ओमर खय्याम.......भाग - १५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Jul 2011 - 10:50 pm

ओमर खय्याम भाग - १
ओमर खय्याम भाग - २
ओमर खय्याम भाग - ३
ओमर खय्याम भाग - ४
ओमर खय्याम भाग - ५
ओमर खय्याम भाग - ६
ओमर खय्याम भाग - ७
ओमर खय्याम भाग - ८
ओमर खय्याम भाग - ९
ओमर खय्याम भाग - १०
ओमर खय्याम भाग - ११
ओमर खय्याम भाग - १२
ओमर खय्याम भाग - १३
ओमर खय्याम भाग - १४

दर्वेशी.
मला नेहमी संत, अध्यात्म इ. ज्यांना कळते अशा ज्ञानी लोकांना प्रश्न विचारावासा वाटतो तो असा –
जर तुम्हाला जन्मल्या जन्मल्या एका खोलीत “”Life support system” वर ठेवले तर काय होईल ? जन्म आणि मृत्यूच्या कल्पनांचे काय होईल. मृत्यूची जर कल्पना नसेल तर परमेश्वराच्या कल्पनेचे काय होईल, मग अध्यात्माचे काय होईल ? मग माणसामधे फक्त जनावरांप्रमाणे “instinct” च उरेल का ? जे अस्तित्वात नाही त्याला मेंदू जन्म देतो का ? इ.इत्यादि.......

मित्रहो, आपण काय होईल याची यादी करा. मी एकदा ही केली आहे आणि मला ह्या सगळ्या कल्पनांचा फोलपणा लक्षात आला. जोपर्यंत ते प्रयोगाने आणि प्रयोगाच्या नियमांनी सिध्द होत नाही तोपर्यंत त्याला काय म्हणावे हा वादाचा मुद्दा आहे. त्यापेक्षा तो अध्यात्माचा बुरखा काढलेला बरा.

दर्वेशीचा अर्थ हा पर्शियन भाषेत सापडतो. दार म्हणजे दार. दारोदारी हिंडून चरितार्थ चालवणारा तो दर्वेशी. हे सूफी संप्रदायाचा तारिघ नावाचा जो उपसंप्रदाय आहे, त्याचे तत्वज्ञान मानणारे लोक आहेत. सूफी हा ग्रीक शब्द “सोफिया” या शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ “ज्ञान”. सूफी संप्रदाय हा थोडासा गूढ पण मनाच्या अंतरीक समाधानाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो, आणि ते “सत्य” काय आहे हे समजल्याशिवाय शक्य नाही असेही ते मानतात. सूफी संत नंतर जसे त्यांचे अनुयायी वाढले तसे तुलनात्मक ऐषारामात राहू लागले. त्यांना उद्देशून ही रुबाया आहे. खय्याम त्यांना सांगतोय की त्या तुझ्या अध्यात्मिक नाटकासाठी तुझे मरणे व्यर्थ आहे.
खय्याम म्हणतो,

अरे दर्वेशी, टरकावून टाक तुझा हा अंगरखा,
त्याच्यासाठी बलिदान व्यर्थ आहे.
ओढ अंगावर आपला जुना गरीबीचा अंगरखा
त्या अंगरख्यातच तू राजा आहेस.

आपल्याकडेही याचे उदाहरण आहेच. मागे केव्हातरी कोणीतरी एक ज्ञानेश्वरीची आवृत्ती काढलेली मला अजून आठवते आहे. त्याचे नावच त्यांनी ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी असे ठेवले होते. कारण त्याची किंमत हजार दोन हजार होती. कारण त्याच्या मुखपृष्टावर सोन्याची नक्षी काढलेली होती. ज्या ज्ञानेश्वरांनी त्यांचे आयुष्य संन्यासी म्हणून घालवले, म्हणजे दर्वेशीच म्हणाना. त्यांच्या विचारांची त्यांनी पार वाट लावली. मला वाटते ज्ञानेश्वरांनी हे ऐकून वरती परत एकदा समाधी घेतली असेल.

पापाचा फायदा !

चांगले–वाईट, ऊन–सावली, सुख–दु:ख, पाप-पुण्य या ज्या जोड्या आहेत, त्या फोडणे सामान्य माणसाला अशक्य आहेत. यांचे अस्तित्व एकमेकांवर इतके अवलंबून आहे की असे वाटते एक असेल तरच दुसरे असणारच. पण सगळ्यात वाईट ढोंगीपणा. आपल्य़ासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत जेथे मोठमोठे पुढारी, तथाकथित संत सांगतात एक पण स्वत: मात्र त्याच्या विरुध्द वागतात. यापेक्षा खय्याम म्हणतो मद्य पिणे हे पाप (असेल तर ) परवडले – त्यामुळे तो म्हणतो, हे आम्हाला नरकात पाठवतात. पाठवू देत पण त्याचा एक फायदा निश्चितच आहे. नरक जन्माला घातल्य़ामुळे त्यांना स्वर्ग पण जन्माला घालावा लागला हेही नसे थोडके. आमच्या पापाचा ( जर ते खरोखरच पाप असेल तर ) हा फायदा तरी नाकारता येत नाही !
खय्याम म्हणतो,

प्रेयसीबरोबर संगत, आणि पिणे
हे ढोंगी धर्म पाळण्यापेक्षा खूप बरे !
प्रेमी आणि पिणारे नरकात गेले
तरच ह्यांना दिसणार स्वर्ग !

ते आहेत म्हणून हे आहेत.

दुष्टबुद्धीच्या माणसाने कितीही प्रयत्न केले तरी माणसाचे ह्रदय तो तोडू शकत नाही.
ज्याप्रमाणे परीस लोखंडाचे रुपांतर सोन्यात करतो तशा ताकदीचे काहीतरी तुमच्याकडे असले तरी त्यामुळे त्याचा आनंद तुम्ही हिरावू शकत नाही.
पण चांगल्या गोष्टींची- मित्र, मद्य, सखी..... यांची किंमत कळायला अशा दुष्टबुध्दी लोकांची आणि दु:खांची, घटनांची गरज आहेच ! किंबहुना यांच्यामुळेच या चांगल्या गोष्टींची किंमत कळते.
खय्याम म्हणतो,

दु:खाने ह्रदय नाही तोडू शकत,
परीसाने आनंद नाही हिरावू शकत.
भविष्य नाही सांगू शकत कोणी,
पण मद्य, प्रेयसी, यासाठी ह्यांची गरज आहे.

ते आहेत म्हणून हे आहेत. त्यांच्या अस्तित्वाचे दु:ख/राग करत बसण्यापेक्षा त्यांच्या मुळे ज्या चांगल्या गोष्टी जन्माला आल्या आहेत त्यासाठी “त्याचे” आभार माना.
थोडक्यात काय हे जग सर्व प्रकारच्या माणसांनी व घटनांनी बनले आहे ते नाकारु नका. हल्लीच्या भाषेत – It’s part of the Game. Design gameplan to enjoy every part of that Game.

चुक आणि हिरवळ!

ऍडॅम आणि इव्हची कथा आपणा सर्वांना माहीतच आहे. त्या जगाच्या जन्माविषयी ही रुबाई असावी. या दोघांच्या चुकीतून ह्या मानवजातीचा जन्म झाला असे काही धर्मात मानले जाते.
त्यासारख्या चुकांना सध्याचे धर्म व समाजमात्र क्षमा करत नाहीत हा मोठा विनोद आहे.
दोन प्रेमीकांच्या हातून घडलेल्या चुकांबद्दल १००० वर्षापूर्वी खय्याम म्हणतो -

या स्वर्गीय घुमटात तुझ्या, माझ्या, नाशासाठी
आपल्या शुध्द आत्म्यांविरुध्द युध्द पुकारलेय त्यांनी
हे प्रिये ये! ह्या मातीत बस. आपल्या चुकीमुळे
राखेतून आपल्या, इथेच हिरवळ उमलणार आहे.

आपल्या प्रेयसीला खय्याम म्हणतोय या आकाशाखाली हे जग आपल्या विरुध्द उठलय ! पण तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. ये ! आपल्या प्रणयातूनच ही मानवजात चालू राहणार आहे. आपली राख झाली तरीही.-
हे प्रिये ये! ह्या मातीत बस. आपल्या चुकीमुळे
राखेतून आपल्या, इथेच हिरवळ उमलणार आहे.

वस्त्राची वीण
खय्याम म्हणतो आपल्या जन्म आणि मृत्यूमधील अंतरात तू काय करणार आहेस ते ठरव !
हे अंतर कापताना काय तोटे होणार आहेत आणि काय फायदे होणार आहेत याचा हिशेब कर. कदाचित तू जाण्यानेही फायदा होणार असेल तर त्याचा स्विकार करायला घाबरु नकोस.
लोक आणि तथाकथित गुरु/महाराज/नाथ सांगतात म्हणून आपण फार मोठे काहितरी करतोय या भ्रमात राहून उगचच विरक्तीला कवटाळू नकोस. (काहीच जमत नाही म्हणून संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता - असे नको) :-) ह. घेणे ! त्यात खरे समाधान नाही.) जे करायचे ते तुमच्या ह्रदयातून आले पाहिजे. ते केले तरच समाधान मिळणार आहे.
खय्याम म्हणतो,

फायदा येण्यातला आणि जाण्यातला मोज !
वस्त्राची उभी आडवी वीण कुठे आहे ?
अनेक प्रेते जाळली जातात रोज
त्यांचा धूर कुठे आहे ?

त्यात तुला तुझ्या आयुष्याच्या वस्त्राचा, जे परमेश्वराने विणले आहे त्याचाही अभ्यास करावाच लागेल.
ह्या रुबाईच्या या ओळीचा अर्थ ““एक धागा सुखाचा”” हे आख्खे गाणे सांगू शकेल.
हे सगळे करताना आकाशाला भिडणारा धूर विसरु नकोस. तो त्या जळणार्‍या प्रेतांचा आहे. म्हणजे मृत्यू अटळ आहे हे कायम लक्षात ठेव.

जयंत कुलकर्णी.

संस्कृतीकलाधर्मइतिहासकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकसमाजलेखमाहितीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रास's picture

10 Jul 2011 - 11:04 am | प्रास

छान आहे हा भागही.

प्रेयसीबरोबर संगत, आणि पिणे

इथे प्रेयसीच्या साथीने मद्याची संगत असं काहीसं असतं तर आणखी छान वाटलं असतं.

या स्वर्गीय घुमटात तुझ्या, माझ्या, नाशासाठी
आपल्या शुध्द आत्म्यांविरुध्द युध्द पुकारलेय त्यांनी
हे प्रिये ये! ह्या मातीत बस. आपल्या चुकीमुळे
राखेतून आपल्या, इथेच हिरवळ उमलणार आहे.

निव्वळ सुंदर.....

फायदा येण्यातला आणि जाण्यातला मोज !
वस्त्राची उभी आडवी वीण कुठे आहे ?
अनेक प्रेते जाळली जातात रोज
त्यांचा धूर कुठे आहे ?

यातली कल्पना चांगल्यापैकी समजली आहे पण एक शंका भेडसावते -

खय्याम, आधी (वडिलांच्या वेळचा) झोराष्ट्रियन आणि नंतर मुसलमान असताना त्याने प्रेतांच्या जाळण्याची कल्पना कशी काय मांडली?

बाकी तुमचे लिखाण आवडते हे वे. सां. न.

जयंत कुलकर्णी's picture

10 Jul 2011 - 11:12 am | जयंत कुलकर्णी

रास्त शंका आहे. पण मला उत्तर माहीत नाही. असे त्याने म्हटले आहे हे खरे आहे. संशोधनाचा विषय आहे. मी जरा शोधतो याचे उत्तर ! बघू सापडते आहे का.....

प्रास, आपण या रुबाया मन लाऊन वाचताय हे बघून आनंद झाला.