ओमर खय्याम आणि त्याच्या रुबाया....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 May 2011 - 10:20 pm

मित्रहो,

२००९ सालच्या डिसेंबरमधे ओमरच्या खय्यामच्या रुबाया वाचल्या आणि त्या मला आवडल्या. तशा त्या कॉलेजमधे असताना वाचल्या होत्या पण आता जरा जास्त भावल्या. त्याचा भावार्थ लिहायचा हा एक प्रयत्न आहे. याचे मित्रांमधे वाचन केले होते आणि त्यांना ते आवडले म्हणुन तुमच्यापुढे ठेवायचे धाडस करत आहे. सध्याच्या या जगात हे काव्य आणि त्यातले विचार जरा पटणे अवघडच आहे, पण बघा तुम्हाला आवडतात का ! नाही आवडल्या तर हा उपक्रम बंद करून टाकू... आहे काय नाही काय..... :-)

आपल्याला त्या आवडतील अशी आशा आहे. आवडल्या तर ते उमर खय्यामचे काम आहे.
नाही तर तो माझ्या भाषांतरचा दोष आहे हे निश्चित.असो.
आपला हा खय्यामबरोबरचा प्रवास बराच मोठा होणार आहे. शेवटची रुबाया त्याच्या मृत्य़ूच्या वेळेची आहे.

याच्या वाचनाची एक पध्दत आम्ही ठरवली होती जेव्हा बीअर पीत असू त्यावेळेपर्यंत झालेल्या रुबायांचे वाचन करायचे. ( बहाना चाहिये !) म्ह्णून या पहिल्या लेखात सुरवातीला संध्याकाळचा उल्लेख झाला आहे. सोबतीला एक PPT आणि मागे एक पार्श्वसंगीत. ते येथे दिलेले आहे. आपल्याला वाटल्यास वातावरण निर्मीतीसाठी ते लाऊ शकता. प्रत्येक भागाच्या वर मी ते देईन.

मला त्यातले काव्य एवढे काही जमले नाही, त्यामुळे ज्याला अर्थ ठेऊन वेगळ्या शब्दात ते मांडायचे असेल तर जरूर मांडावे. मी योग्य वाटल्यास ती दुरूस्ती करेनच कारण शेवटी यांचे वाचन करणे हा उद्देश आहे.



मित्रहो नमस्कार !

आजची संध्याकाळ आपण ओमर खय्याम बरोबर घालवणार आहोत ! मराठीत त्याच्या रुबायांचे भाषांतर करायचे भाषांतर करायचे धाडस मी केले याचे कारण फार सोपे आहे. रुबायांचे अंतःरंग आपल्याला मराठीतच चांगले समजते आणि भावते. एक दोन पेग जर पोटात गेले असतील तर तुम्हाला खात्रीने सांगतो तुमची ही संध्याकाळ मस्त जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मला सांगायला विसरु नका....

मी हे का करू शकलो त्याचे कारण या रुबाया आणि मद्य. खोटे कशाला बोलू ? हे सर्व लेखन मी माझी आवडती फेसाळणारी बीअर पीत केलेले आहे. :-)

आपल्याला खय्याम हा फक्त पेला आणि सुरईच्या संदर्भात जास्त माहिती आहे. काही हरकत नाही... ते काही पाप नाही. पण तो एक वैज्ञानिक होता, गणिती, खगोल शास्त्रज्ञ होता. तत्वज्ञानी होता आणि एक कवीही होता.

त्याचा जन्म १८ मे १०४८ रोजी झाला आणि मृत्यू ४ डिसेंबर ११२२ रोजी झाला.
खाली खय्यामचे भुमतीतील एक अरबी भाषेतील प्रमेय आणि त्याखाली त्याचे चित्र.

खय्यामचा अर्थ - तंबू शिवणारा. त्याच्या नावावरही त्याने एक रुबाई लिहिली आहे. तो म्हणतो-

खय्याम, ज्याने शास्त्राचे तंबू शिवले
दुखःच्या खाईत होरपळून त्याची राख झाली.
नशिबाच्या धारदार शस्त्राने तंबूचे दोरच कापले
आशेच्या दलालांनी त्याला फुकटात विकले.

ही रुबाई त्याने अत्यंत वैफल्यग्रस्त आवस्थेत लिहिले आहे. सुलतान त्याचा मित्र होता आणि भला होता. त्याच्या शास्त्रीय कामासाठी त्याने भरपूर मदत केली होती. ओमरने त्याचे सारे आयुष्य सायन्सची पाठराखण करण्यात घालवली आणि सुलतानाच्या मदतीने ते त्याला शक्यही होते. पण सुलतानाच्या मृत्यूनंतर मात्र त्याच्या राजपूत्राने (जे त्याचे विद्यार्थीही होते) कर्मठ धर्माची कास धरली आणि त्याचे बर्‍याचशा कामाची अक्षरशः राख झाली. त्या त्याच्या मनस्थितीवर रचलेली ही रुबाई.

मित्रहो, यातले शब्द आपल्याला किती ओळखीचे वाटतात ! नशिबाचे धारधार शस्त्र, आशेचे दलाल....... आपण सगळे या अवस्थेतून कधी ना कधी तरी गेलेलेल असतो. आपल्याला आवडते एक आणि आपण करतो दुसरेच. नंतर काय होते ते आपण स्वतःलाच विचारू शकतो. करा धाडस आणि पहा उत्तर मिळते आहे का ? पण ते मिळेतो पर्यंत...
.........नशिबाच्या धारदार शस्त्राने तंबूचे दोरच कापले......

हे येथे ऐकू शकता -

अजून एक दोन दिवसांनी अजून एक रुबाई.....
जयंत कुलकर्णी.

संस्कृतीकलाधर्मइतिहासकविताचारोळ्याप्रेमकाव्यसमाजभाषांतर

प्रतिक्रिया

प्रास's picture

22 May 2011 - 2:54 pm | प्रास

तुमची जशी या रुबायांची वाचनं झालेली आहेत तशी आमची नक्कीच झालेली नाहीत आणि पुन्हा 'पिणे' नसल्याने बहाण्यांचाही काही प्रकार नाही, तरी ही पहिली बैठक एकदम रंजक झाली आहे.

तुमच्या ब्लॉग वर काही वेळा वाचन केलंय. ते लिखाणही आवडलंय. चांगल्या रसग्रहणासह लिहिताय तर नक्कीच येऊ द्या ती तुमची खय्यामच्या रुबायांची भाषांतरं...... वाट बघत आहे.

एका वेळी २-३ रुबायांचं रसग्रहण केलंत तर उत्तम!

बाकी

हे सर्व लेखन मी माझी आवडती बीअर केलेले आहे.

हे काही नीट समजलं नाही ;-) आरामात येऊ द्या, घाईने नको... :-)

पुलेप्र

रामदास's picture

22 May 2011 - 4:20 pm | रामदास

हा पहीलाच भाग असल्यामुळे एकच रुबायी असावी .पुढच्या भागात आणखी रुबाया येतील अशी अपेक्षा करू या.
जयंतरावजी लेख उत्तमच आहे .येऊ द्या आणखी !!