दरवाजाची धूळ
' अब्द अल् रहीम नवासी ' हा फ़ार्स प्रांताचा प्रमुख क्वादी आणि इमाम होता. त्याने १०८२ मधे खय्यामला एक पत्र पाठवले.
ह्या विद्वान गृहस्थाच्या मनात आत्मज्ञान आणि धार्मिक कर्तव्ये ह्याबद्दल काही शंका होत्या. त्या शंका दूर करायची विनंती त्याने खय्यामला पत्राद्वारे केली. हे पत्र त्याने थोडेसे काव्यात रचले. त्याने लिहिले –
हे साबाच्या वार्या,
जेव्हा तू जाशील तेव्हा,
माझ्यावर एक उपकार कर.
माझा नमस्कार खय्यामला सांग आणि
लिनतेने त्याच्या दरवाजाची धुळ कपाळी लाव.
मी सांगतो, त्याची योग्यता ह्याहुनही थोर आहे.
त्या थोर हकिमाला विचार माझे
“प्रयोजन” काय, आणि “कर्तव्ये” काय.
ते ज्ञान मिळव आणि परत येऊन मला वाचून दाखव.
मित्रहो, फ़ार्सचा इमाम हा फार मोठा अधिकारी झाला. त्याने खय्यामप्रती दाखवलेला हा आदर आपल्याला त्याच्या बद्दल खूप काही सांगून जातो.
खाली दाखवली आहेत ती त्याच्या रुबायाच्या सगळ्यात जुन्या हस्तलिखितातील दोन पाने.
ओमरने जे विपुल लिखाण केले त्यातील काहीच आता उपलब्ध आहे.
ओमर खय्यामची १० पुस्तके काळाच्या तडाख्यातून वाचली.
त्यात गणितावरची ४, बीजगणितावरचे १,
भूमितीवरचे १, पदार्थविज्ञानावरची ३,
आणि अध्यात्मावरची ३ आहेत, जी वाचलीत पाहिजेत.
ओमर इराणमधल्या पहिल्या धर्मांतरीत पार्शी पिढीतील होता. म्हणजे त्याचे वडील इब्राहीम जे तंबू शिवणारे सामान्य कामगार होते, त्यांनी इस्लाम धर्म स्विकारला. त्यावेळी मरण किंवा धर्मांतर हे दोनच पर्याय उपलब्ध होते. एक तिसराही असायचा, तो म्हणजे देश सोडणे. आपला धर्म का भूमी? हे निवडणे मरणाहूनही अवघड. आपली निष्ठा जमिनीशी का धर्माशी? मला पोसणारी जमीन पहिली का धर्म पहिला?
सामान्य माणसे देश सोडत नाहीत. जी सोडतात ती असामान्य असेही म्हणता येत नाही. देश सोडणे त्यांना शक्य असते एवढेच ! यांच्यातले नशिबवान कोण ते काळच ठरवतो.
वर एका सुंदर स्त्रीचे चित्र बघितले का ? खय्यामच्या अनेक रुबायांमधे जे सुंदर चेहरा, प्रेयसी यांचे उल्लेख येतात त्या सौंदर्याचे हे प्रातिनिधीक चित्र समजा.
स्त्री-पुरुषातील प्रेमाविषयी एकूणच त्या काळातील माणसांना फार आदर आणि कुतूहल होते. कारण त्याकाळी मनुष्य निसर्गाच्या फार जवळ होता आणि त्याविरुध्द जाण्यात त्याला फारसा शहाणपणा वाटत नसे. निसर्गात सौंदर्य होते आणि स्त्रीच्या सौंदर्याला भुलणे हे नैसर्गिक होते. ते नाते खरोखरच फुले आणि त्याच्यावर फिरणार्या भ्रमरासारखे होते आणि प्रेम हा त्याचा आविष्कार होता.
आणि मला वाटते तो तसा आजही आहे.
उद्या आपण त्याचे अजून एक बीजगणितातील इक्वेशन सोडवण्याची एक पध्दत बघणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्या काव्याकडे वळणार आहोत.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
24 May 2011 - 1:01 pm | मी ऋचा
सुरेख!
24 May 2011 - 1:09 pm | डॉ.श्रीराम दिवटे
माहिती उत्तमच आहे. आपला अभ्यास प्रशंसनीय... पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
24 May 2011 - 1:11 pm | नन्दादीप
सुंदर माहिती,
छान चाल्लय तुमच,,,!!!!
बाकी......
24 May 2011 - 1:42 pm | अमोल केळकर
मस्त माहिती
अमोल केळकर
24 May 2011 - 2:02 pm | अन्या दातार
दरवाज्याची धूळ आपण आमच्या माथी लावताय याबद्दल धन्यवाद.
24 May 2011 - 2:02 pm | यकु
>>>>निसर्गात सौंदर्य होते आणि स्त्रीच्या सौंदर्याला भुलणे हे नैसर्गिक होते.
क्या बात.. क्या बात.. क्या बात!
24 May 2011 - 3:31 pm | गणेशा
अप्रतिम
24 May 2011 - 4:26 pm | प्यारे१
सुंदर ओळख......
24 May 2011 - 8:19 pm | प्रास
फर्मास लिहिताय. असंच सुरू राहू द्या. सुरुवातीचेच भाग आहेत परंतु हा भागही अंमळ त्रोटकच वाटतोय. खय्यामच्या रुबायांचं रसग्रहण सुरू कराल तेव्हा विस्तृतपणे भाग येतील अशी आशा आहे.
मी काही मूळ रुबाई वाचलेली नाही आणि तशी पर्शियनची तोंडओळखही मला नाही पण
यात द्विरुक्ती वाटतेय. माझ्या माहितीप्रमाणे सबा म्हणजेच जन्नतकी हवा. तेव्हा हे एकदा बघून घ्यावे ही विनंती.
बाकी नेहमीप्रमाणेच पुलेप्र :-)
24 May 2011 - 8:46 pm | जयंत कुलकर्णी
अरे व्वा ! बरोबर आहे.
सबा म्हणजे पुर्वे कडून येणारी थंड आल्हादकारक, मनाला इल्हसित करणारी वार्याची झुळूक. म्हणून त्या दिशेने येणार्या वार्याला मी साबाच्या वार्या असे उल्लेखलेले आहे. दुसरे म्हणजे पुर्वेकडच्या प्रांताला त्या काळी साबा असे म्हणत. त्यामुळे कदाचित त्या इमामाने असे लिहीले असेल.
मला माहीत नाही...
:-)
24 May 2011 - 9:08 pm | लिखाळ
छान .. लेखमाला वाचायला उत्सुक आहे.
ती सुंदर स्त्री कोण?
25 May 2011 - 9:10 am | जयंत कुलकर्णी
ती सुंदर स्त्री म्हणजे कोणतीही स्त्री जी तुमची मैत्रीण, बायको, किंवा प्रेयसी असते आणि जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कटकटी, वैताग विसरायला लावते आणि तुमचे भरकटलेले मन परत तुमच्या ताब्यात आणून देते.
:-)
25 May 2011 - 11:44 am | विजुभाऊ
सुंदर स्त्री म्हणजे कोणतीही स्त्री जी तुमची मैत्रीण, बायको, किंवा प्रेयसी असते आणि जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कटकटी, वैताग विसरायला लावते आणि तुमचे भरकटलेले मन परत तुमच्या ताब्यात आणून देते.
वल्ला क्या बात है. सौंदर्याची ही नवी व्याख्या खूप आवडली.
झकास
25 May 2011 - 4:48 am | धनंजय
चांगली माहिती मिळत जाते आहे.
25 May 2011 - 7:35 am | ५० फक्त
लई भारि , उर्दु हि भाषा मला खुप आवडते, खुप छान अलंकारिक भाषा आहे, शब्दांचे खेळ समजावुन घ्यायला फार आवडेल, जयंत कुलकर्णी सर अतिशय धन्यवाद.
25 May 2011 - 9:15 am | जयंत कुलकर्णी
मित्रांनो व मैत्रिणिंनो,
धन्यवाद. ही महफील अशीच रंगत जावी ही इच्छा ! आणि आपल्याला सगळ्यांना (मी धरून ) त्यातून आनंद मिळावा.
25 May 2011 - 11:24 am | आंसमा शख्स
चांगले छोटेसे लेखन केले आहे. पुढील लेखाची वाट पाहत आहे.