ओमर खय्याम भाग - १
ओमर खय्याम भाग - २
ओमर खय्याम भाग - ३
ओमर खय्याम भाग - ४
ओमर खय्याम भाग - ५
ओमर खय्याम भाग - ६
ओमर खय्याम भाग - ७
ओमर खय्याम भाग - ८
बुध्दीबळाचा डाव !
आपल्याला कोड्यांमधे डोके घालायची आवड फार. अगदी शब्दकोड्यांपासून ते अणूचे अंतरंग या सगळ्या कोड्यात! कोड्यात बोलणे हे तर माणसाच्या स्वभावाच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी एक आहे. पुढच्याला न समजणारे बोललो म्हणजे आपण हुशार असे समजणार्यांची संख्या पण काही कमी नाही. स्पष्ट करुन सांगण्याच्या प्रयत्नात उदाहरणे देणे आणि कोड्यात बोलणे यातील फरक आपण सर्वांनी जाणून घेतला तर बरे !
ज्याप्रमाणे बुध्दीबळाचा डावात आपण सर्व सोंगट्या एकेक करुन पेटीत टाकतो, तसाच हा डाव आहे. फक्त त्याचे खेळाडू, सोंगट्या आणि पट हे वेगळे आहेत.तत्वज्ञान कोड्यात न सांगता साध्या, सोप्या शब्दातही सांगता येते...
खय्याम म्हणतो-
कोड्यात न बोलता स्पष्टच सांगतो,
वरती बुध्दीबळाचा डाव चालला आहे, आपण त्यातील प्यादी .
अस्तित्वाच्या पटावरुन एकेक करुन
ते आपल्याला परत पेटीत टाकणार आहेत.
आमचे एक मित्र ह्यावर म्हणाले “त्याने आपल्याला पेटीत टाकण्यापूर्वी आपण लढले पहिजे आणि विजय मिळवायला पाहिजे.” लढायचे कोणाबरोबर ? जो आपल्याला हालवतोय त्याच्याशी ? आपण जेव्हा बुध्दीबळ खेळतो तेव्हा त्यावरचा राजासुध्दा आपले काही वाकडे करु शकत नाही. परमेश्र्वराने तयार केलेल्या या अस्तित्वाच्या पटावर आपली स्थिती ह्याहून काय वेगळी असते ? असो त्यांच्या लढवय्येपणाचे आपण कौतुक करुया !
हे जीवन हा एक अस्तित्वाचा पट आहे, हेच वास्तव आहे, आणि पेटी फार मोठी आहे, डाव तर युगानयुगे चालत आलेला आहे आणि चालणार आहे. एकच सत्य आहे – आपण पेटीत गेलो की आपल्यापूरता हा डाव संपला, हे ज्याला कळले, तो त्यांच्या या डावाची सुध्दा मजा घेऊ शकतो.
अतिशयोक्तीचा अलंकार
खय्याम म्हणतो -
अरे ! जर जगात सत्य हा एक अतिशयोक्तीचा अलंकार आहे,
मग ह्या मानहानीने आणि त्रासाने एवढा अस्वस्थ का होतोस ?
शरण जा तुझ्या दैवाला, आणि काळाशी जमवून घे !
कागदावर उमटलेली शाई परत थोडीच उमटणार आहे ?
मित्रहो,
ह्या रुबायाचा अर्थ तुम्ही लावावा असे मला वाटते. आपण त्यामुळे ही स्लाईड जरा जास्तवेळ ठेवणार आहोत. हा एक छोटा मध्यंतर समजूयात.
ता.क. मी माझ्या मित्रांसाठी या रुबाया व माझा मजकूर याच्या वाचनाचा २ तास कार्यक्रम केला होता. त्याच्या स्लाईड शो मधले हे वाक्य आहे. हा स्लाईड शो माझ्या कडे आहे. ..
आस !
नभ मेघांनी आक्रमिले की तारांगण सर्व हे व्यापूनी जाते. क्षणभर असा भास होतो आहे की संध्याकाळ उलटून गेली की काय ! पण मनावर काही अजून ढगांचे मळभ दाटलेले नाही. आणि नशीब चांगले ! ढगांचे आवरण बाजूला सरले आणि मस्त संध्याकाळ आहे हे स्पष्ट झाले. चला बरे झाले, आता …… प्यायला हरकत नाही.
खय्याम म्हणतो-
त्या गुलाबावर ढगांच्या सावलीचा अंधार,
माझ्या मनात आणि ह्रदयात अजून मदीरेची आस !
झोपू नकोस, काय हक्क आहे तुला ?
दे मला ! बघ ढग दूर झाले, अजून दिवसच आहे.
या रुबाईला दोन्ही अर्थ आहेत. एक त्याच्या प्रेयसीला उद्देशून आणि एक परमेश्वराला उद्देशून. प्रेयसीला तो झोपून देत नाही कारण त्याच्या मनात अजून आस आहे. परमेश्वराला तो म्हणतो आहे की मला अजून जगायची आस आहे, तू त्यामुळे झोपू नकोस, कारण तू झोपलास की सगळेच संपले. आत्ताकुठे माझ्या मनावरचे मळभ दूर झाले आहे आणि आत्ताकुठे मी जिवनाचा उपभोग घ्यायला सुरवात केली आहे
स्वर्ग !
स्वर्ग ह्या कल्पनेचे अनेक फायदे होते. माणसे पापे करायला जरा घाबरतील असे समाजधुरीणांना वाटले असावे. पण हल्लीच्या जगात त्यांचा दारुण पराभव माणसांनी केला आहे. अहो, आता देवालासुध्दा पापात सहभागी करुन घ्यायची चढाओढ लागते तेथे स्वर्गाची काय मिजास?
हे असे होणार ह्याची कल्पना बहुदा खय्यामला अगोदरच आली असावी. ज्या समाजात भीती आणि प्रलोभन ह्याच्यावर माणसांचे वागणे ठरते, तेथे दुसरे काय होणार ? म्हणून तो म्हणतो,
जा ! त्या स्वर्गाचे दार बंद करा.
हे मद्य प्या ह्या सुंदर चेहर्याच्या संगतीत !
त्यांची पूजा आणि याचना करायची ही कुठली वेळ ?
आत्तापर्यंत सोडून गेलेले मला, परत आलेत कुठे ?
बरे एवढे सगळे करुन आमचे मित्र जे गेले ते काय परत आले आहेत का ? ही सगळी शास्त्रे – सायन्स सोडून आपल्या बुध्दीची तहान भागवण्यासाठी माणसांनी तयार केली आहेत आणि एक गोष्ट अनेकदा सांगितली की खरी वाटायला लागते ह्या नियमानुसार हजारो वर्षे हेच चाललेले आहे.
चवथ्या ओळीला दोन अर्थ आहेत. एक म्हणजे माझे मित्र आत्ता यायचे आहेत त्यामुळे वेळ नाही आणि दुसरा म्हणजे माझे जे मित्र हे जग सोडून गेले आहेत ते कुठे परत येणार आहेत ?
खय्यामची मते ही आपल्याकडील चार्वाकच्या मतांशी बरीच मिळतीजुळती आहेत. चार्वाक हा एक माणूस नसून तो एक पंथ होता असे बर्याच तज्ञांचे मत आहे. ते जर खरे असेल तर खय्याम त्या पंथाचा अनुयायी होता का हे तपासून पाहणे योग्य ठरेल कारण त्या काळात इराण व भारतामधे वैचारीक देवाण-घेवाण खूपच होती.
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
20 Jun 2011 - 8:43 am | आंसमा शख्स
प्रेयसीला उद्देशून असलेले हे आहे असेच वाटते.
स्पष्ट बोलायचे तर दुसरा अर्थ जोडलेला वाटतो. सहजतेने आलेला वाटत नाही. त्याकाळात समाजाच्या भूमिकेमुळे असे झाले असेल का? (आजही परिस्थितीत फरक पडलेला नाही हे खेदाने नमूद करतो. खुदा करो आणि मध्यममार्गावर असणारे लोक जास्त येवोत.)
20 Jun 2011 - 6:07 pm | प्रास
हा भागही छान झालाय.
लेखात म्हण्टल्या प्रमाणे खरंच मध्यांतर वगैरे घेताय की काय?
सगळ्याच रुबायांचे अर्थ व्यवस्थित समजत आहेत आणि त्यांचा आनंद घेण्याची प्रक्रियाही (पुन्हा पुन्हा वाचून) सुरूच आहे. सध्यातरी तुमच्याहून वेगळे काही अर्थ काढता येत नाहीयेत..... ;-)
तरीही एक विनंती -
इथे अधोरेखित 'उमटणार' च्या ऐवजी 'उलटणार' असं घेतलं तर अधिक योग्य होईल की काय, असा प्रश्न पडलाय. तेवढा हा प्रश्न सोडवा की जरा.....