ओमर खय्याम भाग - १७

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 Jul 2011 - 8:19 pm

ओमर खय्याम भाग - १ ओमर खय्याम भाग - २ ओमर खय्याम भाग - ३ ओमर खय्याम भाग - ४ ओमर खय्याम भाग - ५ ओमर खय्याम भाग - ६ ओमर खय्याम भाग - ७ ओमर खय्याम भाग - ८ ओमर खय्याम भाग - ९ ओमर खय्याम भाग - १० ओमर खय्याम भाग - ११ ओमर खय्याम भाग - १२ ओमर खय्याम भाग - १३ ओमर खय्याम भाग - १४ ओमर खय्याम भाग - १५ ओमर खय्याम भाग - १६

खुस्रोचा राजमुकुट !
या रुबायाला साधा आणि अध्यात्मिक अर्थही आहेच ! जूनी मदीरा, जे मदीरा पितात त्यांना माहीत असेलच, ही जास्त चवदार असते. त्या प्रमाणे तुम्ही या संसारात जेवढे मुराल तेवढी त्याची चव वाढत जाणार आहे हे लक्षात ठेवा. जेथे ती नाही तो रस्ता पकडू नका. म्हणजे, संसारातच रहा. हिची थोरवी काय सांगू ?
माझा संसार हा मोठमोठ्या साम्राज्याहून मोठ आहे. आणि माझ्या सुरईचे झाकण .............
खय्याम म्हणतो,

एक घोट जुन्या मदीरेचा, नव्या राज्याची काय तमा,
जेथे नाही ती, नको जाऊ त्या रस्त्याला.
शंभर पटीने हा पेला फेरीदूनच्या साम्राज्याहून श्रेष्ठ,
सुरईचे झाकण खुस्रोच्या राजमुकुटाहून श्रेष्ठ !

सुरईच्या झाकणाला येथे खय्याम राजमुकुटाची उपमा देत आहे. दोघांचीही जागा डोक्यावर आहे.

फेरीदून आणि खुस्रो हे पर्शीयाचे राजे होते.

वार्‍याची एक झुळुक फक्त !
या चढाओढीच्या काळात पुढे जाण्याची धडपड प्रत्येकजण करतोय. त्या शर्यतीमधे काय होते आहे हे बघायला कोणालाही वेळ नाही. कधी एकदा सर्वांच्या पुढे जाऊन विजयाची पताका फडकावातोय असे प्रत्येकाला झालंय. बरं तेथे पोहोचल्यावर हे सगळे थांबते की काय ? मुळीच नाही ! मित्रांनो पुढची शर्यत आता तुम्हाला खुणावत असते.
त्यांना उद्देशून खय्याम म्हणतो,

हे साकी ! जे आमच्या पुढे गेले,
अभिमानाच्या धुळीत असतील लोळत.
हे मद्य पी आणि माझ्याकडून ऐक सत्य,
ती, वार्‍याची एक झुळुक फक्त.

या संसारात/अध्यात्मात आपल्याला खूप काही कळते असे वाटून आम्हाला मागे टाकून, आम्हाला अडाणी ठरवून पुढे गेलेले हे साकी, तुला खूप दिसतील. आमची त्यासाठी हेटाळणीही होईल. पण आम्हाला त्याची काळजी नाही. त्यांच्या त्या प्रवासात त्यांना ज्ञानाच्या फक्त एका झुळुकेचाच स्पर्श झालेला आहे. त्या झुळुकेने त्यांना जे बरे वाटते आहे ना, ते तात्पुरतेच आहे. त्यांना वाटते आहे की, संपले ! आता काहीही मिळवायचे राहिले नाही. पण खर्‍या ज्ञानापासून ते शेकडो योजने दूर आहेत. कारण ते “सत्य” जाणत नाहीत, हे सत्य जाणून घे !
हे सर्व केल्यावर मग त्यांना त्यातील फोलपणा कळतो. हे वार्‍याच्या झुळुकीसारखे आहे. त्याने तेवढ्यापुरते बरे वाटते!

विक्षिप्त !
भौतिक सुख:पासून दूर रहा असे प्रत्येक धर्मामधे धर्मगुरू त्यांच्या प्रवचनात कंठ सुकेतोपर्यंत उच्चरवाने सांगत असतात. गेले हजारो वर्षे ते हे सांगत आलेले आहेत. पण काय उपयोग झाला ? शुन्य ! कारण तो मनुष्य जातीचा स्थायिभाव आहे. त्या सुखांचा उपभोग हा जगातल्या सर्व शोधांची जननी आहे हे कसे विसरुन चालेल ? त्यामुळे त्याचा “भौतिक सुखाचा” अतिरेक वाईटच हे ठीक आहे पण त्याची हेटाळणी, आणि ते मिळवणारे पापी आणि आम्ही ते मिळवण्याच्या मागेच लागत नाही म्हणून श्रेष्ठ ही कल्पना चूक आहे. ते थोडेसे विक्षिप्तपणाचे वाटते.
आनंदात आयुष्य जगणे हे मित्रांनो, फार म्हणजे फार महत्वाचे आहे............................
’मद्य’ जमिनीवर ओतणे म्हणजे हा ’संसार’ ऊधळून देण्यासारखेच आहे....
खय्याम म्हणतो,

तुम्ही माझी सुरई फोडलीत,
सुखाचे दरवाजे केलेत बंद.
जमिनीवर ओतलेत मद्य, माझं मरु देत,
काय हा विक्षिप्तपणा ! (तुमचा)

समाजात विचित्र आणि विक्षिप्त माणसांची काही कमी नाही. असाच हा वरचा एक विक्षिप्तपणा -........

कवडीमोल !
देवाने जगपण काय जन्माला घातले आहे बघा –

“फिरो पृथ्वी, फिरो घर,
की नांगर घरावर ....मात्र
मात्र फिरो घाणा निरंतर”

हे जगाचे चक्र फिरतच राहणार आहे. हे बघून अध्यात्मीक क्षेत्रात अधिकार असलेलेही वैतागून जातात.
खय्याम वैतागून परमेश्वराला म्हणतोय “देवा तुला जर माझे हे जग विकत घ्यायला सांगितले तर एखादी फुटकी कवडीतरी देशील का रे तू ह्यासाठी ?
खय्याम म्हणतो,

हे परमेश्वरा ! देतोस काहीतरी मर्त्य जीवाला,
पाणी, निवारा आणि कालवे, पिकांसाठी.
दोन वेळेच्या अन्नासाठी झगडतो आम्ही,
देशील का तू कवडीतरी असल्या स्वर्गासाठी ?

मलातरी देव या जगाच्या लिलावात बोली लावेल की नाही या बद्दलच दाट शंका आहे :-)

मुलभूत तत्वे !

माझे आवडते कवी श्री. चिं.त्रं. खानोलकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात -

मुलभूत तत्वांची पाळेमुळे
खणून खणून तत्वज्ञ मेले
त्यांच्या नावाचे इतिहासात
सोने झाले, भले झाले
मुलभूत तत्वे तरी कसली ?
त्यांच्यामुळे नक्षत्रे दिसली !
त्यांची नावे आठवतात ?
छे ! ती तर कधीचीच पुसली .....
ही मुंग्यांची रांग जातेय कुठे ?
तत्वज्ञांची पाऊलवाट ही इथे
असेल असेल, इतिहासात पाहू
ही मुग्यांची रांग संपली कुठे ?

खय्याम म्हणतो,

ते रहस्य शोधण्यात नाही हाशील
नको खेटे अहंकारी विद्वानांच्या दारा.
इथेच स्वर्ग बनव.. हा प्याला, ही मदिरा, ,
जेथे स्वर्ग, तेथे तू जाशील नाही जाशील.........

प्याला !
दारु पिऊन कोणाला त्रास देऊ नये, कोणाचा अपमान करु नये. दु:ख विसरण्यासाठी दारु पिऊ नये. दारु प्यायचीसुध्दा एक पध्दत आहे. त्याचेही काही नियम आहेत. ते पाळावेत. किती प्यावी याचीही मर्यादा आहे. हे एखाद्याला कळत नसेल तर त्याला जरुर शिकवावे. एवढेच काय, दारु पिताना आणि त्याची मजा चाखल्यावर त्याचासुध्दा मान ठेवायचा असतो. हे जर विसरले तर छि:थू होतेच, पण आपले काय होणार हे खय्याम सांगतो –
खय्याम म्हणतो,

रात्री प्याला मी दगडावर फोडला.
शरमेने मान झुकली, हे कृत्य हिणकस !
त्याने मला संकेत दिला,
तुझ्यासारखा होतो आणि तू उद्या....

थोडक्यात काय, ही मजा आहे पण ती मजाच राहूदेत.

जयंत कुलकर्णी.

संस्कृतीकलाधर्मइतिहासकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यसमाजविचारआस्वादसमीक्षालेखसंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

प्रास's picture

17 Jul 2011 - 1:00 pm | प्रास

छान होतेय लेखमाला.

एक घोट जुन्या मदीरेचा, नव्या राज्याची काय तमा,
जेथे नाही ती, नको जाऊ त्या रस्त्याला.
शंभर पटीने हा पेला फेरीदूनच्या साम्राज्याहून श्रेष्ठ,
सुरईचे झाकण खुस्रोच्या राजमुकुटाहून श्रेष्ठ !

मस्त! मस्त! मस्त!

हे साकी ! जे आमच्या पुढे गेले,
अभिमानाच्या धुळीत असतील लोळत.
हे मद्य पी आणि माझ्याकडून ऐक सत्य,
ती, वार्‍याची एक झुळुक फक्त.

मान्य! मान्य! मान्य!

आता काही शंका (नेहमीप्रमाणेच) ;-)

देशील का तू कवडीतरी असल्या स्वर्गासाठी ?

इथे स्वर्गासाठीच आहे का की जगासाठी आहे?

जेथे स्वर्ग, तेथे तू जाशील नाही जाशील.........

इथे नाही ऐवजी न जास्त योग्य होईल का?

तुझ्यासारखा होतो आणि तू उद्या....

इथे 'आज' असा कालनिदर्शक संदर्भ 'तुझ्यासारखा'पूर्वी येणं आवश्यक वाटत नाही का?

जयंत कुलकर्णी's picture

17 Jul 2011 - 4:18 pm | जयंत कुलकर्णी

दोन तीन वेळा वाचलेत तर कदाचित अर्थ चांगला कळेल. एवढे स्पष्ट लिहायची त्याची पद्धत नाही. :-) आपणच अर्थ काढायचा. :-)