ये दोस्ती ......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
9 Jun 2015 - 10:04 pm

( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ )
हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी!
..... ........ ........
हेग्झियाच्या डाव्या डोळ्यात जन्मतःच मोतीबिंदू होता. त्यामुळे तो त्या डोळ्याने जन्मांध. परिस्थिती अगदी बेताची. इथेतिथे काम करता करता एका factory त लागला. लग्न झाले. एक मुलगा झाला.
पण २००० साली, आयुष्यात कायमचा अंध:कार पसरवणारी घटना घडली. Factory तल्या अपघातात दगडाचे एक अणुकुचीदार टोक त्याच्या उजव्या डोळ्यात घुसले. प्रचंड वेदना. ज्या एका डोळ्याने तो जग पाही, तोही निकामी झाला. मध्यम वय. आंधळ्या माणसाला factory तच काय, पण कुठेतरी कोण नोकरी देणार? त्यात बायको सतत आजारी. एक मूल. उपासमारीची वेळ येऊन ठेपली.
..... ........ ........
तिकडे वेंकीचे निराळे दुर्दैव! जमिनीवर पडलेल्या उघड्या विजेच्या तारेचा धक्का बसल्याने, वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याला आपले दोन्हीही हात खांद्यापासून गमवावे लागले. त्याच्याही घरची गरिबी. थोट्या हातांनीच तो मित्रांबरोबर खेळत असे. तसाच, पोहायला, इतर बारीकसारीक कामे करायला शिकला. पण दु:खात सुख इतकेच कि, सगळ्या गावाने त्याला आपल्या पोराप्रमाणे वागवले. गावप्रमुखाने त्याला शाळेत घातले. पुढे मान आणि खांद्याच्या सहाय्याने तो नांगर हाकू लागला, पायाने अवजारे हाताळू लागला. एवढेच नव्हे तर पायानेच लेखन आणि सुबक विणकाम करू लागला. १९७६ मध्ये पदवीधर झाला. मग स्थानिक वनविभागात त्याला छोटीशी नोकरी देण्यात आली. झाडापानाफुलाफळांची निगराणी करता करता, त्याची झाडांशी दोस्ती जमली.
..... ........ ........

२००० साली, हे शाळूमित्र नशिबाने परत एकत्र आणले. आपल्या लंगोटमित्राचा आंधळा अवतार पाहून, थोटा वेंकी हेलावला. तेरा गम, मेरा गम एक झाले.
मग त्याने आपल्या अंधमित्राला झाडं लावण्याची, त्यातून पैसे कमवण्याची आणि त्यावर चरितार्थ चालवण्याची कल्पना दिली. यातूनच सुरु झाली एका जगावेगळ्या दोस्तीची आणि जिद्दीची कहाणी!
..... ........ ........
५४ वर्षीय हेग्झिया आणि ५३ वर्षीय वेंकी दररोज भल्या सकाळी आपल्या कामाला निघतात. स्थानिक वनविभागाकडून त्यांना नदीपलिकडची आठ हेक्टर जमीन अत्यल्प भाडेतत्वावर मिळाली. घरापासून आपल्या कर्मभूमीकडे जाताना त्यांना दररोज बरेच अंतर चालत जावे लागते. थोट्या हेग्झियाच्या शर्टची रिकामी बाही हातात धरून आंधळा वेंकी त्याच्या मागोमाग चालत राहतो. मग पाण्याला ओढ असणारी नदी लागते. हेग्झिया आपल्या मित्राला पाठकुळी घेतो. कुठेही न धडपडता, दोघेही नदीपार करतात. आज एक तप उलटून गेले, पण त्यांच्या या रोजच्या प्रवासात खंड नाही, फरक नाही! एकेकाळी बिकट होती ती वाट, आज त्यांनी वहिवाटीची केलीय!
झाडं लावून, (तोडून नव्हे!) पैसे मिळवायचे, या प्रापंचिक गरजेतून सुरु झालेले काम पुढे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले. मिळालेल्या जमिनीवर होता होईल तितकी झाडी लावायची. जगवायची. आपल्या गावाला पुरापासून वाचवायचे.वनसंपदा वाढवायची, हि या दोस्तीतील जिगर झाली.
..... ........ ........
जेव्हा १०-१२ वर्षांपूर्वी त्यांनी हे काम सुरु केले, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना वेड्यात काढले. आंधळा अन थोटा मिळून काय दिव्य करणारेत, असली हेटाळणी वाट्याला आली! क्वचित एखाद दुसरे झाड सोडले, तर वर्षानुवर्षे गावचा नदीकिनारा ओसाड होता. पण थोड्याच वर्षांत, जेव्हा तिथे झाडं तगू लागली, वाढू लागली, नदीकिनारा हिरवा दिसू लागला, तेव्हा मात्र गावकऱ्यांची मतं बदलली. मनं बदलली. या दोघांना मदत करण्यासाठी ते हि पुढे सरसावलेत. त्यांची अवजारं दुरुस्त करून दे, झाडाना पाणी घाल, तण उपटून टाक, नवीन रोपटी आणून दे अशी काहीनकाही मदत ते करतात.
..... ........ ........
पण खरं अविरत काम या दोघांचं! कलमं तयार करून, ती लावणं, तसं किचकट आणि वेळखाऊ काम! हातीपायी धड असणाऱ्यानाही कष्टप्रद वाटावं असं! पण यांच्या सुदृढ दोस्तीने झाडावनांना संजीवन दिले. त्यांनीच दहाबारा वर्षांपूर्वी लावलेल्या, आज ताडमाड वाढलेल्या झाडांची डहाळी कापून, तिचे कलम करून, खड्डा खणून लावायचे! इथेही मग एकमेकांची दृढ सोबत. आंधळा वेंकी , थोट्या हेग्झियाच्या पाठीखांद्यावर हळूहळू चढतो. हातांच्या डोळ्यांनी एखादी सळसळती डहाळी, अंदाजाने पण व्यवस्थित कापतो. मग हेग्झिया त्याला सुखरूप खाली उतरवतो.
या सगळ्या कामात दोघांच्या मनाशरीराची कमालीची एकतानता लागते. आयुष्यातील न्यूनतेने त्यांच्या शरीरमनाचे गुंते वेगळ्या अर्थाने सोडवलेत. हेग्झिया हसून म्हणतो, ‘तो माझे डोळे, तर मी त्याचे हात आहोत!’ तर वेंकी म्हणतो, ‘आम्ही मिळून काम करतो, तेव्हा वयं एकास्मि!’
आजपर्यंत त्यांनी सुमारे दहा हजार सुदृढ झाडी वाढवलीयत. पण तीन हजार झाडी खुरटून गेल्याचे, बारीक शल्यही आहे. कधीमधी मिळणाऱ्या गावकऱ्याची मदत सोडली, तर या दोस्तांचे हे एकहाती काम, सावकाश पण दमदारपणे चालू आहे! आज तीन हेक्टर जमिनीवर जंगल उभे आहे. पक्षी घरटी बांधताहेत. जंगलात नवे जीवजीवन मूळ धरत आहे.
..... ........ ........
अलिकडेच हेग्झियाला त्याच्या डॉक्टरांनी, त्याच्या उजव्या डोळ्यांवर इलाज करणे शक्य आहे, असे सांगितलेय. नेत्रपेढीतील प्रतिक्षायादीत, त्याचा नंबर लागून कुणा द्यावानाचे नेत्र मिळाले, कि नेत्ररोपणही शक्य आहे. पण तो म्हणतो, ‘ मला जरी परत दृष्टी मिळाली, तरी मी माझ्या दोस्ताबरोबर झाडं लावण्याचेच काम करीन. मला दिसो वा न दिसो, शेवटच्या श्वासापर्यंत , मी माझे हेच काम माझ्या मित्राबरोबर करत राहणार!’

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकथासमाजजीवनमानराहणीभूगोलविज्ञानशिक्षणप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखबातमीमतशिफारससल्लामाहितीसंदर्भभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

9 Jun 2015 - 10:46 pm | लालगरूड

आवडले

श्रीरंग_जोशी's picture

9 Jun 2015 - 10:51 pm | श्रीरंग_जोशी

खुपच प्रेरणादायी आहे ही प्रत्यक्षातली कथा.

या कथेसाठी खूप धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

शिव कन्या's picture

10 Jun 2015 - 6:19 pm | शिव कन्या

होय, श्रीरंग जोशी.

स्रुजा's picture

9 Jun 2015 - 11:06 pm | स्रुजा

फार च जगावेगळी कथा आहे ही. खुप धन्यवाद. प्रेरणा घेऊ तितकी कमीच.

स्नेहानिकेत's picture

9 Jun 2015 - 11:18 pm | स्नेहानिकेत

छान आहे कथा. स्वतःमधील व्यंगावर जिद्दीने मात करून किती सुंदर फुलवले आहे जीवन ह्या दोघांनी स्वतःचे आणि इतरांचे देखील!!!! आपण अनेकदा आपल्या बारीकसारिक गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. ह्या अश्या कथांमुळे खूप प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी.

एस's picture

9 Jun 2015 - 11:46 pm | एस

अप्रतिम!

हे मौक्तिक खास इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

नाखु's picture

10 Jun 2015 - 10:42 am | नाखु

अगदी असेच म्हणतो.
काही विधायक/प्रेरणादायी वाचायला मिळणे हे दुरापास्तच झाले आहे आज काल.

वाचक नाखु

शिव कन्या's picture

10 Jun 2015 - 6:22 pm | शिव कन्या

जे विधायक घडतेय, त्यापर्यंत पोहचणार कोण?
असो, तो वेगळा विषय झाला.
पण आपणच आपलं असं कायतरी शोधून, लिहाय वाचायचे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 11:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान.

रुपी's picture

10 Jun 2015 - 1:10 am | रुपी

खूपच छान!

स्पंदना's picture

10 Jun 2015 - 5:58 am | स्पंदना

अतिशय स्फुर्तीदायक कथा.
पण तर्री ताई यातुन त्याम्चा जीवनचरीतार्थ कसा चालतो ते नाही कळलं. म्हणजे झाडे फळांची आहेत, की आणखी काही?

शिव कन्या's picture

10 Jun 2015 - 7:15 pm | शिव कन्या

उत्तम प्रश्न. उत्तर चीनचा बराचसा भाग औद्योगिकरणाच्या जाळ्यात अडकलेला. या कथेत जी नदी उल्लेखलेली आहे, ती सुद्धा प्रदूषित आहे. खाली video clip चा धागा दिला आहे. त्यात दिसेल.तसेच एकूण जमीन आणि हवा पाहता, ती काही सुफळ झाडे वाटत नाहीत. पण, स्थानिक प्रशासनाने त्याना सुरवातीला तुटपुंजी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आणखी एका बातमीत वाचला. [त्याचा धागा हरवला बघा. मिळाला परत तर टाकीन.]
चीनच्या बेसुमार लोकांमध्ये जिथे धडधाकट लोकांनाच काम मिळायची मारामार, तिथे अपंगांना फारसे काम मिळत नाही. सुरुवात भयानकच होती. पण जसजशी झाडी मोठी होऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या कारणांसाठी वाळलेला लाकूडफाटा विकून थोडेबहुत पैसे सुटायचे. लोकांना त्यांची माहिती होऊ लागली, तशी त्यांना ते व्यक्तिगत मदत करू लागले. शिवाय, पायाने लिहून दाखवणे, विणकाम करून दाखवणे यातून मिळणारे थोडे बहुत पैसे, वेंकी मित्राला मदत म्हणून देई. पण एकूण, सगळे कष्टप्रद!
पण हे काम करता करता, त्यांच्या मनाने जी उभारी धरली ती सगळ्या संकटांवर मात करणारी आहे. आज ते म्हणतात, हि झाडं आमच्या मुलांप्रमाणे आहेत. ती विकावीशी वाटत नाहीत. आम्ही नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला यांची फळे मिळतील.
ज्यांच्याकडे खायचीही भ्रांत आहे, त्यांच्याकडे हे शहाणपण कुठून येते?

मुक्त विहारि's picture

10 Jun 2015 - 6:29 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

अत्यंत प्रेरणादायी. जादेव पायेंग ह्यांची आठवण झाली.

शिव कन्या's picture

10 Jun 2015 - 6:23 pm | शिव कन्या

होय, यशोधरा! त्या हि माणसाचे काम थोरच!

पुणेकर भामटा's picture

10 Jun 2015 - 8:31 am | पुणेकर भामटा

कुसुमाग्रजान्च्या ओळि आठ्वल्या

अनन्त आमुचि ध्येय्यासक्ति अनन्त अन आशा...
किनारा तुला पामराला...

---- कोलम्बसाचे गर्वगीत.

नूतन सावंत's picture

10 Jun 2015 - 9:40 am | नूतन सावंत

"वयम एकस्मि" हेच खरे आहे.परस्परपूरक असे दोन अर्धे एकत्र झाले की एक पूर्ण होतो.दोघांच्या जिद्दीला सलाम.त्या वेंकीला लवकर डोळा मिळो.

सानिकास्वप्निल's picture

10 Jun 2015 - 4:43 pm | सानिकास्वप्निल

उत्तम, प्रेरणादायी कथा, बरेच काही शिकण्यासारखे आहे ह्यातून.
धन्यवाद तर्री ताई.

विनोद१८'s picture

10 Jun 2015 - 5:16 pm | विनोद१८

छान प्रेरक कथा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रेरणादायक कथा !

ही कथा वाचून भारतीय जादव पायेंगची आठवण झाली. या एकांड्या शिलेदाराने आसाममध्ये १३६० एकरांत जंगल निर्माण केले आहे. त्याबद्दल मिपावर एक लेखही आल्याचे आठवते.

शिव कन्या's picture

10 Jun 2015 - 6:50 pm | शिव कन्या

वाचत असल्याबद्दल धन्यवाद. होय, त्यांचेही काम लक्षात घेण्यासारखे आहे.
पण लक्षात कोण घेतो?

मुक्त विहारि's picture

10 Jun 2015 - 9:19 pm | मुक्त विहारि

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

http://www.misalpav.com/node/21469

कथा वाचुन जयदेव पायॅंग यांची आठवण झाली.

अनुवाद आवडला.

शिव कन्या's picture

10 Jun 2015 - 6:47 pm | शिव कन्या

सुदैवाने दिसतोय.

पिलीयन रायडर's picture

10 Jun 2015 - 6:40 pm | पिलीयन रायडर

सुंदरच!!!

हाडक्या's picture

10 Jun 2015 - 8:16 pm | हाडक्या

एक तार्किक प्रश्न..
अशा गोष्टी वाचल्या की एक लॉजिकल प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे त्या हात नसलेल्याने (अथवा त्याच्या इतर कोणी कुटुंबियांनी/नात्यातल्यांनी) त्यांचा एक डोळा दुसर्‍यास दान दिला असता तर चालले नसते का ?
म्हणजे त्यातही काही अडथळे (वैद्यकिय वगैरे) आहेत का ?
अन्यथा हाच त्यांचा प्रवास किती तरी सोप्पा झाला असता असे वाटते.

आनंदी गोपाळ's picture

11 Jun 2015 - 9:57 am | आनंदी गोपाळ

१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले जाते.
२. डोळा दान केला की कोणत्याही अंधाला दृष्टी आली असे होत नाही. फक्त कॉर्निअल ऑपॅसिटी उर्फ डोळ्याची समोरची काच खराब असेल, तर बदलता येते, त्यातही जर-तर आहेतच.
३. कथेत लिहिलेला जन्मतः मोतीबिंदू व नेत्रपेढी यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही.

आनंदी गोपाळ's picture

11 Jun 2015 - 10:01 am | आनंदी गोपाळ

(प्रतिसाद देताना अर्धवट व दोनदा प्रकाशित झाला होता.)
दगड लागून खराब झालेल्या डोळ्यास मात्र नेत्रदानाने पुन्हा नजर येऊ शकते.

स्वाती दिनेश's picture

10 Jun 2015 - 8:32 pm | स्वाती दिनेश

प्रेरणादायी कथा, आवडली.
स्वाती

प्रीत-मोहर's picture

10 Jun 2015 - 8:36 pm | प्रीत-मोहर

मस्त कथा!! अत्यंत प्रेरणादायक

किसन शिंदे's picture

10 Jun 2015 - 9:24 pm | किसन शिंदे

प्रेरणादायक कथा!!

कथा वाचून जादव पायेंगच्या कथेची आठवण झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2015 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर्री तै, कथा आवडली. प्रेरणादायक.
सालं आम्ही लहान सहान गोष्टीसाठी कुढत बसतो.

-दिलीप बिरुटे

शशांक कोणो's picture

11 Jun 2015 - 9:26 am | शशांक कोणो

खूप छान लिहिलेस तर्री ताई
एकदम दिलसे आवड्या है भाव्ड्याको :)

खुपच प्रेरणादायी कथा..

सनईचौघडा's picture

11 Jun 2015 - 10:53 am | सनईचौघडा

प्रेरणादायी कथा. मानलं त्या दोघांना.

मोहनराव's picture

11 Jun 2015 - 7:31 pm | मोहनराव

धागा वाचुन तुम्ही दिलेला विडियो पाहिला. एवढे अथक परिश्रम तेही अपंग असताना फळाची अपेक्षा न बाळगता करणे म्हणजे खरंच कमाल आहे.

शिव कन्या's picture

11 Jun 2015 - 8:08 pm | शिव कन्या

कमाल तर आहेच! पण धडधाकट लोकांनी या ना त्या रुपाने आपल्या भवतालाविषयी जागरुक राहण्याची , सक्रिय होण्याची वेळ आलीय .

शिव कन्या's picture

11 Jun 2015 - 8:08 pm | शिव कन्या

कमाल तर आहेच! पण धडधाकट लोकांनी या ना त्या रुपाने आपल्या भवतालाविषयी जागरुक राहण्याची , सक्रिय होण्याची वेळ आलीय .

तेजाभाई's picture

11 Jun 2015 - 8:33 pm | तेजाभाई

कथा खुप आवडली
मनापासून धन्यवाद

अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही सातत्याने अशा नवनविन कथा उत्तम अनुवाद करुन मिसळपाववर आणता.मागच्याही सर्वच कथांची निवड विचारपूर्वक केलेली होती. धन्यवाद !

शिव कन्या's picture

11 Jun 2015 - 11:43 pm | शिव कन्या

अजया, आपल्या वाचनातील सातत्याबद्दल धन्यवाद.

चिगो's picture

11 Jun 2015 - 9:36 pm | चिगो

अपंगत्वावर एकमेकांच्या सहाय्याने केलेली ही मात खरंच प्रेरणादायी आहे.. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम करुनही जादेव पायेंगशी तुलना अप्रस्तुत आहे. कारणे दोन..
१. हे दोघे सरकारी मोबदल्यात, अत्यल्प का होईना, झाडे लावलात.. जादेवने जंगलावरील प्रेमापोटी ते केलेय.
२. स्केल: ते अपंग आहेत, हे मान्य करुनही तीन हेक्टर जंगल लागवडीची तुलना १३६० एकर जंगल उभारणीशी करता येत नाही.. थोडा जास्तच ऑब्जेक्टीव्ह झाल्याबद्दल क्षमस्व..

'ईको टास्क फोर्स'द्वारा भारतीय सैन्यपण आसाममधे कोकरझार आणि नामेरी येथे जंगल जोपासण्याचं काम करतेय. वर्षाला जवळपास ४-५ लाख झाडे लावणे व जोपासणे हे या टास्कफोर्सचं काम.. पुन्हा एकदा जादेशवी तुलना नाहीच, कारण की 'इस्टर्न प्लान्टर्स'नावाची अख्खी बटालीअन लागली आहे ह्या कामात..

शिव कन्या's picture

11 Jun 2015 - 11:53 pm | शिव कन्या

चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद. तुलना करणे अप्रस्तुत नाहीच. उलट या निमित्ताने, आपल्या देशात, बाहेर कोण कोण एकांडे शिलेदार काय आणि किती धडपड करतात, ते कळले तर चांगलेच.
होय, ETF चे काम दमदार आहे. आणि ते तसेच होणे गरजेचेही आहे.