सुरई....
ते म्हणतात कुराण सर्वश्रेष्ठ आहे,
वाचले जाते अधूनमधून.
सुरईच्या गळ्यावरच्या ओळी मात्र,
सर्वत्र, सर्वसदाकाळ वाचल्या जातच आहेत,...... वाचल्या जातच आहेत.
मित्रहो, मी आता जे सांगणार आहे, ते खरे आहे आणि वादग्रस्त पण आहे. आपण ते मजा म्हणून वाचूया आणि इथेच सोडून देऊयात!
सगळ्यात प्राचीन वेद ऋग्वेद यात सोमाचा उल्लेख अनेक प्रकाराने केलेला आहे.
सोम म्हणजे प्रकाश, सोम म्हणजे पहाट, सोम म्हणजे नक्षत्रे. सोम म्हणजे लहान मुले, आकाशाचा टेकू आणि सोम म्हणजे राजा. एक गोष्ट लक्षात येते आहे का ? सोम म्हणजे सगळ्या सकारात्मक बाबी आहेत. सगळ्यात महत्वाचा उल्लेख आहे तो म्हणजे ते एक पवित्र झाड आहे. लक्षात घ्या ’ते’ म्हणतात पवित्र झाड आहे आणि त्याच्या रसापासून एक स्वर्गीय पेय बनते. हे प्राशन केल्यावर काय होते ? ते म्हणतात, हे पेय प्या आणि दीर्घायुषी व्हा ! हे पेय तुमच्या ह्रदयातील पापे धुवून टाकते. त्यामुळे तुम्ही देवांची स्तवने अधिक चांगल्या प्रकाराने रचू शकता. रोगांपासून मुक्ती हे तर याचे काम आहे आणि गरिबांसाठी उत्तम औषध आहे. हे पेय तुमचे अपशकुनांपासून आणि शत्रूपासून संरक्षण करते. ( बहुतेक हे पिणार्यांना शत्रू होतच नसतील. ) सत्याला उत्तेजन आणि असत्याला नष्ट करते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा दूराभिमान नष्ट करते, सगळ्यांना एका पातळीवर आणते. ज्यांनी या पेयाची मर्यादेत मजा चाखली आहे त्यांना हे पटेल.
थोडक्यात काय, वेदापासून चालत आलेले हे पेय कोण नाकारणार ? त्याचे अस्तित्व परमेश्वराइतकेच आदीम आहे, हे खय्याम थोडक्यात सांगतो. थोडक्यात सांगणे ही त्याची खासियत आहे – तो म्हणतो ---
ते म्हणतात कुराण सर्वश्रेष्ट आहे,
वाचले जाते अधूनमधून.
सुरईच्या गळ्यावरच्या ओळी मात्र,
सर्वत्र सर्वसदाकाळ वाचल्या जातच आहेत,...... वाचल्या जातच आहेत.
टीप : माझ्या मित्रांनो, सोमरस म्हणजे मदिरा हे अजून सिध्द व्हायचे आहे. खय्याम जेव्हा मदिरा म्हणतो तेव्हा त्याला त्या अर्थाने मदिरा म्हणायचे नसते.... हे आपल्याला पुढे कळेलच.
आयुष्याची किंमत....
माणसाच्या आयुष्याची फार मोठी शोकांतिका ही आहे-
तो भूतकाळ विसरत नाही आणि भविष्यकाळ त्याला छळतो.
का तो त्याच्याकडून हौस म्हणून छळून घेतो ?
वर्तमान आणि भविष्यावर कसला अधिकार सांगतोस..
व्यर्थ आहे उद्याची काळजी.
व्यर्थ दवडू नकोस वेड्या हा क्षणही,
उरलेल्या आयुष्याची किंमत तुला माहीतही नाही.
शेवटचे वाक्य फार महत्वाचे आहे. उरलेल्या आयुष्याची किंमत काय ?
आणि ती कशात मोजणार ?
आत्तापर्यंतच्या आयुष्यापेक्षा कमी का जास्त ?
कमी म्हणजे काय आणि जास्त म्हणजे काय ?
आणि किती आयुष्य उरले आहे ?.......
म्हणून हा क्षणच जग. तोच फक्त तुझा आहे.
हे विश्व केव्हा जन्माला आले ? माहीत आहे का तुम्हाला ? सध्याच्या शास्त्रीय विश्वामधे यावर खूपच काम चालू आहे. आपण नुकतेच ऐकले की विश्वजन्माचे रहस्य उलगडणारे प्रयोग जमिनीखाली १ कि.मी. खोलीवर करण्यात आले. त्याचा निर्णय काय व्हायचाय तो होईल. पण असेही म्हणता येईल की या विश्वाचा जन्म मी जन्मलो त्याच दिवशी झाला. याचे कारण सोपे आहे, मानवजात जन्माला आली नसती तर हा प्रश्नही जन्माला आला नसता. :-)
जेव्हा माणूस समूहात रहायला लागला तेव्हापासून तो मृत्यूला घाबरत आलेला आहे. मेल्यावर स्वर्ग का नरक ? तो वरती तुमच्या पाप-पुण्याचा हिशेब लिहितो म्हणतात. ज्यावर तो लिहितो आणि ज्याने लिहितो ते काय आहे ? याचा शोध विश्वाच्या जन्माइतकाच महत्वाचा आहे. म्हणून खय्याम म्हणतो –
विश्वाच्या जन्मदिनी, अनंताच्या पलिकडे,
माझा आत्मा शोधतोय कागद आणि शाई, स्वर्ग आणि नरक,
त्यांना शेवटी साक्षात्कार झाला,
कागद आणि शाई, स्वर्ग आणि नरक माझ्यातच आहे.
जर मी जन्माला आलो तेव्हाच हे विश्व जन्माला येते तर तो कागद आणि ती शाई माझ्यातच आहे. जर नीट वाचलेत तर या सगळ्यातली मजा लक्षात येईल.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
10 Jun 2011 - 7:35 pm | इरसाल
छानसं स्पष्टीकरण. आवडलं..........
त्याच्या रसापासून एक स्वर्गीय पेय बनते. हे प्राशन केल्यावर काय होते ? ते म्हणतात, हे पेय प्या आणि दीर्घायुषी व्हा ! हे पेय तुमच्या ह्रदयातील पापे धुवून टाकते.
अश्याने लोक जास्त तर पिवू नाही लागणार ना ?
11 Jun 2011 - 2:04 pm | डॉ.श्रीराम दिवटे
इरसाल यांनी खोचक सवाल उपस्थित केला आहे, त्याला अनुमोदन. उत्तर द्यावे...
11 Jun 2011 - 6:11 pm | जयंत कुलकर्णी
कृपया टीप वाचावी. सगळे प्रश्न सुटतील. हा प्रश्न खोचक आहे असे मला वाटले नाही.
हां त्यांना वाटणारी काळजी मात्र जाणवली. ती योग्य आहे.
11 Jun 2011 - 7:54 pm | लिखाळ
लेखमाला चांगली चालू आहे. वाचतो आहे.