पश्चात्तापाची गुंतागंत !
ऊठ आणि मला मदीरा दे ! बोलायची ही वेळ नाही.
आज रात्री तुझे तोंड माझी तहान भागवणार आहे.
या मदिरेत तुझ्या गालाची लाली उतरली की तुला
उमजेल, माझ्या पश्चात्तापाची गुंतागुत तुझ्या बटांइतकीच आहे
मित्रहो, यातली पहिली आणि दुसरी ओळ ही सुरईला उद्देशून आहे. आणि त्याचा अर्थ सरळ आणि भौतिक आहे.
तिसरी ओळ ही त्याच्या सखीला उद्देशून आहे...... मित्रहो, मदिरेची मजा तुमच्या प्रिय सखीच्या सोबतच येऊ शकते. गालाची लाली मद्यात उतरणे... याचा अनुभवच घ्यावा लागेल. तो तुम्ही घ्याल अशी आशा आहे.
जसे तुम्ही तुमच्या सखीच्या गालावर रुळणार्या बटांमधे अडकता ना, तेवढ्याच तीव्रतेने तुम्ही तुमच्या पश्चात्तापाच्या गुंतागुंतीत अडकत जाता. नीट विचार केलात तर या वाक्याचा अर्थ समजेल. माणसाचे आयुष्य विविध घटनांनी भरलेले असते. उपास मोडला तरी भयंकर पश्चात्ताप होणारी माणसे मी बघितली आहेत.
काही माणसांना तर त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचासुध्दा पश्चात्ताप झालेला मी बघितला आहे.
हे समजायला खरोखरच कठीण आहे.
खरंतर हे ख्रिश्चन धर्मातील “पापाची कबूली” ला जे महत्व आहे त्याला उद्देशून असावे !
खरे साक्षात्कारी ?
खय्याम म्हणतो -
मस्जीद, चर्च, मंदीर आणि सिनेगॉग येथे
नरकाला घाबरणार्या आणि स्वर्ग-इच्छुकांची आहे गर्दी.
ज्याला खरा साक्षात्कार झाला आहे तो,
असली बीजे ह्रदयांच्या ह्रदयात पेरत नाही.
मानव जेव्हा नैसर्गिक आपत्तींना घाबरायला लागला तेव्हा त्याला कुठल्यातरी आधाराची आवश्यकता वाटायला लागली. मग ज्याचे स्वरुप जास्त रौद्र, भीतीदायक त्याला तो पिशाच्च/देव मानायला लागला. उदा. पुरासाठी-पाणी, वादळासाठी-वारा, रात्रीसाठी-सूर्य, चंद्र इ.इ. लवकरच त्याला कळून चुकले, रात्रीला सूर्य घालवतो, सूर्याला रात्र, वारा डोंगर अडवतो, अग्नी डोंगरावरची जंगले पेटवतो आणि पाऊस ती आग विझवतो. सूर्याला ढग झाकाळून टाकू शकतात. सगळ्यात भयंकर प्रकार झाला, ज्या दिवशी दिवसाही अंधार पडला. बरोबर ओळखलेत तुम्ही. ग्रहणाच्या दिवशी. मला तर वाटते सर्व देवांच्या आणि राक्षस/पिशाच्यांचा जन्मदीन हाच असावा.
जेव्हा माणसाला पाहिजे तेव्हा देवाची पूजा कराविशी वाटू लागली तेव्हा त्यांच्या प्रतिकांचा जन्म झाला असावा. प्रतिके आली म्हणजे त्यांना रहायला जागा आलीच. मित्रांनो, देवळांचा जन्म हा असा झाला आणि मानवजातीचा घात झाला. मानवापेक्षा त्यांनीच तयार केलेल्या प्रतिकांचेच महत्व जास्त वाढले......प्रतिकांसाठी झालेल्या लढायांचा परामर्श घ्यायची ही जागा नाही आणि वेळही नाही. असो.
चांगल्या वाईटाचा विचार मानव करायला लागला आणि स्वर्ग आणि नरक या कल्पनांची उत्पत्ती झाली. ही कल्पना फार मजेशीर आहे बरंका मित्रांनो ! माणसाने माणसाला मारले तर ते पाप आणि मग नरक यात्रा ठरलेलीच. सैनिकाने शत्रूच्या सैनिकाला मारले तर मात्र ते दोघेही स्वर्गात जातात कारण स्वर्गात कोण जाणार हे राजकारणी आणि धर्मगुरु ठरवतात.
स्वर्गात आणि नरकात कोण जाणार हे धर्मगुरु ठरवायला लागल्यामुळे काय झाले हे मी आपणास सांगत नाही. आपण विचार करा, अवतीभोवती बघा, आपल्याला कळेल. आपण सूज्ञ आहात ! हे ठरवणारे म्हणे साक्षात्कारी असतात. असूदेत ! त्यांच्याविषयी खय्याम म्हणतो –
मस्जीद,चर्च, मंदीर आणि सिनेगॉग येथे
नरकाला घाबरणार्यार आणि स्वर्ग-इच्छुकांची आहे गर्दी.
ज्याला खरा साक्षात्कार झाला आहे तो,
असली बीजे ह्रदयांच्या ह्रदयात पेरत नाही.
वेदनांपासून मुक्ती
माणसाचे मन मोठे विचित्र आहे. मनात कधी काय येईल आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल सांगता येत नाही. मन मेंदू आणि ह्रदय अशा नाजूक रेषांनी जोडले गेले आहे की बस्स! या रेषांच्या त्रिकोणाच्या बाहेर जर एखादा जगायला गेला की लोक बहुदा त्याला वेडा म्हणतात.
पण एक गोष्ट मात्र खरी.....जेव्हा आपले मन त्या रेषांच्या बाहेर पाऊल टाकते, तेव्हा आपण बेचैन होतो, सैरभैर होतो. त्यावेळी जर आपली दृष्टी एखाद्या सुंदर वस्तूवर पडली की मन जरा ताळ्यावर येऊ लागते. मग ती कुठलीही असो. एखादे सुंदर फूल, हिरवागार डोंगर, एखाद्या नदीचा शांत रम्य किनारा किंवा एखादी सुंदर स्त्री.... आणि ती जर तुमची सखी असेल आणि तिच्या हातून जर मद्य मिळणार असेल तर प्रश्नच मिटला.....
म्हणून खय्याम म्हणतो –
थेंब प्रत्येक मदिरेचा तिच्या हातून जो सांडतो,
कोणाच्या डोळ्यातल्या वेदना शमवितो.
धन्य तुझी परमेश्वरा, हे समजतंय तुला,
ही ह्रदयाच्या वेदनांपासून मुक्ती देते मला.
खय्याम शेवटच्या ओळीत परमेश्वराचे आभार मानतोय ते यासाठी की परमेश्वराला माहिती आहे की वेदना जन्माला घातल्या आहेत तर त्याच्यावरचे औषध पण जन्माला घातले पाहिजे. म्हणून त्याने ही जन्माला घातली. ही म्हणजे स्त्री आणि मदीरा.
या दोघींमधे एक विलक्षण नाते आहे. एक वेदना असेल तर दुसरी औषध असते.
-
धन्य तुझी परमेश्वरा, हे समजतंय तुला,
ही ह्रदयाच्या वेदनांपासून मुक्ती देते मला.
जरा विचार केलात तर पटेल मी काय म्हणतोय ते !
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
13 Jun 2011 - 1:13 pm | इरसाल
हाही भाग छान झालाय.
कुलकर्णी साहेब सगळ्या भागांचे दुवे एकसाथ देता येतील काय ?
13 Jun 2011 - 1:27 pm | प्रास
धन्योSस्मि। धन्योSस्मि।
आजचा हा भाग तर आत्तापर्यंतचा सर्वात भारी भाग झालाय!
सुंदर.....
अतिसुंदर....
महासुंदर.....
आज मी राजा असतो तर माझ्या गळ्यातल्या मोत्यांच्या सरीवर खास तुमचे नाव लागले असते.
तुमच्या भाषांतराला माझा कुर्निसात!!!
ओमरचा, त्याच्या रुबायांचा आणि ओमरच्या रुबायांच्या (तुमच्या) मराठी भाषांतराचा फ्यान :-)
13 Jun 2011 - 5:59 pm | जयंत कुलकर्णी
:-)
धन्यवाद !