हे फार मोठे पाप आहे असे त्यावेळी इस्लामी जगतात समजत असत) बरे.
ते निदान स्वत:शी प्रामाणिक असतात म्हणून सुरईसारखे ताठ मानेने उभे राहू शकतात. बाकी सगळे आमच्यासमोर खुजे आहेत प्याल्यांसारखे.

खय्याम म्हणतो-

तुम्ही परत आपल्या भ्रष्ट वहिवाटीवर आला आहात.
कुठले पाच नमाज आणि कसले काय !
जेथे प्याले आहेत तेथे बघा,
आम्ही दिसू ताठ मानेने उभे, सुरईसारखे !

दुसरा अर्थ म्हणजे – कर्मठ, ढोंगी, नाटकी बुवांबाजीपेक्षा सामान्य संसारात रमणारे लोक हे बरेच श्रेष्ठ आहेत. याची उदाहरणे आपण आपल्याभोवती बघतोच आहोत. मित्रहो, लक्षात ठेवा तुम्ही त्या लबांडांच्या पेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहात.

चुंबन!
जन्म आणि मृत्यू आपल्या हातात थोडेच असतात ? आपण येतो आणि जातो.
या दोन्हीमधला काळ आपला ! संसारात येताना जर आपल्याला परमेश्वराला विचारता आले की हा मधला काळ केवढा ? तर आपल्याला काय उत्तर मिळेल ?
या प्रश्नातली गंमत लक्षात आली का? मृत्यू नंतर काय ? माझे प्रयोजन काय ? यापेक्षा किती काळ, हे महत्वाचे आहे. ते जर कळणार नसेल तर त्या (जो काही आहे तो) काळात काय करायचे हाच प्रश्न उरतो !
त्या काळात या संसाराची मजा घे असे खय्याम सांगतोय.
खय्याम म्हणतो,

उत्कंठतेने त्या सुरईच्या ओठाला ओठ मी माझे लावले
किती जगणार मी ? मी तिला विचारले.
ओठाने माझे चुंबन घेत ती कुजबुजली,
पी ! हे मद्य पी ! ह्या जगात परत कोण आलंय ?

आपले ओठ आणि सुरईचा काठ हे पण सुरईचे ओठच आहेत. त्यांच्यामधील चुंबनाचा अर्थ फार गहन आहे.

सल्ला !
खय्याम म्हणतो,

माझं ऐकणार असशील तर सल्ला घे,
मनाची बाळग आणि उतरव ही ढोंगीपणाची वस्त्रे
पुढचे तास परलोकात, हे सगळे क्षणभंगूर आहे.
त्या क्षणिक लोभासाठी नको विकू हे शाश्वत मूल्य!

ज्या इमामाने त्याला त्याच्या “प्रयोजन” आणि कर्तव्याबद्दल सल्ला विचारला त्याचे हे कदाचित थोडक्यात उत्तर असावे. अर्थात मला खात्री आहे हा सल्ला त्याला पाळणे शक्यच नव्हते. हे करायला फार मोठे धैर्य लागते ते कोठून आणणार ?
सगळ्या ढोंगी बाबांना उद्देशून ही रुबाई आहे. सध्या असल्या तथाकथीत ज्ञानी अध्यात्मीक गुरुंचे अमाप पीक आले आहे. त्यातले बरेचसे तुरुंगातच जाण्याच्या लायकीचे आहेत आणि चाललेत हे वेगळे. त्यांनी ही ढोंगीपणाची वस्त्रे उतरवली नाहीत तर जनता ती एक ना एक दिवस उतरवते हे निश्चीत. आसारामबापूंचे आणि सत्यसाईबाबांचे उदाहरण आपल्यासमोर आहेच.

मद्य, मदिरा अणि संसार
खय्याम म्हणतो,

हे खय्याम !! मद्य प्यालेला आहेस तर खूष रहा.
तुझ्या प्रेयसीबरोबर आहेस, तर खूष रहा.
सगळ्याचा शेवट जर तू नसण्यात आहे,
तर तू नाहीस असे समजून खूष रहा !

खय्यामच्या सगळ्या रुबायांमधे मद्याचा उल्लेख वारंवार होतो. कुणाला वाटेल तो एक मद्यपी होता की काय! पण तो जेव्हा मद्य म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ शब्दश: तोच घ्यायला पाहिजे असे नाही. त्याला दोन अर्थ आहेत. एक मद्या आणि दुसरा अर्थ संसार, हे भौतिक जग असा आहे.
खय्यामच्या रुबायांवर योगानंदस्वामींनी एक पुस्तक लिहिले आहे. ज्याला ह्या रुबायांचा अध्यात्मिक अर्थ लावायचा आहे त्यांनी ते जरुर वाचावे. ह्याच स्वामींनी “Autobiography of a Yogi” नावाचे प्रसिध्द पुस्तक लिहिले आहे. ज्यांना अध्यात्मावर वाचायला आवडते, तेही त्यांच्यासाठी वाचण्यासारखे आहे. ( मला ते आवडलेले नाही).
उदा. वरच्या ओळींचा अर्थ असा आहे-
हे खय्याम या पृथ्वीतलावर आला आहेस तर खूष रहा. देवा कशाला जन्म दिलास रेऽऽऽ असा व्यर्थ शोक करत बसू नकोस. जन्म तुझ्या हातात नसल्यामुळे, येथे आल्याबद्दल स्वत:ला दोषी धरु नकोस. सोडव रेऽऽऽऽ या सुख:दुख:च्या फेर्‍यातून असा आक्रोश करु नकोस. त्यापेक्षा आपल्या प्रेयसीबरोबर म्हणजे या संसारातील सर्व जोडीदारांबरोबर या जीवनाचा आनंद घे. (मजा घे म्ह्टले की त्याला वेगळा वास येतो, काही जणांना नाही आवडत तो.....) सर्व जोडीदार म्हणजे, बायको, मुले, मित्र, आईवडील, मैत्रिणी, नातवंडे इ. इ........

शेवटी आपल्याला येथून जायचेच आहे तर उगाचच मोठमोठ्या तत्वज्ञानाच्या गप्पा मारू नकोस आणि आपले आयुष्य खोट्या, काल्पनिक प्रश्नांनी शिणवू नकोस. ज्याची उत्तरे हजारो वर्षात सापडली नाहीत त्या प्रश्नांवर डोके आपटून घेऊ नकोस-

सगळ्याचा शेवट जर तू नसण्यात आहे,
तर तू नाहीस असे समजून खूष रहा !

आनंदाने जगणे ही एक कला आहे. ती ज्याने अवगत केली त्याला रक्तदाबाचा त्रास होत नाही, ह्रदयविकारचे, किंवा मानसिक त्रास होत नाहीत.
यालाच बहुदा सध्या “आर्ट ऑफ लिव्हींग” म्हणत असावेत.

जयंत कुलकर्णी.

संस्कृतीकलाधर्मइतिहासकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजविचारआस्वादसमीक्षालेखमतमाहितीभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

22 Jun 2011 - 9:27 pm | बहुगुणी

तुम्ही परत आपल्या भ्रष्ट वहिवाटीवर आला आहात.
कुठले पाच नमाज आणि कसले काय !
जेथे प्याले आहेत तेथे बघा,
आम्ही दिसू ताठ मानेने उभे, सुरईसारखे !

सर्वच रुपांतरे वाचनीय आणि संग्राह्य आहेत, धन्यवाद!

अप्रतिम भाग.. मस्त

आनंदाने जगणे ही एक कला आहे .. अगदी बरोबर ...

जयंत कुलकर्णी's picture

24 Jun 2011 - 9:10 am | जयंत कुलकर्णी

वाचून हे लिहील्याबद्दल धन्यवाद !