ओमर खय्याम....भाग-१२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
27 Jun 2011 - 7:00 pm

ओमर खय्याम भाग - १
ओमर खय्याम भाग - २
ओमर खय्याम भाग - ३
ओमर खय्याम भाग - ४
ओमर खय्याम भाग - ५
ओमर खय्याम भाग - ६
ओमर खय्याम भाग - ७
ओमर खय्याम भाग - ८
ओमर खय्याम भाग - ९
ओमर खय्याम भाग - १०
ओमर खय्याम भाग - ११

स्वभाव
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरे, म्हणून खय्याम म्हणतो -

माझा मूळ स्वभाव परत परत उफाळून येतो – पण मी करु काय !
त्यातून मला वेदनाच होतात – पण मी करु काय !
तू मला खरोखरच क्षमा करशील रे उदारपणे,
माझी शरम बघून आणि मी काय केले ते बघून -पण मी करु काय !

माझा स्वभाव मुळापासून बदलण्यासाठी मी काय करु, असा प्रश्न त्याला पडलाय. पश्चात्तापाची ताकद फार मोठी आहे हे तर ह्या रुबायामधून खय्यामला सांगायचे नाही ना ?

आपल्या मातीचे पेले!
आपल्या आयुष्यात आपण आयुष्याचे गुलाम असतो. म्हणजे या संसाराचे. हे कर, ते कर! हे करु नको, ते करु नको! हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, याचा विचार करण्यातच आयुष्य जाते. या गुलामगिरीतून आपण केव्हा बाहेर पडणार ? आपल्याला जे पाहिजे ते केव्हा करणार ?
खय्याम म्हणतो,

आयुष्याचे गुलाम किती काळ राहणार ?
एक दिवस जगलो काय आणि एक वर्ष जगलो काय !
तो पेला भर त्या लालचुटुक मद्याने
आपल्या मातीचे पेले होण्याआधी.

मरण्याआधी आणि आपली राख मातीत मिसळण्या अगोदर आणि त्या मातीचे “तो” कुंभार त्या मातीचे पेले करण्याआधी या जगातल्या सर्व सुंदर वस्तूंचा आनंद घ्या. हा जन्म परत येणार नाही.

मठ !
या जगाला मठाची उपमा देत खय्याम म्हणतो,

आहे किती मुक्काम या मठात ?
प्रेयसी आणि प्याल्याशिवाय जगणे कसे ?
तत्वे प्राचीन का नवी ......
मी सोडल्यावर, फरक काय, जग प्राचीन का नवे.

मी सोडल्यावर म्हणजे मी हे जग सोडल्यावर कशाचाच फरक पडत नाही असे खय्याम म्हणतोय ...

कच्चे मांस!
माणसांचा नैसर्गिक स्वभाव हा भौतिक सुखाकडे ओढ घेणारा असतो. त्याचे निसर्गत: प्रेम हे त्याच्यावर असते. पुरातन काळापासून हेच चालत आलेले आहे. जेव्हा माणसाला भाजलेल्या मांसाचा शोध लागला तेव्हापासून त्याने कच्चे मांस खाण्याचे सोडले. तो काही हट्टाने कच्चे मांस खात राहिला नाही.
पण धर्म स्थापनेनंतर मात्र ह्या गोष्टीत फरक पडला. माणसांच्या या स्थायीभावावर टीका व्हायला लागली. या संसाराला उद्देशून ही रुबाया आहे.

खय्याम म्हणतो,

तुझ्या प्रेमापायी मी पापी माणसांसारखी निंदा ओढवून घेतो.
ह्या कर्तव्याला चुकलो तर शिक्षाही भोगतो.
आयुष्य जर माझे तुझ्या क्रौर्याला प्रामाणिक,
याच्या अंतापर्यंत जरा कमी हाल होऊ देत !

तुझ्यावरच्या म्हणजे या संसारावरच्या प्रेमापोटी ! पापी नसताना सुध्दा हे माझी निंदा करतात – कारण काय तर माझे या जीवनावर प्रेम आहे. मान्य नसले तरी कर्तव्य असल्यासारखे हे मला सहन करावे लागते. हे कडव्या धर्मगुरुंना उद्देशून आहे.
ह्या जगावरच्या प्रेमापोटी मी कर्तव्य असल्यासारखी बोलणी ह्या लोकांकडून खातो आहे. हे कर्तव्य पार पडले नाहीतर त्यासाठी शिक्षाही भोगतो. तू आणि मी एकमेकांना जखडले गेलो आहोत तर जरा मला कमी त्रास होऊ देत अशी प्रार्थना तो परमेश्वराकडे करतोय.

युक्ती!!
या जगात जेथे पदोपदी आपल्या पोटी निराशा पदरी येते तेथे जगायची युक्ती खय्याम सांगतोय. त्या युक्तीत नवीन काही नाही आणि विशेष काही वाटत नाही. पण ती अंमलात आणणे फार अवघड आहे. जे धर्माच्या आहारी गेले आहेत, ते त्याला नावं ठेवत आहेत की तू परमेश्वराला शरण जाण्याऐवजी तू हे काय आरंभले आहेस ?
खय्याम म्हणतोय एकदा जन्माला आल्यावर मला तो बुध्दी देऊ शकत नाही आता जे काही होणार आहे ते या भौतिक जगातच होणार आहे.

खय्याम म्हणतो,

हे जग क्षणभंगूर, युक्तीशिवाय जगणे मुष्कील,
मी पहातो फक्त आनंद आणि तो देणारी चमकणारी मदीरा.
ते म्हणतात ’देव तुला बुध्दी देवो आणि तुला पश्चात्ताप होवो .’
तो ती देत नाही, त्याने दिली तरी मला ती नकोच !

याचा अर्थ निराशेच्या वेळी मदीरेचा आधार घ्या असा नसून आपल्याला आनंद देणार्‍या बाबींमधे मन रमवा असा आहे.
सदसर्वकाळ आनंदात राहणार्‍या माणसाला समाज वेगवेगळ्या नावाने ओळखतो. असो. त्याला समाज म्हणतोय जरा सबूरीने घे आणि ...देव तुला.....बुद्धी देवो..

सतरंजी

ही माझ्या आवडत्या रुबायांपैकी एक आहे.
मी काही वर्षांपूर्वी एकदा वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली होती की एका गुंडाचा सारसबागेच्या समोर खून झाला. तुम्हीही वाचली असेल. तो दर्शन घेऊन नुकताच बाहेर पडला होता आणि मारेकर्‍यांनी ( ते पण सराईत गुंडच होते ) त्याच्यावर चाकूने सपासप वार केले होते. त्या मेलेल्या गुंडावरसुध्दा शेकडो गुन्हे दाखल झालेले होते. माझ्या मनात त्यावेळी विचार आला की हा असा गुंड, ज्याने पाच सहा खून पचवलेले आहेत, ज्याच्यावर बलात्कारापासून हत्येचे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, तो माणूस सारसबागेतील गणपतीच्या देवळात काय करत होता ?

त्याचे उत्तर मला अनपेक्षितपणे ही रुबाया वाचल्यानंतर मिळाले. देवळातसुध्दा पापे करायला येणार्‍यात माणसाची ही जात आहे.

खय्याम म्हणतो,

जरी मी दयेचा अर्ज घेऊन आलो आहे मशिदीत,
शपथ तुझी सांगतो, प्रार्थना करायला नाही.
एकदा मी येथून प्रार्थनेची सतरंजी चोरली आहे,
पापांनी ती झिजली की मला येथे यावेच लागते.

परमेश्वराकडे आलो फक्त दयेची भिक मागायला. प्रार्थना वगैरे नंतर. पापे केल्यावर तिरुपतीला/सत्यसाईबाबांना जाऊन आले की परत माणसांचे गळे कापायला मोकळे ! दुर्दैव आपले दुसरे काय !

जयंत कुलकर्णी.

संस्कृतीकलाधर्मइतिहासकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकसमाजविचारआस्वादसमीक्षालेखमतसंदर्भ

प्रतिक्रिया

प्रास's picture

27 Jun 2011 - 7:14 pm | प्रास

मस्त! मस्त!! मस्त!!!

हा भाग देखिल छान उतरला आहे.

आयुष्याचे गुलाम किती काळ राहणार ?
एक दिवस जगलो काय आणि एक वर्ष जगलो काय !
तो पेला भर त्या लालचुटुक मद्याने
आपल्या मातीचे पेले होण्याआधी.

सुंदर, फारच सुंदर....

जरी मी दयेचा अर्ज घेऊन आलो आहे मशिदीत,
शपथ तुझी सांगतो, प्रार्थना करायला नाही.
एकदा मी येथून प्रार्थनेची सतरंजी चोरली आहे,
पापांनी ती झिजली की मला येथे यावेच लागते.

नवी चोरायला (?) ;-)

आवडला, हा भाग सुद्धा आवडला.....

झंम्प्या's picture

28 Jun 2011 - 1:23 pm | झंम्प्या

"जरी मी दयेचा अर्ज घेऊन आलो आहे मशिदीत,
शपथ तुझी सांगतो, प्रार्थना करायला नाही.
एकदा मी येथून प्रार्थनेची सतरंजी चोरली आहे,
पापांनी ती झिजली की मला येथे यावेच लागते"

स्वतःच्या गरजेसाठी, आपण कित्ती जणांचा वापर करतो, त्यात देवालाही सोडत नाही,
जेव्हा गरज सरेल तेव्हा सोयीने विसरतो, अन जेव्हा गरज असेल तेव्हा जवळीक साधून पुन्हा लाचार्यासारखा पायी घुटमळतो.